खबरनामा : पडिले वळण, इंद्रिया सकळ | पुढारी

खबरनामा : पडिले वळण, इंद्रिया सकळ

श्रीमंत सरदार, वजारतमाब, अमीर अल उमराव, सेना खासकेल, हिम्मतबहादूर, नुम्रतजंग, जंगबहादूर, रुस्तुमेजंग, सेनाकर्ते यांचे सेवेशी दासानुदास व पोष्य व बालके सोमाजी बिन गोमाजी याचा आदरेखून साष्टांग दंडवत व त्रिवार मुजरा, विनंती उपरिच! श्रीमंत महाराज साहेब यांचे आसीरवादे करोन व कृपेकरून तमाम हिंदुस्थानातील दौड आहे व प्रसंगी हेजिबगिरी आहे व तमाम प्रांतीची बितंबातमी श्रीमंत चरणी पेश करीत आहे. ऐसियास सांप्रत महाराष्ट्र देशी जे त्रिपक्षीयांचे सरकार तख्तावर आहे, त्यात काही कुरबुरी सुरू आहेत. तख्तनशीन छावणीत शिवसेना छावणी मुख्य. त्यांचे छावणीचेच वजीर तख्तावर.

दुसरे क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस. त्यांचे छावणीचे दुय्यम वजीर आहेत. येणेप्रोा काँग्रेस रियासतीसह त्रिवर्गाचे राज्य आहे. ऐसियास शिवसेना छावणी व राष्ट्रवादी काँग्रेस छावणी यांचे काही सरदार व मनसबदार व मानकरी यांचेत नित्यनूतन हातोफळी सुरू असलेचे वर्तमान आहे. पडिले वळण, इंद्रिया सकळ येणेप्रोा किंवा आदतसे मजबूर ऐसे आहे. तेणेविषयी प्रस्तुत खबरथैलीत बितपशील वर्तमान श्रीमंत साहेब यांचे चरणविंदास पेश करीत आहे.

दोन सालामागे महाराष्ट्र देशी तख्तासाठी रणकंदन घोर जाहले. भारतीय जनता पक्ष व शिवसेना या दोन छावण्या येके बाजूस व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस दुसरे तर्फेस येणेप्रेा झुंज जंगीच जाहली. इरेसरीने देमार-घेमार जाहली. अनेक रुस्तुम सोहराब यांचा रेच उतरला, ऐसे तुंबळ युद्ध जाहले. तत्रअपि नतीजा अनपेक्षित जाहला. तख्ताची सत्ता घेणेस कोण्हास मनुष्यबळ पुरेसे प्राप्‍त जाहले नाही. भाजप व शिवसेना हे मित्र पक्ष. तत्रअपि, वजीर कवण छावणीचा, यावरून नांदीलाच सत्तानाट्यावर पडदा पडला. तस्मात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा श्रीमंत शरद पवार यांणी आटापिटा करोन त्रिवर्गाची मोट बांधणेचे प्रेत्न चालविले.

तो आकस्मातच श्रीमंत पवार यांचे पुतणे श्रीमंत अजितदादा पवार यांणी रातोरात कमळ हाती घेत नूतनच मार्गी पाऊल टाकिले. तत्रअपि, औट घटकेचे सिंहासन लाभले नाही. अजितदादा छावणीस परतले. काका-पुतण्यांची दिलजमाई जाहली. श्रीमंत पवार यांणी त्रिवर्गाची मोट बांधणेचा आपला उद्यम तडीस नेला. मंत्रिपदाचे वाटप जाहले. तत्रअपि, गेल्या किती येक सालापासून येकमेकाचे सामने आलेले त्रिवर्गातील सरदार व दरकदार व मनसबदार व मानकरी यांचेत मेळ मनापासून कितपत, ऐसा सवालच होता.

अपरिहार्य म्हणोन वागणे व नांदणे प्राप्‍त जाहले. तत्रअपि काही अंगवळणी पडलेले नाही, हे वेळोवेळी दिसोन आलेच आहे. आता प्रारंभीचे नाराजीला भलतीच उकळी आल्याचे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांचे सरदारातील द्वंद्वयुद्धावरून दिसोन येत आहे. शिवसेनेचे बडे सरदार, नामजाद सरलष्कर श्रीमंत शिवाजीराव आढळराव पाटील यांणीच सांप्रत तोफ डागलियाने भांडण चव्हाट्यावर आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सरदार व शिलेदार-बारगीरसुद्धा शिवसेना छावणीस नित्य उपद्रव करीत आहेत व शिवसेनेचे गड-किल्‍ले नेस्तनाबूत करणेचे उपद्व्याप सुरू आहेत, येणेप्रोा श्रीमंत शिवाजीराव आढळराव पाटील यांणी तोफेस बत्ती दिल्ही. राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर सरदार व प्रांतीचे कोतवाली खात्याचे मंत्री श्रीमंत दिलीप वळसे-पाटील यांचे रोखाने श्रीमंत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गोळाबारी केली.

सरदार पाटील यांची मारगिरी आहे, तोच सांगोल्याचे शिवसेनेचे सरदार शहाजीबापू पाटील यांणीही तमंचा डागला. आम्हास कोण्ही पुसत नाही. आमची दाद-दखल काही नाही, ऐसा घरचा आहेर सरदार पाटील यांणी आपलेच छावणीस दिल्हा. छावणीत सर्व काही ठीकठाक नाही; काही सरदार नाराज आहेत इत्यर्थ! दुसरे येक सरदार रामदास कदम यांणीही आपला असंतोष बोलून दाविलाच आहे.

काही सरदार-दरकार यांची नाराजी असली, तरी अनेकांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरदार-दरकदारांवर शरसंधान आहे. सालगुदस्तपासोनच हा सिलसिला दरोबस्त सुरू आहे. शिवसेना छावणीचे सरदार दीपक सावंत यांणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरदारांवर वारंवार भालेराई केली आहे. रायगडचे दिल्‍ली तख्ताचे या आधीचे मनसबदार अनंत गीते व राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगडचे सांप्रतचे मनसबदार श्रीमंत सुनील तटकरे यांचा उभा दावा आहे. अहि-नकुलवत वैर. ऐसियास श्रीमंत अनंत गीते यांचा श्रीमंत तटकरे यांचेवर नित्य भडिमार आहे. येक संधी सोडीत नाहीत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे सरदार व सांप्रतचे मंत्री छगन भुजबळ यांचेवर शिवसेनेचे सरदार सुहास कांदेे यांणी तूर्तासच धु्रकोट बाणांचा मारा जबरच केला. नांदगाव प्रगणेतून कांदे यांणी मानकरीपद हासिल केले आहे. तो आपले प्रगणेस प्राप्‍त होणारे अल्पनिधीचा पाढाच त्यांणी वाचला. एवंच भुजबळ यांचेवर गैरकारभाराचीही तक्रार दस्तुरखुद्द तख्ताचे वजीर श्रीमंत उद्धव ठाकरे यांचेकडे दाखल केली. मामला गंभीरच जाहला. तत्रअपि, राजकारभार चालवणे तो सर्वांस सांभाळून घेणे आले. ऐसियास तक्रारींची वासलात काय लागणार, हे दिसतच आहे.

येणेप्रोा शिवसेना छावणीत काही असंतोष आहे, तो या छावणीतील सरदार-दरकदारांचे निशाणावर राष्ट्रवादी काँग्रेस छावणीचे सरदार आहेत व कलगीतुरा झडताना दिसत आहे. ऐसियास दोन्ही छावण्या या प्रांतीक पातळीवर आहेत. उभयता छावण्यांचे जे सरदार व दरकदार व जहागिरदार व इनामदार आदी त्यांचे वतन व शिवसेना सरदार-दरकदार-जहागिरदार व इनामदार आदींचे वतन येकच. येकाच प्रगणेवर व तरफेवर उभयता आपला चौथाईचा व सरदेशमुखीचा हक्‍क सांगणार. तेणेकारण मुळातच उभयता छावणीचे सरदारांत हमामा आहे. काही ठिणगी पडताच, भडका उडतो. आपद‍्धर्म म्हणोन व पदरी पडले, पवित्र जाहले, म्हणोन चालले आहे.

ऐसियास ख्रिस्ताब्द 2019 सालात प्रांतीचे तख्तासाठी झुंज जाहली. सदर लढतीमध्ये किमान 50 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना सरदार यांचेतच अटीतटीची व कडोनिकडीची हातघाई जाहली. सुलतानढवा करोन, मोर्चे लावून बालेकिल्ल्यास भिडले. मशारनिल्हे झुंजात कोण्ही विजयश्री मेळविली तो कोण्हाचे पदरी पराभव आला. तो ज्याचे विरोधात तलवार धरिली, त्याचेशी दिलजमाई कैसी व्हावी? ऐसियास त्रिवर्गाची आघाडी आकारास येत होती, तेव्हाच रुसवेफुगवे होते. सुरुवातीस ते गुलदस्त्यात होते, ते आता उघड होत आहेत. सांप्रत पूर्वापार दुष्मनीस पुनरपि धार येत आहे. त्रिवर्ग आघाडी आहे, सत्तेत आहोत, म्हणोन ज्यांचे हातून मानकरी पद गेले, ते स्वस्थ राहतील ऐसे नाही.

सांप्रतचे सालातच महापालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, नगरपालिका आदी गडकिल्‍ले व गढ्या यांचेसाठी रणांगण होतच आहे. सदर रणमैदानात मशारनिल्हे सरदार येकमेकावर तेगी घेऊन धावा बोलतील, हे दिसतच आहे. येणेप्रोा या दोन छावण्यांत अंतर्गत धुसफूस आहे. तो काँग्रेस रियासतीचे श्रीमंत नाना पटोले यांचाही स्वबळावर लढतीत उतरणेचा नारा आहेच.

अन्यही काही काँग्रेस रियासतीचे सरदार स्वबळासाठी गुडघ्यास बाशिंग बांधून आहेत. येणेप्रोा त्रिवर्गाची कसरत आहे. भाजप छावणी समान शत्रू म्हणोन सांप्रत ताक फुंकून, हात राखून सांभाळून घेत कारभार आहे. तत्रअपि उणीदुणी कमती नाहीत. श्रीमंत साहेब यांसी बरा बोध जाहला असेलच. बहुत काय लिहावे? अस्तु. आमचे आगत्य असो द्यावे. कळावे ही विनंती. लेखनालंकार!

Back to top button