Nifty and Sensex : अर्थवार्ता | पुढारी

Nifty and Sensex : अर्थवार्ता

* गतसप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स (Nifty and Sensex) निर्देशांकाने जबर घसरण अनुभवली. निफ्टी व सेन्सेक्स (Nifty and Sensex) अनुक्रमे 526.10 अंक व 1774.93 अंकांची घसरण होऊन दोन्ही निर्देशांक 16985.2 अंक व 57011.74 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये 3 टक्के तर सेन्सेक्समध्ये 3.02 टक्क्यांची घसरण झाली. परदेशी गुंतवणूकदारांची भांडवल बाजारातील सातत्याने होणारी विक्री या पडझडीस कारणीभूत ठरली. परदेशी गुंतवणूकदारांनी डिसेंबरमध्ये आतापर्यंत 16790 कोटी, नोव्हेंबरमध्ये 2520 कोटी तर ऑक्टोबरमध्ये 12436 कोटींची विक्री केली.

* जगभरात व्याजदरवाढीचे सत्र सुरू. बँक ऑफ इंग्लंडने प्रथमच मागील तीन वर्षांच्या कालावधीत आपले व्याजदर 0.10 वरून 0.25 टक्क्यांपर्यंत वाढवले. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने देखील आपले रोखे खरेदीमधील कपातदर (टॅपरिंग प्रोसेस) वेगाने वाढवण्याचा निर्णय जाहीर केला. पुढील वर्षी मार्च 2022 नंतर व्याजदर वाढवण्याच्या दिशेने पावले टाकण्याचा निर्धारदेखील व्यक्त केला. यामुळे भारतातील 10 वर्षे कालावधीच्या रोखांचा व्याजदरदेखील 4 बेसिस पॉईंटस्नी वाढून 6.4102 टक्के झाला.

* जगभर वाढत्या व्याजदरांचे सत्र, देशभरातील वाढती महागाई त्यामुळे वाढता रोख्यांचा दर आणि परदेशी गुंतवणूकदारांची भारतीय भांडवल बाजारातील विक्री, या सर्वांचा एकत्रित परिणाम रुपया चलन डॉलरच्या तुलनेत कमजोर होण्यात झाला. आठवड्याभरात रुपया डॉलरच्या तुलनेत 28 पैसे कमजोर झाला. सध्या रुपयाने 76 रुपये प्रति डॉलरची पातळी ओलांडून 76.06 रुपये प्रतिडॉलर किमतीवर बंद झाला.

* नोव्हेंबर महिन्यात घाऊक महागाई दर (होलसेल प्राईस इंडेक्स/WPI) जग मागील 30 वर्षांच्या उच्चांकी पातळीवर घाऊक महागाई दर तब्बल 14.23 टक्क्यांवर पोहोचला. सवार्र्धिक वाढ ही इंधन आणि ऊर्जा क्षेत्राने दर्शवली. या क्षेत्राचा महागाई दर 39.81 टक्क्यांवर पोहोचला. अन्नधान्याच्या महागाई दरानेदेखील मागील 13 महिन्यांचा उच्चांक मोडला. किरकोल महागाई दर (CPI Inflation) मागील 3 महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर म्हणजेच 4.91 टक्क्यांवर आला.

* भारतातील ‘भारतीय स्पर्धा आयोग’ (सीसीआय) या सरकारी संस्थेने फ्युचर ग्रुप आणि अ‍ॅमेझॉन यांच्यातील व्यवहार रद्दबातल करत अ‍ॅमेझॉनला 202 कोटींचा दंड सुनावला. अ‍ॅमेझॉनने फ्युचर कुपन्स कंपनीमधील 49 टक्के हिस्सा खरेदी करताना माहिती दडवल्याचा ठपका आयोगाने ठेवला आहे. फ्युचर रिटेलमधील, रिलायन्स रिटेलच्या 24,500 कोटींच्या हिस्सा खरेदीच्या व्यवहाराला अ‍ॅमेझॉनने विरोध केला होता. याविरोधात सिंगापूरच्या आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरणाकडे अ‍ॅमेझॉनने दाद देखील मागितली. परंतु, या नव्या निर्णयामुळे फ्युचर उद्योग समूहावरून रिलायन्स उद्योग समूह आणि अ‍ॅमेझॉन हा आंतरराष्ट्रीय उद्योगसमूह आमनेसामने उभे ठाकले आहेत.

* भारती एअरटेलने 15,519 कोटींचा थकीत कर (स्पेक्ट्रम ड्यूज) सरकारकडे जमा केला. या पश्चात 75 हजार कोटींची थकबाकी अजून बाकी आहे. ही थकबाकी आर्थिक वर्ष 2026-27 व 2031-32 दरम्यान 10 टक्के व्याजासह भरणे अपेक्षित होते. परंतु, वेळेआधी रक्कम भरल्याने कंपनीची 3400 कोटींच्या व्याजाची बचत झाली आहे. टेलेनॉर कंपनीकडून 19051 कोटींचा स्पेक्ट्रम 2014 साली खरेदी केल्याच्या बदल्यात ही रक्कम सरकारदरबारी जमा करणे अपेक्षित होते.

* इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्सचे संस्थापक ‘समीर गेहलोत’ यांनी आपला कंपनीमधील 22 टक्क्यांपैकी 11.9 टक्क्यांचा हिस्सा ब्लॅकस्टोन आणि अबुधाबी इन्व्हेस्टमेंट अ‍ॅथोरिटीला विकून टाकला. मार्चअखेर गेहलोत कंपनीमधून बाहेर पडणार. बातमी आल्यानंतर इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्सचा समभाग शुक्रवारअखेर सुमारे 8.2 टक्क्यांनी कोसळला.

* विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये वापरल्या जाणार्‍या ‘सेमी कंडक्टर चिप्स’ उत्पादनाला भारतात चालना देण्याच्या द़ृष्टीने केंद्र सरकारची 76 हजार कोटींची प्रोत्साहन योजना. या योजनेअंतर्गत 20 चिप्स बनवण्याच्या कंपन्यांची स्थापना करण्यात येईल. सध्या या क्षेत्रात चीनचे वर्चस्व असून, त्याला शह देण्याच्या द़ृष्टीने ही योजना कार्यान्वित होत आहे. जगभरात सेमी कंडक्टर्स चिप्सची टंचाई असून योग्य ती संधी साधून भारत हे या चिप्सचे उत्पादन केंद्र (सेमी कंडक्टर्स हब) बनवण्याचा सरकारचा मानस आहे.

* श्रीराम ग्रुप आपल्या समूहातील तीन कंपन्यांचे एकत्रीकरण (मर्जिंग) करणार. श्रीराम ट्रान्स्पोर्ट फायनान्समध्ये श्रीराम सिटी युनियन आणि श्रीराम कॅपिटल यांचे विलीनीकरण केले जाणार. यासाठी सरकारतर्फे आवश्यक त्या परवानगी आणि समभागाधारकांची मंजुरी घेतली जाणार.

* 10 डिसेंबर रोजी संपलेल्या सप्ताहाअखेर भारताची परकीय गंगाजळी 77 दशलक्ष डॉलर्सनी घटून 635.8 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली.

प्रीतम मांडके

Back to top button