आंतरराष्ट्रीय : ‘इस्लामोफोबिया’ दिनाची निरर्थकता | पुढारी

आंतरराष्ट्रीय : ‘इस्लामोफोबिया’ दिनाची निरर्थकता

जगात इस्लाम आणि मुस्लिमांविरुद्धचे पूर्वग्रह दूर करण्यासाठी दरवर्षी 15 मार्च रोजी ‘इस्लामोफोबिया’ दिवस (इंटरनॅशनल डे टू कॉम्बॅट इस्लामोफोबिया) साजरा करण्याच्या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्रांनी नुकतीच मान्यता दिली आहे. पाकिस्तानचे राजदूत मुनीर अक्रम यांनी 193 सदस्यीय संयुक्त राष्ट्र महासभेसमोर इस्लामिक सहकार्य संघटनेचा (ओआयसी) ठराव मांडला. जो अनेक देशांच्या पाठिंब्याने मंजूर करण्यात आला; मात्र भारत आणि फ्रान्सने त्याला विरोध केला.

भारताने या ठरावाला विरोध करताना म्हटले आहे की, भीती किंवा पूर्वग्रह ही भावना कोणा एका धर्माबद्दलच आहे; असे नसून, अनेक धर्मांबद्दल आहे. अशा परिस्थितीत एका धर्माबद्दलच भीती आहे, असे म्हणणे योग्य नाही. सर्व धर्मांबद्दल भीतीचे वातावरण निर्माण केले जाते व ते दूर करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. संयुक्त राष्ट्रंतील भारताचे कायम प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती यांनी ‘इस्लामोफोबिया’ऐवजी ‘रिलिजिओफोबिया डे’ पाळला जावा, अशी सूचना केली.

इस्लामची दहशत सध्या जगभर पसरली आहे. विशेषत: अमेरिकेत ट्वीन टॉवरवर हल्ला झाल्यानंतर इस्लामची दहशत पसरली आहे. याच दहशतीतून अफगाणिस्तानातील बामियान येथील महाकाय बुद्ध मूर्तींची नासधूस झाली आहे. मंदिरे आणि गुरुद्वारांवर हल्ले झाले आहेत, त्यामुळे इस्लामविषयी गैरसमज निर्माण झाले आहेत. हे गैरसमज दूर करण्याची जबाबदारी इस्लामच्या धार्मिक नेत्यांवर तसेच इस्लामिक म्हणवून घेणार्‍या देशांवर आहे. पाकिस्तानसारखे देश इस्लामचा राजकीय वापर करून शेजारी देशात दहशतवाद पसरवीत आहेत, अशा अवस्थेत ‘इस्लामोफोबिया’ निर्माण झाला तर तो दोष कुणाचा, याचा विचार न करता संयुक्त राष्ट्रांनी हा प्रस्ताव मंजूर केला आहे.

संबंधित बातम्या

खरे तर संयुक्त राष्ट्रांनी धार्मिक बाबींपासून दूर राहावयास हवे. कोणत्याही एका धर्माविषयी असलेल्या भीतीला एवढे महत्त्व दिले, तर येत्या काळात अन्य धर्मांचे अनुयायी असेच ठराव त्यांच्या धर्माबाबत संयुक्त राष्ट्रात आणतील आणि मग या जागतिक संस्थेतही धर्माचे राजकारण सुरू होईल आणि जागतिक शांतता आणि सद्भावना निर्माण करण्याचे संयुक्त राष्ट्रांचे प्रयत्न निष्फळ होतील.

भारतात विविधता आहे व त्याचा भारताला अभिमान आहे. हा भारताचा सामाजिक-सांस्कृतिक पाया आहे आणि भारतात सर्वधर्म समभाव आहे, हे भारतीय प्रतिनिधींनी संयुक्त राष्ट्रांच्या लक्षात आणून दिले व ‘इस्लामोफोबिया’वर आणलेल्या ठरावात अशा जागतिक विविधतेचा आदर व्यक्त होणे आवश्यक होते. पण ठरावात कोठेही धर्मांच्या विविधतेचा उल्लेख नाही, हे खटकते, हेही त्यांनी स्पष्ट केले.

इस्लामला अन्य धर्मांबद्दल आदर आहे का? इस्लामिक म्हणवून घेणार्‍या अनेक देशांमध्ये धार्मिक अल्पसंख्याकांवर अत्याचार होतात. इस्लामिक देशांत ईश्वरनिंदा कायदे आहेत (लश्ररीहिशू) व कायदे मोडणार्‍यांना मृत्युदंड दिला जातो, हे योग्य आहे का? याचा विचार हा ठराव संमत करण्यापूर्वी संयुक्त राष्ट्रांनी करणे आवश्यक होते. पाकिस्तानसारख्या देशात अगदी छोटा मुस्लिम मुलगा कुणाविरुद्धही ईश्वरनिंदेची तक्रार करू शकतो व त्याचा खरेखोटेपणा न पडताळता आरोपीला शिक्षा होऊ शकते. यामुळेही जगात ‘इस्लामोफोबिया’ वाढला असण्याची शक्यता संयुक्त राष्ट्रांनी लक्षात घ्यावयास हवी होती. ‘इस्लामोफोबिया’ दिवस पाळण्याचा हा निर्णय म्हणजे जातीयवादाचा जागतिक प्रसार म्हणावा लागेल.

भारतात सध्या भाजपचे सरकार आहे. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करून हे सरकार सत्तेवर आल्याचा आरोप केला जातो. त्यामुळे देशात जातीय ध्रुवीकरण सुरू झाले आहे. अशात असा दिवस भारतात साजरा करणे म्हणजे आगीत तेल ओतणे आहे. भारताची फाळणी धर्माच्या आधारावर झालेली असल्यामुळे भारतात ‘इस्लामोफोबिया’ ही आजची गोष्ट नाही. त्यातच भारतात स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे जातीय दंगली झाल्या आहेत, त्यामुळे भारतात ‘हिंदू-मुस्लिम ऐक्य’ ही मोठी गरज आहे. त्यासाठी अनेक धर्मनिरपेक्ष नेते सतत प्रयत्न करीत असतात. महात्मा गांधी यांनी आपले पूर्ण जीवन हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी समर्पित केले होते. हिंदू व मुस्लिमांना एकमेकांविषयी भीती न वाटता ‘प्रेम’ व ‘आदर’ वाटावा, असे त्यांचे प्रयत्न होते. अशा स्थितीत भारतात ‘इस्लामोफोबिया’ दिवस साजरा करणे म्हणजे हिंदू व मुस्लिमांनी एकमेकांवर संशय घेण्यासारखे आहे.

इस्लामिक देशांची एक संघटना जगात आहे. या संघटनेने हा तथाकथित ‘इस्लामोफोबिया’ दूर करण्यासाठी काय प्रयत्न केले, हे संयुक्त राष्ट्रांनी विचारणे आवश्यक होते. इस्लाम हा जगातला एक मोठा धर्म आहे व बहुमताच्या जोरावर हा धर्म आपले जागतिक वर्चस्व राखून आहे. पण ज्यू, पारशी, जैन, शीख असे छोटे धर्म जगभर आपले अस्तित्व राखून आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी संयुक्त राष्ट्र वेगळे प्रयत्न करणार आहे का? हेही ‘इस्लामोफोबिया’ दिनाचा ठराव मंजूर करताना स्पष्ट होणे आवश्यक होते.
भारताने असा दिवस साजरा करण्यापेक्षा ‘सर्वधर्म समभाव दिवस’ साजरा करणे योग्य राहील. या दिवशी सर्वधर्म परिषद भरवून, त्यात एका धर्माच्या नेत्याने त्याला अन्य धर्मात कोणत्या अनुकरणीय किंवा चांगल्या बाबी दिसल्या ते सांगितले, तर सर्व धर्मांच्या अनुयायांना एकमेकांच्या धर्माचा आदर करण्याची प्रेरणा मिळेल.
‘इस्लामोफोबिया दिन’ हा इस्लामच्या जागतिक राजकारणाचा भाग आहे. त्यात भारताने न पडता, आपल्या बहुधार्मिक विविधतेचा आदर करावा, हेच बरे.

इस्लामची दहशत सध्या जगभर पसरली आहे. विशेषत: अमेरिकेत ट्वीन टॉवरवर हल्ला झाल्यानंतर इस्लामची दहशत पसरली आहे. याच दहशतीतून अफगाणिस्तानातील बामियान येथील महाकाय बुद्ध मूर्तींची नासधूस झाली आहे. मंदिरे आणि गुरुद्वारांवर हल्ले झाले आहेत, त्यामुळे इस्लामविषयी गैरसमज निर्माण झाले आहेत. हे गैरसमज दूर करण्याची जबाबदारी इस्लामच्या धार्मिक नेत्यांवर तसेच इस्लामिक म्हणवून घेणार्‍या देशांवर आहे.

दिवाकर देशपांडे

Back to top button