अंतराळ पर्यटनाचे विस्तारते क्षितिज | पुढारी

अंतराळ पर्यटनाचे विस्तारते क्षितिज

एक व्यवसाय म्हणूनही ‘अंतराळ पर्यटन क्षेत्र’ भविष्यात भरभराटीला येऊ शकते, यात शंकाच नाही. भविष्यकाळात ‘अंतराळ पर्यटन’ ही अब्जावधी डॉलर्सची बाजारपेठ बनू शकते. केवळ उद्योजकच नव्हे, तर अभिनेते-अभिनेत्रींसारखे सेलिब्रिटीही अंतराळ पर्यटन करू लागतील. सामान्य लोकांसाठीही अंतराळ पर्यटन आवाक्यात येईल. इतकेच नव्हे, तर अंतराळात घरे व ऑफिसही भाड्याने मिळू शकतील.

‘मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे’, असे म्हटले जाते. माणसाची खरेदी करण्याची हौस पाहून पु. ल. देशपांडे यांनी ‘मनुष्य हा खरेदीत आनंद मानणारा प्राणी आहे’, असे म्हटले होते. आता याच धर्तीवर ‘मनुष्य हा पर्यटनप्रिय प्राणी आहे,’ अशीही एक नवी व्याख्या बनवावी लागेल. जगभरातील लोकांची पर्यटनाची हौस पाहून ही नवी व्याख्या सहज पटावी! अनेक देशांची अर्थव्यवस्था तर निव्वळ पर्यटनावरच चालणारी आहे. आता तर माणसाला पर्यटनासारखी पृथ्वीही अपुरी पडू लागली आहे. त्यातूनच ‘अंतराळ पर्यटना’चे आकर्षण वाढू लागले आहे. इतकेच नव्हे, तर चक्क अंतराळात पर्यटकांसाठी हॉटेलही उभे (!) करण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत.

जुन्या काळात रशिया, अमेरिका वगैरे बड्या देशांचे अंतराळवीरच अंतराळ प्रवासाला जात असत. त्यामागे वैज्ञानिक मोहिमांचे, विविध प्रयोगांचे तसेच अंतराळ संशोधनाचे कारण असे. मात्र काही धनकुबेरांना आपणही अंतराळात जाऊन निळीशार पृथ्वी ‘याचि देही, याचि डोळा’ पाहावी, अशी स्वप्ने पडू लागली. ही स्वप्ने साकार करण्यासाठी लागणारे धाडस आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे या प्रवासासाठी हवा असणारा बक्कळ पैसा गाठीला असल्याने हे स्वप्न साकार होण्याचा मार्ग खुला होऊ लागला.

अमेरिकेचे उद्योगपती डेनिस टिटो हे जगातील पहिले अंतराळ पर्यटक ठरले. 28 एप्रिल 2001 मध्ये रशियाच्या ‘सोयूझ’ यानातून टिटोसाहेब पृथ्वीच्या कक्षेत फिरत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाहुणे म्हणून आठ दिवसांच्या मुक्कामाला गेले व इथूनच अंतराळ पर्यटनाची किंवा ‘खासगी अंतराळवीर’ या संकल्पनेची सुरुवात झाली. त्यासाठी त्यांनी 20 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सध्याच्या हिशेबात भारतीय चलनात दीड अब्ज रुपयांपेक्षाही अधिक पैसे मोजले होते!

सोप्या भाषेत सांगायचे, तर अक्षरशः पाण्यासारखा पैसा खर्च करून हा माणूस अंतराळ पर्यटनाची हौस भागवून आला. 2001 ते 2009 या काळात एकूण सात अंतराळ पर्यटकांनी पृथ्वीबाहेर फिरून येण्याची गंमत अनुभवली. हे पर्यटन प्रामुख्याने रशियाच्या ‘रॉसकॉसमॉस’ या अंतराळ संशोधन संस्थेद्वारे व रशियाच्याच ‘सोयूझ’ यानातून होत असे. स्थानकावरील (खर्‍या) अंतराळवीरांची संख्या वाढल्याने नंतर रशियाने असे पर्यटन थांबवले. 2019 मध्ये अमेरिकेच्या ‘नासा’ने ‘स्पेस एक्स’च्या ‘क्रु ड्रॅगन’ तसेच ‘बोईंग स्टारलायनर’ यानातून अंतराळ पर्यटकांना स्पेस स्टेशनची सफर घडवून आणण्याचे जाहीर केले.

त्यासाठी अंतराळ पर्यटकाला दिवसाचे 35 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 27 लाख रुपयांचे शुल्क होते. अशा सरकारी कंपन्याच नव्हे, तर खासगी कंपन्याही अंतराळ पर्यटनाच्या क्षेत्रात उतरल्या. एलन मस्क यांची ‘स्पेस एक्स’, जेफ बेजोस यांची ‘ब्लू ओरिजिन’ आणि सर रिचर्ड ब्रान्सन यांची ‘व्हर्जिन गॅलेक्टिक’ यांसारख्या कंपन्यांनी स्वतःची अंतराळयाने तयार करून अंतराळ प्रवासही घडवून आणला. इतकेच नव्हे, तर ‘स्पेस एक्स’ने 2018 मध्ये जाहीर केले की, चंद्रावरही अंतराळ पर्यटन घडवले जाईल. जपानचे अब्जाधीश युसाकू मेझावा यांच्यासह काही पर्यटकांना ‘स्टारशिप’ यानातून ही चंद्राची सफर घडवली जाणार आहे.

अंतराळ पर्यटनाचे तीन प्रकार आहेत. त्यामध्ये ‘ऑर्बिटल’, ‘सब-ऑर्बिटल’ आणि ‘लुनार स्पेस टुरिझम’ यांचा समावेश होतो. चंद्राची सफर अशा ‘लुनार स्पेस टुरिझम’चा भाग असेल. पृथ्वीच्या कक्षेत फिरत असलेल्या ‘आयएसएस’पर्यंत म्हणजेच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापर्यंतच सर्वांना नेले जाईल किंवा तिथे राहण्याची संधी दिली जाईल, असे नाही. केवळ पृथ्वीजवळच्या अवकाशातूनही काही मिनिटांपासून ते एक-दोन दिवसांची सफर घडवून आणली जाऊ शकते.

अनेक खासगी कंपन्यांनी अशा ‘सब-ऑर्बिटल’ किंवा ‘लो अर्थ ऑर्बिट’च्या पर्यटनाचा मार्ग अवलंबलेला आहे. 11 जुलै 2021 मध्ये ‘व्हर्जिन गॅलेक्टिक’च्या ‘युनिटी 22’ यानाने पहिल्यांदाच मानवासहित अंतराळ प्रवास केला. यामध्ये खुद्द रिचर्ड ब्रान्सनही सहभागी झाले होते. अन्य प्रवाशांमध्ये भारतीय वंशाच्या सिरिशा बांदला हिचा समावेश होता. ही मोहीम 90 मिनिटांची होती. 20 जुलै 2021 मध्ये जेफ बेजोस यांच्या ‘ब्लू ओरिजिन’ कंपनीने आपल्या ‘न्यू शेफर्ड क्रु कॅप्सूल’मधून अशीच सफर घडवली होती.

या सफरीत खुद्द जेफ बेजोस, त्यांचे बंधू मार्क बेजोस, ऑलिव्हर डेमेन आणि वॅली फंक अंतराळ सफरीवर गेले होते. ही सफर अवघ्या दहा मिनिटांचीच होती, हे विशेष आणि ती पृथ्वीच्या ‘सब-ऑर्बिटल’पर्यंतच होती. केवळ अंतराळातून पृथ्वीचे विहंगम द़ृश्य पाहण्यापुरतेच हे छोटे पर्यटन होते. 16 सप्टेंबर 2021 मध्ये एलन मस्क यांच्या ‘स्पेस एक्स’ कंपनीने आपल्या ‘क्रु ड्रॅगन’ यानातून पर्यटकांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पर्यटन घडवले. हे पर्यटन तीन दिवसांचे होते. गेल्या वर्षी अशा प्रकारे जगातील बड्या उद्योजकांची तसेच त्यांच्या अंतराळ कंपन्यांची स्पर्धा दिसून आली.

काही अब्जाधीश निव्वळ ‘पर्यटन’ किंवा ‘हौस’ म्हणून या प्रवासाला जातात, असेही नाही. त्यांना विज्ञानात किंवा अंतराळ संशोधनातही रस असतो. रिचर्ड गॅरिएट या अमेरिकन उद्योजकाने म्हटले आहे की, ‘आपल्याला ‘अंतराळ पर्यटक’ म्हणण्याऐवजी ‘खासगी अंतराळवीर’ म्हणवून घेणे अधिक आवडेल. याचे कारण म्हणजे एखाद्या खर्‍या अंतराळवीरांसारखेच प्रशिक्षण घेऊन आम्ही अशा मोहिमेवर जात असतो.’ अंतराळ पर्यटन करणारे दक्षिण आफ्रिकेचे पहिले व्यक्ती व उद्योजक मार्क शटलवर्थ यांनी म्हटले आहे की, आपल्याला अंतराळ पर्यटक म्हणण्याऐवजी ‘व्यावसायिक अंतराळ प्रवासाचा अग्रगण्य माणूस (पायोनियर)’ असे म्हटले जावे!

अमेरिकन उद्योजक ग्रेगरी ओल्सेन यांनी स्वतःला ‘खासगी अंतराळ संशोधक’ म्हणवून घेतले. याचा अर्थ इतकाच की, निव्वळ पैसा आहे म्हणून कुणी अंतराळ सफरीवर जाणार नाही. त्यासाठी तुम्हाला अंतराळ संशोधनाचीही आवड हवी तसेच त्यासाठीचे धाडस आणि कठोर प्रशिक्षणाची तयारीही हवी! अर्थात, एक व्यवसाय म्हणूनही अंतराळ पर्यटन क्षेत्र भविष्यात भरभराटीला येऊ शकते यात शंकाच नाही. अमेरिकेच्या ‘फेडरल एव्हीएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ने आपल्या एका अहवालात म्हटले आहे की, येत्या वीस वर्षांच्या काळात अंतराळ पर्यटन ही अब्जावधी डॉलर्सची बाजारपेठ बनू शकते!

पर्यटन म्हटले की, हॉटेल व्यवसाय आलाच. अंतराळ पर्यटनही त्याला अपवाद राहिले नाही. ‘ऑर्बिटल असेंब्ली’ नावाची एक स्पेस कंपनी 2019 पासून अंतराळात हॉटेल निर्माण करण्याची तयारी करीत आहे. हे ‘हॉटेल’ म्हणजे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासारखेच ‘स्पेस स्टेशन’ असेल. अशी एक नव्हे, तर दोन स्पेस स्टेशन्स तयार केली जाणार आहेत. सुरुवातीला ‘पायोनियर स्टेशन’ नावाचे छोटे स्पेस स्टेशन सुरू केले जाईल व तिथे एका वेळी 28 लोक राहू शकतील.

पुढील तीन वर्षांमध्ये म्हणजेच 2025 पर्यंत हे स्पेस हॉटेल सुरू होईल. त्यानंतर ‘व्होएजर’ नावाचे मोठे स्पेस स्टेशन किंवा स्पेस हॉटेल सुरू केले जाईल. तिथे एकाच वेळी 400 लोकांना राहता येईल. हे स्पेस हॉटेल 2027 मध्ये सुरू करण्याची योजना आहे. एकंदरीत, भविष्यात अंतराळ पर्यटन आणि हॉटेलिंगचा व्यवसायही भरभराटीला येणार यात शंकाच नाही. केवळ उद्योजकच नव्हे, तर अभिनेते-अभिनेत्रींसारखे सेलिब्रिटीही अंतराळ पर्यटन करू लागतील.

‘स्टार ट्रेक’ फेम अभिनेते विल्यम शॅटनर यांनी ‘ब्लू ओरिजीन’च्या यानातून अंतराळ प्रवास करून, असे करणारे सर्वात वृद्ध व्यक्ती बनण्याचा मानही पटकावलेला आहे. केवळ अब्जाधीशांसाठीच नव्हे, तर अन्य लोकांसाठीही अंतराळ पर्यटन आवाक्यात येईल, अशा पद्धतीच्या मोहिमाही भविष्यात आखल्या जातील. त्याबाबतचे संकेत अंतराळ कंपन्यांच्या बड्या उद्योजकांनी दिलेले आहेत. भविष्यात अंतराळात घरे व ऑफिसही भाड्याने मिळू शकतील, असे ‘ऑर्बिटल असेंब्ली’ने म्हटले आहे. माणसाच्या या भरार्‍या पाहता, भविष्यात मंगळही दूर वाटणार नाही, असेच दिसते!

Back to top button