dपुढारी ऑनलाईन डेस्क
अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने पुढील महिन्यात व्याजदर कपातीचे संकेत दिल्याच्या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी भारतीय शेअर बाजारात (Stock Market) तेजी राहिली. सेन्सेक्सने (Sensex) आज सलग तिसऱ्या दिवशी वाढ नोंदवली. सेन्सेक्स १४७ अंकांनी वाढून ८१,०५३ वर बंद झाला. तर निफ्टी ५० (Nifty) निर्देशांक ४१ अंकांच्या किरकोळ वाढीसह २४,८११ वर स्थिरावला. आजच्या ट्रेडिंग सत्रात निफ्टी बँक मजबूत स्थितीत दिसून आला.
शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी.
सेन्सेक्स १४७ अंकांनी वाढून ८१,०५३ वर बंद.
निफ्टी ४१ अंकांच्या किरकोळ वाढीसह २४,८११ वर स्थिरावला.
IT आणि पॉवर वगळता सर्व क्षेत्रांत खरेदीचा माहौल.
निफ्टी बँक मजबूत स्थितीत.
स्मॉलकॅपमध्ये सलग पाचव्या दिवशी वाढ.
बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल आज २२ ऑगस्ट रोजी ४६०.५१ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. ते याआधी बुधवारी २१ ऑगस्ट रोजी ४५९.२४ लाख कोटी रुपयांवर होते. याचाच अर्थ आज बीएसई सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात १.२७ लाख कोटी रुपयांची वाढ झाली.
क्षेत्रीय निर्देशांकात पॉवर निर्देशांक १ टक्के घसरला, तर फार्मा, ऑईल आणि गॅस, ऑटो, आयटीमध्ये किरकोळ घसरण झाली. तर बँक, एफएमसीजी, मेटल, रियल्टी, टेलिकॉम ०.५ ते १.४ टक्क्यांनी वाढून बंद झाले. बीएसई मिडकॅप ०.६ टक्के आणि स्मॉलकॅप ०.४ टक्क्यांनी वाढून बंद झाला. स्मॉलकॅपमध्ये सलग पाचव्या दिवशी वाढ दिसून आली.
सेन्सेक्सवर भारती एअरटेल, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, टायटन, जेएसडब्ल्यू स्टील, एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले. तर एम अँड एम, एनटीपीसी, टाटा मोटर्स, टीसीएस, पॉवर ग्रिड या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
निफ्टीवर ग्रासीम, टाटा कन्झ्यूमर, भारती एअरटेल, अपोलो हॉस्पिटल, टाटा स्टील हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांपर्यंत वाढले. दुसरीकडे विप्रो, एनटीपीसी, टाटा मोटर्स, एम अँड एम, डॉ. रेड्डीज हे शेअर्स प्रत्येकी १ टक्के घसरले.
आज IT आणि पॉवर वगळता सर्व क्षेत्रांत खरेदीचा माहौल राहिला. निफ्टी आयटी निर्देशांकाने आज ४१,८३४ चा नवा उच्चांक गाठला. पण त्यानंतर तो ४१,५०६ वर लाल रंगात बंद झाला.