ट्रॅव्हल इन्श्युरन्स : गरज आणि दक्षता

प्रवास विम्याची खबरदारी
Travel Insurance
ट्रॅव्हल इन्श्युरन्सPudhari File Photo
Published on
Updated on
अंकिता कुलकर्णी

सणासुदीचा काळ जवळ आला की, अनेक भारतीय परदेशात जाऊन सुट्टी घालवण्याच्या तयारीत असतात. अशा परिस्थितीत राहण्यासाठी योग्य जागा शोधणे, विमान तिकीट आणि हॉटेल्स बुक करणे इत्यादींबद्दल खूप विचार केला जातो; परंतु प्रवास विमा पॉलिसी गांभीर्याने निवडणे महत्त्वाचे असताना त्याचा विसर पडतो; पण परदेशात असताना प्रवाशाला काही अपघात झाला, तर त्याची निष्काळजीपणा चांगलीच महागात पडू शकतो. वास्तविक, परदेशात प्रवास करत असाल, विशेषत: आरोग्यसेवा महाग असलेल्या देशात, तर जास्त विमा असलेली पॉलिसी निवडणे गरजेचे आहे. वैद्यकीय खर्च आणि विनिमय दर तुलनेने कमी असतील अशा देशात जाणार असाल, तर कमी किमतीच्या विम्याची निवड करू शकता.

विम्याच्या रकमेचा विचार करताना इतर काही घटकदेखील विचारात घेतले पाहिजेत. यामध्ये प्रवासाचा कालावधी, तुमचे वय, तुम्ही एकटे किंवा कुटुंबासोबत प्रवास करत आहात की नाही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांपैकी कोणाला किंवा तुम्हाला आधीपासून अस्तित्वात असलेल्या आरोग्य समस्या आहेत का, याचा समावेश होतो. जर तुम्ही लांबच्या सहलीला जात असाल आणि तुमचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त असेल, तर जास्त रकमेच्या विम्याची पॉलिसी निवडा.

या पॉलिसीमध्ये सामानाचे संरक्षण, फ्लाईट रद्द होणे, महत्त्वाची कागदपत्रे गमावणे आणि वैद्यकीय खर्च समाविष्ट करणे आवश्यक आहे. दागिने, इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी महागड्या वस्तू घेऊन जाण्याचा विचार करत असाल, तर पॉलिसीसह उपलब्ध असलेल्या अतिरिक्त कव्हरेजचीही तपासणी करा. बर्‍याच पॉलिसींमध्ये आधीपासून अस्तित्वात असलेल्या व्याधी, शस्त्रक्रियेनंतरचे परिणाम इत्यादींचा समावेश असत नाही. या पार्श्वभूमीवर तुमचे पूर्वीचे आजारदेखील पॉलिसीमध्ये समाविष्ट आहेत, याची खात्री करा. जरी तुम्हाला त्यासाठी जास्त प्रीमियम भरावा लागला तरीही याबाबत हलगर्जीपणा करू नका; अन्यथा परदेशात खूप खर्च करावा लागू शकतो. बर्‍याच पॉलिसी विशिष्ट कव्हरेजसाठी मर्यादा सेट करतात. यामुळे त्या पॉलिसीची उपयुक्तताच कमी होते. सबब संपूर्ण विम्याची रक्कम वापरण्यायोग्य असल्याची खात्री करा.

बरेच पर्यटक वर नमूद केलेले मुद्दे न तपासता, त्यांच्या ट्रॅव्हल एजंटने केलेली योजना सहज स्वीकारतात. ट्रॅव्हल एजंट हे विमा तज्ज्ञ नसतात आणि त्यामुळे तुमच्या गरजेनुसार ते योग्य पॉलिसीसाठी मार्गदर्शन करू शकत नाहीत. तसेच ट्रॅव्हल एजंट्सचे काही विमा कंपन्यांशी टाय-अप असू शकतात. अशा परिस्थितीत, तुम्हाला बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व पॉलिसी आणि त्यांच्या किमतींची तुलना करण्याची संधी मिळणार नाही. ट्रॅव्हल एजंट सामान्यत: मूलभूत पॉलिसी देतात, ज्यामध्ये विम्याची रक्कम मर्यादित असते आणि अनेक गोष्टी वगळल्या जातात; परंतु तुम्हाला सर्वसमावेशक कव्हरेज अधिक फायदेशीर ठरते. अशा परिस्थितीत, ट्रॅव्हल एजंटकडून ट्रॅव्हल इन्श्युरन्स खरेदी करण्याऐवजी, इन्श्युरन्स अ‍ॅग्रीगेटरच्या पोर्टलवर जा आणि वेगवेगळ्या पॉलिसींची तुलना करा. तुमच्या गरजेनुसार योग्य धोरण निवडण्यासाठी अशी पोर्टल्स खूप उपयुक्त ठरू शकतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news