पुढारी ऑनलाईन डेस्क
शेअर बाजारात (Stock Market) आज सोमवारी (दि. १२) काही प्रमाणात हिंडेनबर्ग इम्पॅक्ट (hindenburg report on adani) दिसून आला. आजच्या सत्रात बाजारात चढ-उतार राहिला. आजच्या सत्रात ४०० अंकांच्या घसरणीसह खुला झालेला सेन्सेक्स (Sensex) नंतर सावरला. सेन्सेक्स ५६ अंकांच्या किरकोळ घसरणीसह ७९,६४८ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक (Nifty) २० अंकांच्या किरकोळ घसरणीसह २४,३४७ वर स्थिरावला. मुख्यतः आज अदानी समुहाच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली.
सुरुवातीच्या घसरणीतून सावरत सेन्सेक्स- निफ्टी सपाट बंद.
एफएमसीजी आणि पीएसयू बँक शेअर्सवर राहिला दबाव.
आजच्या सत्रात १,७६३ शेअर्स वाढले, १,८१० शेअर्स घसरले.
अदानी पोर्ट्सचा शेअर्स २ टक्क्यांनी घसरून बंद.
बीएसई मिडकॅप सपाट पातळीवर बंद.
स्मॉलकॅपमध्ये ०.५ टक्क्यांनी वाढ.
क्षेत्रीय निर्देशांकात एफएमसीजी, पॉवर, पीएसयू बँक आणि मीडिया ०.५ ते २ टक्क्यांनी घसरले. तर बँक, टेलिकॉम, आयटी, ऑईल आणि गॅस आणि रियल्टी ०.३ ते १ टक्के वाढले. बीएसई मिडकॅप सपाट पातळीवर बंद झाला. तर स्मॉलकॅप ०.५ टक्क्यांनी वाढून बंद झाला.
सेन्सेक्सवर एनटीपीसी, अदानी पोर्ट्स, पॉवर ग्रिड, एसबीआय, नेस्ले इंडिया, एम अँड एम हे शेअर्स टॉप लूजर्स ठरले. तर ॲक्सिस बँक, इन्फोसिस, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक हे शेअर्स तेजीत राहिले.
निफ्टी ५० वर अदानी पोर्ट्स, एनटीपीसी, डॉ. रेड्डी, ब्रिटानिया, एसबीआय हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी घसरले. तर ओएनजीसी, हिरोमोटोकॉर्प, ॲक्सिस बँक, इन्फोसिस, डिव्हिस लॅब हे शेअर्स १ ते २.५ टक्क्यांपर्यंत वाढले.
अदानी यांच्या साम्राज्यात विदेशातून करण्यात आलेल्या गुंतवणुकीत सेबीच्या अध्यक्षा माधुरी पुरी बूच यांचाही सहभाग असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट हिंडेनबर्ग रिसर्चने केला आहे. हिंडेनबर्गने (Hindenburg Research) आपल्या नव्या अहवालात अदानी समूहावर सेबीकडून कारवाई का झाली नाही याचा खुलासाही केलाय. याचे पडसाद आज बाजारात दिसून आले. विशेषतः अदानी समुहाचे शेअर्स घसरले. (hindenburg report on india)
अमेरिकेतील शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चच्या नव्या आरोपानंतर सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात अदानी समूहाच्या शेअर्समध्ये १७ टक्क्यांपर्यंत घसरण झाली. निफ्टी ५० वर अदानी एंटरप्रायजेस आणि अदानी पोर्ट्स हे सुरुवातीच्या व्यवहारात टॉप लूजर्स ठरले होते. त्यानंतर या शेअर्समधील घसरण कमी झाली. निफ्टीवर दुपारच्या सत्रात अदानी विल्मर, अदानी टोटल गॅस, अदानी एनर्जी, अदानी पोर्ट्स, एसीसी, अदानी एंटरप्रायजेस (adani enterprises share price), अदानी पॉवर या शेअर्सनी नकारात्मक पातळीवर व्यवहार केला.
गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील व्यावसायिक साम्राज्याशी संबंधित ऑफ-शोअर संस्थांमध्ये हिस्सेदारी असल्याबद्दल हिंडेनबर्गने सेबीच्या प्रमुखावर नवीन आरोप केले आहेत. यामुळे आजच्या सत्रात अदानी शेअर्सवर फोकस राहिला. अदानी विल्मर आणि अदानी टोटल गॅस प्रत्येकी ४ टक्क्यांनी घसरले, तर अदानींची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायजेस शेअर्स सुमारे एक टक्क्याने घसरून बंद झाला.