विज्ञानझेप घ्यायची तर… | पुढारी

विज्ञानझेप घ्यायची तर...

प्रा. विजया पंडित

ब्रिटिश राजवटीत भारताने नामांकित शास्त्रज्ञांना जन्म दिला. रामानुजन, जगदीशचंद्र बोस, चंद्रशेखर व्यंकट रमन, मेघनाद साहा आणि सत्येंद्रनाथ बोस यांनी जगभरात भारताचे नाव उंचावले. मात्र, स्वातंत्र्यानंतर एकही आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरवला जाणारा शास्त्रज्ञ का निर्माण होऊ शकला नाही, याचा आपण कधी विचार केला आहे का?

शतकभरापूर्वी भारतात अनेक थोर शास्त्रज्ञ, संशोधक होऊन गेले

साधारणत: शतकभरापूर्वी भारतात अनेक थोर शास्त्रज्ञ, संशोधक होऊन गेले. त्याकाळी भारतावर इंग्रजांचे राज्य होते; मात्र तरीही आपल्या शास्त्रज्ञांनी भारताची पताका उंचावत ठेवली. आज मुबलक प्रमाणात पायाभूत सुविधा असताना, संशोधनकेंद्रे असताना जागतिक तोडीचा एकही शास्त्रज्ञ नव्या काळात उदयाला येताना दिसत नाही किंवा संशोधन होताना दिसून येत नाही,

ही चिंतेची आणि विचार करावयास लागणारी बाब आहे. केंद्र सरकारने ‘मेक इन इंडिया’, ‘स्टार्टअप इंडिया’ यासारखे उपक्रम सुरू करण्यामागे भारतातील प्रतिभेला वाव देणे, हा महत्त्वाचा उद्देश असला तरी तो जागतिक पातळीवर कसा जाईल, यासाठीही प्रयत्न करणे गरजेचे आहे.

2017 मध्ये तिरुपती येथे भारतीय विज्ञान परिषद पार पडली

2017 मध्ये तिरुपती येथे भारतीय विज्ञान परिषद पार पडली. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांना आवाहन करताना म्हटले होते, की तांत्रिक तयारी आणि प्रतिस्पर्धात्मक क्षमतेसाठी आपल्याला आव्हानांचे आणि संधीचे प्रामाणिकपणे आकलन करावे लागणार आहे. देशासमोर स्वच्छ पाणी, आहार, पर्यावरण, हवामानबदल, संरक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मोठी आव्हाने आहेत.

त्याचबरोबर तंत्रज्ञानाचा विकासासाठी लाभ कसा घेता येईल, हेही पहावे लागणार आहे. यासाठी देशातील प्रमुख संस्थांना सर्व क्षेत्रांशी जोडण्यासाठी विज्ञानपूरक सामाजिक जबाबदारीच्या कल्पनेचा विकास करावा लागणार आहे.

पंतप्रधान असेही म्हणाले होते, की सरकार मूलभूत विज्ञानापासून ते विविध क्षेत्रातील नवनवीन संशोधन करण्यासाठी, मदत करण्यासाठी तयार आहे. 2030पर्यंत भारत जगातील आघाडीच्या तीन देशांच्या पंक्तीत जाऊन बसेल, अशी आशाही पंतप्रधानांनी व्यक्त केली होती. परंतु, या क्षेत्रात नवीन शोध आणि नवीन तंत्रज्ञानाचा विकास होत नाही, तोपर्यंत देशाला झेप घेता येईल, असे वाटत नाही. कारण नवसंशोधनाच्या यादीत भारताचा समावेश जगातील सर्वात मागास देशात होतो.

जगभरातील संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या विकासाचे काम विद्यापीठ आणि तांत्रिक संस्थेत होते. परंतु, आपल्याकडे विद्यापीठ हे राजकीय अड्डे बनले आहेत. त्यामुळे देशात विज्ञान आणि तंत्रविकासासाठी आपल्याला कक्षेबाहेर जाऊन वातावरण तयार करावे लागणार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाशिवाय आज विकासाची कल्पनाच करता येत नाही.

दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भारतीय विज्ञान काँग्रेस आपला वार्षिकोत्सव साजरा करते. वास्तविक अशा प्रकारच्या कार्यक्रमातून भारतीय विज्ञानाला कोणत्याही प्रकारचा लाभ मिळताना आतापर्यंत दिसून आलेला नाही.

तसे पाहिले तर अशा प्रकारच्या सायन्स काँग्रेसच्या माध्यमातून देशभरातील तांत्रिक विद्यापीठे, विज्ञान संस्था, राष्ट्रीय प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांना एकत्र करून देशातील समस्यांवर चर्चा करून आपल्या क्षेत्रात संशोधन आणि विकासाचे भावी चित्र मांडणे अपेक्षित आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून सरकारदेखील शास्त्रज्ञांना विविध क्षेत्रांतील असणार्‍या समस्यांची माहिती सादर करू शकेल. त्या माहितीच्या आधारे शास्त्रज्ञांना कोणत्या क्षेत्रात संशोधन आणि विकास करण्याची गरज आहे, हे समजणे सोपे गेले असते.

पंडित जवाहरलाल नेहरू आणि होमी भाभा

पंडित जवाहरलाल नेहरू आणि होमी भाभा यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने खाद्यउत्पादन आणि औद्योगिक उत्पादनात वाढ करून देशाला स्वावलंबी करता येईल, असे म्हटले होते. कालांतराने या दोन्ही व्यक्तींच्या प्रयत्नांना यश आले आणि आजघडीला आपल्याकडे तांत्रिक आणि संशोधन विकासासाठी मुबलक पायाभूत सुविधा उपलब्ध आहे.

देशात 200हून अधिक राष्ट्रीय प्रयोगशाळा, डझनभर संस्थांन आणि शेकडो विद्यापीठे आहेत. भारताने अंतराळ, आण्विक क्षेपणास्त्र क्षेत्रात काही प्रमाणात यश मिळवले आहे. मात्र, जगाला सांगण्यासारखे आपल्याकडे एकही नवीन संशोधन आढळून येत नाही.

देशातील शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांची संख्या पाहता जगातील भारताचे स्थान तिसर्‍या क्रमांकावर आहे. मात्र, सर्व वैज्ञानिक संशोधन हे परदेशी शास्त्रज्ञांच्या नावावर जमा आहे. त्यात एकाही भारतीयाचे नाव दिसून येत नाही. अशी स्थिती पाहून आपल्या देशात संशोधन सुरू आहे की नाही, यावरच प्रश्नचिन्ह उभा राहते. आपल्या देशात आज एखादा रामन, खुराना नाही.

आज आपल्याकडे असणार्‍या विविध वैज्ञानिक संस्थांनात काम करणार्‍या मंडळी सध्या कोणते संशोधन करत आहेत. त्यांच्या संशोधनाला मान्यता मिळत नाही का, की ते काहीच करत नाहीत, देशात वैज्ञानिक प्रगतीसाठी पूरक वातावरण नाही, अशा प्रकारची स्थिती कधीपासून आहे, ती कधी बदलणार, अशा प्रकारचे असंख्य प्रश्न उपस्थित होतात.

वास्तविक पाहता, सात-आठ दशकांपूर्वी अशा प्रकारचे वातावरण नव्हते. ब्रिटिश राजवटीत देशावर संकटे कमी नव्हती. परिस्थिती अत्यंत विपरीत आणि प्रतिकूल होती. असे असतानाही भारताने नामांकित शास्त्रज्ञांना जन्म दिला. रामानुजन, जगदीशचंद्र बोस, चंद्रशेखर व्यंकट रमन, मेघनाद साहा आणि सत्येंद्रनाथ बोस यांनी जगभरात भारताचे नाव उंचावले.

मात्र, स्वातंत्र्यानंतर एकही आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरवला जाणारा शास्त्रज्ञ निर्माण होऊ शकला नाही. याचा आपण कधी विचार केला आहे का? संसदेतही राष्ट्रीय दृष्टीने महत्त्वाच्या असणार्‍या या विषयावर कधीही चर्चा होताना दिसून येत नाही.

जगभरात आता शास्त्रज्ञ आणि तांत्रिक ज्ञान हे आर्थिक स्रोताचे माध्यम बनले आहेत. कोणत्याही देशातील शास्त्रज्ञ आणि तांत्रिक क्षमता त्याच्या आर्थिक प्रगतीच्या समीकरणाशी जोडली जाते. तांत्रिक ज्ञान आता व्यापाराचे साधन बनले आहे.

त्यामुळे विज्ञान आणि तांत्रिक विकासाविना आता कोणत्याही देशाची प्रगती होणे अशक्यच आहे. परंतु, भारतीय भूमीत अशा प्रकारचे वैज्ञानिक आणि तांत्रिक विकासाला पोषक वातावरण का तयार होत नाही, हा खरा प्रश्न आहे.

आधुनिक सामाजिक, राजकीय तसेच सांस्कृतिक प्रणालीत असे काही दोष आहेत का, की जे अशा प्रकारचे वातावरण तयार करण्यास बाधा आणत आहेत, असा प्रश्न यानिमित्ताने पडतो. मात्र, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची दिशा निश्चित करण्याची ताकद ही समाजातच आहे.

कारण विकासाची प्रक्रिया ही समाजातूनच होते आणि एकदा विकासप्रक्रिया सुरू झाली, की समाजही बदलत राहतो. या विकासाच्या जोरावरच अन्य देशांशी तुलना करून आपला विकास कोणत्या दिशेने आणि क्षेत्रात झाला आहे, हे पाहता येईल.

जपानसारख्या देशाने पाश्चिमात्य देशात वैज्ञानिक क्रांती कोणत्या आधारावर झाली, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा अभ्यास करून जपानने आपल्या देशात विज्ञानपूरक वातावरण आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. देशामध्ये शिक्षण आणि औद्योगिक तंत्रज्ञानावर आधारित अनुकूल परिस्थिती निर्माण केली.

जपानकडून विज्ञानाच्या गरजांच्या पूर्तीसाठी राजकीय शक्तीचा योग्य वापर

यासाठी जपानने विज्ञानाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी राजकीय शक्तीचा योग्य वापर केला आणि विज्ञान, शासन आणि उद्योग यांना एकाच सूत्रात बांधले. संशोधन विकासासाठी जपानने जो अभ्यास केला, तो आपण केलेला दिसून येत नाही.

याचा अर्थ संशोधन क्षेत्रात आपणच मागासलेले आहोत, असे काही नाही. आपल्याकडे नैसर्गिक साधनसंपत्ती, खनिजसंपदा विपुल आहे. त्यासाठी ‘स्टार्टअप इंडिया’ कार्यक्रम योग्य प्रकारे राबवला गेला, तर त्यातून युवाशक्तीच्या प्रतिभेला नवे बळ मिळेल. डॉ. चंद्रशेखर व्यंकट रमण हे भारताला जागतिक पातळीवर कीर्ती आणि प्रतिष्ठा मिळवून देणारे विज्ञानमहर्षी होते.

त्यांना नोबेल पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. पण त्यांच्यानंतर भारताला विज्ञानामधील एकही नोबेल पारितोषिक मिळालेले नाही. काही देशांमधील दोन ते तीन शास्त्रज्ञांना एकाच वर्षी नोबेल पारितोषिक मिळतं आणि आपल्याला 60 वर्षांत एकाही व्यक्तीला ते मिळालेलं नाही, याचा विचार शासनाने व सर्वच समाजाने करण्याची गरज आहे. नवी पिढी विज्ञानाच्या मूलभूत क्षेत्रामध्ये संशोधन करत नाही, तोपर्यंत आपण जागतिक पातळीवर विज्ञानाच्या स्पर्धेत यशस्वी होऊ शकत नाही.

पहा व्हिडिओ : दै. पुढारीने पूरग्रस्त वृत्तपत्र विक्रेत्यांना दिले जगण्याचे बळ

Back to top button