

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्मार्टफोन, संगणक आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंना परस्पर (रेसिप्रोकल) शुल्कातून वगळल्याचे जाहीर केल्यानंतर भारतीय शेअर बाजाराने मंगळवारी (दि.१५) तेजीत सुरुवात केली. विविध क्षेत्रांमध्ये चौफेर खरेदी दिसून येत आहे. सुरुवातीच्या व्यवहारात बेंचमार्क इक्विटी निर्देशांक सेन्सेक्स १,६०० हून अधिक अंकांनी वाढून ७६,७५० पार झाला. तर निफ्टी ५० ने जवळपास ५०० अंकांनी वाढून २३,३०० वर व्यवहार करत आहे. विशेषतः मेटल आणि रियल्टी शेअर्समध्ये बंपर तेजी दिसून आली आहे.
ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणांनी जगभरातील शेअर बाजार गडगडले होते. पण आठवड्याच्या अखेरीस अमेरिकेने त्यांच्या प्रस्तावित टॅरिफमधून स्मार्टफोन, संगणक आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंना वगळले. यामुळे जागतिक शेअर निर्देशांकांना मोठा दिलासा मिळाला.
क्षेत्रीय पातळीवर निफ्टी ऑटो ३ टक्के आणि रियल्टी ४.४ टक्के वाढला आहे. निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस, आयटी, मेटल, फार्मा, कन्झ्यूमर ड्युराबेल्स आणि ऑईल अँड गॅस निर्देशांकही तेजीत खुले झाले आहेत. बीएसई मिडकॅप सुमारे २ टक्के आणि स्मॉलकॅप २.४ टक्के वाढून व्यवहार करत आहे.
सेन्सेक्सवर इंडसइंड बँक, टाटा मोटर्स, एलटी, एम अँड एम, अदानी पोर्ट्स, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, टाटा स्टील हे शेअर्स २ ते ६ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. तर दुसरीकडे हिंदुस्तान युनिलिव्हर हा शेअर्स घसरला आहे.