पुढारी ऑनलाईन डेस्क
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीचे संकेत आणि भारतीय बाजारात परदेशी गुंतवणूक ओघ वाढणार असल्याचे आशेने आज गुरुवारी भारतीय शेअर बाजारात (Stock Market) विक्रमी तेजीचा माहौल राहिला. सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी आज नवा विक्रमी उच्चांक नोंदवून अनुक्रमे १.७ टक्के आणि १.९ टक्के वाढून बंद झाले. सेन्सेक्सने आज पहिल्यांदाच ८३ हजारांचा टप्पा पार केला. त्यानंतर सेन्सेक्स १,४३९ अंकांनी वाढून ८२,९६२ वर बंद झाला. तर निफ्टीने (Nifty) आज २५,४३३ चा सर्वकालीन उच्चांक नोंदवला. त्यानंतर निफ्टी ४७० अंकांनी वाढून २५,३८८ वर स्थिरावला.
सेन्सेक्स- निफ्टी अनुक्रमे १.७ टक्के आणि १.९ टक्के वाढून बंद.
सेन्सेक्सने पहिल्यांदाच पार केला ८३ हजारांचा टप्पा.
निफ्टीने नोंदवला २५,४३३ चा सर्वकालीन उच्चांक.
बीएसई मिडकॅप १.३ टक्के आणि स्मॉलकॅप ०.७ टक्क्यांनी वाढला.
बाजारातील आजच्या विक्रमी तेजीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्याचे बाजार भांडवल ६.६ लाख कोटींनी वाढून ४६७.३६ लाख कोटी रुपयांवर पोहोचले.
निफ्टी ५० ला बँकिंग, पॉवर, एनर्जी आणि ऑटो शेअर्समधील तेजीमुळे नवा उच्चांक गाठता आला. सर्व १३ क्षेत्रीय निर्देशांक तेजीत राहिले. निफ्टी ऑटो, निफ्टी एनर्जी, निफ्टी इन्फ्रा आणि निफ्टी मेटल २ ते ३ टक्क्यांनी वाढले. निफ्टी आयटी १.६ टक्क्यांनी वाढून बंद झाला. बीएसई मिडकॅप १.३ टक्के आणि स्मॉलकॅप ०.७ टक्क्यांनी वाढला.
सेन्सेक्सवर एनटीपीसी, भारती एअरटेल, एम अँड एम, जेएसडब्ल्यू स्टील, अदानी पोर्ट्स हे शेअर्स ३ ते ४ टक्क्यांपर्यंत वाढले. त्याचबरोबर एसबीआय, टेक महिंद्रा, टाटा स्टील, एलटी, कोटक बँक, इन्फोसिस, अल्ट्राटेक सिमेंट हे शेअर्स प्रत्येकी २ टक्के वाढले. रिलायन्सचा शेअर्स १.९ टक्के वाढून बंद झाला.
निफ्टीने आज २५,४३३ च्या नवा उच्चांकाला स्पर्श केला. निफ्टीवर हिंदाल्को, भारती एअरटेल, एनटीपीसी, श्रीराम फायनान्स, ग्रासीम हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले.
अमेरिका आणि आशियाई बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजाराने आज सकारात्मक सुरुवात केली होती. त्यानंतर तेजी वाढून शेअर बाजाराने आज नवे शिखर गाठले. अमेरिकेतील महागाईवाढीच्या आकडेवारीने फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीचे संकेत दिले आहेत.
चीनकडून कमी झालेली मागणी आणि जागतिक अतिरिक्त पुरवठ्याच्या चिंतेमुळे सप्टेंबर महिन्यात कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे १० टक्क्यांनी घसरल्या आहेत. आज दरात सुधारणा दिसून आली. नोव्हेंबरसाठीच्या ब्रेंट क्रूड फ्यूचर्स दर १.४ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ७१.६१ डॉलरवर राहिला.