क्रीडा : वैभवाच्या प्रतीक्षेत मल्लखांब | पुढारी

क्रीडा : वैभवाच्या प्रतीक्षेत मल्लखांब

मनोवेधक रचना असलेले अनेक कार्यक्रम आपण पाहत असतो. या कार्यक्रमांमध्ये सादर केल्या जाणार्‍या काही कसरती पाहून आपल्या छातीत धस्स होते. कोरोनाच्या महामारीमुळे जवळजवळ दोन वर्षे खेळाडूंना केवळ स्पर्धा नव्हे, तर स्पर्धात्मक सरावापासूनही वंचित राहावे लागले होते. लवकरच राज्य आणि अखिल भारतीय स्तरावरील मल्लखांब स्पर्धांचा मौसम सुरू होणार आहे, त्यापूर्वी पुण्यातील मल्लखांबपटूंना आपले कौशल्य दाखवण्याची आणि खर्‍या अर्थाने स्पर्धात्मक पुनरागमन करण्याची संधी मिळावी, याद़ृष्टीने मल्लखांब स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

खेळाडूंचा लाभलेला सहभाग आणि त्यांच्या पालकांचा उत्साह तसेच प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद लक्षात घेतला, तर एखाद्या अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धांइतकीच ही स्पर्धा अव्वल दर्जाची झाली. शाहू लक्ष्मी कला-क्रीडा अकादमी आणि पुणे जिल्हा मल्लखांब संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या आमदार चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातर्फे या स्पर्धेसाठी दोन लाख रुपयांची पारितोषिके देण्यात आली होती. स्पर्धेत साडेचारशे खेळाडूंचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला होता. दहा वर्षांखालील मुला-मुलींपासून सत्तर वर्षांवरील पुरुष व महिला गटातील खेळाडूंनी दोरीचा आणि पुरलेल्या मल्लखांबावर केलेल्या कसरती खरोखरीच नेत्रदीपक आणि आकर्षक होत्या.

एरवी जिल्हा किंवा अन्य वेगवेगळ्या स्तरावरील मल्लखांब स्पर्धांमध्ये सहसा तीस वर्षांवरील खेळाडू भाग घेत नाहीत. किंबहुना, जर अशा काही खेळाडूंना भाग घ्यावयाचा असेल, तर त्यांना अठरा वर्षांवरील वयोगटातच भाग घ्यावा लागतो. पर्यायाने त्यांना युवा खेळाडूंचे आव्हान असते आणि या आव्हानांना सामोरे जाण्याएवढे कौशल्य,लवचिकता तीस वर्षांवरील खेळाडू दाखवू शकत नाहीत. मात्र जर नवोदित आणि उदयोन्मुख खेळाडूंना प्रेरणा द्यायची असेल, तर आपणही चांगल्या कसरती करून त्यांच्यापुढे आदर्श ठेवला पाहिजे, असे वेगवेगळ्या प्रशिक्षकांच्या मनात आले.

त्यामुळेच आमदार चषक स्पर्धेत तीस वर्षांवरील खेळाडूंसाठी वेगवेगळे वयोगट ठेवण्याची संकल्पना अंमलात आणण्यात आली. पुण्यात वेगवेगळ्या प्रशिक्षण केंद्रांवर मार्गदर्शन करणार्‍या अनेक प्रशिक्षकांनी त्यामध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेत आपले कौशल्य दाखवले. त्यामध्ये 1972 मध्ये राष्ट्रीय स्तरावर विजेतेपद मिळवणारे अरुण कागदे, जिल्हा मल्लखांब संघटनेचे संस्थापक भास्कर गोडबोले, शिवछत्रपती पुरस्कार विजेते राजीव जालनापूरकर, डॉक्टर आदित्य केळकर इत्यादींचा समावेश होता. मल्लखांबमध्ये पहिला अर्जुन पुरस्कार मिळवणारी देशातील पहिली खेळाडू हिमानी परब हिची उपस्थिती नवोदित खेळाडूंना प्रेरणा देणारीच होती. मल्लखांब हा इतर अनेक क्रीडा प्रकारांसाठी उपयुक्त खेळ मानला जातो. कुस्ती, वुशु, ज्युडो, जिम्नॅस्टिक्स इत्यादी अनेक क्रीडा प्रकारांमधील खेळाडू दोरीवरील कसरतींचा सराव नेहमीच करीत असतात.

पायामध्ये बळकटी येण्यासाठी, लवचिकता व एकाग्रता वाढवण्यासाठी मल्लखांब हा खेळ उपयुक्त मानला जातो. तसेच या खेळामध्ये थोड्या उंचीवरून कोलांटी उडी घेत अचूकपणे पाय जमिनीवर टेक वण्यासाठी आवश्यक असणारा आत्मविश्वास, धोका पत्करण्याची वृत्ती मल्लखांब खेळामुळेच निर्माण होते. हे कौशल्य अन्य क्रीडा प्रकारांबरोबरच आपल्या दैनंदिन जीवनासाठीही उपयुक्त असते. मल्लखांबमध्ये राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवणार्‍या महाराष्ट्राच्या अनेक खेळाडूंनी अन्य क्षेत्रांतही आपला नावलौकिक उंचावला आहे. महाविद्यालयीन स्तरापर्यंत मल्लखांबाची कारकिर्द यशस्वी करणारे कालांतराने अभियांत्रिकी, वैद्यकीय इत्यादी अनेक क्षेत्रांतही यशस्वी झाले आहेत. राजीव जालनापूरकर यांनी रामोजी सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. आदित्य केळकर हे नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून अतिशय ख्यातनाम आहेत. त्यांनी नेत्रचिकित्सा क्षेत्रातही जागतिक स्तरावर अनेक सन्मान मिळवले आहेत. परदेशामध्ये नोकरी करणार्‍या अनेक मल्लखांबपटूंनी तेथेही या खेळाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच की काय, अलीकडे जागतिक स्तरावरील पहिली मल्लखांब स्पर्धा महाराष्ट्रात यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली होती.

स्पर्धात्मक युगात जर आपल्या खेळाचा प्रसार आणि प्रचार मोठ्या प्रमाणात करावयाचा असेल, तर संयोजनात व्यावसायिकता आणण्याची आवश्यकता आहे. आयपीएलद्वारे क्रिकेटची लोकप्रियता जगाच्या कानाकोपर्‍यात पसरली आहे. त्याचे अनुकरण करीत कबड्डी, हॉकी, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, कुस्ती, टेनिस, बॅडमिंटन इत्यादी खेळांच्याही आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रो लीग आयोजित करण्यात येत आहेत. त्यामुळे या खेळांची लोकप्रियता वाढू लागली आहे. पैसा व प्रसिद्धी या एकाच नाण्याच्या दोन बाजू मानल्या जातात. जर स्पर्धांना अधिकाधिक प्रसिद्धी मिळाली, तर आपोआपच प्रायोजकही तुमच्याकडे रांग लावतात.

ही गोष्ट लक्षात घेऊनच मल्लखांब संघटकांनी अधिक व्यापक विचार केला पाहिजे. आंतर क्लब स्तरावर अधिकाधिक स्पर्धांचे आयोजन केले, तर आपोआपच खेळाडूंचा स्पर्धात्मक अनुभव बळकट होतो. पर्यायाने खेळाडूंनाही चांगली प्रसिद्धी मिळू शकते. सुदैवाने गेल्या चार-पाच वर्षांमध्ये आपल्या देशात क्रीडा क्षेत्राविषयी शासकीय स्तरावर आणि एकूणच समाजामध्ये खूपच सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. खेळाडूंना दरमहा शिष्यवृत्तीही दिली जात आहे. खेळाच्या विकासासाठी क्रीडा संघटकांनी चांगल्या योजना सादर केल्या, तर त्याकरिता आर्थिक पाठबळ देण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य शासन उचलत आहे. त्याचा फायदा संघटकांनी घ्यायला पाहिजे.

मल्लखांब हा इतर अनेक क्रीडा प्रकारांसाठी उपयुक्त खेळ मानला जातो. स्पर्धात्मक युगात मल्लखांब खेळाचा प्रसार आणि प्रचार मोठ्या प्रमाणात करावयाचा असेल, तर संयोजनात व्यावसायिकता आणण्याची आवश्यकता आहे.

मिलिंद ढमढेरे

Back to top button