व्यक्‍तिचित्र : संघर्ष एका वाघिणीचा | पुढारी

व्यक्‍तिचित्र : संघर्ष एका वाघिणीचा

आपल्या भावाची पाकिस्तानच्या तावडीतून मुक्तता व्हावी, यासाठी एका बहिणीने दिलेला अभूतपूर्व लढा इतिहासात अमर झाला आहे. भलेही त्याला अपेक्षित यश आले नसले तरीसुद्धा. ही बहीण म्हणजे नुकतेच निधन झालेल्या दलबीर कौर आणि त्यांचा भाऊ म्हणजे सरबजीत सिंग. त्यांच्या संघर्षाचे हे स्मरण.

निरपराध असलेल्या माझ्या भावाला दहशतवादी ठरवून पाकिस्तानने त्याची निर्घृण हत्या केली… तो चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेला होता. मात्र, त्याच्या बाबतीत कसलीही दयामाया दाखवण्यात आली नाही. मी त्याला पाकिस्तानच्या तावडीतून सोडविण्यासाठी जीवाची बाजी लावली. ते सारे प्रयत्न व्यर्थ ठरले. अखेर तो दिवस आलाच आणि माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. हे उद्गार आहेत एका भारतीय वाघिणीचे. ‘वेड्या बहिणीची वेडी ही माया’ असे म्हणतात ते खरेच आहे. आपला भाऊ सरबजीत सिंग याची पाकिस्तानच्या तावडीतून मुक्तता व्हावी यासाठी या बहिणीने दिलेला अभूतपूर्व लढा इतिहासात अमर झाला आहे.

भलेही त्याला अपेक्षित यश आले नसले तरीसुद्धा. ही बहीण म्हणजे गेल्या महिन्यात 25 तारखेला रात्री निधन झालेल्या दलबीर कौर आणि त्यांचा भाऊ म्हणजे सरबजीत सिंग. या वास्तव घटनेवर बेतलेला ‘सरबजीत’ नावाचा हृदयस्पर्शी चित्रपट काढण्यात आला होता आणि तो सुपरहिट ठरला. पाकिस्तानच्या अब्रूची लक्तरे काढणार्‍या या चित्रपटावर तिथल्या भारतद्वेष्ट्या सरकारने बंदी घातली तरी सत्य काय होते, ते सार्‍या जगाला या माध्यमातूनही कळून चुकले.

सरबजीत सिंग हा गरीब शेतकरी. 1990 मध्ये 30 ऑगस्टच्या मध्यरात्री पंजाबच्या सीमेलगत असलेल्या ‘भिकविंड’ गावातून पाकिस्तानच्या हद्दीत गेला. झीरो लाईन ओलांडली तेव्हा तिथे कुणीच पहारेकरी नव्हता. त्यानंतर काही वेळाने पाकिस्तानी रेंजर्सनी त्याला अटक केली. तिथूनच या गरीब शेतकर्‍याच्या दुर्दैवाचे दशावतार सुरू झाले. कसलीही खातरजमा न करता पाकिस्तान सरकारने त्याला दहशतवादी ठरवून टाकले. एवढेच नव्हे, तर अट्टल दहशतवादी ठरवण्यासाठी पाकिस्तानकडून त्याचे नामांतरही मनजीतसिंग रत्तू असे करण्यात आले. याच दरम्यान पाकिस्तानमध्ये लाहोर आणि फैसलाबादमध्ये बॉम्बहल्ले झाले. त्यात चौदा जणांचा मृत्यू झाला. हे हल्ले सरबजीतसिंगनेच घडवून आणले, असा दावा पाकिस्तानच्या तपास यंत्रणांनी केला. लगोलग त्याच्यावर खटला भरण्यात आला.

पाकिस्तानच्या न्यायालयात विद्युत वेगाने या खटल्याची जुजबी सुनावणी झाली आणि पाकिस्तानी लष्करी कायद्यानुसार सरबजीतला फासावर लटकावण्याचा दिवससुद्धा मुक्रर करण्यात आला. ते साल होते 1991. या एवढ्या गंभीर खटल्यात, सुनावणीच्या काळात सरबजीतला बचावाची संधी क्रूरपणे नाकारण्यात आली कारण त्याला मृत्युदंड देण्याची पाकिस्तानला अतिशय घाई झाली होती. वास्तविक, तो केवळ नजरचुकीने पाकिस्तानी हद्दीत प्रवेशकरता झाला होता, हे भारताकडून पाक प्रशासनाला पटवून देण्याचे सर्वतोपरी प्रयत्न झाले. तेव्हाचे परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांनी, हा विषय भारतातील पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयापुढे मांडला. मानवतेच्या पातळीवर विचार करून सरबजीतची सुटका केली जावी, असेही सांगितले गेले. मात्र, पाकिस्तानचे मन द्रवले नाही.

सरबजीत हा ‘रिसर्च अ‍ॅनालिसिस अँड व्रिंग’ म्हणजेच ‘रॉ’ या भारतीय गुप्तचर संघटनेचा सदस्य आहे आणि त्यानेच लाहोर व फैसलाबादेत बॉम्बस्फोट घडवून आणले, या आपल्या दाव्यावर पाकिस्तान ठाम राहिला. त्यामुळे दलबीर कौर चवताळल्या आणि आपल्या भावाला पाकिस्तानच्या कराल विळख्यातून सोडविण्यासाठी त्यांचा प्रदीर्घ लढा सुरू झाला.

दलबीर कौर यांनी तेव्हाचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांना अनेकदा फोन करून सरबजीतची कर्मकहाणी सांगितली. अखेर त्यांनी दलबीर यांना प्रत्यक्ष भेटीची वेळ दिली. ‘आम्ही तुझ्या भावाला नक्की परत आणू. तू आमच्यावर विश्वास ठेव,’ असे दलबीर यांना त्यावेळी सांगण्यात आले. त्यानंतर भारत सरकारने याकामी वेगाने पावले उचलली. तुम्ही हे सारे प्रकरण गैरसमजातून उभे केल्याचे भारताने पाकिस्तानला कडक शब्दांत बजावले.

मात्र, पाकिस्तान आपल्या भूमिकेवर ठाम राहिला. त्यामुळे दलबीर अजिबात खचल्या नाहीत. उलट त्या दुप्पट त्वेषाने पेटून उठल्या. त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, युवा नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या भेटी घेऊन त्यांना वारंवार सरबजीत प्रकरणी पावले उचलण्याची विनंती केली. मात्र, आपल्या व्यस्त कार्यक्रमातून या मंडळींनाही सरबजीतचे विस्मरण होत गेले. दरम्यानच्या काळात, दलबीर यांनी भारत आणि पाकिस्तानातील जवळपास 170 नेत्यांची भेट घेऊन सरबजीतच्या सुटकेसाठी याचना केली.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनाही त्या तिथे जाऊन भेटल्या. त्यावर शरीफ यांनी सरबजीतच्या सुटकेचा शब्द त्यांना दिला. मात्र, जर त्याच्याविरोधात ठोस पुरावे मिळाले तर त्याला पुन्हा आमच्या हवाली करावे लागेल, असे सांगण्यासही ते विसरले नाहीत. वास्तवात काहीच घडले नाही. त्यानंतर दलबीर यांनी तेव्हाचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे आपली व्यथा मांडली. दरम्यानच्या काळात याविषयाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. परिणामी डॉ. मनमोहन सिंग सरकारने सरबजीतच्या सुटकेसाठी नव्याने प्रयत्न सुरू केले. त्यालाही यश आले नाही.

वर्षे जात राहिली तरी दलबीर यांनी चिकाटी सोडली नाही. त्यांनी सरबजीतच्या सुटकेचा मुद्दा मिळेल त्या व्यासपीठावर मांडून पाकिस्तानचा भेसूर चेहरा जगासमोर आणला. या काळात त्यांना ब्रिटनमधील भारतीय वंशाचे एक वकील जॅस उप्पल यांची साथ मिळाली. त्यांनी ‘फ्री सरबजीत’ ही मोहीम आंतरराष्ट्रीय पातळीवर राबवली. खेरीज बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते रजा मुराद यांनीही सह्यांची मोहीम हाती घेतली. या मोहिमेअंतर्गत त्यांनी जून 2012 मध्ये 1,38,226 लोकांच्या सह्या जमा केल्या.

अभिनेता सलमान खान याने आपल्या ‘बिईंग ह्युमन’ या एनजीओच्या माध्यमातून सरबजीतच्या सुटकेसाठी जास्तीत जास्त लोकांचा पाठिंबा मिळवला. शेवटी या विषयाकडे पुन्हा एकदा सार्‍या देशाचे लक्ष वेधण्यासाठी दलबीर यांनी बंगळूरपासून कँडल मार्च काढला. तिथून मुंबई, नाशिक, अन्य गावे करत पुढे पूर्व बंगाल, श्रीनगर ते पंजाबमधील ‘भिकविंड’ या सरबजीतच्या गावापर्यंत त्यांनी या रॅलीच्या माध्यमातून जोरदार जनजागृती केली. त्यामुळे नाही म्हटले तरी पाकिस्तान सरकार दडपणाखाली आले.

त्यावेळी जनरल परवेझ मुशर्रफ हे पाकिस्तानचे सर्वेसर्वा होते. त्यांनी सरबजीतच्या कुटुंबीयांंना सरबजीतची भेट घेण्याची अनुमती दिली. त्यावेळी सरबजीतला पाकिस्तानातील कोट लखपत जेलमध्ये ठेवण्यात आले होते. सरबजीतची अवस्था तेव्हा दयनीय झाली होती. त्याला तशा अवस्थेत पाहून त्याची पत्नी सुखप्रीत आणि मुली स्वप्नदीप व पूनम ओक्साबोक्शी रडल्या. दलबीर यांनाही सरबजीतच्या भेटीची परवानगी देण्यात आली. तिथेही त्यांनी सरबजीत कसा निरपराध आहे, हे पटवून देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला.

तथापि, याच काळात सरबजीत प्रकरणातील एक साक्षीदार शौकत सलीम याने पोलिसांच्या दडपणाखाली आपण खोटी साक्ष दिल्याचे मान्य केले. त्यानंतर पाकिस्तानात या सलीमच्या विरोधात आगडोंब उसळला. मग लगेचच या सलीमने आपण तसे बोललोच नाही, अशी राजकीय छापाची भूमिका घेतली. सरबजीतने तब्बल पाच वेळा तेव्हाचे पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्याकडे दयेची याचना केली. त्यांनी प्रत्येक वेळी ही याचना निष्ठुरपणे फेटाळून लावली.

अखेर 27 जून 2012 रोजी मुशर्रफ यांनी सरबजीतची फाशी रद्द करून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याचे वृत्त येऊन थडकले. त्यामुळे सरबजीतचे कुटुंब आणि ‘भिकविंड’ या गावाने त्यादिवशी दिवाळी साजरी केली. कारण, आता सरबजीच्या सुटकेचा मार्ग मोकळा होणार होता. वास्तविक, सरबजीतने आधीच पाकिस्तानी तुरुंगात 22 वर्षे काढली होती. पाकिस्तानी कायद्यानुसार, जन्मठेपेच्या शिक्षेचा कालावधी चौदा वर्षे आहे. भारतानेही पाकिस्तानच्या या कृतीचे स्वागत केले. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळे होते.

तो काळा दिवस होता 26 एप्रिल 2013. लाहोरमधील कोट लखपत जेलमध्ये सरबजीतवर अन्य कैद्यांनी हल्ला चढवला. या अमानुष हल्ल्यात सरबजीतच्या देहाच्या चिंधड्या उडाल्या. त्याच्या कवटीचे तुकडे झाले. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला जिना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि तिथे काही दिवस त्याला तशाच अवस्थेत ठेवून उपचार सुरू असल्याचे नाटक रंगवण्यात आले. दरम्यानच्या काळात तिथले डॉक्टर फोनवरून दलबीर यांना खोटा दिलासा देत होते.

अखेर काही दिवसांतच सरबजीत शहीद झाल्याची बातमी वार्‍यासारखी पसरली आणि सरबजीतच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. खास विमानाने त्याचा मृतदेह भारतात आणून, पंजाबमध्ये हजारोंच्या उपस्थितीत सरबजीतला अंतिम निरोप देण्यात आला. सरबजीतचे भारतात पोस्टमार्टेम करण्यात आले तेव्हा त्याचे अनेक अवयव आधीच काढून घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे भारतात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली. एक खरे की, आपल्या भावाला वाचविण्यात दलबीर यांना भलेही यश आले नाही, तरी त्यांनी पाकिस्तानच्या विरोधात दिलेला कडवा लढा इतिहासात अमर झाला आहे.

उमंग कुमार यांनी रणदीप हुड्डा आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांना घेऊन या विषयावर काढलेला ‘सरबजीत’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटातील सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिकेत अक्षरशः जीव ओतला. रणदीपने अठरा किलो वजन घटवून चंदेरी पडद्यावर हुबेहूब सरबजीत साकारला. त्यामुळे दलबीर यांनी रणदीपला आपला भाऊ मानले. एवढेच नव्हे, तर ‘माझ्या मृत्यूनंतर तू मला खांदा देशील,’ असेही वचन त्याच्याकडून दलबीर यांनी घेतले होते. काही दिवसांपूर्वी दलबीर यांना देवाज्ञा झाली, तेव्हा आपल्या व्यस्त वेळापत्रकातून मुद्दाम वेळ काढून रणदीपनेही हे वचन पाळले.

सुनील डोळे

Back to top button