पुढारी ऑनलाईन डेस्क
महागाईत झालेली घट आणि जागतिक सकारात्मक संकेतादरम्यान आज शुक्रवारी निफ्टी आणि सेन्सेक्स मोठ्या तेजीत दिसून आले. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स १ हजार अंकांनी वाढून ८०,१३० च्या वर गेला. तर निफ्टी ५० निर्देशांक २७५ अंकांनी वाढून २४,४२० वर पोहोचला. विशेष म्हणजे आजच्या सत्रात आयटी शेअर्स चमकले आहेत.
जागतिक सकारात्मक संकेतांसह अमेरिकेतील आर्थिक आकडेवारीने जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेतील मंदीची भीती कमी केली आहे. यामुळे भारतीय शेअर बाजारात तेजीचा माहौल दिसून येत आहे. आज सर्वच क्षेत्रांतून खरेदी दिसून येत आहे.
दरम्यान, बाजारातील आजच्या जोरदार तेजीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ४.१५ लाख कोटींनी वाढून ४४८.४४ लाख कोटी रुपयांवर पोहोचले.
टेक महिंद्रा, एम अँड एम, टीसीएस, टाटा मोटर्स, एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, कोटक बँक, आयटीसी हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांनी वाढले आहेत. पॉवर ग्रिड, ॲक्सिस बँक, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, नेस्ले इंडिया हे शेअर्सही तेजीत आहेत.
अमेरिकेच्या बाजारातील जोरदार तेजीनंतर भारतीय बाजारातही सकारात्मक वातावरण राहिले. आज निफ्टी आयटी निर्देशांक २ टक्क्यांहून अधिक वाढला. निफ्टी आयटीवर Mphasis चा शेअर्स तब्बल ६.५ टक्क्यांनी वाढून टॉप गेनर ठरला आहे. LTTS, Wipro आणि TCS हे शेअर्सही जोरदार तेजीत व्यवहार करत आहेत.