सिंहायन आत्मचरित्र : घराचे झाले गोकुळ! - पुढारी

सिंहायन आत्मचरित्र : घराचे झाले गोकुळ!

डॉ. प्रतापसिंह ऊर्फ बाळासाहेब ग. जाधव, मुख्य संपादक, दैनिक पुढारी

पाच नोव्हेंबर 2020 रोजी ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. तसेच त्यांनी ‘पुढारी’ची सूत्रे 1969 साली हाती घेतली. त्यांच्या पत्रकारितेलाही 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘पुढारी’ हे विविध चळवळींचे प्रथमपासूनचे व्यासपीठ. साहजिकच, संयुक्त महाराष्ट्र लढ्यापासून अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचे ते साक्षीदार आहेत. केवळ साक्षीदार नव्हे, तर सीमाप्रश्नासह अनेक आंदोलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. पाऊण शतकाचा हा प्रवास; त्यात कितीतरी आव्हाने, नाट्यमय घडामोडी, संघर्षाचे प्रसंग! हे सारे त्यांनी शब्दबद्ध केले आहेत, ते या आत्मचरित्रात. या आत्मचरित्रातील काही निवडक प्रकरणे ‘बहार’मध्ये क्रमशः प्रसिद्ध करण्यात येत आहेत. – संपादक, बहार पुरवणी

आई, आबा, मी व माझ्या सहा बहिणी असे आमचे कुटुंब शुक्रवार पेठेतील गोविंद निवासमध्ये राहात होतो. शिक्षण पूर्ण होत गेले, तसे माझ्या मोठ्या बहिणींचे विवाह पहिल्यांदा झाले. माझ्या लग्नानंतर लहान बहिणींचे विवाह समारंभ पार पडले. माझा तसाच माझ्या बहिणींचा संसार सुरू झाला.

आम्हा सर्व बहीण-भावंडात इतका जिव्हाळा होता की, त्या लग्नानंतर सासरी जाताना मला खूप यातना व्हायच्या. मला आठवतं. मोठी बहीण अक्काला मुंबईला म्हणजे मुलुंडला सोडायला गेलो की, मी परत येताना फार दुःखी व्हायचो. खरं तर बहीण-भावंडं लहानपणापासून एकत्र वावरलेलो असतो. सर्वांच्यात इतका एकोपा असतो की, काही आवडीची खाण्याची गोष्ट असली तरी आपण ती सर्वांना वाटून खातो.

‘सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती
ओवाळिते भाउराया रे
वेड्या बहिणीची रे वेडी माया…’

दोन मोठ्या आणि चार लहान बहिणींचा मी भाऊ. जन्म झाल्यापासून आमचा निकटचा सहवास. मोठ्या दोघींचा मी लाडका ‘बाळ’, तर लाडक्या चार लहान बहिणींचा मी ‘अण्णा!’ अशा मायेच्या गोकुळात मी वाढलो.

सिंहायन आत्मचरित्र
आमचा जाधव परिवार… माझ्या सर्व बहिणी, त्यांचे पती, त्यांच्या सुना व नातवंडे. माझी मुले, सून, नातवंडे व सर्व भाचे यांच्यासमवेत ‘इंदिरा निवास’ येथे झालेल्या कौटुंबिक सोहळ्यातील क्षण.

‘भाऊ असतो बहिणीचा जन्मभरचा मित्र,

त्याच्या डोळ्यात असते नित्य
तिच्या आयुष्याचे चित्र
जिचे भाऊ तिला पाहतात नेहमी
सुखी आणि समृद्ध
तिच्या हाती असते नित्य अन्नपूर्णेची
थाळी सिद्ध…
भाऊ असतो कृष्ण… ती द्रौपदी-सुभद्रा
तिच्या डोळ्यांत सदैव असते
भावाचीच मुद्रा…’

अशी एका कवीची कविता आहे. आम्ही सगळे एकत्र वाढलो, खेळलो, बागडलो… आई-आबांच्या वात्सल्याने भरलेल्या कुशीत आमचं बालपण सरलं. आम्ही एकमेकांवर भरभरून माया केली. मोठ्या बहिणींनी वात्सल्याने ओथंबलेल्या माझी माया केली आणि मीही धाकट्या बहिणींवर तशीच माया केली. मुलगी ज्या घरात वीस-पंचवीस वर्षे राहते, हरिणीसारखी बागडते, तेच घर सोडून सर्वस्वी परक्या अशा सासरच्या घरी एके दिवशी निघून जाते.

तिच्या आयुष्यातलं हे खूप मोठं परिवर्तन घडतं. तिचं जीवन पूर्णपणे बदलून जातं. माझ्या प्रत्येक बहिणीच्या लग्नप्रसंगी माझ्या काळजात विलक्षण कालवाकालव झाली. लग्नात आपली सख्खी बहीण, जिच्याशी आपण सख्ख्या नात्यानं जोडले गेलेलो असतो, ती बहीण परक्या घरी जाते. आणि भावाचं लग्न होतं, तेव्हा आयुष्यातही सर्वस्वी परकी स्त्री प्रवेश करते.

जिच्याशी आपली कसलीही ओळख नाही, अशी अनोळखी स्त्री पत्नी म्हणून आपल्या घरात येते आणि आपली जिवलग असलेली बहीण मात्र आपल्याला सोडून जाते, हे खरे तर क्लेशदायक असते; पण ती घरोघरची रीत आहे. ती पाळावीच लागते. बहीण कितीही लाडकी असली, मायेची असली, तरी तिला घरीच ठेवून घेता येत नाही, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. आम्हा सगळ्या भावंडांच्या नैसर्गिक जिव्हाळ्याचा झरा हा अखंडपणे झुळझुळत राहिलेला आहे.

घर कसं आलिशान असावं किंवा घराची सजावट कशी मनमोहक असावी याकडे प्रत्येक जण आपल्या कुवतीनुसार आवर्जून लक्ष देतो; पण माझ्याद़ृष्टीने घरातील सदस्यांमध्ये असलेल्या जिव्हाळ्याच्या आंतरक्रिया या महत्त्वाच्या. चंद्रमौळी झोपडी असो, एखाद्या शेतकर्‍याचं शेणकाल्यानं सारवलेलं घर असो वा कुडाची झोपडी किंवा शहरी संस्कृतीतील एखादं घर… त्यामध्ये राहणार्‍या कुटुंब सदस्यांमध्ये असलेला जिव्हाळा, प्रेम, वात्सल्य हेच घराचं खरं घरपण. त्याला पर्याय असत नाही.

सुदैवाने आम्हा सात भावंडांमध्ये बालपणापासूनच कमालीचं प्रेम, आपुलकी राहिली. त्यामुळेच घर नावाच्या या गोकुळात फक्त माझीच नव्हे, तर माझ्या बहिणी व पुढील पिढ्यांचीही चांगलीच संस्कारक्षम मशागत झाली. नातेसंबंधातील या गोडव्यानं आजही माझं मन व्यापलं आहे. आई-आबांबरोबर घरात वावरणारी आम्ही सात भावंडं. अर्थात, या चिमुकल्यांच्या वयात अंतर हे होतंच. अन् त्या अंतराचा मान ठेवूनच सर्व काही चाललेलं असायचं. साने गुरुजी म्हणायचे, मुले ही देवाघरची फुले आहेत. तर या फुलांचा दरवळ आमच्या घरात सदोदित राहिला.

बालवयाला अनुसरून आम्हा बहीण-भावंडांमध्ये असलेला अवखळपणा अनेकदा समोर यायचा. त्यामुळे त्या त्या भावंडाची पटकन दखल घेतली जायची. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती म्हणतात, ते उगाच नाही. आम्ही सात भावंडं असलो तरी प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या होत्या. अर्थात, त्यामध्ये एकदोघांच्या वा अधिक जणांच्या आवडीनिवडी जुळण्याचा योगही असायचाच. घरात कितीही शिस्तीचं वातावरण असलं तरी अशा गोष्टी त्याला अपवाद असायच्या.

प्रत्येकाचा अभ्यास हेही आमच्या घरातील तसं भारी प्रकरण. आईसाहेबांचं सर्वांच्या अभ्यासावर बारीक लक्ष असायचं. साहजिकच अभ्यास करताना टिवल्याबावल्यांना थारा नसला, तरी त्यातूनही खोडी काढणं नसेल, तर ते बालपण कसलं! एखादी खोड काढून नामानिराळा राहण्यात मी तसा उस्ताद. अर्थात, मी मुलगा म्हणून एकुलता एक असल्यानं तेही माझ्यासाठी चांगलंच संरक्षण कवच असायचं, हे सांगणे न लगे! पण, माझ्यावर अशी वेळ कोणत्याही बहिणीनं येऊ दिली नाही, हे त्यांच्या मनाचं मोठेपण.

आम्ही बहिणी-भावंडं एकत्रच जेवायला बसायचो. घशाखाली उतरणारे घासही मौजमस्ती करीतच वाटचाल करायचे. मध्येच हास्याची लकेर, एखाद्याचा तक्रारवजा स्वर… या ठरलेल्याच गोष्टी. पण, असं काहीही असलं तरी मी सर्वच बहिणींचा कमालीचा लाडका होतो. त्यामुळे कोणत्याही बालसंघर्षात कोणतंही बालंट त्यांनी माझ्यापर्यंत येऊ दिलं नाही. तेव्हा मी लहान होतो; परंतु बहिणींकडून मिळालेल्या त्या प्रेमाची महती काय होती किंवा आहे, हे आठवताना नाही म्हटलं तरी आजही कंठ रुंदावतो. कविवर्य ग. दि. माडगूळकरांच्या शब्दात सांगायचं झालं, तर –

‘नवीन आज चंद्रमा, नवीन आज यामिनी।
मनीं नवीन भावना, नवेंच स्वप्न लोचनीं॥’
असं असलं, तरी तेच गदिमा म्हणतात,
‘दूर बाल्य राहिलें, दूर राहिल्या सखी
बोलण्या कुणासवें सूर दाटले मुखीं
अननुभूत माधुरी आज गीतगायनी॥’

या ओळी ओठावर आल्यानंतर परघरी गेलेल्या बहिणींची आठवण तशी काळजाला बोचणारीच.
माझं लग्न हा घरातील चांगलाच हॉट विषय ठरलेला. मी मुली पाहायला जायचा; परंतु मी कमालीचा चोखंदळ. त्यामुळे तो योग जुळून येईलच याची खात्री नसायची.

मी कमालीचा कामात मग्न. रिकामं बसून राहणं मला आवडत नाही, हे सर्वांनाच माहीत व सर्वांच्याच अंगवळणी पडलेलं. तरीही अहमदनगर असो, मुलुंड वा सांगली-मिरज… तेथून एखादी बहीण घरी येत आहे असं कळल्यानंतर माझं लक्ष आपसूकच तिकडं लागायचं. हातातल्या कामाची गती मंद व्हायची. तसं होणं साहजिकच आहे. मनात तळ ठोकून राहिलेला जिव्हाळा थोडाच शांत राहणार आहे. मग माझी पावलं आपसूकच घराकडे वळायची. बहिणींची ख्यालीखुशाली, तिच्याबरोबरच्या भाच्यांशी संवाद हा ठरलेलाच. आम्हीही कधीकाळी,

‘झुक झुक झुक झुक आगीन गाडी,
धुरांच्या रेषा हवेत काढी,
पळती झाडे पाहू या
मामाच्या गावाला जाऊ या….’
हे स्वर आळवलेले होते!

माझ्या दोन मोठ्या बहिणी अक्का व ताई यांची व माझी लहान बहीण माई या तिघींची लग्ने माझ्या आधी झाली. अक्काला अमर, अजय ही दोन मुले; तर ताईला समीर हा मुलगा; माईला म्हणजे लीलाला रणजित व सत्यजित ही दोन जुळी मुले, असा हा बालगोपाळांचा मेळावा आमच्या शुक्रवार पेठेतील ‘गोविंद निवास’ या वाड्यात भरलेला असायचा.

माझ्या लग्नानंतर माझी मुलगी शीतल व मुलगा योगेश यांची यात भर पडली, तर माझ्या इतर लहान बहिणी जयश्री हिला निकिती, शिल्पा या दोन मुली व अमेय हा मुलगा; तर पाचवी बहीण वैजयंती हिला निखिल व कुणाल हे दोन मुलगे व सर्वात लहान बहीण हेमलता हिला अक्षय व अजिंक्य अशी दोन मुले. असे आमच्या कुटुंबात सात भावंडांची एकूण 14 लहान मुलांची मोठी गँग होती. त्यामुळे माझ्या बहिणी, मेहुणे, भाचे, भाच्या, माझी पत्नी व मुले, आई व आबा असा हा मोठा परिवार म्हणजे हे एक गोकुळच झालं होतं.

भाच्यांशी संवाद साधताना मन रितं व्हायचं, आनंदानं फुलायचं. त्यांना कडेवर घेतानाच आनंद हा कल्पनातीतच. पण, वय कुणासाठी थांबत नाही. मोठ्या त्या मोठ्याच; पण लहान बहिणीही वयानं वाढल्या, भाचरं मोठी झाली, त्यांचंही गोकुळ निर्माण झालं… तरी कालचा जिव्हाळा आजही आपला आब राखून आहे. मी त्यांच्यामध्येही चांगलाच रममाण होतो. एक मात्र खरं की, आपल्याकडे प्रौढत्व असलं तरी ते आपल्यालाही बाल्यावस्थेत घेऊन जातं. हा विरंगुळाही आपल्याला ताजंतवानं ठेवण्यास मदत करतो.
माझा विवाह 5 मे 1974 चा. त्यानंतर बरोबर सव्वा वर्षांनी आमच्या आयुष्यात आमची मुलगी ‘शीतल’ चांदणं शिंपीत आली.

‘लाट उसळोनी जळी खळे व्हावे
त्यात चंद्राचे चांदणे पडावे
तसे गाली हासता तुझ्या व्हावे…’

कवी बी यांच्या या काव्यपंक्तीसारखीच माझ्या मनाची तेव्हा अवस्था झाली होती. तिला बघायला जेव्हा मी दवाखान्यात धावत गेलो होतो, तेव्हा पाळण्यात झोपलेली ती शुक्राची चांदणी बघून माझा ऊर आनंदानं भरून आला. एखाद्या ससुल्यासारखं ते गोड गोजिरवाणं कन्यारत्न पाहून तेव्हाच माझ्या मनात विचार आला की, या चांदणीचा प्रकाश किती शीतल आहे! हिचं नाव ‘शीतल’च ठेवायचं!

माणसाचं आयुष्य किती विस्मयकारक आहे, याची प्रचिती मी घेत होतो. माझी पत्नी सौ. गीतादेवी या पहिल्या बाळंतपणासाठी म्हणून माहेरी मुंबईला गेल्या होत्या. तिथं त्यांच्यावर डॉ. पद्मा मेहता यांची ट्रिटमेंट चालू होती आणि मग 9 सप्टेंबर 1975 रोजी ‘शीतल’नं या जगातच नव्हे, तर आमच्या जीवनातही प्रवेश केला! मुंबईतील ताडदेवच्या भाटिया हॉस्पिटलमध्ये तिचा जन्म झाला.

मुलगी झाली म्हणून मी नाराज नव्हतो. कारण मला एक-दोन नव्हे, चक्क सहा बहिणी आहेत. आमच्या शुक्रवार पेठेतील गल्लीत सगळ्यांच्याच घरात मुलीच जास्त होत्या. आमचे शेजारी शेवडेगुरुजी यांना एक मुलगा, चार मुली होत्या. आमचे दुसरे शेजारी दशरथ गायकवाड यांना तर सर्व पाच मुलीच. त्यामुळे आमच्या गल्लीला मुलींचे वरदानच होते असे मला वाटायचे. त्यामुळे मुलगी झाली तरी मी आनंदी होतो.

पहिली बेटी आणि तुपाची रोटी, हा अनुभव आम्ही अनुभवत होतो. त्यावेळी मी कोल्हापुरातच होतो. जेव्हा मला ‘मुलगी झाली हो,’ म्हणून माझ्या सासरवाडीतून फोन आला. मला पहिला मुलगा होईल असे वाटले होते. साहजिकच, प्रत्येक बापाची तीच इच्छा असते कारण प्रत्येक पित्याला आपला वारस हवा असतो. मला सहा बहिणी होत्या आणि त्यांचं आबांच्यावर जिवापाड प्रेम होतं. त्यामुळे मुलगी बापावर मुलापेक्षा जास्त प्रेम करते, हे मी स्वतः अनुभवलं होतं. आई आणि आबांचा आनंद तर गगनात मावत नव्हता. मी तर लगेचच मुंबईला जाऊन धडकलो.

मी हॉस्पिटलमध्ये धावतच गेलो. योगायोगानं त्याचवेळी डॉ. पद्मा मेहता यांचा राऊंड चालू होता. त्या बाळ-बाळंतिणीच्या तब्येतीची चौकशी करीत होत्या. माझ्यासमोरच त्या उत्स्फूर्तपणे बोलून गेल्या. ‘काय सुंदर बेबी आहे! इतकं सुंदर बाळ मी कधीच बघितलं नव्हतं.’

खरोखरच माझी शीतल खूपच गोंडस दिसत होती. डॉ. पद्मा मेहतांनी तर तिचं कौतुक भाटिया हॉस्पिटलच्या सार्‍या स्टाफकडे केलं. खरं सांगायचं, तर जन्मजात तिला लाभलेलं देखणेपण आजही तसंच टिकून आहे. वाढत्या वयाबरोबर होणारे शारीरिक बदल सोडले, तर तिच्या सौंदर्याची नजाकत कायम आहे.

बालपणापासूनच मला तिच्याबद्दल ओढ आहे आणि आजही मला तिची खूप काळजी वाटत असते. आकाशात भरारी घेणार्‍या घारीचं लक्ष जसं तिच्या घरट्यातील पिलांवरच असतं, अगदी तसंच माझं मन आजही शीतलभोवतीच घुटमळत असतं.

बाळंतपणानंतर सौ. गीतादेवी काही दिवस मुंबईत त्यांच्या माहेरीच राहिल्या. तिथंच बाळाचं बारसं करण्यात आलं आणि माझ्या सूचनेप्रमाणं तिचं नाव ‘शीतल’ ठेवण्यात आलं. अर्थात, तिला लहानपणापासूनच आम्ही सर्व जण ‘ताई’ म्हणतो.

आता आबा आणि आई यांना शीतलला खेळवण्याची ‘ड्युटी’च लागली होती. त्यातून त्यांना मिळणारा विरंगुळा लाखमोलाचा होता. लहान मुलाच्या अस्तित्वानं घराला खरं खरं घरपण येतं, असं म्हणतात ते काही खोटं नाही. त्याचं हसणं, खिदळणं, पडणं, रडणं; अहो त्याचं रडणं हेसुद्धा एक सुरेल संगीतच असतं. एकूणच, शीतलच्या सहवासात जाधवांच्या घराला आनंदाचं भरतं आलं होतं. मी मुंबईला गेलो की, ‘रूपम’सारख्या मोठमोठ्या दुकानांतून या आमच्या ताईला हौसेनं सुंदर सुंदर ड्रेस खरेदी करून घेऊन यायचो. शीतलचे कोडकौतुक करण्यात आमचे दिवस भुर्रर्रकन उडून जात होते.

एक मात्र खरं की, मला शीतलसाठी जास्त वेळ देता आला नाही. ‘पुढारी’चा व्याप आणि सामाजिक समस्या सोडवण्यात मी गुंतून गेलो होतो. परंतु, एवढा व्याप कमी होता की काय म्हणून नियतीनं माझ्या खांद्यावर ‘निर्णयसागर’ची धुरा ठेवली. त्याला कारणही तसंच घडलं. गीतादेवी यांचे मामा उदयसिंह काळे यांचा 1975 मध्ये कर्करोगानं मृत्यू झाला. ते निर्णयसागरचं काम पाहत होते. परंतु, त्यांच्या मृत्यूनं निर्णयसागरला कुणी वालीच उरला नव्हता.

त्यामुळे माझ्या सासू-सासर्‍यांनी निर्णयसागरचं काम पाहण्याची मला विनंती केली. एका अर्थानं त्यांनी निर्णयसागरच्या किल्ल्याच माझ्या हातात सोपवल्या आणि ते रिकामे झाले. त्यामुळे 1975 पासूनच माझा मुंबईतला मुक्कामही वाढला. साहजिकच, शीतलच्या बाललीलांना मी बर्‍यापैकी पारखा झालो. त्याची खंत आजही मला आहे.

त्या काळात सौ. गीतादेवींचा मुक्काम मात्र कोल्हापुरातच होता. वस्तुतः सौ. गीतादेवी या एक कर्तबगार स्त्री होत्या. त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा केलेला होता. त्यानंतर त्यांनी काही काळ निर्णयसागरसारख्या प्रख्यात आणि मोठ्या प्रेसचं व्यवस्थापन मोठ्या कौशल्यानं सांभाळलं होतं. त्या काळात त्यांनी काही धाडसी निर्णय घेऊन सर्वांनाच थक्क केलं होतं.

साहजिकच माझी इच्छा होती की, माझ्या अनुपस्थितीत कोल्हापुरात त्यांनी ‘पुढारी’चा कार्यभार सांभाळावा. त्या ते काम मोठ्या तडफेनं आणि उमेदीनं करतील, याची मला पक्की खात्री होती; पण नियतीलाच ते मान्य नव्हतं. कारण 1970 साली माझ्या आईंच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं होतं; पण ते शंभर टक्के यशस्वी न झाल्यामुळे त्यांना चालताना किंवा उभं राहताना त्रास होत होता. त्यामुळे त्यांना घरकाम करणं त्रासाचं होत होतं. त्यातच शीतलचीही जबाबदारी होती. मुलं लहान असताना आईच्या कर्तृत्वाचे पंख छाटले जातात, असं म्हटलं जातं, ते खरंच आहे. त्यातच आमचा गोतावळा मोठा. पै-पाहुण्यांचा राबताही तेवढाच मोठा. अशा वेळी गीतादेवींची खरी गरज ‘पुढारी’पेक्षा जाधवांच्या घरालाच अधिक होती.

त्यातल्या त्यात एक गोष्ट बरी झाली होती. शीतलची देखभाल करायला आम्हाला एक चांगल्या विनापाश आजीबाई मिळाल्या होत्या. त्यांचं नाव मनीआजी. त्या मूळच्या पनवेलच्या. शीतलची खरी देखभाल या मनीआजींनीच केली. आम्ही सर्व जणच त्यांना मनीआजी म्हणायचो. त्या वयस्कर असल्या तरी चांगल्या काटक होत्या. त्यांनी शीतलचं संगोपन आपल्या नातीसारखं समजून केलं. लहान बाळाला अंघोळ घालण्यापासून, त्याला दिवसभर सांभाळण्याचं काम या मनीआजीच करीत होत्या. त्या हे सारं काम आपुलकीनं करीत असल्यामुळे आम्हाला शीतलकडे फारसं लक्ष द्यावं लागलं नाही.

1978 साली माझा मुक्काम मुंबईतच होता. आईंच्या गुडघ्याचं ऑपरेशन मुंबईतच करण्यात आलं होतं. त्यांना मरिन लाईन्स येथील बाला नर्सिंग होममध्ये अ‍ॅडमिट करण्यात आलं होतं. डॉ. चौबळ त्यांच्यावर उपचार करीत होते. तसेच डॉ. सिंघलही त्यांना ट्रिटमेंट देत होते. आईंना डिस्चार्ज मिळाल्यानंतर मी आणि माझी मोठी बहीण अक्का, आम्ही त्यांना कोल्हापूरला घेऊन आलो.

गुडघ्याचं ऑपरेशन केल्यामुळे त्यांना गाडीतून बसवून आणणं शक्य नव्हतं म्हणून एका अ‍ॅम्बुलन्सनंच त्यांना आम्ही कोल्हापूरला आणलं. आम्ही आईंना घेऊन आमच्या शुक्रवार पेठेतील घरी रात्री उशिरा पोहोचलो आणि त्यानंतरही मी ‘पुढारी’ ऑफिसमध्ये येऊन कामकाजात मग्न झालो. परंतु, ती रात्र आमच्यासाठी शुभरात्र ठरली. म्हणतात ना, ‘रात्रीच्या गर्भात उद्याचा उषःकाल असतो;’ अगदी तसंच त्या रात्री घडलं. त्या रात्रीच्या गर्भातून जाधवांच्या घराण्याचा उषःकाल होणार होता!

आईंना घरी आणलं आणि त्याच रात्री सौ. गीतादेवींच्या पोटात दुखू लागलं. त्यांना प्रसववेदना होऊ लागल्या. ताबडतोब त्यांना मेरी वॉलनेस हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. शीतलच्या जन्मानंतर अवघ्या दोन वर्षांतच योगेशच्या रूपानं तिचा भाऊराया जन्माला आला. 3 फेब्रुवारी 1978 रोजी त्याचा जन्म झाला आणि ‘मुलगा’ झाला म्हणून घरात आनंदाला उधाण आलं! वास्तविक, गीतादेवींचं नाव मागच्या वेळेसारखंच मुंबईच्या भाटिया हॉस्पिटलमध्ये घातलं होतं. त्यांचं हेही बाळंतपण डॉ. पद्मा मेहता यांच्याकडेच होणार होतं.

परंतु, देवाची इच्छा काही वेगळीच होती. योगेशचा जन्म कोल्हापुरातच व्हावा, असं जणू नियतीलाही वाटत होतं. कारण त्यामागे एक पारंपरिक सूत्र होतं. ते असं की, माझ्या पणजोबांचा, आजोबांचा, आबांचा आणि माझाही जन्म कोल्हापूरच्या मातीमधलाच! आमच्या नाळी इथेच पुरल्या गेल्या. योगेश हा आमच्या वंशाचा दिवा. आमचा वंश पुढे चालवणारा. मग त्याची नाळही इथंच पुरली गेली पाहिजे. ती मुंबईत पुरून कशी चालेल! म्हणून योगेशचा जन्म कोल्हापुरात झाला असावा, याची मला खात्री आहे.

‘योगेश’च्या रूपानं वंशाचा दिवा लागला आणि सर्वांच्याच चेहर्‍यावर आनंदाची सूर्यकिरणं फुलून आली. आई-आबांचा आनंद तर काय वर्णावा! आम्ही योगेशचं बारसं बाराव्या दिवशी मोठ्या थाटामाटातच साजरं केलं. गीतादेवी गणपतीच्या निस्सीम भक्त. त्यांची गणपतीवर अतोनात श्रद्धा. त्यामुळे मुलाचं नाव गणपतीच्याच नावावरून ठेवायचं, हा त्यांचा आग्रह. पण आम्हीही त्यांनाच नाव शोधायला सांगितलं. त्यांनी मग गणेश सहस्रनामावलीतून ‘योगेश’ या नावाची निवड केली आणि ते आम्हा सर्वांनाच पसंत पडलं. थोडक्यात, योगेश प्रतापसिंह जाधव यांचा जन्म अशा तर्‍हेनं झाला.

शीतल आणि योगेश यांंच्या बाललीलांमध्ये सगळं घरच मश्गूल होऊन गेलं आणि आमच्या चिरेबंदी घराचं गोकुळ झालं! दोन लहान बाळांच्या पालनपोषणात आमचा वेळ कसा जात होता, हे आमचं आम्हालाच कळत नव्हतं. विशेष म्हणजे ज्या मनी आजींनी मुंबईत शीतलची देखभाल केली होती, त्याच आजीबाई आता योगेशच्या देखभालीसाठीही धावून आल्या.

माझ्या मुलांबरोबरच आमचं घर माझ्या बहिणींच्या मुलांनी बहरलेलं असायचं. माझे भाचे, भाच्या असा मोठा गोतावळा होता. या सर्वांच्याबरोबर झोपाळ्यावर बसून जोराने झोका घेत दंगा करण्यात, यांना घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी दौरा करण्यात, गगनबावड्याला जाण्यात किती आनंद असायचा याचे शब्दांत वर्णनही करू शकणार नाही.

निर्णयसागरच्या जबाबदारीमुळे माझा एक पाय मुंबईत, तर दुसरा कोल्हापुरात अशी माझी अवस्था झाली होती. परंतु, मुंबईहून कोल्हापूरला येताना माझी प्रत्येकवेळी भरगच्च खरेदी ही ठरलेलीच असायची. त्यात आईसाठी नऊवारी, तर पत्नीसाठी सहावारी साड्यांची खरेदी हमखास असे. पण खरी खरेदी होत असे, ती या दोन लाडक्या चिमण्यांसाठी! मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमधून त्यांच्यासाठी नवनव्या फॅशनचे छान छान कपडे घेण्यात माझा वेळ कसा निघून जाई, ते माझं मलाच कळत नव्हतं. मी मुंबईहून वेळोवेळी त्यांच्यासाठी आणलेल्या खेळण्यांनी तर आमच्या घरात एवढी गर्दी केली होती की, आमच्यासाठी तिथं आता फारशी जागाच उरली नव्हती. कळत-नकळत पुढची पिढी घराचा ताबा कसा घेत असते, याचं हे सुंदर उदाहरण होतं.

आता आबांनाही एक रोजची ड्युटी लागली होती आणि ती ते स्वेच्छेनं पार पाडीत होते. दररोज दोन्ही मुलांना व इतर नातवंडांना गाडीत बसवायचं आणि त्यांना दूरदूरपर्यंत फिरवून आणायचं, हा जणू त्यांचा छंदच होऊन बसला होता. बघता बघता आमच्या चिमुकलीनं म्हणजे शीतलने शारदेच्या पवित्र मंदिरात प्रवेश केलादेखील. तिला आम्ही होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमध्ये दाखल केले आणि तिथंच तिनं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यावेळी योगेश हा सेंट झेवियर्समध्ये शिकत होता.

माझी दोन्ही मुलं – योगेश आणि शीतल हे कोल्हापुरातच कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण घेत होते. माझ्या आधी व नंतर लग्न झालेल्या सर्व बहिणींची बाळंतपणं कोल्हापुरात झाली. त्यांची मुलंही आमच्या घरी असत. हा सर्व बालगोपाळांचा गोतावळा कोल्हापुरातच वाढला. पूर्वीचा शुक्रवार पेठेतील वाडा व नंतर नागाळा पार्क येथील ‘इंदिरा निवास’ हा बंगला म्हणजे मोठं गोकुळच झालं होतं. मला पूर्वीपासून लहान मुलांची फार आवड. त्यामुळं माझ्या मुलांच्या बरोबर; बहिणींच्या मुलांच्याबरोबर; इतकेच नव्हे, तर आतेबहिणींच्या मुलींच्याबरोबर खेळण्यात मला फार आनंद व्हायचा. या सर्व बालगोपाळांना घेऊन मुंबई, पुणे, गोवा, गगनबावडा अशी आमची भ्रमंती सुरू असायची.

माझा सर्वात मोठा भाचा अमरपासून ते सर्व लहान बच्चे कंपनीला मी फक्त खेळवतच नव्हतो, तर दुधाच्या बाटलीतून दूध पाजण्याचं कामही मोठ्या हौसेनं करीत असे. लहान मुलांचा लळा असल्यानं कामाच्या प्रचंड व्यापातून मला तेवढाच विरंगुळा मिळत असे. मुलांचे हट्टही मोठे नामी असायचे. कुणाला मामाच्या पाठीवर बसून घोडा करायचं असायचं, तर कुणाला चोर-शिपायाचा खेळ करून बंदूक चालवायची असायची. लपाछपी तर ठरलेलीच. लपाछपीमध्ये तर संपूर्ण घर डोक्यावर घेतलं जायचं.

एकावेळी अनेक आवाज निघाल्यानंतर ते साहजिकच होणार ना हो! अर्थात, या बाललीलांमध्ये पूर्णतः रममाण होणं शक्य नसलं तरी, काही काळ तरी मी त्या रूपातही वावरायचो. एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमालाही आम्ही सर्व जण जायचो. अर्थात, तेही माझं शेड्यूल पाहूनच. माझं क्षेत्र म्हणजे सेकंदासेकंदाचा वेध घेणारं रणांगणच. त्यामुळेच मी प्रदर्शनासारख्या ठिकाणाला प्राधान्य द्यायचा. एखाद्या तातडीच्या कामासाठी निघायचं असेल तर तिथून ते शक्य व्हायचं. अर्थात, पाठीमागची जबाबदारी सांभाळण्यास गीतादेवी या सक्षम असल्यानंच मला ते शक्य व्हायचं.

मी, माझी पत्नी गीतादेवी, माझी दोन मुलं व सहा बहिणींची मुलं अशा प्रचंड गोतावळ्यामुळं आमचं ‘इंदिरा निवास’ नेहमी गोकुळासारखं गजबजलेलं असायचं. या बच्चे कंपनीत ‘आनंदाचे डोही, आनंद तरंग’ हा आनंद मी मन भरभरून घेतला आहे. आज मी वयाची पंचाहत्तरी ओलांडली तरीही माझं लहान मुलांचं आकर्षण कमी झालेलं नाही. आजही मला माझी व बहिणींची नातवंडे यांच्याशी खेळण्यात खूप आनंद मिळतो. सतत कामाच्या रगाड्यात कडक शिस्तीचा असणारा मी, या बालगोपाळांच्या सहवासात माझं बालपण शोधत असतो.

मी मुलांबरोबर लहान झालो, तरी ती जसजशी मोठी होत गेली तसं तसं त्यांना मार्ग चालताना काय करायचे, हे सांगण्यासही मी कधी विसरलो नाही. मंगेश पाडगावकर यांनी म्हटले आहे,

‘बिकट वाट वहिवाट असावी,
धोपट मार्गा धरू नको;
मिळमिळीत बेचव जगण्याच्या उपदेशांना स्मरू नको!’

माझ्या पुढील पिढ्याही बुलंद, आत्मविश्वासानं परिपूर्ण, काहीतरी वेगळं करण्याची हिंमत असलेल्याच असाव्यात! ही माझी भावना व त्याचद़ृष्टीने मी त्यांच्याशी संवाद साधत असतो. त्यांचीही वाटचाल माझ्या विचारांचा पाया धरून सुरू आहे, याचा मला अभिमान आहे.

Back to top button