पुढारी ऑनलाईन डेस्क
भारतीय शेअर बाजारातील (Stock Market) निर्देशांक निफ्टी ५० आणि सेन्सेक्सने आज गुरुवारी नवा विक्रमी उच्चांक गाठला. सेन्सेक्स आजच्या ट्रेडिंग सत्रात ८२,२८५ पर्यंत वाढला. तर निफ्टीने २५,१९२ चा नवा सर्वकालीन उच्चांक नोंदवला. त्यानंतर सेन्सेक्स ३४९ अंकांनी वाढून ८२,१३४ वर बंद झाला. तर निफ्टी ९९ अंकांच्या वाढीसह २५,१५१ वर स्थिरावला. आज ऑटो, आयटी, ऑईल आणि गॅस आणि एफएमसीजी शेअर्समध्ये खरेदीचा जोर राहिला.
सेन्सेक्स आजच्या ट्रेडिंग सत्रात ८२,२८५ पर्यंत वाढला.
निफ्टीने २५,१९२ चा नवा सर्वकालीन उच्चांक नोंदवला.
ऑटो, आयटी, ऑईल आणि गॅस आणि एफएमसीजी शेअर्समध्ये जोरदार खरेदी.
Paytm shares शेअर्स तेजीत, ५ टक्क्यांपर्यंत वाढ.
ऑटो, ऑईल आणि गॅस, टेलिकॉम, आयटी, एफएमसीजी निर्देशांकात ०.५ ते १ टक्क्यांनी वाढ.
क्षेत्रीय निर्देशांकाक ऑटो, ऑईल आणि गॅस, टेलिकॉम, आयटी आणि एफएमसीजी ०.५ ते १ टक्क्यांनी वाढले. तर कॅपिटल गुड्स, फार्मा, मीडिया, मेटल, पॉवर ०.३ ते ०.७ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप ०.२ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप ०.७ टक्क्यांनी घसरला.
विशेषतः हेवीवेट रिलायन्स इंडस्ट्रीज तसेच फायनान्सियल आणि आयटी शेअर्समधील तेजीमुळे बाजाराला सपोर्ट मिळाला. दरम्यान, शेअर बाजारात आज विक्रमी तेजी राहिली असतानाही बीएसई (BSE) वरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३१ हजार कोटी रुपयांनी कमी होऊन ते ४६२.७२ लाख कोटी रुपयांवर आले. BSE वर आज सुमारे २,५२५ शेअर्स घसरले. तर १,४२३ वाढले आणि १३५ शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून आला नाही.
सेन्सेक्सवर टाटा मोटर्स, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, एचसीएल टेक, आयटीसी, रिलायन्स, टेक महिंद्रा, मारूती हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले. तर एम अँड एम, जेएसडब्ल्यू स्टील, सन फार्मा, कोटक बँक, इन्फोसिस या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
निफ्टीवर (Nifty) टाटा मोटर्स, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, बीपीसीएल, ब्रिटानिया हे शेअर्स २ ते ४ टक्क्यांनी वाढले. तर ग्रासीम, एम अँड एम, हिंदाल्को, आयशर मोटर्स, कोटक बँक हे शेअर्स घसरले.
पेटीएम शेअर्स (97 Communications Share Price) आज बीएसईवर सुरुवातीच्या व्यवहारात ५ टक्क्यांनी वाढ नोंदवून ५६५ रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला. त्यानंतर हा शेअर्स ५५४ रुपयांवर स्थिरावला. पेमेंट सर्व्हिस व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी वित्त मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर पेटीएमचा शेअर्स वधारला.
आशियाई बाजारात आज घसरण दिसून आली. एमएससीआयचा जपानबाहेरील आशिया-पॅसिफिक शेअर्सचा निर्देशांक ०.६ टक्क्यांनी घसरला. आज विशेषतः टेक शेअर्समध्ये घसरण दिसून आली. जपानचा निक्केई ०.४ टक्के आणि दक्षिण कोरिया कोस्पी १ टक्के घसरला.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) २८ ऑगस्ट रोजी १,३४७ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. तर त्याच दिवशी देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी ४३९ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने आगामी बैठकीत व्याजदर कपातीचे संकेत दिले आहेत. यामुळे भारतीय आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी वाढली आहे.