निमित्त... : पॉकेमॉनची पंचविशी! | पुढारी

निमित्त... : पॉकेमॉनची पंचविशी!

व्हिडीओ गेमच्या इतिहासातल्या प्रमुख गेम्सपैकी एक गेम म्हणजे पॉकेमॉन. गेल्याच वर्षी पॉकेमॉनच्या गेम सिरीजची 25 वर्षे पूर्ण झाली. 1996 मध्ये सुरू झालेल्या या गेमची प्रसिद्धी पाहून 1997 मध्ये तिचं कार्टून व्हर्जनही काढण्यात आलं. त्याला जगभरातल्या लोकांनी डोक्यावर घेतलं. अ‍ॅश, पिकाचू ही नावं अल्पावधीतच घरोघरी पोहोचली. येत्या 1 एप्रिलला हे कार्टून 25 वर्षांचं होतंय. सातोशी ताजिरी आणि केन सुगीमोरी या दोघा गेमवेड्या मित्रांनी मिळून पॉकेमॉन नावाची व्हिडीओ गेम बनवली. सातोशीला लहानपणी वेगवेगळे किडे, पाखरं पकडायची आवड होती. त्याचा हाच छंद पॉकेमॉनमागची खरी प्रेरणा आहे. 13 वर्षांचा असताना सातोशीला ‘स्पेस इन्वेडर्स’ या व्हिडीओ गेमचं वेड लागलं होतं. त्यामुळेच त्याने स्वतःची गेम बनवण्याचा ध्यास घेतला.

सातोशीच्या या स्वप्नाला केन सुगीमोरीची साथ लाभली. अप्रतिम चित्रकार असलेल्या केनच्या मदतीने सातोशीने वयाच्या सोळाव्या वर्षी ‘गेम फ्रिक’ नावाचा हस्तलिखित अंक छापला. या अंकात वेगवेगळ्या गेम्सबद्दल माहिती असायची. जसजशी या अंकाची विक्री होऊ लागली, तसतसं सातोशीचं गेमिंग नेटवर्क वाढत गेलं. स्वतःची गेम बनवण्यासाठी सातोशी प्रोग्रॅमिंग शिकला आणि केनच्या मदतीने त्याने पॉकेमॉनवर काम सुरू केलं.

1990 मध्ये सातोशीने ‘निन्टेंडो’ या जपानी व्हिडीओ गेम कंपनीसमोर पॉकेमॉनची निर्मिती करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यांना आधी ही आयडिया झेपली नाही, पण ‘गेम फ्रिक’ सातोशीवर त्यांचा विश्वास होता. ‘पॉकेमॉन रेड अँड ग्रीन’ ही पहिली गेम बनवायला सहा वर्षे लागली. सुरुवातीला या गेमला अतिशय थंड प्रतिसाद मिळाला, पण हळूहळू या गेमची चर्चा होत गेली आणि निन्टेंडोच्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या गेमच्या यादीत ‘पॉकेमॉन’चं नाव सगळ्यात वर आलं.

संबंधित बातम्या

पॉकेमॉन म्हणजे ‘पॉकेट मॉस्टर’चं संक्षिप्त रूप. चित्रविचित्र आकाराचे, पण अनैसर्गिक शक्ती लाभलेले हे काल्पनिक कीटक, पक्षी आणि प्राणी ‘पॉकेमॉन’ म्हणून ओळखले जात. इतरांपेक्षा जास्तीत जास्त पॉकेमॉन मिळवणे आणि इतरांच्या पॉकेमॉनशी आपल्या पॉकेमॉनची झुंज लावणे, हा या गेमचा मूळ उद्देश होता. यात जबरदस्त अ‍ॅक्शन होती, पण कसलाही रक्तपात वगैरे नव्हता. हरलेले पॉकेमॉन सरळ बेशुद्ध व्हायचे. लढाई असूनही कसलाही रक्तपात नसल्याने ही गेम मुलांना आणखीनच आवडली.

या गेमची वाढती प्रसिद्धी पाहता, निन्टेंडोने याच गेमवर आधारित एक ‘अ‍ॅनिमी सिरीज’ म्हणजेच जपानी कार्टून मालिका काढायचं ठरवलं. या मालिकेचा पहिला भाग 1 एप्रिल 1997 ला प्रदर्शित झाला. अ‍ॅश नावाच्या मुलाच्या पॉकेमॉन शोधण्याच्या आणि पॉकेमॉन मास्टर बनण्याच्या प्रवासावर हे कार्टून आधारित होतं. गेममध्ये हेच पात्र आपल्याला सातोशी या नावाने भेटतं. पण पॉकेमॉनचा जगभरातला चाहतावर्ग पाहून मुख्य पात्राला अ‍ॅश असं नाव दिलं गेलं.

जपानमध्ये सात सीझनची असलेली ही मालिका आंतरराष्ट्रीय स्तरावर 24 सीझनमध्ये विभागली गेली. पॉकेमॉन गेमच्या लोकप्रियतेचा कळस गाठायला या कार्टूनला फार वेळ लागला नाही. अल्पावधीतच अ‍ॅश, पिकाचू, टीम रॉकेट ही नावं घरोघरी पोहोचली. आज अ‍ॅनिमी या कार्टून प्रकाराचाही मोठा चाहतावर्ग जगभर पसरलाय. पण अ‍ॅनिमीची ही लोकप्रियता वाढवण्याचं खरं श्रेय मात्र निर्विवादपणे पॉकेमॉनलाच जातं.

पॉकेमॉनमध्ये बर्‍याच पात्रांचा भरणा असला तरी मध्यवर्ती भूमिकेतला अ‍ॅश आणि त्याचा पिकाचू नावाचा पॉकेमॉन, ही या मालिकेतली सर्वाधिक लोकप्रिय पात्रं आहेत. पिकाचू म्हणजे थोडक्यात विद्युत उंदीर! जपानी भाषेत विजेचा आवाज ‘पिका’ आणि उंदराचा आवाज ‘चू’ असा आहे. अ‍ॅशचा हा उंदरासारखा दिसणारा पोकेमॉन विजेचा झटका देऊन प्रतिस्पर्ध्याला घायाळ करतो. त्यामुळेच त्याला पिकाचू नाव दिलं गेलंय. पिवळ्या रंगाचा, गालावर लाल ठिपके असणारा, लुकलुकणार्‍या डोळ्यांनी बघणारा पिकाचू त्याच्या ‘पिका पिका पी’ या आवाजामुळे जास्त फेमस झाला.

अ‍ॅशसोबत मिस्टी नावाची मैत्रीण आणि ब्रॉक नावाचा मित्र आहे. तेही अ‍ॅशसारखेच पॉकेमॉन मास्टर बनण्यासाठी भटकतायत. हे तिघेही वेगवेगळ्या पॉकेमॉन लीगमध्ये जाऊन पॉकेमॉनच्या लढतींमध्ये भाग घेतात. कधी जिंकतात, तर कधी हारतात; पण तरीही सोबत राहतात. या मालिकेतही खलनायक आहेत. त्यांच्या टीमचं नाव ‘टीम रॉकेट.’ जेसी, जेम्स आणि त्यांचा मियाव नावाचा मांजरीसारखा दिसणारा पॉकेमॉन म्हणजे टीम रॉकेट. अ‍ॅश आणि पिकाचूला त्रास देणं हेच त्यांचं काम असतं.
पिकाचूशिवाय इतरही काही पॉकेमॉन त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे प्रसिद्ध आहेत. चक्रीवादळ सोडणारा बल्बासॉर, आग ओकणारा चार्मेंडर, पाण्याला हत्यार म्हणून वापरणारा स्क्वर्टल, सकारात्मक ऊर्जा देणारा मिस्टीचा टोगेपी हेही बरेच लोकप्रिय आहेत. आपल्या गाण्याने श्रोत्यांना झोप आणणारा आणि ते झोपल्यावर चिडून त्यांच्या चेहर्‍यावर चित्र काढणारा जिगलीपफ नावाचा पॉकेमॉन असंच एक गंमतीशीर प्रकरण आहे.
भारतात पॉकेमॉन 2003 मध्ये ‘कार्टून नेटवर्क’ या टीव्ही चॅनलवर हिंदी भाषेत प्रदर्शित झाला. 1990 ते 2000 मध्ये जन्मलेल्या भारतीयांसाठी पॉकेमॉन हे नाव नवीन नाही. हट्टाने कार्टून बघणार्‍यांच्या जगात पॉकेमॉन न पाहिलेल्या किंवा न आवडलेल्यांचा शोध घेणं म्हणजे गवतात सुई शोधण्यासारखं आहे. 2014 मध्ये डिज्नी इंडियाने पॉकेमॉनचे प्रसारण हक्क मिळवले. यावेळी पहिल्यापासून पूर्ण मालिका परत डब केली गेली. मराठी, कन्नड, तमिळ आणि तेलुगू भाषांतही पॉकेमॉनचं डबिंग झालंय.

पॉकेमॉन इतकं लोकप्रिय झालं होतं की, त्यातल्या पात्रांची चित्रं असलेली उत्पादनं बाजारात येऊ लागली. बच्चेकंपनीला आपल्याकडे वळवून घेण्यासाठी पॉकेमॉनने स्थानिक दुकानदारांना बरीच मदत केली. दप्तर, वह्या, स्टिकर, कंपासपेट्या, पाण्याच्या बाटल्या आणि डब्यांवर पॉकेमॉनची चित्रं दिसू लागली. रेनकोट आणि छत्र्याही पॉकेमॉनच्या चित्रांनी सजून गेल्या होत्या. वेगवेगळ्या पॉकेमॉनच्या राख्या आजही विकल्या जातात.

येत्या 1 एप्रिलला पॉकेमॉनचं कार्टून पंचविशीत पोहोचतंय. गेल्या कित्येक वर्षांत असंख्य कार्टून्स आलेत आणि गेलेत. पण त्यात पॉकेमॉनला भारतीयांनी शुक्रतार्‍यासारखं अढळपद दिलंय. त्यांचं पॉकेमॉनप्रेम सिद्ध करण्यासाठी 2016 ला आलेल्या ‘पॉकेमॉन गो’ या मोबाईल गेममुळे झालेल्या दुर्घटनांचा आकडा पुरेसा बोलका आहे. प्रेमवीरांच्या ‘बाबू शोना जानू’च्या जमान्यात ‘पिकाचू’ हे लडिवाळ नाव आजही तितकंच खास आहे. आजही पिकाचूच्या आवाजाची रिंगटोन ऐकताच चमकणारे डोळे पाहिले की, पॉकेमॉन विसरणं किती अवघड आहे हे जाणवतं.

कार्टून म्हणलं की टॉम अँड जेरी, मिकी माऊस, रिची रिचपासून ते बेन टेन, ड्रॅगन बॉल झी, डोरेमॉन आणि आताच्या शिवा, मोटू और पतलू, छोटा भीमपर्यंतची नावे डोळ्यांसमोर येतात. या यादीतलं एक कधीही विसरता न येण्यासारखं नाव म्हणजे पॉकेमॉन. पॉकेमॉनने गेमिंगपाठोपाठ कार्टूनच्या अवाढव्य दुनियेतही आपलं एक वेगळंच स्थान निर्माण केलंय.

प्रथमेश हळंदे

Back to top button