सिंहायन आत्मचरित्र : कन्या सासुर्‍यासी जाये पुढील पिढीची वाटचाल | पुढारी

सिंहायन आत्मचरित्र : कन्या सासुर्‍यासी जाये पुढील पिढीची वाटचाल

डॉ. प्रतापसिंह ऊर्फ बाळासाहेब ग. जाधव मुख्य संपादक, दैनिक पुढारी

पाच नोव्हेंबर 2020 रोजी ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. तसेच त्यांनी ‘पुढारी’ची सूत्रे 1969 साली हाती घेतली. त्यांच्या पत्रकारितेलाही 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘पुढारी’ हे विविध चळवळींचे प्रथमपासूनचे व्यासपीठ. साहजिकच, संयुक्‍त महाराष्ट्र लढ्यापासून अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचे ते साक्षीदार आहेत. केवळ साक्षीदार नव्हे, तर सीमाप्रश्‍नासह अनेक आंदोलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. पाऊण शतकाचा हा प्रवास; त्यात कितीतरी आव्हाने, नाट्यमय घडामोडी, संघर्षाचे प्रसंग! हे सारे त्यांनी शब्दबद्ध केले आहेत, ते या आत्मचरित्रात. या आत्मचरित्रातील काही निवडक प्रकरणे ‘बहार’मध्ये क्रमशः प्रसिद्ध करण्यात येत आहेत. – संपादक, बहार पुरवणी

वर्ष 1993…
‘अर्थो हि कन्या परकीय एव तामद्य सम्प्रेष्य परिगृहीतुः।
जातो ममायं विशदः प्रकामं प्रत्यर्पितन्यास इवान्तरात्मा॥

‘मुलगी हे वस्तुतः परक्याचं धन असतं. ते एक अनमोल रत्न. ती दुसर्‍याची अमानत. ज्याची त्याच्याकडे सोपवताना कन्या वियोगाचं दुःख तर होणारच; पण त्याहूनही एका मोठ्या कर्तव्यातून मुक्‍त झाल्याचं समाधानही पित्याला मिळत असतं.’
महाकवी कालिदासाच्या ‘अभिज्ञान शाकुंतल’ या नाटकातील हा चिरंतन श्‍लोक. श्‍लोक कसला, मनोगतच ते! दुष्यंताशी विवाह करून जेव्हा शकुंतला सासरी जायला निघते, तेव्हा तिच्या पित्यानं, कण्व मुनींनी उत्स्फूर्तपणे काढलेले हे भावोद‍्गार! या भावना इतक्या सनातन आहेत की, प्रत्येक पित्याच्या अंतःकरणातील वेदना त्या बोलक्या करतात. मग त्याला मी तरी कसा अपवाद असेन?

सिंहायन आत्मचरित्र
कौटुंबिक समारंभात (डावीकडून) सौ. शीतलची मुलगी व आमची नात ऐश्‍वर्या, पत्नी सौ. गीतादेवी, कन्या सौ. शीतल, मी, जावई मंदार पाटील व शीतलचा मुलगा व आमचा नातू ऋतुराज.

शीतल माझ्या काळजाचा तुकडा! माझी लाडकी कन्या. तिची पाठवणी करताना माझ्या भावनाही अशाच उचंबळून आल्या होत्या.
ज्या हातांनी तिला तोलून धरलं, ज्या अंगा-खांद्यानं तिला आधार दिला, तेच आज परके झाले होते. एक प्रकारे माझं जग सुनंसुनं झालं होतं. ‘पुढारी’चा विस्तार, निर्णयसागरची जबाबदारी, माझं सार्वजनिक काम, आदी कारणांनी तसा शीतलला माझ्याकडून वेळ कमीच मिळाला. तरी जो काही वेळ मिळाला होता, तो तिनं माझ्या सान्‍निध्यात मनमुराद लुटला. बालपणाच्या तिच्या लाडिक मागण्या, त्या पूर्ण करण्यासाठी माझी होणारी धावपळ… ते आठवलं तर आजही माझ्या ओठांवर हसू विलसतं. मी कोल्हापूर मुक्‍कामी असलो की, शीतल नावाचं गोंडस बाळ माझ्याकडे धाव घ्यायचं. आईच्या कडेवरून आपल्याकडे येताना तिच्या चेहर्‍यावर फुललेलं चांदणं… लाजवाबच. पुढे ती रांगायला लागली. माझ्या स्टडीरूमकडे तिची पावलं वळायची. अनेकदा दरवाजा बंद असला तर दारावर आपटलेले हात मला तिच्या आगमनाची जाणीव करून द्यायचे. हे सगळं कल्पनातीतच. सकाळी कार्यालयात निघालं की, तो गोंडस चेहरा नजरेसमोर हटता हटायचा नाही. साहजिकच, दुपारची जेवणाची वेळ असो वा संध्याकाळ… पावलं कधी घराकडे वळायची ते कळायचंही नाही.

तिच्या पाठोपाठ अवघ्या दोन वर्षांत चि. योगेशचाही जन्म झाला. या दोघांच्या आगमनाने आमच्या घराला एक वेगळेच घरपण आलं. माझी दोन्ही मुलं ही माझी खरी संपत्ती होय. साहजिकच, दोघांसाठी आणलेल्या खेळण्यांनी घर भरून गेलेलं असायचं. वेगवेगळ्या गाड्या, ट्रेन, विमानं, बॉल, बाहुल्या… काय काय खेळण्यातले प्रकारही.

शीतल व योगेश यांचं बालपण हे खूपच सुखात गेलं. त्यांचा कोणता हट्ट पुरवला नाही, असं झालं नाही. त्यांनी मागणी करावी व त्याची पूर्तता करावी, हे ठरलेलंच. अशा वेळी त्यांना आवर घालणं अवघड जायचं. मुलं थोडी मोठी झाल्यानंतर पन्हाळा, गगनबावडा जवळच्या ठिकाणी, तसेच महाबळेश्‍वर, मुंबई, गोवा इथं पिकनिकला मी त्यांना घेऊन जायचो. शीतलसाठी केअरटेकर असल्याने तशी तिच्या शाळेत जाण्याची वा तिला सोडण्याची वेळ माझ्यावर कधी आली नाही. शीतलला होलीक्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमध्ये प्रवेश घेतला. तेथेच तिनं शालेय शिक्षण पूर्ण केलं. 1987 मध्ये आबांचे निधन झालं. व पुढे 1989 मध्ये दै. ‘पुढारी’चा अमृत महोत्सव साजरा झाला.

एकदा मुलगी वयात आली की, तिच्या लग्‍नाची लगीनघाई सुरू न होईल तरच नवल! आबांनीही माझ्या सर्वच बहिणींची लग्‍नं अगदी वेळेवर केली होती. त्यामुळे आता शीतलच्या लग्‍नाची चर्चा घरात सुरू झाली. वरसंशोधन सुरूही झालं. ठाण्याचे तत्कालीन खंबीर आणि कर्तबगार जिल्हाधिकारी मधुकर पाटील तथा एम. बी. पाटील यांच्या मुलाचं स्थळ. एम. बी. पाटील म्हणजे पप्पू कलानीसारख्या बड्या धेंडाच्या बेकायदेशीर बांधकामावरही हातोडा मारायला ज्यांनी मागंपुढं पाहिलं नाही, असा जिगरबाज सनदी अधिकारी! एकेकाळी त्यांनी कोल्हापूर महापालिकेचे आयुक्‍त म्हणूनही कार्यभार सांभाळला होता. ते कोल्हापूरला आरडीसी होते तेव्हापासून त्यांचे माझे चांगले संबंध.

त्यांचे चिरंजीव मंदार. मंदार यांनी बी.एस.सी., एम.बी.ए. (सिस्टीम्स) आणि एम.सी.जे.सुद्धा केलेलं. स्थळ आम्हाला पसंत पडलं. मुलीला मुलगा आणि मुलग्याला मुलगीही पसंत पडली. त्यांना मुंबईत लग्‍न हवं होतं. उभयतांचं शुभमंगल दिनांक 17 सप्टेंबर 1993 रोजी मुंबईत संपन्‍न झालं. विवाह स्थळ होतं, वांद्य्राचं रंगशारदा हे पंचतारांकित हॉटेल. विशेष म्हणजे शीतलच्या विवाहाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खास उपस्थिती होती. बाळासाहेबांच्याबरोबरच वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, विलासराव देशमुख तसेच गृह राज्यमंत्री माणिकराव ठाकरे, कोल्हापूरचे पालकमंत्री सदाशिवराव मंडलिक, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे सर्व राज्याच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री उपस्थित होते.

सिंहायन आत्मचरित्र
कौटुंबिक समारंभातील क्षण. (डावीकडून उभे) सौ. शीतलचा मुलगा ऋतुराज, मुलगी ऐश्‍वर्या,
कन्या सौ. शीतल, जावई मंदार पाटील, सून सौ. स्मितादेवी, चि. योगेश, आमचा नातू व योगेशचा मुलगा राजवीर, (बसलेले) पत्नी सौ. गीतादेवी, मी व नातू तेजराज.

त्याचबरोबर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, विरोधी पक्षनेते सुधीर जोशी, ठाण्याचे महापौर अनंत तरे, आमदार मुश्ताक अंतुले, माजी मंत्री एस. एन. देसाई, माजी राज्यमंत्री शंकरराव नम, सौ. आणि श्री. डॉ. डी. वाय. पाटील, राज्याचे अतिरिक्‍त मुख्य सचिव एस. आर. वाकोडकर, माजी मुख्य सचिव के. बी. श्रीनिवासन, तसेच नगरविकास सचिव डी. टी. जोसेफ, गो. बा. पिंगुळकर, समाजकल्याण सचिव शशिकांत दैठणकर, माहिती आणि जनसंपर्क महासंचालक अजित वर्टी, गृहसचिव रामदेव त्यागी यांच्यासह प्रशासन सेवेतील अनेक ज्येष्ठ सनदी आणि पोलिस अधिकारी उपस्थित होते.

त्याशिवाय पश्‍चिम महाराष्ट्रातूनही अनेक ज्येष्ठ शासकीय अधिकारी लग्‍नसोहळ्याला आवर्जून आलेले होते. वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी मुंबईतील सर्व मोठे उद्योगपती, डॉक्टर्स आणि सर्व शिक्षण संस्थांचे प्रमुखही उपस्थित होते.

रंगशारदा हे पंचतारांकित हॉटेल. या हॉटेलातच विवाह समारंभ म्हटल्यावर ते संपूर्ण हॉटेलच आम्ही बुक करून टाकलं होतं. जाधव परिवार, आमचे नातेवाईक आणि प्रचंड मोठा मित्र परिवार याच हॉटेलमध्ये मुक्‍काम ठोकून होता. एका अर्थानं शीतलचं लग्‍नच पंचतारांकित थाटात झालं, असं म्हटलं तर ते अतिशयोक्‍तीचं होणार नाही. तरीही कोल्हापूर आणि परिसरातील असंख्य लोकांना आणि हितचिंतकांना मुंबईत विवाह समारंभाला उपस्थित राहता आलं नव्हतं. मुळात ‘पुढारी’ परिवारच एवढा दांडगा की, त्याला मुंबईत घेऊन जाणं हे प्रॅक्टिकली अशक्यच होतं. म्हणून मग आम्ही शीतल आणि मंदारच्या विवाहानिमित्त एक जंगी स्वागत समारंभ कोल्हापुरातील हॉटेल शालिनी पॅलेस इथं आयोजित केला.

या समारंभास श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, याज्ञसेनी राणीसाहेब, तसेच सांगलीच्या पटवर्धन महाराणी, कागलचे विक्रमसिंह घाटगे, सौ. सुहासिनीदेवी घाटगे, शिवाय गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विल्फ्रेड डिसोझा, डी. सी. नरके, डी. आय. जी. भगवंतराव मोरे, पी. एन. पाटील, आमदार श्रीपतराव बोंद्रे, रत्नाप्पाण्णा कुंभार, महादेवराव महाडिक, उद्योगपती राम मेनन, कुलगुरू डॉ. अप्पासाहेब वरुटे, शामराव भिवाजी पाटील, कल्लाप्पाण्णा आवाडे, बाबुराव धारवाडे, आर. के. पोवार, पै. गणपतराव आंदळकर, शेतकरी संघाचे अध्यक्ष वि. ह. पाटील यांच्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव जिल्ह्यातील आय.ए.एस., आय.पी.एस. शासकीय अधिकारी, तसेच डॉक्टर्स, उद्योजक क्षेत्रातील असंख्य मान्यवरांनी आपली उपस्थिती आवर्जून लावली होती. त्याचप्रमाणे चित्रपटसृष्टीतील चंद्रकांत मांडरे, साहित्यिक बाबा कदम, अ‍ॅड. अरविंद शहा यांच्यासह सर्व ‘पुढारी’ परिवार आणि कुटुंबीय हजर होते.
परंतु, या सगळ्या सुखसोहळ्यानंतर तो हृदयस्पर्शी क्षण येणं अपरिहार्यच होतं! शीतलची पाठवणी करताना माझ्या भावना उचंबळून आल्याशिवाय कशा राहतील? माझी स्थिती कण्व मुनींसारखीच झाली होती.

‘गंगा यमुना डोळ्यांत उभ्या का
जा, मुली जा, दिल्या घरी तू सुखी राहा!’

असेच जणू त्यांचे अश्रूभरले डोळे बोलत होते. अखेर अत्यंत जड अंतःकरणानं आम्ही आमच्या लाडक्या लेकीला निरोप दिला!
पित्याच्या काळजाला झालेली जखमही तितकीच महत्त्वाची. ज्या हृदयात अठरा-वीस वर्षे ठाण मांडून राहावं व ते घरटं चार-सहा मंगलाष्टकांनी ओस पडावं… ही बाबच हृदयाला पीळ पाडणारी. पण, त्यालाही इलाज असत नाही. या दिव्यातून मुलींच्या सर्वच पित्यांना जावं लागतं. मीही गेलो. लेकीच्या विरहाच्या दुःखाचा रांजण भरलेला असला तरी एक पिता म्हणून मलाही हे दुःख पचवावं लागलं.
मंदार मूळचे ठाण्याचे असले, तरी विवाहानंतर त्या दोघांनी पुण्यात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. मंदार सॉफ्टवेअरच्या व्यवसायात कार्यरत होते. त्यांनी स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी स्थापन करून व्यवसायात यशस्वी भरारी घेतली होती. मात्र, पुढे त्यांनी होमिओ फार्मा या क्षेत्रावर लक्ष केंद्रित केलं.

‘डोलिओसीस होमिओ फार्मा प्रा. लि.’ या नावाची कंपनी स्थापन करून त्यांनी तिच्या विस्तारासाठी स्वतःला वाहून घेतलेलं आहे. शीतलनं पुण्यातूनच बी.कॉम. केलं व वृत्तपत्रविद्येचं शिक्षणही घेतलं. तिनं पुणे ‘पुढारी’ ऑफिसचं कामकाज बघणं सुरू केलं. बघता बघता वर्षे कशी गेली कळले नाही आणि आम्हाला पहिली नात झाली. तिचा जन्म कोल्हापुरात झाला. तिचं नाव ऐश्‍वर्या ठेवलं. त्यानंतर दोन वर्षांनी शीतलला मुलगा झाला, त्याचं नाव ऋतुराज ठेवले. त्याचाही जन्म कोल्हापुरातच झाला. शीतलच्या रूपानं आम्हाला तूपरोटी मिळाली होती आणि ऐश्‍वर्याच्या रूपानं शीतल आणि मंदारना ‘तूपरोटी’ची प्राप्‍ती झाली होती.

ऐश्‍वर्या आमची मोठी नात. तिचंही शिक्षण पुण्यातील कॉन्व्हेंट स्कूलमध्येच झालं. त्यानंतर तिनंही आपल्या आईसारखंच बी.कॉम. केलं आणि त्यानंतर लंडन येथे जाऊन ले कॉरडॉनब्ल या फ्रेंच इन्स्टिट्यूटमध्ये कलुनरी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण करून तिनं आईच्याही पुढे एक पाऊल टाकलं. तिचा मला अभिमान वाटतो. ऋतुराजने बी.बी.ए. केले व तो पुढील एम.बी.ए.साठी अमेरिकेला जात आहे. तोही आपल्या बहिणीसारखाच हुशार आहे.

ताईचा संसार सुखाचा चालला असून, ती ‘पुढारी’च्या पुणे आवृत्तीचं काम पाहते. अकौंट हा तिचा जिव्हाळ्याचा विषय असून, त्यात तिचा हातखंडा आहे. तिचा स्वभावही माझ्यासारखाच करारी असल्यामुळे ती ‘पुढारी’च्या पुणे आवृत्तीचं काम मोठ्या धडाडीनं पाहते, याचं मला समाधान वाटतं.

शीतल पुण्यात स्थायिक आहे. तिकडे माझे वरचेवर जाणे होते. कधी व्यावसायिक कामकाजानिमित्त, तर कधी लाडक्या लेकीला भेटण्यासाठी. तिच्या अंगातही पत्रकारिता चांगलीच मुरली आहे. तिच्याकडे भविष्याचा वेध घेण्याची हातोटी आहे. अनेकदा ती मला होणारे व्यावसायिक बदल, त्यावर आपली भूमिका काय असावी, त्याअनुषंगाने काय केलं पाहिजे याबाबत बरंच काही सांगत असते. तिची ती गती पाहून मी स्तिमित होतो. मला माझ्या लेकीचा अभिमान वाटतो.

ती आपल्या संसारात रमून गेली. वसंत ऋतूत कोकिळेचं कूजन आसमंत भारून टाकतं. विविध रंगांचे, ढंगांचे पक्षी आपापल्या मगदुराप्रमाणे आपल्या आवाजाचं दान देतात. सर्वत्र फुलांचे ताटवे असतात अन् त्यामध्ये कोकिळेचा आवाज… मनाला उभारी देणारा, मोहवून टाकणारा असतो. पण, वसंत ऋतू सरतो अन् कोकिळेचं कूजनही आयागमनी होतं. शीतलच्या गमनानं माझ्या मनातील वसंत ऋतूची अवस्थाही अशीच झाली. पण, मला इथं नोबेल पारितोषिक विजेते कविश्रेष्ठ रवींद्रनाथ टागोरांचं एक वचन आठवतं. ते म्हणतात,
‘If you shed tears when you miss the sun, you also miss the stars.’

सूर्यास्त झाल्यानंतर नभमंडळावर तारका प्रकटतात. त्यांचा संचार सुरू होतो. त्या फक्‍त रात्रीचा अंधारच घालवीत नाहीत, तर उद्याच्या सूर्यप्रकाशाकडे वाटचाल करण्याचे बळही देतात. रवींद्रनाथांच्या तेजस्वी शब्दातून हा दुर्दम्य आशावाद प्रकट होतो. तिकडेही एक पिता म्हणून मला दुर्लक्ष करून चालणार नाही.

शीतल मोठी कधी झाली, हे आम्हाला कळलेच नाही. तिचं लग्‍न झालं, तिला दोन मुलं झाली. मोठी मुलगी ऐश्‍वर्या, ती लंडनला जाऊन शिक्षण घेऊन आली. तिचा मुलगा ऋतुराज याने पुणे विद्यापीठातून बी.बी.ए. केलं व एम.बी.ए.साठी तो अमेरिकेला चालला आहे. दोन्ही नातवंडं इतकी मोठी झाली आहेत की, आता त्यांचाही विवाह करण्याची वेळ आली आहे.

शीतलच्या नंतर माझा मुलगा योगेशचा जन्म झाला. तोही उच्चशिक्षित झाला. त्याचे लग्‍न माझे ज्येष्ठ बंधुतुल्य मित्र डॉ. डी. वाय. पाटील यांची नात स्मितादेवी यांच्याशी झाले व त्यांनाही राजवीर व तेजराज अशी दोन मुले झाली. ही सर्व नातवंडे मोठी झाल्यामुळे व ही नवीन पिढी आमच्यापेक्षाही तंत्रज्ञान आत्मसात करण्यात हुशार असल्यामुळे आम्हा आजी-आजोबाला काही नवीन गोष्टी शिकवत असतात व आम्हाला त्याचेही कौतुक वाटते.

आज योगेश आणि आमची सून स्मितादेवी हे दोघेही आपापली जबाबदारी पार पाडत आहेत. योगेश ‘पुढारी’चे चेअरमन म्हणून सर्वच जबाबदारी सांभाळत आहेत, तर स्मितादेवी या त्यांच्या वडिलांच्या पुणे येथील डी. वाय. पाटील विद्यापीठात ट्रस्टी म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.

तिसरी पिढी आपली जबाबदारी सांभाळत आहे. आता आमची पुढील चौथी पिढी म्हणजे नातवंडं ऐश्‍वर्या, ऋतुराज, राजवीर, तेजराज यांच्याबद्दल मला दोन शब्द लिहिणं आवश्यकच आहे. ऐश्‍वर्या, ऋतुराज यांनी आपल्याला काय करायचे आहे, आपला कल कशामध्ये आहे व आपण काय केले तर यशस्वी होऊ शकतो, याचा आपल्या शालेय जीवनातच धांडोळा घेतला. उच्च शिक्षणासाठी त्यांनी स्वतःच अभ्यासक्रम निवडला. ते शिक्षण जगभरात कोणत्या संस्था देतात, त्यापैकी कोणत्या संस्था विशेष नामांकित आहेत याचीही शहानिशा केली. त्यांनी तिथं प्रवेश मिळवला व मोठ्या अभिमानानं आम्ही असं असं केलं आहे म्हणून सांगितलं. शिवाय आपण निवडलेल्या अभ्यासक्रमाचे फायदेही त्यांनी समजावून सांगण्यास मागेपुढे पाहिले नाही. ऐश्‍वर्या लंडनला असताना तिच्याकडे मी गेलो.

भारतीय संस्कृतीत वाढलेली, त्यातच कोल्हापूरचं रांगडेपण असलेली ही मुलगी लंडनला एकटी कशी राहते, तिथल्या संस्कृतीशी कशी काय जुळवून घेते याबाबत मला जबरदस्त कुतूहल होतं. पण, तिथं गेल्यानंतर, तिची प्रगती पाहिल्यानंतर माझ्याही डोळ्याचे पारणे फिटले. तीच गोष्ट ऋतुराजची. त्यानं एम.बी.ए.साठी अमेरिकेची वाट चोखाळली आहे. राजवीर, तेजराज हेही आपलं ध्येय ठरवून वाटचाल करीत आहेत. राजवीर बंगळुरू येथे TBIS – The Bangalore International School येथे शिकत आहे, तर लहानगा तेजराज हा कोल्हापुरातील शांतिनिकेतमध्ये शिकत आहे.

कमालीची तंत्रस्नेही असलेली आजची ही पिढी काळानुरूप आमच्याही पुढे काही पावलं आहे, हे मान्य करावंच लागेल. अगदी लहानपणापासून या पिढीची तयारी इतकी की, एखादी महत्त्वाची संकल्पना असेल, माहिती हवी असेल तर आम्ही त्याशी संबंधित साधनं धुंडाळू लागतो. तर, आमची ही चिमुरडी नातवंडं गुगल वगैरे माध्यमांना कमांड देऊन काही सेकंदात ती माहिती घेऊन समोर उभी! काळानुरूप आलेली ही तत्परता, सजगता, वेळेचं भान हे त्यांच्याकडचे ऐवज आहेत व तेच त्यांच्या करिअरमध्ये यशाचे गमक ठरणार आहेत. उंच उंच भरारी घेणार्‍या त्यांच्या इच्छा-आकांक्षा, स्वप्नांना बहर आणणार्‍या आहेत. त्यांचे विचार ऐकले व त्यासाठी त्यांची सुरू असलेली धडपड पाहिली, तर आकाशही ठेंगणे ठरावे. कर्तृत्वाची ही शिखरं त्यांना खुणावत आहेत व हे आव्हान पेलण्यास आपण समर्थ असल्याचं त्यांनी कृतीतून दाखवण्यास सुरुवातही केली आहे. मला खात्री आहे की, त्यांनी आकाशाला गवसणी घालण्याचा उचलेला विडा नभात विहारणार्‍या पक्ष्यांनाही प्रश्‍न पाडणारा आहे. चि. योगेश असो, सौ. शीतल वा आमची चौथी पिढी… गगनभरारीची आस बाळगून त्यानुरूप वाटचाल करणारे हे प्रवासी पक्षी आहेत.

योगेश यांच्या विवाहबद्दल पुढे मी स्वतंत्र प्रकरणात ऊहापोह केलेला असल्यामुळे या प्रकरणात त्याचा सविस्तर उल्लेख केलेला नाही, इतकेच.

‘आकाशी झेप घे रे पाखरा, तोडी सोन्याचा पिंजरा’ या शब्दात प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबूडकर यांनी ऐषोआरामात लोळणार्‍या, सुखलोलुप जिवांना गगनभरारीचा मार्ग दाखवला. श्रम, कष्टाचं मोल विशद केलं. घाम गाळल्याशिवाय मोती मिळत नाहीत, हे ठणकावून सांगितलं. हे आठवायचं कारण म्हणजे, आमच्या जाधव घराण्यातील चौथी पिढी व्यवसाय, उद्योगधंद्यामध्ये उतरण्याच्या तयारीत आहे. अगोदरच्या पिढ्यांनी घेतलेले कष्ट, केलेला त्याग… त्यातून उभा राहिलेले ‘पुढारी’चे साम्राज्य… त्यामुळे याही पिढीच्या मुखात सोन्याचा चमचा आहे, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. पण, जाधव घराण्यातील सर्वच पिढ्या कार्यप्रवण निघाल्या. त्यांनी वैभव-मायेच्या या सोनेरी पिंजर्‍यात स्वतःला कधी जखडून ठेवलं नाही. त्यांनी वेळोवेळी स्व-सामर्थ्यावर क्षितिजाकडे झेप घेतली. तिथं कर्तृत्वाचे झेंडे गाडले. आताची नवपिढीही झेप घेण्याच्या तयारीत आहे, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. प्रसिद्ध विचारवंत जॉर्ज बर्नाड शॉ यांनी म्हटलं होतं,
You see things; and you say ‘why?’ But I dream things that never were; and I say ‘Why not?’

हीच वैचारिक नाळ पकडल्याने मी ‘पुढारी’चे साम्राज्य निर्माण करू शकलो. माझ्या तोंडातही तोच सोन्याचा चमचा होता, ऐषोआरामाची साधने होती; पण तो चकवा मी व्यवस्थित टाळल्यामुळेच हे शक्य झालं. अर्थात, काळाची पावलं ओळखत मी वाटचाल केली. माझ्या व्यवसायात येणार्‍या नवनवीन तंत्रज्ञानाचा मी अंगीकार करीत गेलो. त्याची काळाच्या कसोटीवर योग्यअयोग्यता तपासत राहिलो. नावीन्य धुंडाळत राहिलो. एक मात्र खरं की, पुढे संगणक, डिजिटल क्रांती झाली. त्यामध्ये सर्वच व्यवसाय मुळापासून बदलले. त्याला प्रिंट मीडियाही अपवाद ठरला नाही. तरी हे शिवधनुष्य उचलताना माझ्याबरोबर माझी पुढची पिढी म्हणजे चि. योगेश व सौ. शीतल हे खंबीरपणे उभे राहिले.

चि. योगेश वा सौ. शीतल हे महाविद्यालयीन शिक्षणाच्या उंबरठ्यावर उभे असतानाच जागतिकीकरण, उदारीकरण, खासगीकरणाची लाट आली. त्यानं व्यवसायाची भाषाच बदलली. त्यांच्या उमेदीतच दूरदर्शन, संगणक यांचाही प्रसार झाला. एकूण काय, तर चि. योगेश व सौ. शीतल यांची पिढी ही आमच्या व पुढच्या पिढीतील उंबरठा ठरली, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. त्या पिढीनं जुन्याचं गमन व नव्याचं आगमन अनुभवलं. त्यानुसार त्यांनी काळाची चिकित्सा केली व त्यानुसार आपल्या ध्येयधोरणात बदल केला. चि. योगेशने बी.कॉम. करून एम.बी.ए. केलं. डॉक्टरेटसाठी ‘भारतातील प्रसार माध्यमांपुढील आव्हाने आणि संधी’ हा विषय घेऊन प्रिंट मीडियापासून, सिनेमा आणि मल्टिप्लेक्स मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, रेडिओ मीडिया, तसेच इंटरनेट मीडिया, आऊट डोअर मीडिया, अशा विविध माध्यमांचा सखोल अभ्यास केला. तुलनात्मक चिकित्सा केली.

परदेशातून भारतात जी थेट गुंतवणूक होत आहे, त्याचाही त्यानं परामर्श घेतला. एकूणच काय, तर चि. योगेश व सौ. शीतल यांनी काळाची पावलं ओळखून अनावश्यक जुन्याला सोडचिठ्ठी देतानाच नव्याचा अंगीकार केला. संगणक क्रांतीने त्यांच्या हातात मोठे शस्त्र आले. त्यानुरूप त्यांनी नवनवीन संधी शोधल्या व आपली घोडदौड सुरू ठेवली. याबाबत मी अन्य प्रकरणांत सविस्तर लिहिलेच आहे. तरी, आज चि. योगेश व सौ. शीतल मीडियामध्ये आपले पाय घट्ट रोवून आहेत यापरते एका कार्यप्रवण पित्याला समाधान ते कोणते! इथं महत्त्वाचा भाग असा की, माझी पिढी ही संगणक तंत्रज्ञानाशी सर्वंकष नाळ जुळलेली पिढी होऊ शकली नाही. आपल्याला आवश्यक तेवढंच आम्ही घेत गेलो. मात्र याबाबतीत चि. योगेश असेल वा सौ. शीतल, आमच्या पुढे अनेक पावले होती/आहेत.

आपल्याला काय करायचं आहे, हे त्यांनी स्वतः ठरवलं व त्यानुरूप त्यांची वाटचाल होत राहिली.‘टोमॅटो’पासून त्याचं प्रत्यंतर येतच आहे. नाहीतर पूर्वी काय व्हायचं, मुलानं काय करायचं हे वडिलांनी ठरवायचं व त्यानुसार मुलाची वाटचाल निश्‍चित व्हायची. आता तर आमची चौथी पिढी गगनभरारी घेण्यास सज्ज असून संगणक, डिजिटल क्रांतीच्या युगात ते इतके परिपक्‍व आहेत की, त्यांनी काय करावं, हे सांगण्याच्या भानगडीत पडण्याची संधीच त्यांनी आम्हाला दिलेली नाही. डिजिटल, संगणक क्रांतीमुळे संधींची कमतरता नाही. मार्ग अनेक आहेत, ते खुणावत आहेत. आमच्या झेप घेऊ पाहणार्‍या पिढीनं त्याचाही लेखाजोखा घेतला आहे. कोणत्या मार्गावरून चाललं तर आपल्याला आपल्या करिअरचं गंतव्य स्थान गवसेल याच्या परिपूर्ण कल्पना त्यांच्या डोक्यात आहेत.

काळ बदलत राहतो. पण, सध्याच्या संगणक, डिजिटल युगात मूल कळतं होतंय न होतंय तोवर त्याच्यासमोर ज्ञानाचा पेटाराच उघडलेला असतो. त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर चालणार्‍या खेळण्यांपासून मोबाईल, ग्रह-तारे यांसारख्या विपुल बाबींचा समावेश असतो. या माध्यमातून त्याच्या ज्ञानाच्या कक्षा केव्हाच्याच रुंदावलेल्या असतात. साहजिकच, आजच्या सात-आठ वर्षांच्या मुलाच्या ज्ञानापुढे पंचाहत्तरीतले गृहस्थही यथातथा ठरतात. बरं, ही पिढी इतकी सतर्क आहे की, आजी-आजोबांना हे तंत्रज्ञान काय आहे, काय केलं की काय होतं हे शिकवत/सांगत राहतात.

 

Back to top button