‘नाटो’चं नवं सुरक्षा तंत्रज्ञान | पुढारी

‘नाटो’चं नवं सुरक्षा तंत्रज्ञान

गर्दीच्या ठिकाणी सुरक्षेचं योग्य नियोजन करणं हा सरकार समोरचा सगळ्यात मोठा टास्क असतो. त्यावर उपाय म्हणून रडार यंत्रणा, लेझर सेन्सर आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी म्हणून ‘नाटो’नं एक नवं तंत्रज्ञान आणलंय.

लोकसंख्येत भारत जगात दुसर्‍या क्रमांकाचा देश आहे. इथं अंतर्गत आणि बाह्यसुरक्षा फार महत्त्वाची ठरते. आपल्या रोजीरोटीसाठी मोठा गोतावळा शहरांकडे वळतो. मुंबईच्या लोकल ट्रेनची गर्दी पाहून अनेकांना धडकी भरते. गर्दीमुळे आत पाय टाकावा की नाही, याच्या भीतीने अनेकांचं टेन्शन वाढतं. त्यामुळे कधी एक पाय मागंही येतो. कुंभमेळ्यासारख्या अनेक धार्मिक कार्यक्रमांमधल्या गर्दीचे रेकॉर्ड तर डोळे दिपवणारे असतात.

ही गर्दी कधी कधी सुरक्षा यंत्रणांसमोरचं आव्हान ठरतं. गर्दीच्या ठिकाणी सुरक्षेचं योग्य नियोजन करणं हा सगळ्यात मोठा टास्क असतो. बॉम्बस्फोट, हल्ल्यांसारख्या घटनांवेळी सरकारचा कस लागतो. कारण ही गर्दी दहशतवाद्यांचं सॉफ्ट टार्गेट ठरू शकते. अशा वेळी गर्दीवरच्या नियंत्रणासाठी म्हणून ‘नाटो’नं आणलेलं एक नवं तंत्रज्ञान आपल्यासाठी वरदान ठरू शकतं.

जगातल्या 29 देशांचा सहभाग असलेली ‘नाटो’ ही एक लष्करी संघटना आहे. ‘सायन्स फॉर पीस अँड सिक्युरिटी’ हा ‘नाटो’च्या नागरी सुरक्षेसंबंधीचा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. ‘नाटो’चे सदस्य, भागीदारी देशांमधला संवाद वाढवणं आणि त्यांच्यातल्या व्यावहारिक सहकार्याला प्रोत्साहन देण्याच्या द‍ृष्टीने या कार्यक्रमाची आखणी करण्यात आलीय.

मागच्या दशकभरात जगभरातली महत्त्वाची रेल्वे स्थानकं, विमानतळं, स्टेडियम आणि इतर ठिकाणी अनेक दहशतवादी हल्ले झाले. त्यामुळे पायाभूत सुविधांचं नुकसान झालंच शिवाय मोठ्या प्रमाणात जीवितहानीही झाली. या पार्श्‍वभूमीवर ‘नाटो’च्या ‘सायन्स फॉर पीस अँड सिक्युरिटी’नं 2018 ला ‘डेक्स्टर’ नावाच्या सुरक्षासंबंधी प्रोजेक्टची घोषणा केली. त्यासाठी 5.3 मिलियन डॉलरची तरतूद करण्यात आली. मागच्या तीन वर्षांपासून या प्रकल्पावर काम चालू होतं.

गर्दीच्या ठिकाणी दहशतवाद्यांचा मुकाबला करणं आणि बंदुका, स्फोटकं शोधण्यासाठी म्हणून ‘डेक्स्टर’ हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आलंय. सध्या हे प्रायोगिक तत्त्वावर असलं तरी पुढच्या दोन वर्षांमध्ये याला व्यावसायिक स्वरूप मिळेल, असं या कार्यक्रमाचे प्रमुख डेनिज बेटन यांनी फ्रान्सची वृत्तसंस्था असलेल्या एएफसीला म्हटलंय. या प्रोजेक्टवर ‘नाटो’चे सदस्य आणि भागीदारी देशांच्या 11 संशोधन संस्था काम करतायत. इटलीच्या रोममधल्या एका रेल्वे स्टेशनवर 24 मे 2022 ला प्रायोगिक तत्त्वावर ‘डेक्स्टर’ची चाचणी घेण्यात आली होती. त्यासाठी ‘मायक्रोवेव्ह इमेजिंग कर्टन’, ‘एक्स्प्लोसिव्ह ट्रेस डिटेक्शन सेन्सर’ आणि ‘इंटिग्रेटेड सिस्टीम फॉर थ्रीट अर्ली डिटेक्शन’ या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय.

इटलीत याचा पहिला प्रयोग झाला. हे कसं चालतं? तर सुरुवातीला प्रवाशांचं कॅमेरा ट्रॅकिंगच्या मदतीने एक हिरवं थ्रीडी चित्र कॉम्प्युटरमध्ये कैद केलं जातं. लेझर सिस्टीमचा वापर करून ही थ्रीडी चित्रं भुयारी मार्गांच्या कॉरिडॉरमध्ये मोठ्या स्क्रीनवरही दाखवली जातात. त्यासाठी सेन्सर आणि सॉफ्टवेअर तंत्रज्ञान एकत्रित करण्यात आलंय.

समजा, एखाद्या प्रवाशानं बंदूक किंवा इतर काही शस्त्र आपल्या सोबत ठेवली असतील, तर ते या थ्रीडी चित्रात लाल रंगात चमकू लागतं. ही बंदूक किंवा शस्त्र शोधण्यासाठी ‘मायक्रोवेव्ह इमेजिंग कर्टन’ नावाचं तंत्रज्ञान वापरलं गेलंय. जर कोणत्या प्रवाशाकडे संशयास्पद काही आढळलं तर रडार यंत्रणा, सेन्सर आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने पोलिस आणि सुरक्षा कर्मचार्‍यांच्या स्मार्टग्लासवर मेसेज पोहोचतो. त्यातून पुढचा धोका टाळता येऊ शकतो.

भारतात आजपर्यंत अनेक दहशतवादी हल्ले झालेत. 26/11 चा मुंबईवरचा हल्ला असू दे किंवा संसदेवर झालेला हल्ला. या हल्ल्यांमुळे मोठं नुकसान झालं. 26/11 ला मुंबईच्या सीएसटी स्टेशनवरच्या दहशतवादी हल्ल्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. आपल्या देशात कुंभमेळ्यासारखे मोठे धार्मिक कार्यक्रम होतात. तिथल्या गर्दीमुळे सुरक्षेचा प्रश्‍नही असतो. अशा वेळी ‘नाटो’चं नवं तंत्रज्ञान फायद्याचं ठरू शकतं.

या तंत्रज्ञानामुळे प्रवाशांची गर्दी आणि सार्वजनिक ठिकाणी असलेल्या लोकांवर लक्ष ठेवणं सोपं जाईल. लेझर सिस्टीमचा वापर करून थ्रीडी चित्रं भुयारी मार्गांच्या कॉरिडॉरमध्ये मोठ्या स्क्रीनवरही दाखवता येणं शक्य आहे. शिवाय लवकरच व्यावसायिक स्वरूपात हे तंत्रज्ञान येण्याची शक्यता असल्यामुळे भारतासारखी मोठी लोकसंख्या असलेल्या देशाला त्याचा फायदाच होईल. त्यामुळे दहशतवादी हल्ल्यांआधीच सर्वसामान्यांची सुरक्षा करणं सोपं जाईल. युक्रेन आणि रशियाच्या युद्धाला अद्यापही पूर्णविराम मिळालेला नाही. त्यामुळे ‘नाटो’चं लक्ष युरोपच्या सुरक्षेकडे वळलंय. या पार्श्‍वभूमीवर ‘डेक्स्टर’ तंत्रज्ञान हे ‘नाटो’च्या दहशतवादविरोधी कृती योजनेतलं एक महत्त्वाचं पाऊल म्हणता येईल.

– अक्षय शारदा शरद

Back to top button