‘मोदी-मॅजिक’चे विश्‍लेषण करणारा ग्रंथ | पुढारी

‘मोदी-मॅजिक’चे विश्‍लेषण करणारा ग्रंथ

– डॉ. योगेश प्र. जाधव

भारतातील विविध मान्यवरांनी लिहिलेल्या लेखांचा हा संग्रह वाचकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनाबद्दल आणि कार्याबद्दल आंतरद‍ृष्टी देतो. ग्रामीण ते शहरी, उद्योग ते पायाभूत सुविधा, विज्ञान आणि तंत्रज्ञान ते कला आणि संस्कृती, अर्थव्यवस्था ते आरोग्य आणि संरक्षणापासून शिक्षण… अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये होत असलेल्या बदलांचे विहंगम चित्र उभे करतो.

एकविसाव्या शतकाचे भारतातील आगमन आणि राष्ट्रीय आघाडीवर उत्कृष्ट राजकीय व्यक्‍तीचा उदय, या दोन समानार्थी घटना होत. नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी 7 ऑक्टोबर 2001 रोजी निवडणुकीत लोकनियुक्‍त प्रतिनिधी बनण्याचा बहुमान सर्वप्रथम प्राप्‍त केला आणि आता 20 वर्षांनंतर त्यांनी जे साध्य केले आहे, ते इतर कोणी त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत साध्य करण्याची आशा करू शकत नाही. लोकप्रिय नेते बनणे आणि इतर सर्वांपेक्षा आपली योग्यता सतत उच्च राखणे! लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारचे प्रमुख म्हणून ते गेली 20 वर्षे अखंडितपणे काम पाहत आहेत. साडेबारा वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून, तर आठ वर्षे भारताचे पंतप्रधान म्हणून! भारतासारख्या जगभरातील इतर कोणत्याही लोकशाही राज्यव्यवस्थेसाठी ही एक अनोखी घटना आहे.

वंचित सामाजिक आणि आर्थिक पार्श्‍वभूमी असलेला माणूस म्हणून मोदींना कोणतेही वारशाने चालत आलेले विशेषाधिकार लाभले नाहीत. ते उच्चभ्रूंच्या महाविद्यालयात गेले नाहीत आणि त्यांच्या आधी भारतावर राज्य करणार्‍या कोणत्याही उच्चभ्रूंच्या नेटवर्कचा भागही ते कधी झाले नाहीत. तरीही त्यांचे कठोर परिश्रम आणि लोकांच्या उत्थानाची तळमळ यामुळे ते केवळ निवडणुकीच्या क्षेत्रातच अपराजित राहतील असे नव्हे, तर मोठ्या प्रमाणात लोकप्रियता, सार्वजनिक प्रशंसा, सुशासनाचा नमुना आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारतातील सर्वात विश्‍वासार्ह सार्वजनिक व्यक्‍तिमत्त्व म्हणूनही ते अपराजित राहतील, हे निश्‍चित झाले आहे.

मोदींच्या संकल्पनेला केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही लोकप्रियता लाभली आहे. त्यांची लोकप्रियता वर्ग, जात, देश, लिंग, प्रदेश, लोकसंख्या किंवा वयाच्या भिंती ओलांडून गेली आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ या संकल्पनेसाठी जनभागीदारी म्हणजे सर्वसमावेशकता आणि सहभागी प्रशासनावरचा त्यांचा अढळ विश्‍वास हाच त्यांच्या नेतृत्वाचा आधारस्तंभ आहे आणि हीच मोदींची जादू आहे.

‘मोदी अँड 20 : ड्रीम्स मीट डिलिव्हरी’ हा पंतप्रधान मोदींचा चमत्कार उलगडून दाखविण्याचा आणि त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणार्‍या नामवंत व्यक्‍तींच्या द‍ृष्टिकोनातून त्यांची धोरणे समजून घेण्याचा एक सुस्पष्ट आणि अभ्यासपूर्ण प्रयत्न आहे. पाच विभागांचा समावेश असलेला हा एकवीस अध्यायांचा ग्रंथ म्हणजे 22 प्रख्यात विषयतज्ज्ञांकडून पंतप्रधान मोदींच्या देशाशी आणि देशवासीयांशी असलेल्या अतुलनीय बांधिलकीची साक्ष देणारा अतुलनीय प्रयत्न आहे. दिवंगत लता मंगेशकर यांनी या ग्रंथाला लिहिलेली प्रस्तावना म्हणजे गानकोकिळेच्या पंतप्रधानांशी असलेल्या दीर्घकालीन ऋणानुबंधावर आणि भारताच्या विकासगाथेच्या असंख्य पैलूंवर टाकलेला प्रकाश होय.

ग्रंथाचा पहिला भाग पंतप्रधानांच्या धोरणांच्या सामाजिक प्रभावाचा धांडोळा घेतो. दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू यांनी पंतप्रधानांच्या युवकांशी असलेल्या संपर्काबाबत आणि समस्या सोडविण्याच्या क्षमतेबाबत भाष्य केले आहे. ‘अपोलो’ समूहातील शोबना कामिनेनी यांच्या ‘महिला सक्षमीकरणाचे नवीन व्याकरण’ या लेखात महिला सक्षमीकरणाविषयी माहिती देण्यात आली आहे. ‘लोककेंद्री द‍ृष्टिकोनाचे यश’ या प्रकरणात अर्थतज्ज्ञ सुरजित भल्ला यांनी विषयाची मांडणी केली आहे. अंतिम माणसापर्यंत मदत पोहोचवून गरिबी निर्मूलन करण्याच्या मोदींच्या धोरणांच्या परिणामाविषयी त्यांनी भाष्य केले आहे.

दुसरा विभाग पंतप्रधानांच्या धोरणांच्या राजकीय परिणामांचा आढावा घेणारा आहे. अमिष त्रिपाठी यांनी पंतप्रधानांच्या सांस्कृतिक पुनरुज्जीवनविषयक धोरणांचा आढावा घेतला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी ‘लोकशाही, वितरण आणि आशेचे राजकारण’ या प्रकरणात मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचा राजकीय प्रवास अधोरेखित केला आहे. प्रदीप गुप्‍ता हे भारतातील सर्वात विश्‍वासार्ह मनोवैज्ञानिकांपैकी एक असून, त्यांनी मोदींनी निवडणुका लढवण्याचा मार्ग कायमस्वरूपी कसा बदलला याविषयी भाष्य केले आहे.
तिसरा विभाग आर्थिक धोरणांविषयीचा आहे. भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार अनंता नागेश्‍वरन यांनी मोठा विचार मांडण्याच्या आणि नंतर त्याची अंमलबजावणी करण्याच्या मोदींच्या अद्वितीय क्षमतेचा शोध घेतला आहे. प्रा. अरविंद पनगडिया हे भारतातील सर्वात प्रतिष्ठित अर्थतज्ज्ञ असून, आर्थिक सुधारणांच्या प्रक्रियेत मोदींच्या कार्यकाळात जे साध्य झाले, त्याचा खोलवर अभ्यास करून विचार मांडले आहेत. प्रतिष्ठित अर्थतज्ज्ञ आणि लेखिका डॉ. शमिका रवी यांनी, सूक्ष्म अर्थशास्त्र तसेच मोदींनी गरिबांचे सक्षमीकरण कसे केले यावर विचार करताना त्यांचे अद्वितीय डेटा विश्‍लेषण कौशल्य वापरले आहे. उदय एस. कोटक यांनी संपत्ती निर्माण करणार्‍यांविषयीचा पंतप्रधानांना वाटणारा आदर आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचे त्यांचे तत्त्वज्ञान याविषयी विचार मांडले आहेत.

चौथ्या विभागात मोदींनी आणलेल्या प्रशासनाच्या नव्या प्रतिमानांचा वेध घेण्यात आला आहे. इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे अजय माथूर यांनी विकास आणि पर्यावरण संरक्षण यांच्यातील संघर्ष टाळून साधलेल्या परस्पर संवादांचा शोध घेतला आहे. भारतातील अग्रगण्य कृषिशास्त्रज्ञ प्रा. अशोक गुलाटी यांनी, शेतीच्या क्षेत्रातील व्यवस्थापनाविषयी लिहिले आहे. भारतातील अग्रगण्य वैद्यकीय व्यावसायिक डॉ. देवी शेट्टी यांनी कोव्हिड-19 च्या साथरोगाच्या व्यवस्थापनात प्रशासनाचा जो प्रतिसाद राहिला, त्याचे विश्‍लेषण केले आहे. नंदन नीलेकणी यांनी वैयक्‍तिक किस्से सांगून अशी मांडणी केली आहे की, मोदींनी दैनंदिन प्रशासनात तंत्रज्ञान कसे समायोजित केले आणि ते शासनाचे एक अमिट साधन कसे बनवले. सद‍्गुरू जग्गी वासुदेव यांच्या ‘द पॉवर ऑफ मासेस अँड मास मुव्हमेंट’ या प्रकरणात त्यांनी मोदींच्या ‘लोकसहभागातून विकास’ या मॉडेलविषयी मते मांडली आहेत. त्यांनी गुजरात सरकारच्या 2003 च्या कन्या केलवानी साक्षरता चळवळीचा संदर्भ दिला असून, या योजनेत मुलींवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते.

शेवटचा विभागात भारत उर्वरित जगाशी कसा व्यवहार करतो याचा शोध घेण्यात आला आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मोदींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सुरक्षिततेशी संबंधित बाबी हाताळण्याच्या त्यांच्या पहिल्या अनुभवावर तपशीलवार आणि वैचारिक प्रगल्भतेने भाष्य केले आहे. जवळजवळ तीन दशकांपासून पंतप्रधानांना वैयक्‍तिकरीत्या ओळखणार्‍या दोन व्यक्‍ती म्हणजे ब्रिटनमधील मनोज लाडवा आणि अमेरिकेतील भरत बारई. या दोघांनी वैयक्‍तिक किस्से सांगितले आहेत. मोदींनी जगात देशाच्या वाढविलेल्या सामर्थ्याचे दर्शन घडविणार्‍या आठवणी त्यांनी सांगितल्या आहेत. शेवटच्या प्रकरणात भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी, 2014 पासूनचे भारताचे परराष्ट्र धोरण आणि आंतरराष्ट्रीय समुदायात पंतप्रधानांनी जो भविष्यकेंद्रित द‍ृष्टिकोन मांडला, त्याचा वेध घेतला आहे.

विश्‍लेषणात्मक आणि संशोधनात्मक अशा सर्वसमावेशक वृत्तीने भारतातील विविध व्यक्‍तींनी लिहिलेल्या लेखांचा हा संग्रह वाचकांना शतकातील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या राजकारण्यांपैकी एक असलेल्या मोदींच्या जीवनाबद्दल आणि कार्याबद्दल आंतरद‍ृष्टी देतो. ग्रामीण ते शहरी, उद्योग ते पायाभूत सुविधा, विज्ञान आणि तंत्रज्ञान ते कला आणि संस्कृती, अर्थव्यवस्था ते आरोग्य आणि संरक्षणापासून शिक्षण… अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये होत असलेल्या बदलांचे विहंगम द‍ृश्य नजरेसमोर आणणारा हा ग्रंथ आहे. विद्यार्थी, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ तसेच देशातील आणि परदेशांतील ज्यांना ज्यांना मोदींची जादू समजून घ्यायची आहे, अशा सर्वांसाठी हा एक खजिनाच आहे.

Back to top button