क्रीडा : स्वप्नवत विजेतेपद! | पुढारी

क्रीडा : स्वप्नवत विजेतेपद!

राष्ट्रीय स्तरावर अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या रणजी स्पर्धेत मुंबईचा कायमच दबदबा राहिला आहे. तब्बल 41 वेळा अजिंक्यपद मिळविणार्‍या मुंबईकरांना तुलनेने दुय्यम मानल्या गेलेल्या मध्य प्रदेशने अंतिम फेरीत धूळ चारली. त्यांची ही कामगिरी प्रस्थापित संघांना धक्का देणारी आणि आत्मपरीक्षण करणारीच ठरली आहे.

प्रत्येक खेळाडू कारकिर्दीत सर्वोच्च यश मिळविण्याचे स्वप्न पाहत असतो. हे स्वप्न साकारण्यासाठी तो अथक प्रयत्न करतो; मात्र काही वेळेला त्याचे हे स्वप्न साकार होत नाही. आपले अपुरे राहिलेले स्वप्न तो आपल्या मुलांद्वारे किंवा शिष्यांद्वारे साकार करण्याचा आटोकाट प्रयत्न करतो आणि त्यामध्ये त्याला यशही मिळते. मुंबईचे ज्येष्ठ क्रिकेटपटू व प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्याबाबत असेच म्हणावे लागेल. मध्य प्रदेशचा कर्णधार म्हणून काम करताना अपुरे राहिलेले रणजी करंडकाचे स्वप्न त्यांनी मध्य प्रदेशच्या खेळाडूंना मार्गदर्शन करीत यंदा साकार केले. मध्य प्रदेश खेळाडूंनी जिद्द, महत्त्वाकांक्षा आणि सांघिक कौशल्य याच्या जोरावर ऐतिहासिक विजेतेपद मिळविले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

राष्ट्रीय स्तरावर अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या रणजी स्पर्धेत मुंबईचा कायमच दबदबा राहिला आहे. तब्बल 41 वेळा अजिंक्यपद मिळविणार्‍या मुंबईकरांना तुलनेने दुय्यम मानल्या गेलेल्या मध्य प्रदेशने अंतिम फेरीत धूळ चारली. मुंबईबरोबरच कर्नाटक, पंजाब, दिल्ली इत्यादी संघांनी रणजी स्पर्धेत कायमच आपले वर्चस्व निर्माण केले आहे. त्यांच्या तुलनेत मध्य प्रदेश संघ विजेता होईल, अशी क्रिकेट पंडितांनी कधी फारशी अपेक्षा केली नव्हती. वलयांकित आणि मातब्बर खेळाडूंचा अभाव असतानाही मध्य प्रदेशच्या खेळाडूंनी प्रत्येक सामन्यानंतर आपली कामगिरी उंचावत ‘रणजी करंडका’वर नाव कोरले. त्यांची ही कामगिरी प्रस्थापित संघांना धक्का देणारी आणि आत्मपरीक्षण करणारीच ठरली आहे.

संबंधित बातम्या

रणजी स्पर्धा हा खेळाचा आत्मा

रणजी करंडक स्पर्धा ही एकेकाळी भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी असलेली हुकमी स्पर्धा मानली जात असे. या स्पर्धेत खेळण्यासाठी नवोदित व युवा खेळाडू कसोशीने प्रयत्न करीत असत. दुर्दैवाने मर्यादित षटकांच्या स्पर्धांमुळे रणजी स्पर्धेचे महत्त्व कमी झाले. त्यामुळेच की काय, रणजी आणि तत्सम स्थानिक स्पर्धांकडे अनेक दिग्गज खेळाडू पाठ फिरवीत असतात. खेळपट्टीवर फलंदाजी केली तर धावा मिळविण्याचे कौशल्य आत्मसात करता येते. या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खेळपट्ट्यांवर वेगवेगळे कौशल्य असलेल्या गोलंदाज व फलंदाजांसमवेत खेळण्याची संधी मिळते. परिपूर्ण खेळाचे ज्ञान अशा स्पर्धेमुळेच आत्मसात करता येते.

राष्ट्रीय संघातील एखादा खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर अपयशी होत असेल, तर त्याला रणजीसारख्या स्थानिक सामन्यांमध्ये खेळण्याचाही सल्ला दिला जातो. त्यामुळेच रणजी स्पर्धा ही क्रिकेटचा आत्माच मानली जाते. असे असूनही अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू वेगवेगळी कारणे देत स्थानिक स्पर्धांना कमी महत्त्व देतात. त्यांच्या या वृत्तीचा फायदा घेत, गेल्या चार-पाच वर्षांमध्ये अनेक दुय्यम मानल्या गेलेल्या संघांनी स्थानिक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे आणि राष्ट्रीय निवड समितीच्या सदस्यांना आपल्या कामगिरीची गांभीर्याने दखल घ्यायला लावली आहे.

‘चक दे इंडिया’ या चित्रपटात कबीर खान हा हॉकी प्रशिक्षक भारतीय महिला हॉकी संघाची बांधणी करतो आणि भारताला विश्वचषक स्पर्धा जिंकून देतो. या कबीर खानप्रमाणेच मध्य प्रदेशचे प्रशिक्षक पंडित यांनी अक्षरशः शून्यातून संघाची बांधणी केली आणि स्वप्नवत अजिंक्यपद पटकावले. अर्थात त्यांची ही कामगिरी खूप काही सोपी नव्हती. एक अशक्यप्राय आव्हानच त्यांच्यापुढे होते. दोन वर्षांपूर्वी त्यांच्याकडे हे प्रशिक्षकपद सोपविण्यात आले.

क्रिकेटमध्ये खेळाडू व प्रशिक्षक या दोन्हींबाबत पंडित यांनी चार पावसाळे पाहिले आहेत, असे म्हटले तर ते फारसे वावगे ठरणार नाही. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई संघाने 2002-03, 2003-04 तसेच 2015-16 मध्ये रणजी करंडक जिंकला होता. फारसे वलयांकित खेळाडू नसलेला विदर्भ संघ रणजी करंडकावर नाव कोरेल, असे कधी कोणी भाकितही केले नव्हते. परंतु पंडित यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली 2017-18 मध्ये विदर्भ संघाने सनसनाटी विजेतेपद मिळवले. विजेतेपद मिळण्यापेक्षाही ते टिकवणे हे मोठे आव्हान असते, असे नेहमी म्हटले जाते. मात्र विदर्भ संघाने पुन्हा 2018-19 मध्ये रणजी स्पर्धा जिंकली.

पंडित यांच्याकडे मध्य प्रदेश संघाचे प्रशिक्षक पद सोपविण्यात आले. कोरोना महामारीच्या काळात त्यांच्याकडे ही जबाबदारी आल्यानंतर अनेक आव्हाने उभी राहिली होती. संघातील खेळाडू निवडण्यापासून त्यांची शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे इत्यादी अनेक गोष्टींबाबत त्यांची कसोटी होती. मध्य प्रदेशमधील शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही त्यांनी नैपुण्य शोधमोहीम घेतली. टाळी कधी एका हाताने वाजत नाही, असे म्हटले जाते. त्याप्रमाणेच पंडित यांच्याकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवताना मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेने त्यांना सर्वच गोष्टींबाबत स्वातंत्र्य दिले. एवढेच नव्हे, तर खेळाडूंसाठी आवश्यक असणार्‍या सर्व सुविधा दिल्या. त्यामुळे पंडित यांचे काम अधिकच सोपे झाले.

विजेतेपदाचा निर्धार

मध्य प्रदेशमधील क्रिकेट पंडित यांच्यासाठी नवीन नव्हते. सहा वर्षे त्यांनी या संघाकडून खेळाडू म्हणून प्रतिनिधित्व केले होते. सन 1998-99 मध्ये त्यांच्याच नेतृत्वाखाली मध्य प्रदेश रणजी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती, त्यावेळी त्यांना पहिल्या डावात आघाडी मिळूनही नंतर निर्णायक पराभवास सामोरे जावे लागले होते. या पराभवाची बोच कायमच पंडित यांना वाटत होती. त्यामुळेच जेव्हा मध्यप्रदेशचे प्रशिक्षकपद त्यांच्याकडे आले, तेव्हा त्यांनी या संघाला विजेतेपद मिळवून द्यायचा निर्धार ठेवला. खेळाडू व प्रशिक्षक यांच्यामध्ये द़ृढविश्वास आणि सुसंवाद असेल, तर आपोआपच खेळाडू आणि पर्यायाने संघाची कामगिरी सर्वोत्तम होते हे लक्षात घेऊनच, त्यांनी संघातील खेळाडूंच्या क्षमतेबाबत विश्वास ठेवला आणि त्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन केले.

सातत्यपूर्ण फलंदाजी

फलंदाजीमध्ये यश दुबे (दोन शतकांसह 600 हून अधिक धावा), रजत पाटीदार (पाच अर्धशतके व दोन शतके), अठरा वर्षीय खेळाडू अक्षत रघुवंशी (तीन अर्धशतके व एक शतक), शुभम शर्मा (चार शतकांसह 600 हून अधिक धावा तसेच अंतिम सामन्यात यश दुबेच्या साथीत द्विशतकी भागीदारी), यष्टीरक्षक व सलामीवीर हिमांशू मंत्री (उपांत्य फेरीत महत्त्वपूर्ण शतकी खेळी) यांनी मध्य प्रदेशच्या यशामध्ये सिंहाचा वाटा उचलला. क्रिकेटमध्ये कारकीर्द करण्यासाठी उत्तर प्रदेशमधील आपले गाव सोडून आलेला कुमार कार्तिकेय हा उज्ज्वल भवितव्य लाभलेला गोलंदाज आहे.

मुंबई इंडियन्सने त्याला संघातील खेळाडूंच्या सरावासाठी पाचारण केले होते. कार्तिकेय याने यंदाच्या रणजी स्पर्धेत मध्य प्रदेश संघाकडून 32 गडी बाद करीत संघाच्या विजयास मोठा हातभार लावला. त्याला गौरव यादव, पार्थ सहानी, सारांश जैन, अनुभव आगरवाल इत्यादी गोलंदाजांची महत्त्वपूर्ण साथ लाभली. आदित्य श्रीवास्तव याने कर्णधारपदाची धुरा सांभाळताना प्रत्येक वेळी आपल्या सहकारी खेळाडूंवर सार्थ विश्वास ठेवला. त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन देत त्यांच्याकडून संघासाठी आवश्यक असणारी कामगिरी करून घेतली.

मध्य प्रदेश संघाने मिळविलेल्या विजेतेपदाचा बोध घेत अन्य संघांच्या खेळाडू, प्रशिक्षक व संघ व्यवस्थापकांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. विशेषतः मुंबई व महाराष्ट्र या संघांनी आपल्या कामगिरीबाबत गांभीर्याने विचार केला पाहिजे. या दोन्ही संघांमध्ये आंतरराष्ट्रीय सामने व आयपीएलचा प्रदीर्घ अनुभव असलेले खेळाडू आहेत. संघांमधील खेळाडूंची निवड करताना त्यांची स्थानिक सामन्यांमधील कामगिरी, शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती याचाही सखोल अभ्यास त्यांच्या निवड समितीने केला पाहिजे.

‘रणजी स्पर्धा’ हीच खर्‍या अर्थाने क्रिकेटचा आत्मा मानली जाते. हे लक्षात घेऊनच महाराष्ट्र व मुंबईच्या क्रिकेट पदाधिकार्‍यांनी भविष्यातील संघ उभारणीसाठी योग्य रितीने नियोजन केले पाहिजे. केवळ निवड चाचणी स्पर्धेवर अवलंबून न राहता, खेळाडूंना स्थानिक स्पर्धांमधील भरपूर अनुभव घेण्याबाबत अनिवार्य केले पाहिजे. एक मात्र नक्की की, गेल्या काही वर्षांमध्ये राजस्थान, विदर्भ आणि आता मध्य प्रदेश यांच्यासारखे फारसे चर्चेत नसलेले संघ रणजी स्पर्धेत वर्चस्व गाजवू लागले आहेत. कोणताही संघ दुय्यम नसतो. कधी ना कधीतरी हा संघदेखील सर्वोच्च स्थान घेऊ शकतो, हेच मध्य प्रदेशने दाखवून दिले आहे.

मिलिंद ढमढेरे

Back to top button