मनसुबा दिल्लीचा! | पुढारी

मनसुबा दिल्लीचा!

श्रीमंत, सरदार, वजारतमाब, अमीर-अल-उमराव, सेना खासकेल, नुम्रतजंग, सेनाकर्ते, हिम्मतबहादूर, जंगबहादूर, रुस्तुमे जंग, दौलतबंकी, महाराजसाहेब यांचे पायाशी बालके व जन्मादारभ्य सेवक व पोष्य सोमाजी बिन गोमाजी याचा आदरेखून त्रिवार मुजरा व शिरसाष्टांग दंडवत, विनंती उपरीच! श्रीमंत साहेब यांचे आसीरवादे करोन हेजीबगिरी व नजरबाजी करोन प्रांतोप्रांत व प्रगणे व तरफ यांचे अंतस्थ हमामा कैसा, हालहवाल कैसी याचा धांडोळा घेवोन श्री हुजुर चरणी इमाने इतबारे पेश करीत आहे. हिंदुस्थानातील खबरा आहेतच. तत्रअपि दस्तुरखुद्द आपले प्रांती, महाराष्ट्र प्रांती लवकरच दांडगाच गदारोळ उठणार, ऐसा रंग दिसत आहे. शिवसेना छावणीचे कुल अखत्यार व महाराष्ट्र प्रातीचे वजीर श्रीमंत उद्धव ठाकरे यांणी सांप्रत दिल्ली तख्तास गवसणी घालणेचा मनसुबा बोलून दाविला आहे व तेणेप्रोा येकेकाळचे आपले दोस्त व सांप्रतचे दुश्मन भाजप छावणी यावर कडोनिकडीने शरसंधान केले आहे. ऐसियास त्यांसी भाजप छावणीतून जाबसाल आहे व नजीकचे भवितव्यात उभयतांमधील वैराग्नी भडकतच जाणार, ऐसा रागरंग आहे. प्रस्तुत खलित्यात येणेविषयी तपशीलवार व बयाजवार खबर पेश करीत आहे.

श्रीमंत साहेब मजकूर यांणी बरे विदित आहे, की श्रीमंत उद्धवजी यांचे पिताश्री हिंदुहृदयसम्राट व शिवसेनाप्रमुख श्रीमंत बाळासाहेब ठाकरे यांणी नित्य भव्य-दिव्य मनसुबे नजरेपुढे ठेविले. आज ना उदईक दिल्ली तख्त काबीज करू, येणेप्रोा महत्त्वाकांक्षा ठेविली. तस्मात त्यांचे जयंतीचे निमिते करोन श्रीमंत उद्धवजी यांणी आपले पिताश्री यांची महत्त्वाकांक्षा पूर्ततेचा संकल्प सोडिला. मराठे यांणी दिल्ली तख्तावर घण घातले. तख्त कब्जेत घेतले व अटकेपार भगवा झेंडा लावून भीमथडी घोडी चौखूर दौडली. श्रीमंत बाळासाहेब यांचे नजरेसमोर प्रस्तुत इतिहासाचा दाखला. तो श्रीमंत उद्धवजी यांणी दिल्ली तख्ताचा मनसुबा धरिला आहे. मनसुबा उत्तमच आहे व कार्य जाहलियास गोमटेच आहे. तत्रअपि, आजवेरी शिवसेना छावणीने उत्तर हिंदुस्थानात आपली घोडी दामटविली. पदरी काही पडिले नाही. ऐसियास त्याचेही भान श्रीमंत उद्धवजी यांणी बाळगूनच मशारनिल्हे संकल्प सोडिला असणार.

श्रीमंत उद्धवजी यांणी धनुष्यास प्रत्यंचा तो चढविली आहे! भाजप छावणीचे चार चांदाचे सरदार श्रीमंत अमित शहा राणा यांणी शिवसेना छावणीस एकट्याने लढा म्हणोन आव्हान दिल्हे होते. श्रीमंत उद्धवजी यांणी श्रीमंत अमित शहा राणांचे प्रस्तुत आव्हान स्वीकारलेची शिवगर्जनाच केली. इतःपर आम्ही एकट्यानेच लढू, ऐसाही संकल्प केला! तत्रअपि, आव्हान देणे व पाठोपाठ दिल्ली तख्ताचे अखत्यारीतील यंत्रणांचा ससेमिरा लावू नये, ऐसेही त्यांणी बजावले. आजवर आम्हास गुलामाप्रोा वर्तणूक दिल्ही. युतीची 25 वर्षे सडली, हे म्हटलेच होते, ते बरोबर आहे, म्हणोन उद्धवजींनी पुढे पुरवणी केली. अनेक छावण्या व राहुट्या यांचेशी भाजप छावणीने जवळीक केली. त्यात जवळिकीत येणार्‍या छावण्या व राहुट्या यांची ससेहोलपट जाहली. त्यांचे हिंदुत्वापेक्षा आमचे हिंदुत्व कडवे, छावण्यात बेबनाव घडवून तख्त कधी हासिल केले नाही, येणेप्रोा तलवार चालविली. चोरून नव्हे, तो उजेडात शपथ घेतली, म्हणोनही उद्धवजींनी तमंचाचा चाप वोढला.

सांप्रत राजकीय रणमैदानात अस्सल तेगबहादूर दुर्मीळच आहेत. गुंजभर करून शेरभर मिरवणारेच बहुतांश. त्यातही काहीच कर्तृत्व नसले, तरी तोंडपाटीलकी करून आपुलेच ढोल बडवणारे बोलभांड, बोलघेवडे बहुत. असे वाचीवीर अनेक. पैकी वाचीवीर शिरोमणी म्हणोन शिवसेना छावणीचे सरदार संजय राऊत हे अतिप्रसिद्ध. किल्लेदारी सोडाच, साध्या मेटाची हवालदारीही त्यांणी कधी केली नाही, तलवार कैसी धरणे, याचा किमपि आनभव नाही, ते संजय राऊत छावणीचे कर्तृमअकर्तृम अशा थाटात वावरत असतात. आविर्भाव ऐसा, की छावणीचे कारभारी आपणच! कांहीही जाहल्यास, त्यात तोंड खुपसणे, हाच यांचा उद्यम. श्रीमंत उद्धवजी यांसी श्रीमंत देवेंद्र फडणवीस आदींनी जाबसाल केला, तो यांचे पित्त खवळले! मिरच्या झोंबल्या, म्हणोन आगपाखड करिता, तुमच्या जन्माआधी शिवसेनेचा जन्म झाला आहे. ऐसियास तुम्हास कैसे उमगावे, येणेप्रोा राऊत यांणी वाग्बाण सोडले. आमची पावले आता दिल्लीकडे, म्हणोन त्यांणी श्रीमंत उद्धवजी यांची री वोढिली! केंद्रीय यंत्रणा भाजपचे चिलखत. ते काढून या. मातीत लोळवू, येणेप्रोा वल्गनाही त्यांणी केल्या. यांचा वकूब किती? तत्रअपि, तोंड आहे, म्हणोन जिभेचा पट्टा चालतो आहे.

श्रीमंत उद्धव ठाकरे यांणी तोफ डागली. तो लगोलग भाजप छावणीचे मातब्बर सरदार व प्रांतीचे या आधीचे वजीर श्रीमंत देवेंद्र फडणवीस यांणी त्यास जाबसाल जबरदस्तच केला. भाजप छावणीसमवेत येकत्र होते, तावत्काळी शिवसेना छावणी अव्वल क्रमांकावर होती. सांप्रत साथ सोडली, तो चौथ्या क्रमांकावर घसरली, येणेप्रोा सरदार फडणवीस यांणी सुतरनाळातून मारगिरी केली. यांचे हिंदुत्व कागदी. आम्ही प्रयागराज केले. संभाजीनगर केव्हा करणार, राम मंदिरासाठी लाठी खाणारे आम्ही. तुम्ही केवळ बोलघेवडे, येणेप्रोा दो हाती पट्टा फिरविला. ऐसियास श्रीमंत फडणवीस यांणी राष्ट्रवादी काँग्रेसवरही तोफ डागली. राष्ट्रवादी काँग्रेस काय वस्तू आहे? राष्ट्रवादी तो गल्लीतील छावणी, त्यांसी दिल्ली बहोत दूर, येणेप्रोा त्यांणी राष्ट्रवादी काँग्रेस छावणीचा फज्जा उडविला, वर्मी घाव घातला. तो सदर छावणीत पळ सुटला, येणेप्रोा कानोकानी आहे.

भाजप छावणी प्रांतीचे कुलअखत्यार सरदार श्रीमंत चंद्रकांत पाटील कोल्हापूरकर यांणीही पंचहत्यारांनिशी श्रीमंत उद्धव ठाकरे यांचेवर हमला चढविला. उद्धवजी यांचा उमाळा म्हणजे पश्चातबुद्धी, येणेप्रोा संभावना केली. आपले सारे चुकले, त्यात छावणीस ओहोटी लागली, येणेप्रोा त्यांचा विलाप असलेची बर्कंदाजी सरदार पाटील यांणी केली. सरदार पाटील यांची जमेतनिशी डावी-उजवी बगल सफै केली, तो शिवसेना छावणीस पायगोवा जाहला.

ऐसियास भाजपचे रणगाजी श्रीमंत प्रवीण दरेकर यांणी तेग परजीत घावडाव केले. जे खरे मर्द, त्यास काही आपण मर्द म्हणोन गाजावाजा करावा लागत नाही. श्रीमंत बाळासाहेब ठाकरे यांणी नित्य काँग्रेस रियासतीवर महांकाळी तोफ डागली. लाखोली वाहिली. काही मुलाहिजा ठेविला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस छावणीचे सर्वेसर्वा श्रीमंत शरद पवार बारामतीकर यांचेवरही त्यांची कडाबिन कडाडत असे. श्रीमंत बाळासाहेब यांणी आयुष्यभर ज्यांचेशी चार हात केले, त्यांचेशीच हातमिळवणी केली, म्हणोन सरदार दरेकर यांणी जंबुरियातून मारा धडाडीने केला. राष्ट्रवादी काँग्रेस छावणीने तब्बल अडीच लाख कोटींचा खजिना घेतला. त्यापाठोपाठ काँग्रेस रियासतीने खजिना हासिल केला. तत्रअपि शिवसेना छावणीचे सरदारांस अवघे पन्नास हजार कोटी इतकेच वाट्यास आले; ऐसा लेखाजोखाही सरदार दरेकर यांणी मांडिला.

भाजप छावणीचे सरदार अतुल भातखळकर यांणीही रणमैदानात आपला घोडा बिनीवर आणिला. घोडा चौटाप चालवीत दो हाती खांडे घेऊन, जैसा बळीराजा कणसांची कापणी करतो, तद्वत मारगिरी केली. शिवसेना छावणीस हिंदुत्वाचा कडवा अभिमान. तत्रअपि यांचे कारकिर्दीत टिपू सुलतानाचे नावे बागा उभ्या रहात आहेत. यांचे राजवटीत मुघल पुनरपि कबरीतून उठून बाहेर येतील, येणेप्रोा सरदार भातखळकर यांणी घणाघाती वार केले. येणे भाजप व शिवसेना छावणीत नूतनच खडाजंगीचा माहोल आहे. श्रीमंत उद्धवजींना दिल्लीचे वेध आहेत, तो भाजपाचे रणसुभे त्यांसी प्रांतीच जखडणेचे तयारीत आहेत. शिवसेनेचे पंचप्राण मुंबई महापालिकेत गुंतले आहेत. त्याच बालेकिल्ल्यावर सुलतानढवा करणेची भाजप छावणीची जय्यत तयारी आहे. गुदस्त साल-दोन सालापासोन उभयता छावण्यांत कलह आहेच. तो सांप्रत टोकास जाताना दिसत आहे. कोण्ही उणीदुणी काढणेची संधी दवडीत नाहीत. भांडणाचा सिलसिला जारी आहे व या ना त्या निमितेकरोन आगीत तेल वोतण्याचा मायना आहे. फाल्गुन मासातच महापालिका, जिल्हा परिषदा आदी गडांसाठी रणांगणाचा मुहूर्त आहे. तोवर सांप्रत सुरू आहे, ते जंग पुढेही चालणार व त्यास धार येत जाणार, हा होरा काही चुकावयाचा नाही. धुळवडीचे सुमारास आरोप-प्रत्यारोपांची धुळवड उडणार, देमार-घेमार जबरच होणार, ऐसा मोहरा आहे. बहुत काय लिहावे? आमचे आगत्य असो द्यावे. लेखनसीमा!

 

Back to top button