संशोधन : एचआयव्हीवर मात? | पुढारी

संशोधन : एचआयव्हीवर मात?

गेल्या महिन्यात एचआयव्ही एड्स संदर्भातल्या एका बातमीने खळबळ उडवून दिली. अमेरिकेतील एक एचआयव्ही बाधित महिला ‘मूलपेशी प्रत्यारोपण’ (डींशा उशश्रश्र ढीरपीश्रिरपींरींळेप) उपचाराने पूर्ण बरी झाल्याची ही बातमी होती. एचआयव्ही पॉझिटिव्हची निगेटिव्ह होणारी जगातील ही पहिली महिला तर एकूण रुग्णांमध्ये तिसरी व्यक्ती ठरली. आधीचे दोन रुग्ण पुरुष होते.
एचआयव्ही एड्सवरील उपचारामधील हा मैलाचा दगड असला तरी शास्त्रज्ञांच्या मते, हुरळून जाण्यासारखी ही गोष्ट नाही. कारण ‘मूलपेशी प्रत्यारोपण’ हा उपचार सर्वसामान्यांना परवडण्यासारखा नाही. आजमितीला दरवर्षी अमेरिकेतील केवळ 50 रुग्णांना या उपचाराचा फायदा होतो आणि असा उपचार जगभरातील चार कोटींच्या संख्येने असणार्‍या एचआयव्ही बाधितांना देणे हे प्रत्यक्षात शक्य होणार नाही.

ही बरी झालेली महिला ल्युकेमिया (अर्लीींश चूशश्रेळव ङर्शीज्ञशाळर) ने ग्रस्त होती. ल्युकेमिया म्हणजे रक्ताचा एक प्रकारचा कॅन्सर. रक्तपेशी तयार करणार्‍या हाडाच्या मगजातील पेशींमध्ये या कॅन्सरला सुरुवात होते. ‘मूलपेशी प्रत्यारोपण’ उपचार हा तिला ल्युकेमियासाठी देण्यात आला होता आणि या उपचारामुळे तिची एचआयव्ही चाचणी निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक आली. अर्थात, सध्या ही महिला गेल्या 14 महिन्यांपासून त्या अर्थाने एचआयव्हीमुक्त झाली असली, तरी ती तशी भविष्यात कायमस्वरूपी राहणे महत्त्वाचे ठरते.
एचआयव्ही – एड्स बरा झाल्याची ही काही पहिलीच बातमी नाही. गेल्यावर्षी अर्जेंटिनामधून अशीच एक बातमी आली होती. एक महिला एचआयव्हीवरील कोणत्याही उपचाराशिवाय बरी झाली.

जेव्हा एचआयव्ही- एड्स विषाणू शरीरात प्रवेश करतो, तेव्हा तो शरीरातील पांढर्‍या पेशींवर आक्रमण करतो आणि रोगप्रतिकारशक्ती निष्प्रभ करून टाकतो. त्यामुळे इतर संधिसाधू जंतू जिवाणू – विषाणू – बुरशी इत्यादी शरीरावर आक्रमण करतात. हळूहळू रुग्ण अशक्त होत जातो. वारंवार जंतुसंसर्ग होतात. या स्थितीला एड्स असे संबोधले जाते. पण या नियमाला अपवाद म्हणून या महिलेच्या शरीरातील रोगप्रतिकार संस्थेने एचआयव्ही विषाणूंचा हल्ला परतवून लावून, एचआयव्हीवर मात केली. खरे तर जगातील अशा प्रकारच्या व्यक्तींचा शोध घ्यायला हवा आणि त्यांचा अभ्यास करायला हवा.

संबंधित बातम्या

मूलपेशी प्रत्यारोपणामुळे एचआयव्ही रुग्ण बरा झाल्याच्या घटनेचा विचार करता, ‘टिमोथी रे ब्राऊन’ हे ‘बर्लिन रुग्ण’ नावाने ओळखले जाणारे गृहस्थ अशा प्रकारच्या उपचाराने बरे होणारा पहिले रुग्ण होते. त्यांनाही ल्युकेमिया होता आणि मूलपेशी प्रत्यारोपणामुळे एचआयव्हीवर त्यांनी मात केली होती. पण दुर्दैवाने 2020 मध्ये वयाच्या 54 व्या वर्षी त्यांना पुन्हा ल्युकेमिया झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. पण मूलपेशी प्रत्यारोपणानंतर त्यांना जवळपास दहा ते बारा वर्षांचे चांगले आयुष्य लाभले. मूलपेशी प्रत्यारोपणाद्वारे एचआयव्ही बरा करण्याचे अनेक अयशस्वी प्रयोग आजपर्यंत झालेले आहेत.

अमेरिकेतील बरी झालेली महिला ‘न्यूयॉर्क रुग्ण’ म्हणून ओळखली जाते. या महिलेला नाळेतील मूलपेशी आणि प्रौढ मूलपेशी यांच्या मिश्रणाचे प्रत्यारोपण करण्यात आले. या मूलपेशी शरीरातील रोगप्रतिकार संस्थेवर मात करतात. नाळेतील या मूल पेशींमध्ये उत्परिवर्तित पेशी असतात, ज्या आपल्या शरीराचे एचआयव्ही विषाणूपासून संरक्षण करतात. यांना उउठ- वशश्रींर 32/32 असे संबोधले जाते. यापूर्वीच्या पहिल्या दोन रुग्णांमध्ये प्रौढ मूलपेशी देण्यात आल्या होत्या. एक रक्तातील मूलपेशी, तर दुसर्‍या हाडाच्या मगजातील मूलपेशी होत्या. या दोन्हींमध्ये एचआयव्हीपासून संरक्षण करणार्‍या उत्परिवर्तित पेशी होत्या. या दोन्ही रुग्णांमध्ये नाळेतील मूलपेशी दिल्या गेल्या नव्हत्या, ज्या या तिसर्‍या रुग्णांमध्ये म्हणजे अमेरिकेतील महिलेला दिल्या गेल्या. ही महिला मिश्र वंशाची आहे. या महिलेला दिल्याप्रमाणे नाळेतील मूलपेशी आणि प्रौढ व्यक्तीतील मूलपेशी यांच्या मिश्रणाने ल्युकेमियाग्रस्त एचआयव्हीवर मात करता येते का, हे येणारा काळ ठरवेल.

खरे तर मूलपेशी प्रत्यारोपण उपचारपद्धती हीदेखील तशी सोपी नाही. मूलपेशीदाता आणि रुग्ण यांचे रक्त आणि रक्तपेशी जुळणे फार महत्त्वाचे असते; अन्यथा त्याचे गंभीर दुष्परिणाम संभवतात. रुग्णाच्या पेशी आणि मूलपेशी यांच्यामध्ये त्या अर्थाने युद्धच होते आणि मूलपेशी प्रत्यारोपणाचा रुग्णाला फायदा होण्याऐवजी तोटाच होतो. त्यामुळे मूलपेशी प्रत्यारोपणापूर्वी रुग्ण आणि दाता यांची परस्पर जोड होणे किंवा त्यांच्या रक्तपेशी जुळणे हे फार महत्त्वाचे असते.

या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील या महिलेचे उदाहरण महत्त्वाचे ठरते. पहिली गोष्ट म्हणजे रुग्ण ही महिला आहे कारण आजपर्यंत ‘मूलपेशी प्रत्यारोपण’ हे अधिकांश प्रमाणात पुरुषांमध्ये झालेले आहे. सदर महिला ही मिश्र वंशाची असल्याने तिच्याबाबतीत योग्य मूलपेशी मिळणे आणि त्याचे प्रत्यारोपण यशस्वी होणे, ही गोष्ट आव्हानात्मक होती म्हणून हे यश महत्त्वाचे ठरते. अशा प्रकारे ल्युकेमियाग्रस्त एचआयव्ही रुग्ण मूलपेशी प्रत्यारोपणाद्वारे एचआयव्हीवर मात करू शकत असले तरी ल्युकेमिया किंवा कॅन्सर नसलेल्या एचआयव्ही रुग्णांचा प्रश्न उरतोच.

अशा रुग्णांसाठी अजून तरी नवीन उपचार नाहीत. पण तरीसुद्धा त्यांनी घाबरून जायचे कारण नाही कारण आज एचआयव्ही एड्सवर अनेक उत्तमोत्तम औषधोपचार उपलब्ध आहेत. गरज आहे ती, रुग्णांनी आपली तपासणी तातडीने करून घ्यायची आणि आपला उपचार नियमितपणे न चुकता घेण्याची.

अमेरिकेतील एक एचआयव्हीबाधित महिला ‘मूलपेशी प्रत्यारोपण’ उपचाराने पूर्ण बरी झाली. ही घटना एड्सवरील उपचारामधील मैलाचा दगड असली तरी ‘मूलपेशी प्रत्यारोपण’ हा उपचार सर्वसामान्यांना परवडण्यासारखा नाही.

डॉ. अनिल मडके

Back to top button