कृषी क्रांती अवतरली ; पण...

डॉ. मुकुंद गायकवाड
ज्येष्ठ कृषितज्ज्ञ

हरितक्रांतीमुळे कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल झाले. आज आपण अन्नधान्योत्पादनात स्वयंपूर्ण झालो आहोत; मात्र तरीही खाद्यतेलांसारख्या काही बाबतीत आयातीवरचे अवलंबित्व कायम आहे. ते कमी करण्यासाठी येणार्‍या काळात पावले पडणे आवश्यक आहे. शेतकर्‍यांचे आर्थिक सक्षमीकरण होणे गरजेचे आहे.

स्वातंत्र्यापूर्वी 1943 मध्ये झालेल्या भीषण भूकंपामुळे, बंगालमध्ये आलेल्या दुष्काळामुळे दहा लाखांवर लोक मृत्यूमुखी पडले होते. त्या काळात भारताला मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचा तुटवडा जाणवू लागला होता. स्वातंत्र्यानंतर अन्नधान्याची ही भूक भागविण्यासाठी भारताला अमेरिकेवर अवलंबून राहावे लागत होते. अमेरिका त्याबाबतीत मदत करत असली, तरीही ती मदत सढळ हाताने नसून त्यात त्यांच्या वर्चस्वाची झाक होती. अमेरिकेचे त्यावेळचे अध्यक्ष जॉन्सन यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये असे लिहून ठेवले आहे की, भारतातील जनतेची वर्षभर भूक भागवू शकू एवढे अन्नधान्य आम्ही भारताला एकाच वेळी निर्यात करू शकत होतो. परंतु, त्यांना गुडघे टेकवायला लागावे म्हणून आम्ही त्यांना प्रत्येक महिन्याला धान्याचा पुरवठा करत होतो.

लालबहाद्दूर शास्त्री पंतप्रधान झाले तेव्हा त्यांना या समस्येची अतिशय तीव्रतेने जाणीव झाली. त्यापूर्वी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्राला फारसे महत्त्व दिले गेले नव्हते. लालबहाद्दूर शास्त्रींनी अन्नधान्याचा हा तुटवडा कमी भासावा, यासाठी संपूर्ण देशाला सोमवारी उपवास करण्याचे आव्हान केले होते.

त्याचप्रमाणे त्यांच्या मंत्रिमंडळातील कृषिमंत्री सुब्रमण्यम यांना त्यांनी सांगितले की, काही करून तुम्ही या समस्येवर तोडगा काढा. कुठल्याही स्थितीत भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला पाहिजे, अशी योजना करा.

त्यावेळी सुब्रमण्यम यांचे नातेवाईक डॉ. एम. एस. स्वामीनाथन हे इंडियन अ‍ॅग्रीकल्चर रिसर्च संस्थेचे प्रमुख होते. या दोघांनी असा विचार केला की, भारताची भूक भागवायची असेल, तर शेती क्षेत्रामध्ये अमूलाग्र बदल केला पाहिजे. असा विचार करत असताना त्यांनी काही मूलभूत गोष्टी तपासल्या. असा बदल कोणत्या देशाने केलेला आहे?

याबाबत इतर देशांमध्ये काय परिस्थिती आहे? असा अभ्यास केल्यानंतर त्यांना दिसून आले की, मेक्सिकोमध्ये नॉर्मन बोरलॉग नावाच्या शास्त्रज्ञाने बुटक्या गव्हाच्या जाती शोधून काढल्या आहेत.

या जाती आपल्याकडील गव्हाच्या जातींपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात पीक देतात. त्याच्यावर रोगराई होत नाही. आपल्याकडच्या गव्हावर तांबेरा रोग झाल्यामुळे संपूर्ण गहू खलास व्हायचा. या रोगामुळे होणारे नुकसान लक्षात आल्यानंतर ही गोष्ट स्वामीनाथन यांनी शास्त्रीजींच्या लक्षात आणून दिली. ते जाणून घेतल्यावर शास्त्रीजी म्हणाले, मग मेक्सिकोमधील बियाणे आपल्याकडे आणा. अशा स्थितीत फक्त बियाणे आणून चालणार नव्हते, तर ते पूर्ण पॅकेज घ्यावे लागणार होते.

कारण, या बियाणांसाठी खते आणि पाणी जास्त लागणार होते आणि तशी स्थिती पंजाब व हरियाणामध्ये होती. तेथील भाक्रा-नांगल धरणामुळे पाण्याची मुबलकता होती, तसेच जमिनीही चांगल्या होत्या. त्यामुळे ते बी पंजाब-हरियाणा राज्यांमध्ये देण्याचे ठरले आणि त्यानंतर जगात प्रथमच अशी घटना घडली की, विमाने भरभरून ते बियाणे आणले गेले.

दिल्लीचे विमानतळ इतर विमानांसाठी बंद करून फक्त बी आणणार्‍या विमानांसाठी खुले केले गेले होते. त्यावेळी ही हरितक्रांती झाली. त्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले.

या हरितक्रांतीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सर्वांत उत्तम प्रकारची खते, बी बियाणे, पाणी यांचा वापर या काळामध्ये झाला. 1967 ते 1970 या दरम्यान ही पहिली हरितक्रांती झाली. हे झाल्यानंतर मग आपल्या लोकांनी इतर पिकातही हायब्रिड जाती विकसित केल्या. ज्वारीमध्ये चांगल्या जाती विकसित केल्या. त्यामुळे ज्वारीचे उत्पन्न वाढले. दक्षिणेमध्ये भाताचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जायचे.

त्यासाठी फिलिपिन्समधून संशोधित केलेले बियाणे वापरून उत्पन्नात वाढ केली गेली. यामुळे एकाच वेळेला गहू, ज्वारी आणि भात या पिकांमध्ये मोठी क्रांती झाली आणि भरघोस पीक येऊ लागले. त्याला म्हणतात हरितक्रांती. ही हरितक्रांती होण्यामागे भूक हे प्रमुख कारण होते, तसेच अमेरिकेवर अन्नधान्यासाठी अवलंबून राहणे बंद करणे हेदेखील महत्त्वाचे कारण होते.

अमेरिकेवरील हे अवलंबित्व कमी झाल्यामुळेच 1971 मध्ये ज्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या तेव्हा त्यांना अमेरिकेवर मात करता आली. अमेरिकेचा विरोध पत्करून बांगलादेश स्वतंत्र केला गेला. याचे कारण जी हरितक्रांती झाली होती, ज्याचा पाया लालबहाद्दूर शास्त्रींनी घातला होता आणि इंदिरा गांधींनी तो टिकवून ठेवला. यामुळेच आपण अमेरिकेच्या डोळ्याला डोळा भिडवून बांगलादेशचे युद्ध यशस्वी करू शकलो.

या हरितक्रांतीचे नक्कीच वेगवेगळे समाजिक परिणाम घडून आले आणि ते मोठ्या प्रमाणात सकारात्मक असेच होते. त्यातील पहिला परिणाम म्हणजे यापूर्वी दक्षिणेकडचे लोक मोठ्या प्रमाणावर फक्त भातावरच अवलंबून होते. परंतु, हरितक्रांतीमुळे गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊ लागल्यानंतर तेदेखील गहू आहारामध्ये वापरू लागले.

त्यामुळे त्यांची प्रकृती सुधारू लागली. केवळ भात खाल्ल्यामुळे त्यांच्यामध्ये मधुमेह किंवा अन्य तत्सम आजारांचे प्रमाण वाढले होते. त्यांची फूड हॅबिट यामुळे बदलली गेली आणि आजही तेथील लोक गहू खाताना दिसतात. आजसुद्धा दक्षिणेकडचे लोक गव्हाचा वापर मोठ्या प्रमाणावर करताना दिसतात.

त्यावेळी हरितक्रांती झाली; पण त्यानंतर आपल्या देशातील शेतकर्‍यांनी ती टिकवून ठेवली. त्यामुळे आपल्याकडची लोकसंख्या वाढली, तरी चांगले बियाणे, खते यामुळे अन्नधान्य भरपूर येऊ लागले. या हरितक्रांतीमुळे भारतात मोठमोठे खताचे कारखाने तयार झाले, सिंचनाचे प्रकल्प उभे राहिले. कर्ज वगैरे मिळू लागल्यामुळे भारतामध्ये अन्नधान्याचे उत्पादन वाढत गेले.

जनतेला पुरेल इतके धान्य निर्माण होऊ लागले. त्यामुळे अन्न सुरक्षेचा कायदा मागच्या सरकारने आणला. याचे कारण अन्नधान्य उपलब्ध आहे. ते प्रचंड प्रमाणात असून साठवायलासुद्धा सरकारकडे जागा नसल्यामुळे अगदी एक रुपया-दोन रुपये किलो भावाने ते धान्य उपलब्ध करून देतात. इतकेच नाही, तर काही प्रकारचे धान्य भारत आता निर्यात करत आहे.

हरितक्रांतीमुळे भारतात मोठा सामाजिक बदल झाला तो असा, मोठ्या प्रमाणात कुपोषण कमी झाले. आजही ते आहे; पण त्याचे प्रमाण तेव्हाच्या तुलनेत खूप कमी आहेे. परंतु, जे 70-80 टक्के लोक शेतीवर अवलंबून होते, त्यांना पुरेसे खायला मिळत नव्हते, ते आज पुरेशा प्रमाणात अन्न खाऊ शकत आहेत. अन्नधान्याच्या बाबतीत काळजी करण्याचे कारण राहिले नाही.

एखाद्या वेळेला दुष्काळ पडला, एखाद्या भागात नैसर्गिक आपत्ती आली, तरी भारताचे लोक अन्नाच्या बाबतीत आता निश्चिंत झालेले आहेत. हा एक मोठा सामाजिक बदल झाल्याचे दिसून येते.

असे असले, तरी हरितक्रांतीचे काही दुष्परिणाम देखील झाले. त्यामुळे शेती खराब झाली. खूप जास्त खतांच्या आणि पाण्याच्या वापरामुळे जमिनीचा कस गेला. त्यामुळे जमिनी नापीक बनल्या. अधिक रासायनिक खतांमुळे पिकांमधील पोषक तत्त्वेही कमी झाली आहेत. जास्त कीटकनाशके वापरल्यामुळे विषमय अन्न काही लोकांना खावे लागते. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये सेंद्रिय उत्पादनांची मागणी वाढू लागल्याने शेतकरीही नैसर्गिक शेतीकडे वळू लागला आहे.

शेतकरी असो किंवा अन्य कुठलाही समाजाचा घटक असो, त्याला चांगले परिवर्तन हवे असते. समाज नेहमी चांगल्या नेतृत्वाचे, चांगल्या गोष्टींचे स्वागत करतो; पण हरितक्रांतीच्या सुरुवातीला काही शेतकर्‍यांनी या बियाण्यांना मोठा विरोध केला. हे निकस अन्न आहे, पूर्वीचेच अन्न चांगले आहे, या हायब्रीड जातींमुळे माणूस नपुंसक होईल अशा कल्पनांमुळे त्यावेळीही याला विरोध झाला होता. परंतु, त्या विरोधावर भूकेने मात केली आणि गरिबांनी त्याचा स्वीकार केला. वास्तवात त्या जाती निकस नव्हत्या.

जगाच्या संशोधनाचा आधार घेऊन आपण देशातील भूकेच्या समस्येवर मात केली आहे. बी. टी. उत्पादन आपण स्वीकारले. कापूस क्षेत्रातील क्रांती देखील जनुक अभियांत्रिकी शास्त्रातील प्रगतीमुळे झालेली आहे. त्यामुळे आपल्याकडील प्रतिगामी विचारांचे किंवा परंपरावादी लोक विरोध करत होते. आजही पूर्वीच्याच पिकांच्या पद्धती चांगल्या होत्या, असे म्हणणारे लोक आहेत; पण पूर्वीच्याच पद्धती वापरल्या असत्या, तर आज संपूर्ण देशाला अन्नधान्य पुरवणे शक्य झाले असते का, याचा विचार केला पाहिजे.

आज शेती क्षेत्राला दुसर्‍या हरितक्रांतीची गरज आहे. आता लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे आपल्याला अन्नधान्य उत्पादनाचा जो आकडा स्थिर झालेला आहे तो वाढवावा लागणार आहे. याचा विचार करता शेतकर्‍यांची मानसिकता आधीच तयार झालेली आहे; पण यातील पुढचा मोठा धोका म्हणजे, शेतकरी आता व्यापारी पिकाकडे वळलेले आहेत. द्राक्ष, ऊस, कापूस अशी पैसा मिळवून देणारी पिके जास्त प्रमाणात काढत आहेत.

त्यामुळे आता शेतकरी अन्नधान्य पिकवण्यापासून दूर जात आहे. हे मोठे आव्हान भविष्यकाळात शेतीपुढे उभे राहणार आहे. पूर्वी जसे अन्नधान्यांच्या पिकाला शेतकर्‍यांनी वाहून घेतले होते, त्यामुळे हरितक्रांती झाली, आता मात्र अन्नधान्याच्या पिकांमध्ये त्यांचा खर्च निघू शकेल एवढे पैसे मिळत नसल्यामुळे या पिकांपासून तो दूर जात आहे. म्हणून यापुढचा धोका मोठा आहे.

सरकार म्हणते गरज पडली, तर आम्ही अन्नधान्य आयात करू; पण हा काही त्यावरचा उपाय नाही. आपल्याच देशातील शेतकरी सक्षम कसा होईल, त्यासाठी अधिक प्रयत्न केले गेले पाहिजेत. गहू आयातीचा निर्णय घेतला तेव्हा त्याविरुद्ध बंड करणारा किंवा लिहिणारा मीच होतो. आम्ही असे प्रतिपादन केले होते की, गहू हे तीन-चार महिन्यांचे पीक आहे.

तुम्ही जर ऑस्ट्रेलियन शेतकर्‍याला 16 रुपये भाव देत असाल आणि इथल्या शेतकर्‍याला आठ रुपये देता, त्याऐवजी इथल्या शेतकर्‍याला आवाहन केले आणि त्याला आठच्या ऐवजी बारा रुपये भाव दिला, तर देशाला पुरेल इतका गहू तो इथे पिकवू शकतो.

त्यामुळे चुकीची आयात ही बंदच झाली पाहिजे. तो पैसा आपल्या देशातील शेतकर्‍यांना मिळाला पाहिजे. आज आपण 200 प्रकारची कृषी उत्पादने आयात करत आहोत. खाद्यतेले आयात करत आहोत. हे जर पैसे आपल्या शेतकर्‍याकडे गेले, तर आपला शेतकरी समृद्ध होणार नाही का? हे परिवर्तन करणे आता आपल्यासमोरचे आव्हान आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीसुद्धा अलीकडेच खाद्यतेल आयातीबाबत चिंता व्यक्त केली आहे. येणार्‍या काळात याद़ृष्टीने सकारात्मक पावले पडतील, अशी अपेक्षा आहे.

ही पावले पडताना शेतकरी आर्थिकद़ृष्ट्या सक्षम कसा होईल, यावर अधिक भर दिला पाहिजे. गेल्या काही वर्षांत शेतीसाठी पीक विमा योजना, मृदा कार्ड, किसान सन्मान योजना यासारख्या अनेक योजना आणण्यात आल्या आहेत.

मध्यंतरी केंद्र सरकारने कृषी कायद्यात सुधारणा करून या दिशेने पाऊल टाकले आहे; मात्र त्यांची अंमलबजावणी काटेकोर होऊन शेतकरी जेव्हा खर्‍या अर्थाने आजच्या दुरवस्थेतून बाहेर येईल, तेव्हाच स्वातंत्र्याला खरा अर्थ प्राप्त झाला, असे म्हणता येईल.

Exit mobile version