निफ्टी आणि सेन्सेक्स : अर्थवार्ता | पुढारी

निफ्टी आणि सेन्सेक्स : अर्थवार्ता

* गतसप्ताहात निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये अनुक्रमे एकूण 458.65 आणि 1490.83 अंकांची वाढ होऊन दोन्ही निर्देशांक अनुक्रमे 17812.7 व 59744.65 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये एकूण 2.64 टक्के व 2.56 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.

* दहा वर्षांचे भारतीय सरकारी रोख्यांचा दरा (bond yield) मध्ये एका आठवड्यामध्ये सुमारे नऊ बेसिस पॉईंटची वाढ नोंदवली गेली. दहा वर्षांच्या भारतीय रोख्यांचा दर 6,5423 टक्क्यांपर्यंत पोहोचला. मागील सप्ताहात हा दर 64537 टक्के होता. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हमध्ये झालेल्या बैठकीनुसार लवकरच अमेरिकेतला व्याजदर वाढीस लागण्याची शक्यता आहे.

* आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमतींनी पुन्हा उसळी घेतली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडचा दर 82 डॉलर प्रती बॅरलच्या वर गेला. कजाकिस्तान आणि लिबिया या देशामध्ये असलेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचे दर वाढले. हे सर्व असले तरी दिलासादायक बाब म्हणजे रुपया चलन डॉलरच्या तुलनेत शुक्रवारच्या दिवशी आठ पैसे मजबूत होऊन 74.31 रुपया प्रति डॉलरपर्यंत पोहोचला.

* गुंतवणूकदारांसाठी शुखशबर समभाग (shares) तारण ठेवून त्या बदल्यात डिजिटल माध्यमाद्वारे कर्जाचा त्वरित पुरवठा करणारी जिओजीत फायनान्शिअल सर्व्हिसेसची जिओजीत क्रेडिट्स पहिली कंपनी ठरली. या सुविधेचा लाभ घेणार्‍या कोणत्याही ग्राहकाकडे एनएसडीएलचे डिमॅट अकाऊंट असेल तर काही अटी-शर्तीसह ऑनलाईन कर्ज मिळू शकेल. सध्या ऑक्टोबर 2021 च्या आकडेवारीनुसार ही बाजारपेठ सुमारे 55,300 कोटींची आहे आणि दरवर्षी 23-25 टक्क्यांच्या वृद्धीदराने वाढत आहे. जिओजीत आणि एनएसडीएल यांच्या संयुक्त विद्यमाने ही सुविधा सर्व गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. यापूर्वी समभागांच्या बदल्यात कर्ज घेण्यासाठी दस्तावेज प्रक्रिया (paperwork) मोठी होती. परंतु जिओजीत क्रेडिट्स या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे काही मिनिटातच कर्ज मिळणे शक्य होणार आहे.

* राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार भारताची अर्थव्यवस्था आर्थिक वर्ष 2022 मध्ये 9.2 टक्क्यांच्या दराने वृद्धिंगत होईल.

* वस्तूंची घरपोच सेवा पुरवणार्‍या dunzo या स्टार्टअप कंपनीमध्ये रिलायन्स रेटेल वेंचर्स 200 दशलक्ष डॉलर्स गुंतवले. तसेच लाईट बॉक्स, लाईट रॉक, 3 एल कॅपिटल यांच्याद्वारे 40 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करण्यात आली. रिलायन्स रिटेलचा या स्टार्टअपमध्ये 25.8 टक्क्यांचा हिस्सा असेल. भारतातील प्रमुख पंधरा शहरांमध्ये व्यवसाय वृद्धीसाठी ही गुंतवणूक वापरली जाईल, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले. मागवलेली वस्तू केवळ पंधरा ते वीस मिनिटांमध्ये घरपोच देण्याचे कार्य ही स्टार्टअप कंपनी करते.

* भारतात स्टार्टअप कंपन्यांची होणारी वाढ पाहून मोठ्या कंपन्यांनी यांच्याशी करार करण्यास प्राधान्य क्रम दिला आहे. शहरात पार्किंगची वाढती समस्या लक्षात घेऊन फास्टटॅगच्या धर्तीवर पार्किंग सेवा पुरवणार्‍या पार्क प्लस कंपनीसोबत एअरटेल पेमेंट बँकने करार केला. एअरटेलच्या ई वॉलेटमधून फास्टटॅगद्वारे गाड्यांना पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार.

* भारतीय कंपनी फ्युचर रिटेलला दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा. भारतीय स्पर्धा आयोगाने फ्युचर आणि अ‍ॅमेझॉन यांच्यामध्ये झालेला करार रद्दबातल केल्याने तसेच फ्युचर उद्योग समूह आणि रिलायन्स यांच्यामध्ये झालेल्या व्यवहाराविरुद्ध अ‍ॅमेझॉन या आंतरराष्ट्रीय कंपनीने सिंगापूर न्यायाधिकरणाकडे धाव घेतली. सिंगापूर आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरणाने अ‍ॅमेझॉनच्या बाजूने निकाल दिला होता. या सिंगापूर न्यायालयाच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. या संदर्भातील पुढची सुनावणी एक फेब्रुवारी रोजी घेण्याचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने घेतला.

* एल.आय.सी.चा मेगा आयपीओ लवकरच भारतीय बाजारात येणार. यासाठी सरकारने थेट परदेशी गुंतवणूक नियमात (FDI) बदल करण्याचे संकेत दिले आहेत. यापूर्वी जुलै 2021 रोजी एलआयसीचा आयपीओ आणण्यासाठी केंद्र सरकारच्या कॅबिनेटने मंजुरी दिली आहे.

* परदेशी चलन रोख्यांच्या (Foreign Currency Bond) मार्गाने देशातील सगळ्यात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने तब्बल 30,000 कोटींचा (सुमारे चार अब्ज डॉलर्सचा) निधी जमवला. आजपर्यंतचा हा सर्वात मोठा परदेशी चलन रोख्यांच्या माध्यमातून उभा केलेला निधी आहे. यापूर्वी 2014 साली ओएनजीसी या कंपनीने 2.2 अब्ज डॉलर्सचा निधी या मार्गाने जमवला होता.

* 31 डिसेंबर रोजी संपलेल्या सप्ताहाअखेर भारताची परकीय गंगाजळीत 1,466 अब्ज घट होऊन 633.614 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली.

Back to top button