सिंहायन आत्मचरित्र : हिमालयावर झेंडा | पुढारी

सिंहायन आत्मचरित्र : हिमालयावर झेंडा

डॉ. प्रतापसिंह ऊर्फ बाळासाहेब ग. जाधव मुख्य संपादक, दैनिक पुढारी

पाच नोव्हेंबर 2020 रोजी ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. तसेच त्यांनी ‘पुढारी’ची सूत्रे 1969 साली हाती घेतली. त्यांच्या पत्रकारितेलाही 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘पुढारी’ हे विविध चळवळींचे प्रथमपासूनचे व्यासपीठ. साहजिकच, संयुक्त महाराष्ट्र लढ्यापासून अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचे ते साक्षीदार आहेत. केवळ साक्षीदार नव्हे, तर सीमाप्रश्नासह अनेक आंदोलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. पाऊण शतकाचा हा प्रवास; त्यात कितीतरी आव्हाने, नाट्यमय घडामोडी, संघर्षाचे प्रसंग! हे सारे त्यांनी शब्दबद्ध केले आहेत, ते या आत्मचरित्रात. या आत्मचरित्रातील काही निवडक प्रकरणे ‘बहार’मध्ये क्रमशः प्रसिद्ध करण्यात येत आहेत. – संपादक, बहार पुरवणी

‘काळोखातूनि विजयाचा ये पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा।’

जणू कुसुमाग्रजांच्या या काव्यपंक्तीच श्रोत्यांच्या डोळ्यांमधून विरघळून वाहत होत्या. सियाचीनला हॉस्पिटल बांधण्यासाठी आपण होकार कसा दिला, हे सांगताना जॉर्ज म्हणाले,

सिंहायन आत्मचरित्र

“संरक्षणमंत्री झाल्यावर, सियाचीनला जेव्हा मी प्रथम भेट दिली, त्यावेळी तिथं जवानांविषयी उपेक्षाच जाणवली. त्यामुळे सियाचीनच्या भूमीत हॉस्पिटल उभारण्याची कल्पना जेव्हा मला बाळासाहेबांनी सांगितली, तेव्हा मी लगेचच त्याला तातडीनं होकार दिला. बाळासाहेबांच्या या दूरद़ृष्टीला माझा सलाम! या नेक कामाबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद.”

या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या उत्कट भावना व्यक्त करताना मी म्हणालो, “सीमेवर शहिदांनी सांडलेल्या रक्ताच्या थेंबाची किंमत कुबेराला अथवा कळिकाळालाही करता येणार नाही.” माझ्या या भावपूर्ण वक्तव्यानं संपूर्ण सभागृह हेलावून गेलं. जॉर्ज यांच्याविषयी बोलताना मी म्हणालो, “जवानांशी समरस होणारा संरक्षणमंत्री म्हणजे जॉर्ज फर्नांडिस. फर्नांडिस हे सियाचीनला सर्वाधिक वेळा भेट देणारे संरक्षणमंत्री आहेत. आतापर्यंत त्यांनी बावीस वेळा सियाचीनला भेट दिलेली आहे. जवान आणि जनतेच्या कर्तव्यपूर्तीच्या कृतज्ञतेचा हा कार्यक्रम असून, आपल्याला देशप्रेमानं भारलेला आणि सीमेवर लढणार्‍या जवानांची काळजी घेणारा संरक्षणमंत्री लाभलेला आहे.” अशी उत्कट भावनाही मी व्यक्त केली.

माझ्या द़ृष्टीनं जॉर्ज फर्नांडिस हे एक लढवय्ये संरक्षणमंत्री. त्यांनी आजवर कुणाच्या डोक्यातही आला नसेल असा एक ऐतिहासिक निर्णय घेतला. त्याबाबतची माहिती देताना मी सांगितलं,

“सीमेवर लढताना जवान शहीद व्हायचे. त्यांच्या निधनाची तार त्यांच्या घरी जायची. मात्र, त्यांच्यावर अंत्यसंस्कार तिकडे सीमेवरच व्हायचे. कुणाचा पती, कुणाचा भाऊ, कुणाचा मुलगा किंवा कुणाचा पिता देशाचं रक्षण करताना शहीद होतो आणि दुर्दैवानं त्याचं पार्थिवही घरच्या लोकांना पाहायला मिळायचं नाही. परंतु, ही प्रथा फर्नांडिस यांनी बंद केली. शहीद जवानाचं पार्थिव सरकारी खर्चानं त्याच्या घरी पाठवण्याचा निर्णय घेतला. मग तिथं, त्यांच्या गावीच त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन अंत्यसंस्कार होऊ लागले.”

“फर्नांडिस यांच्या या निर्णयानं तरुणांचा लष्कराकडे ओढा वाढला. एकेका भरती केंद्रावर पाच पाच-दहा दहा हजार तरुण भरतीसाठी हजेरी लावू लागले. फर्नांडिस यांच्यामुळेच लष्करातील जवानांचं नैतिक धैर्य वाढलं. समाजात त्यांची प्रतिमा अधिकच उजळ झाली. त्यांना सन्मान मिळू लागला. याशिवाय फर्नांडिस यांनी शहीद जवानांच्या नातेवाईकांना जमीन आणि पेट्रोल पंपाचं लायसन्स देण्याचा निर्णय घेऊन त्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाची हमी दिली.”

त्याबद्दल मी फर्नांडिस यांना धन्यवाद देताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
या कार्यक्रमाचं औचित्य सांगताना मी म्हणालो, “राष्ट्राला आपलं आयुष्य प्रदान करणार्‍या महात्मा गांधींची आणि देशापुढे त्यागाचा आणि नि:स्पृहतेचा आदर्श ठेवणार्‍या तसेच पाकिस्तानला धडा शिकवणार्‍या लाल बहाद्दूर शास्त्री यांची आज जयंती आहे. आज दोन ऑक्टोबर आहे आणि निधीची रक्कमही दोन कोटींपेक्षा जास्त आहे. हेही औचित्य साधलं गेलं आहे.”

टाळ्यांच्या कडकडाटात मी पुढे म्हणालो, “पंधरा हजार फुटांपेक्षा उंच अशा दुर्गम भागात, संपूर्ण प्रतिकूल परिस्थिती असतानाही आमच्या शूर जवानांनी घुसखोर शत्रूला सीमेपार पळवून लावलं. शहीद जवानांच्या रक्ताचा सांडलेला प्रत्येक थेंब आपल्याला ऋणाईत करून गेला. त्यामुळेच त्यातून अंशतः का असेना, पण उतराई होण्यासाठी आर्मी सेंट्रल वेल्फेअर फंडाचे मेजर जनरल दत्ता यांनी आवाहन करताच, त्यांना आम्ही त्वरित प्रतिसाद दिला. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देणारे ‘पुढारी’ हे देशातील पहिलं वृत्तपत्र आहे.”
मी या निधीपाठीमागचा इतिहास सांगताच सभागृह पुन्हा एकदा टाळ्यांनी दुमदुमून गेलं.

सियाचीन हॉस्पिटलच्या संकल्पनेबाबत ‘पुढारी’ची प्रशंसा करताना जॉर्ज म्हणाले, “‘पुढारी’चा गौरव करायला शब्दच नाहीत. ‘पुढारी’ म्हणजे लीडर. लीडर म्हणजे नेता. ‘पुढारी’नं आपलं नेतृत्व सिद्ध करून दाखवलं. एका वृत्तपत्रानं घालून दिलेलं हे उदाहरण देशभक्तीचा ज्वलंत इतिहासच आहे. देशात मी ज्या ज्या ठिकाणी जातो, त्या त्या ठिकाणी मी आवर्जून ‘पुढारी’चं हे योगदान कौतुकानं सांगत असतो.”

फर्नांडिस यांनी केलेला हा सन्मान केवळ ‘पुढारी’चाच नव्हता, तर अर्थातच तो या निधीयज्ञामध्ये ज्यांनी ज्यांनी आपल्या मदतीच्या समिधा टाकल्या, त्या सर्वांनाच केलेला मानाचा मुजरा होता. या निधीसाठी ज्या सुहृदयांनी आणि देशप्रेमींनी आपलं योगदान दिलं, त्यांचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत.

‘पुढारी’नं सियाचीन रुग्णालयासाठी गोळा केलेल्या निधीबद्दल गौरव करतानाच फर्नांडिस यांनी दिल्लीतील सरकारी बाबूंकडून जवानांच्या होणार्‍या उपेक्षेची कर्मकहाणीच कथन केली. ती कहाणी कुठल्या राष्ट्रप्रेमी व्यक्तीच्या काळजाला घरं पाडणारीच होती. फर्नांडिस यांनी सांगितलं, “मी पहिल्यांदा जेव्हा सियाचीनला गेलो, तेव्हा तिथं एक मोडलेली ‘स्नो मोबाईल’ मला दिसली. स्नो मोबाईल हे बर्फात चालवायचं वाहन असतं. तिथल्या जवानांसाठी हे फार मोलाचं साधन असतं. ती अशी मोडक्या अवस्थेत का आहे, असा प्रश्न मी लष्करी अधिकार्‍यांना विचारला. त्यावेळी मला मिळालेलं उत्तर हे कोणत्याही देशप्रेमी नागरिकाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारंच होतं! ‘आपण तर संरक्षणमंत्रीच आहात. आपणच त्याचं उत्तर शोधावं!’ असा सूर व्यक्त करणारं ते उत्तर होतं!”

“दिल्लीला परत आल्यानंतर सगळ्यात प्रथम मी त्या स्नो मोबाईलच्या मागणीचा प्रस्ताव पाहिला. तर माझ्या असं लक्षात आलं की, तब्बल एक वर्ष दोन महिने तो संरक्षण मंत्रालयातच या टेबलावरून त्या टेबलावर फिरत होता! ‘आधीची वाहने काय झाली? नवी कशासाठी हवी?’ यासारखे अनेक शेरे त्यावर मारले होते. शेर्‍यांनीच फाईल रंगून गेली होती. याचा संबंध देशाच्या सुरक्षेशी निगडित आहे. तेव्हा चौकशी नंतर करावी. आधी गरज पूर्ण करणं आवश्यक आहे, हे त्या अधिकार्‍यांना समजतच नव्हतं.”

“तो प्रकार पाहून, मी लगेचच कसल्याही चौकशीआधी तातडीनं हवी ती वाहनं पुरवण्याची व्यवस्था तर केलीच; पण त्याचबरोबर एक कायमस्वरूपी आदेशही काढला. तो आदेश असा होता की, संरक्षण मंत्रालयातील प्रत्येक अधिकार्‍यानं किमान दोन वर्षांतून एकदा तरी सियाचीनला आणि बावन्न अंश सेल्सिअस तापमान असताना कच्छमधील वाळवंटी सीमाभागाला भेट दिलीच पाहिजे. ही सक्ती नव्हे, पण प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्याशिवाय जवानांच्या मागणीतील तीव्रता लक्षात येऊच शकणार नाही. तसेच हा आदेश कायमचा लागू राहील, अशी नियमात तरतूदच करून घेतली.”

यावरूनच ‘पुढारी’नं संकलित केलेल्या कारगिल हॉस्पिटल फंडाचं महत्त्व कळून आल्याशिवाय राहत नाही. कोल्हापूर, सातारा आणि सांगली हा शूरवीरांचाच प्रदेश आहे, असं म्हटलं तर ते अतिशयोक्तीचं मुळीच होणार नाही. इथल्या मातीतूनच शूर सैनिक उगवतात! या भागाला एक ऐतिहासिक परंपराच आहे. शत्रूला समोरासमोर भिडण्याची जिद्द, ताकद आणि कुवत या मातीतल्या मर्द मावळ्यांच्या अंगी इतिहास काळापासून बाणलेली आहे. ती त्यांना जन्मजात मिळालेली देणगीच आहे.

भारतानं 1971 च्या युद्धात पाकिस्तानला अशीच धूळ चारली होती. त्यावेळी पंतप्रधान इंदिरा गांधी स्वतः कोल्हापूरला आल्या. त्यांनी कोल्हापुरात जाहीर सभा घेऊन इथल्या शूरवीरांचं तोंडभरून कौतुक केलं. इथल्या जनतेलाही धन्यवाद दिले.

कारगिलच्या युद्धातही कोल्हापूर, सांगली आणि सातारा भागातील जवानांनी आपल्या प्राणांची बाजी लावली होती. या रणसंग्रामात अनेक जवान धारातीर्थी पडले. अनेक गंभीररीत्या जखमी झाले. या शहिदांच्या आणि जखमी वीरांच्या कुटुंबीयांसाठीही ‘पुढारी’नं मदत जमा केली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील मच्छिंद्र देसाई आणि अशोक बिरंजे या दोन हौतात्म्य पत्करलेल्या जवानांच्या कुटुंबीयांना फर्नांडिस यांच्या हस्ते मदतीचे धनादेश प्रदान करण्यात आले. शिवाय स्मृतिचिन्ह देऊनही त्यांचा सन्मान करण्यात आला. या हृद्यप्रसंगी सर्वांचीच हृदये हेलावून आली. अंत:करणात उदात्त भाव दाटून आले.

‘रौद्रभीषण’ या एकाच शब्दानं ज्या रणभूमीचं वर्णन करता येईल, ते सियाचीन होय. हिमालय पर्वतराजीत ‘नुंब्रा व्हॅली’ या नावानं हा प्रदेश ओळखला जातो. हा संपूर्ण प्रदेशच वालुकामय असून 18,500 फूट उंचीवर सियाचीनचं हे हिमवाळवंट आहे. इथं सात महिने कडाक्याचा हिवाळा असतो. त्या काळात तिथलं तापमान उणे 50 डिग्री सेल्सिअसच्याही खाली जातं! याला तापमान म्हणायचं की ‘शीतमान’, तेच कळत नाही. एरवीच्या पाच महिन्यांतही ते उणे 12 ते 15 डिग्री सेल्सिअस इतकं असतंच.

हे खर्‍या अर्थानं एक हिमवाळवंटच असून, ते 700 चौरस कि. मी. परिसरात पसरलेलं आहे. उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर जसं वातावरण असतं, तसंच इथलं वातावरण आहे. म्हणूनच या भागाला ‘तिसरा धु्रव प्रदेश’ असंही म्हटलं जातं. इथं एकवेळ शत्रूशी सामना करणं सोपं, पण निसर्गाशी सामना करणं कठीण. ‘तोपो के गोलों से नहीं, बल्कि बर्फ के गोलों से हमे डरना पडता हैं।’ ही तिथल्या प्रतिकूल परिस्थितीत जीवाची बाजी लावणार्‍या जवानांची व्यथा!

हा भाग अतिउंच. साहजिकच ऑक्सिजनचं प्रमाणही कमालीचं विरळ. प्राणवायूच पुरेसा मिळत नसल्यामुळे प्राण कंठाशी येतात. अनेक आजारांना निमंत्रण. हिमदंश तरी पाचवीलाच पूजलेला. शिवाय अल्टिट्यूड पल्मनरी एडिमा, हाय अल्टिट्यूड सेरेब्रल एडिमा, तीव्र न्यूमोनिया तसेच छातीत पाणी होणं, हातापायांची बोटं बधिर होणं, संवेदना नष्ट होणं; यासारख्या विकारांनी थैमानच मांडलेलं! आणि उपचाराची सोय शून्य!

उपचारासाठी ‘खारदुंग ला’ नावाच्या घाटीचा खडतर प्रवास करून लेह गाठावं लागे. सहा तासांचा हा अत्यंत बिकट प्रवास आणि जर का वातावरण प्रतिकूल असेल, तर रुग्णाचं नशीबही प्रतिकूलच समजायचं! अशा वातावरणात तर हेलिकॉप्टरही कुचकामाचं ठरतं. अशा या रौद्रभीषण रणभूमीवर एका सुसज्ज हॉस्पिटलच्या उभारणीची कुदळ पडली! आणि ते पाहूनच तेथील जवानांना अत्यानंद झाला. तो आनंद शब्दातीत होता!

4 जुलै 2001 मध्ये सियाचीन हॉस्पिटलची पायाभरणी झाली. मला निमंत्रण होतंच. या कार्यक्रमाला माझे जावई मंदार पाटील आणि आमचे दिल्लीचे प्रतिनिधी धर्मानंद कामत उपस्थित राहिले होते. ही पायाभरणी लष्कर प्रमुखांच्या म्हणजेच चीफ ऑफ आर्मी यांच्या हस्ते पार पडली. कोनशिला बसवण्यापासून ते इमारतीचा अखेरचा चिरा बसेपर्यंत माझी कामावर घारीसारखी नजर होती. संबंधितांना फोनवरून सूचना देत होतो आणि कामाच्या प्रगतीचा आढावा घेत होतो. रुग्णालयाच्या उभारणीची जबाबदारी ‘वाल्को इंजिनिअर्स’ या कंत्राटदार कंपनीकडे सोपवण्यात आली होती. पाच महिन्यांत बांधकाम पूर्ण करण्याचा बारचार्ट. कंपनीनं रात्रीचा दिवस करून ही जबाबदारी वेळेत पार पाडली. बार चार्ट पाळला.

युद्धभूमीवरचं बांधकामही जणू युद्धपातळीवरच करण्यात आलं. लेफ्टनंट जनरल अर्जुन रे आणि ब्रिगेडियर देशपांडे यांनी डोळ्यात तेल घालून कामावर करडी नजर ठेवली. हा भाग पहाडी. इथली जमीन वाळूची. त्यातच वर्षातील सात महिने जमीन बर्फाखाली. या दुर्गम भागात मजूर मिळण्याची मारामार. प्रत्येक वस्तू, एखादी सुई किंवा सुतळीचा तुकडासुद्धा हवा असेल, तर अतिदुर्गम रस्त्यावरून जाऊन दूरवरून आणण्याची कसरत. ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ अशीच अवस्था.

हॉस्पिटलच्या उभारणीसाठी अत्याधुनिक प्री-फॅब्रिकेशन जर्मन तंत्राचा अवलंब केला होता. निसर्गाशी लढा देत देत अवघ्या पाच महिन्यांत हे हॉस्पिटल उभं करणं हे सतीचं वाणच होतं. परंतु, तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर आणि कठीण परिश्रमास पर्याय नाही, हे भरतवाक्य ओठांत घेऊन सर्वांनीच युद्धपातळीवर काम केलं आणि अक्षरशः एक युद्धच जिंकलं! ‘इमारत फळा आली!’

सियाचीनच्या या हॉस्पिटलचं जर वर्णनच करायचं झालं, तर केवळ ‘वैशिष्ट्यपूर्ण आणि एकमेवाद्वितीय’ या दोन शब्दांतच करावं लागेल. कडाक्याच्या थंडीचा, बर्फवृष्टीचा, हिमवादळांचा किंवा भूकंपाचाही परिणाम न होणार्‍या तंत्रज्ञानातून हे हॉस्पिटल उभारलं गेलेलं आहे. बाहेरच्या वातावरणाचा किंबहुना निसर्गाच्या अवकृपेचा यत्किंचितही परिणाम न होणारं असं हे एकमेव हॉस्पिटल आहे. युरोपियन तंत्रज्ञानाच्या सहकार्यातून, या हॉस्पिटलसाठी ‘मेटल स्किन पॉलियूरिथीन’च्या खास भिंती आणि छत बनवून घेण्यात आले आहेत. दरवाजातून किंवा खिडक्यांतून बाहेरच्या वातावरणाचा आत परिणाम होऊ नये म्हणून इन्सुलेटेड ग्लास पॅनल्सचाही वापर करण्यात आला आहे, हे विशेष.

भर हिवाळ्यात सियाचीनमधलं जीवनच बर्फासारखं गोठून जातं. तापमान शून्याखाली 50 अंशापर्यंत जातं. अशा वेळी या हॉस्पिटलमधील तापमान मात्र 22 अंश सेल्सिअसपर्यंत म्हणजेच मानवी जीवनाला पोषक असं राहील, अशी यंत्रणा इथं तयार करण्यात आलेली आहे. बाहेरच्या आणि हॉस्पिटलच्या तापमानात सुमारे 72 अंश सेल्सिअसचा फरक ठेवता येईल. यासाठी डिझेलवर चालणारी खास हिटिंग सिस्टीम जर्मनीतून आयात करण्यात आलेली आहे. याच यंत्रणेमार्फत हॉस्पिटलमध्ये प्रत्येक ठिकाणी गरम पाणी मिळण्याची सोय केलेली आहे.

हॉस्पिटल बांधलेला हा परिसर हुडेर-परतापूर सियाचीनचाच एक भाग असल्यामुळे इथेही बर्फवृृष्टी होतच असते. तब्बल एक फुटापर्यंत बर्फाचा थर साचून राहतो. इतका थर पेलतील अशाच क्षमतेचे मजबूत छत हॉस्पिटलसाठी बनवले गेलेले आहेत. एवढा बर्फ पडूनही आतलं वातावरण उबदारच राहतं, हे विशेष.

हे हॉस्पिटल बांधणार्‍या वाल्को कंपनीनं इमारतीचे सारे भाग ‘खारदुंग ला’ या जगातील सर्वोच्च वाहन मार्गावरून हुंडेरपर्यंत मोठ्या कष्टानं आणले होते. कारण या परिसरात ताशी शंभर किलोमीटरपर्यंतच्या वेगानं वादळी वारे वाहत असतात. हिमालयाचा हा पट्टा पाचव्या भूकंपप्रवण क्षेत्रात मोडतो. याचाही रुग्णालय उभारणीत विचार करण्यात आलेला आहे.

शंभर बेडस्ची सुविधा असलेल्या या हॉस्पिटलचा अतिदक्षता विभाग अत्याधुनिक साधनांनी सुसज्ज आहे. 12 लीड कॉम्प्युटराईज्ड ई.सी.जी. यंत्रणा, कमर्शियल मॉनिटरिंग, सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम अशा यंत्रणांसह हा खास विभाग जवानांच्या सेवेला सज्ज आहे. इथला शस्त्रक्रिया विभागही अत्यंत अद्ययावत आहे. त्यात बॉर्डल्स ऑपरेटस्, पल्स ऑक्सिमीटर्स, मॉनिटरी आणि रिकव्हरी रूम यासारख्या सुविधांचा समावेश आहे. सियाचीनसारख्या अतिउंच आणि बर्फाळ प्रदेशातील या हॉस्पिटलच्या उभारणीनं एक इतिहासच घडवला, यात मुळीच शंका नाही.

18 नोव्हेंबर 2001! सियाचीन हॉस्पिटलच्या उद्घाटनाचा मंगल दिवस! परिपूर्तीच्या आनंदाचा दिवस. जवानांच्या जीवनात नवं आरोग्यपर्व सुरू करणारा दिवस. देशाभिमान, देशभक्ती आणि देशप्रेमाच्या उदात्त आविष्काराचा दिवस. माझं उरीपोटी बाळगलेलं स्वप्न वास्तवात आणणारा दिवस!

ही अठरा नोव्हेंबर तारीखही माझ्याच सोयीनं घेण्यात आली होती, हे विशेष होय. त्याचं झालं असं की, या आधीच उद्घाटन सोहळा घ्यायचा फर्नांडिस यांचा विचार होता. त्यासाठी त्यांनी त्यांच्या सोयीची एक तारीखही मूकरर केली होती. परंतु, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या तारखेला मी जाऊ शकणार नव्हतो. म्हणून मी चि. योगेशना आणि त्यांच्यासोबत ‘पुढारी’च्या स्टाफला पाठवण्याच्या विचारात होतो. मात्र, जॉर्ज फर्नांडिस यांनी, मी सियाचीनला यावं असा आग्रहच धरला.

त्यासाठी ते उद्घाटनाची तारीख पुढे ढकलायलाही तयार झाले. मग मात्र माझा नाइलाज झाला. परंतु, तारखेच्या घोळात जवानांवरचे उपचार थांबू नयेत अशी माझी इच्छा होती. म्हणून मग मी फर्नांडिस यांना विनंती केली की, आता हॉस्पिटल चालू होऊ द्या. जवानांवर उपचार होऊ देत. त्यानं उद्घाटन समारंभाला काहीच बाधा येणार नाही.

फर्नांडिस यांना माझी ही सूचना मोलाची वाटली आणि त्यांनी तसे आदेशही देऊन टाकले. आम्ही जेव्हा हॉस्पिटलच्या उद्घाटनाला तिकडे गेलो, तेव्हा तिथे काही सैनिकांवर उपचार सुरू असल्याचं पाहून मला खूपच समाधान वाटलं. आम्हाला पाहून त्या जवानांनाही खूप खूप आनंद झाला.

फर्नांडिस यांनी फारच आग्रह केल्यामुळे मला या महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी जावंच लागलं. 19 नोव्हेंबर 2001 पासून संसदेचं अधिवेशन सुरू होणार होतं. त्यामुळे हा कार्यक्रम एक दिवस अगोदर म्हणजे 18 नोव्हेंबर रोजी घ्यायचं निश्चित झालं. आम्ही 17 तारखेलाच पुण्याहून दिल्लीला गेलो. माझ्यासोबत चि. योगेश तसेच माझे जावई मंदार पाटील शिवाय श्रीराम पवार, वसंत सप्रे, पप्पू अत्तार आणि माझे पर्सनल फिजिशियन डॉ. शिंदेही होते. दिल्लीत आम्ही संरक्षण मंत्र्यांच्याच निवासस्थानी राहिलो.

18 नोव्हेंबरची पहाट उजाडली आणि आम्हाला घेऊन हवाई दलाचं खास विमान आकाशात झेपावलं. त्या विमानात जॉर्ज फर्नांडिस, मी, चि. योगेश, मंदार आणि माझा स्टाफ यांच्याबरोबरच दिल्लीतील प्रेस मीडियाचे सर्व प्रतिनिधीही होते. क्षणाक्षणानं आम्ही सियाचीनच्या दिशेनं झेपावू लागलो. तिथली कमालीची हाडं गोठवणारी थंडी लक्षात घेऊन आम्ही अंगावर गरम कपडे आधीच चढवले होते.

अवघ्या दोन तासातच, म्हणजे साडेसात वाजता आम्ही थॉईस विमानतळावर लँड झालो. त्यावेळी तिथे मायनस 8 ते 10 डिग्री तापमान होतं. साहजिकच, हवेत प्राणवायूचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे आम्हाला चालतानाच काय, तर हालचाल करतानाही दम लागत होता. तिथून मग दोन हेलिकॉप्टर्सनी आम्ही सीमेवरील अगदी शेवटच्या टोकावर असलेल्या हिमाच्छादित लष्करी ठाण्यांना भेटी दिल्या. पाकिस्तानकडून जिंकलेली काही ठाणी आम्ही पाहून घेतली. आम्हाला आमच्या जवानांचा अभिमान वाटला.

तसे जॉर्ज फर्नांडिस हे माझ्यापेक्षा वयानं मोठे. मात्र, त्यांच्याकडे उत्साह दांडगा! तो पदोपदी मला जाणवत होता. उद्घाटनाच्या वेळेआधी आम्ही परतापूरला परत आलो. ज्या ठिकाणी हॉस्पिटल बांधलं आहे, त्या भागाचं नाव आहे ‘परतापूर.’ त्यावरून हॉस्पिटलमधले जवान मला म्हणाले, “आपका नाम प्रताप है और यह अस्पताल भी आपने परतापूर में ही बनाया है। लगता है, परतापूर का मतलब ही प्रतापपूर है।” त्यांना हा मोठाच योगायोग वाटत होता.

जगातील उत्तुंग रणभूमीवर उभं राहिलेलं हे पहिलंच हॉस्पिटल होय. कार्यक्रमावेळी इथलं तापमान होतं उणे 7.6 अंश सेल्सिअस. डोक्यावर बर्फवृष्टी चालूच होती. एवढ्या कडाक्याच्या थंडीतही कार्यक्रमाचं नियोजन लष्करी इतमामात अत्यंत सुसूत्र पद्धतीनं करण्यात आलं होतं, हे विशेष.

हॉस्पिटलच्या उद्घाटनाआधी जवानांनी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना आणि मला ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला. त्यानंतर मग संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते या हॉस्पिटलचं शानदार उद्घाटन करण्यात आलं. मी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होतो, तर ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक योगेश जाधव, मंदार पाटील यांच्यासह ‘पुढारी’चा स्टाफही उपस्थित होता. यावेळी उत्तर सेना विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल नानावटी, लेफ्टनंट जनरल अर्जुन रे तसेच मेजर जनरल अरुण पाठक यांच्यासह लष्करी अधिकारी, जवान आणि स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सर्वत्र उत्साह ओसंडून वाहत होता.

खरं तर, हिवाळ्याची सुरुवात झाली होती. परंतु, निसर्गालाही मनापासून वाटत होतं की, हा समारंभ व्यवस्थित पार पडावा म्हणून! त्यामुळे निसर्ग आज पूर्णपणे प्रसन्न होता. जणू या शुभकार्यासाठी निसर्गाचा आशीर्वादच लाभला होता. आपल्याकडे कार्यक्रमाच्या वेळा कधीच नीट पाळल्या जात नाहीत; पण इथं लष्कराची कडक शिस्त काय असते, ती पाहायला मिळाली. साडेदहाचा समारंभ ठीक साडेदहालाच सुरू झाला. आधी विविधधर्मीय पुजार्‍यांनी यथासांग पूजाविधी केले.

विशेष म्हणजे लष्करातील कार्यक्रमासाठी प्रत्येक धर्मातील पुजारी नेमलेले असतात, हे विशेष. सर्वधर्म समभावाची संकल्पना इतक्या चांगल्या पद्धतीनं आणखी कुठल्या देशात अंमलात आणली जात असेल, असं मलातरी वाटत नाही. उद्घाटनानंतर आम्ही हॉस्पिटलच्या सर्व विभागांना भेट दिली. तसेच तेथील प्रत्येक जवानाची भेट घेऊन त्यांना कोल्हापूरहून आणलेल्या वस्तू भेट दिल्या.

सर्व जखमी जवानांना या हॉस्पिटलमुळे खूपच सुकून मिळाल्याचं दिसून येत होतं. त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहून समाधान वाटलं. त्यानंतर हॉस्पिटलच्या बाहेर मैदानावर उपस्थित जवान आणि अधिकार्‍यांच्यापुढे फर्नांडिस यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. ते भरभरून बोलले. प्रामुख्यानं ‘पुढारी’ आणि माझ्याबद्दल बोलताना तर त्यांच्या रसवंतीला बहर आला होता!

“सियाचीनला जेव्हा मी संरक्षणमंत्री म्हणून पहिली भेट दिली, तेव्हाच माझ्या लक्षात इथल्या जवानांच्या आरोग्याची होणारी हेळसांड आली
होती. त्याबाबतीत लवकरात लवकर काय करता येईल, याचा विचार करीत असतानाच, ‘पुढारी’चे संपादक बाळासाहेब जाधव यांनी हॉस्पिटलची कल्पना मांडली. मला ती एवढी भावली की, लालफीत बाजूला ठेवून ‘पुढारी’च्या निधीतून हॉस्पिटल उभारणीचा निर्णय मी घेतला. या कामाला तीन वर्षे लागतील, असं मला सांगितलं जात होतं; पण लेफ्टनंट जनरल रे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी अवघ्या पाच महिन्यांतच हे हॉस्पिटल पूर्ण केलं.” अशी पूर्वपीठिका फर्नांडिस यांनी सांगितली.

ते पुढे म्हणाले, “समाजासाठी एक व्यक्ती काय करू शकते, याचा आदर्शच बाळासाहेबांनी घालून दिला आहे. भारतीय सेनेसाठी त्यांनी केलेलं कार्य अतुलनीयच म्हणावं लागेल. आर्मी सेंट्रल वेल्फेअर फंडासाठी लष्करानं आवाहन केलं. त्याला सर्वप्रथम बाळासाहेबांनीच प्रतिसाद दिला. लष्कराच्या इतिहासातील हे एक आगळंवेगळं उदाहरण आहे, यात शंका नाही. हे हॉस्पिटल म्हणजे जवानांसाठी नवी संजीवनीच आहे.”

‘पुढारी’च्या या उत्तुंग कार्याचा गौरव करताना फर्नांडिस पुढे म्हणाले, “आज मैं रक्षामंत्रि हूँ। कल मैं रक्षामंत्रि रहूँगा, या ना रहूँगा। लेकिन यह अस्पताल ‘पुढारी’ का अस्पताल है और यह ‘पुढारी’के निगरानी में ही रहेगा।”
यापेक्षा कौतुकाचे शब्द आणखी काय असू शकतात!

Back to top button