पुढारी ऑनलाईन डेस्क
जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांदरम्यान देशांतर्गत निर्देशांकांना (Stock Market) स्पष्ट दिशा मिळाली नाही. त्यात एचडीएफसी बँक शेअर्समधील घसरण आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे मंगळवारी (दि.१३) सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) गडगडले. आज सर्व क्षेत्रात विक्री दिसून आली. सेन्सेक्स ६९२ अंकांनी घसरून ७८,९५६ वर बंद झाला. तर निफ्टी २०८ अंकांच्या घसरणीसह २४,१३९ वर स्थिरावला.
सेन्सेक्स ६९२ अंकांनी घसरून ७८,९५६ वर बंद.
निफ्टी २०८ अंकांच्या घसरणीसह २४,१३९ वर स्थिरावला.
सर्व क्षेत्रीय निर्देशांक आज लाल रंगात बंद.
बँक, पॉवर, मेटल आणि टेलिकॉम प्रत्येकी १ टक्के घसरले.
बीएसई मिडकॅप, स्मॉलकॅप जवळपास १ टक्के घसरले.
सेन्सेक्सवर एचडीएफसी बँकेचा शेअर्स टॉप लूजर ठरला.
अदानी समुहाच्या शेअर्समध्ये संमिश्र व्यवहार.
सर्व क्षेत्रीय निर्देशांक आज लाल रंगात बंद झाले. बँक, पॉवर, मेटल आणि टेलिकॉम प्रत्येकी १ टक्के घसरले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप जवळपास १ टक्के घसरले. आज शेअर बाजार किरकोळ घसरणीसह खुला झाला होता. पण त्यानंतर त्याची घसरण वाढत गेली. दरम्यान, निफ्टी २४,१०० च्या जवळ आणि सेन्सेक्स ७९ हजारांच्या खाली आला.
बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज १३ ऑगस्ट रोजी ४४५.३४ लाख कोटींवर आले. जे याआधीच्या सत्रात म्हणजे १२ ऑगस्ट रोजी ४४९.८२ लाख कोटी रुपयांवर होते. याचाच अर्थ आज बीएसई सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात ४.४८ लाख कोटी रुपयांची घट झाली.
सेन्सेक्सवर एचडीएफसी बँकेचा शेअर्स टॉप लूजर ठरला. हा शेअर्स आज ३.५ टक्क्यांनी घसरून १,६०२ रुपयांपर्यंत खाली आला. बजाज फायनान्स, टाटा मोटर्स, टाटा स्टील, एसबीआय, टाटा स्टील, कोटक बँक, बजाज फिनसर्व्ह, अदानी पोर्ट्स हे शेअर्सही घसरले. तर टायटन, एचसीएल टेक, नेस्ले इंडिया, सन फार्मा या शेअर्स तेजी दिसून आली.
निफ्टीवर एचडीएफसी बँक, बीपीसीएल, श्रीराम फायनान्स, एचडीएफसी लाईफ, टाटा मोटर्स हे शेअर्स २ ते ३.५ टक्क्यांपर्यंत घसरले. तर टायटन, अपोलो हॉस्पिटल, डॉ. रेड्डीज, टाटा कन्झ्यूमर हे शेअर्स हिरव्या रंगात बंद झाले.
ग्लोबल इंडेक्स एग्रीगेटर एमएससीआय (MSCI) ने अदानी समूह आणि त्याच्या उपकंपन्यांच्या शेअर्सवरील निर्बंध हटवले आहेत. हिंडेनबर्ग रिसर्चच्या नव्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर अदानी समुहासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. मॉर्गन स्टॅनली कॅपिटल इंटरनॅशनल (MSCI) ने अदानी समूह आणि त्याच्या उपकंपन्यांच्या शेअर्सवरील निर्बंध हटवले आहेत. ज्यामुळे समूहाच्या व्यवसाय ऑपरेशन्समध्ये नवीन घडामोडी घडू शकतात, असे NDTV ने वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, आज अदानी समुहाच्या शेअर्समध्ये संमिश्र व्यवहार दिसून आले. अदानी टोटल गॅस, अदानी एनर्जी, अदानी ग्रीन या शेअर्सनी सकारात्मक पातळीवर व्यवहार केला. तर अदानी अदानी एंटरप्रायजेसचा शेअर्स २ टक्क्यांनी घसरला. तर अदानी पोर्ट्सचा शेअर्स १ टक्के घसरणीसह बंद झाला.
परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारात विक्रीकडे वळले आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) १२ ऑगस्ट रोजी ४,६८० कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली, तर त्याच दिवशी देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी ४,४७७ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली.