बचत : म्युच्युअल फंडमधून पैसे काढताना... - पुढारी

बचत : म्युच्युअल फंडमधून पैसे काढताना...

सध्याच्या काळात गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडकडे ओढा वाढला आहे. लिक्‍विड किंवा डेट ओरिएंटेड म्युच्युअल फंडचे पैसे एक-दोन दिवसांत मिळतात. परंतु इक्‍विटी फंडचा पैसा हा चार-पाच दिवसात खात्यावर जमा होऊ शकतो.

सध्या म्युच्युअल फंड योजनेस गुंतवणूकदारांची पहिली पसंती आहे. यात गुंतवणूक करणे, पैसा काढणे सोयीचे ठरत असल्याने गुंतवणूकदारांकडून म्युच्युअल फंडची निवड केली जात आहे. तसेच शंभर रुपयांपासून ते कितीही रक्‍कम म्हणजेच एकरकमी किंवा एसआयपीच्या स्वरूपातून गुंतवणूक करू शकता. युनिटची विक्री करून आपण आपला पैसा काढू शकतो.

युनिट विकण्याची प्रक्रिया

आपण स्वत:च युनिट विकू इच्छित असाल तर संकेतस्थळावरील ट्रान्जेक्शन स्लिप डाऊनलोड करा. त्यानंतर यास रिडेंप्शन अ‍ॅप्लिकेशनला म्युच्युअल फंडच्या कंपनीच्या कार्यालयात जमा करू शकता. ऑनलाईन सुविधेच्या माध्यामतूनही रिडेप्शन करू शकता. अनेक कंपन्यांनी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एवढेच नाही तर मोबाईल अ‍ॅपने देखील रिडेप्शनचा पर्याय वापरता येतो. आपण रक्कम किंवा युनिटच्या हिशोबाने पैसे काढू शकतो. नोंदणीकृत मोबाईलवर आलेला ओटीपी दिल्यानंतर रिंडप्शनची आपली प्रक्रिया पूर्ण होते.

पैसे मिळण्याचा कालावधी

पैसे लिक्विड किंवा डेट ओरिएंटेड म्युच्युअल फंडमध्ये असतील तर आपल्याला दोन दिवसांत पैसे मिळतील. परंतु इक्विटी फंड असेल तर चार-पाच दिवसानंतर आपल्या खात्यात पैसे जमा होतील. एक गोष्ट लक्षात ठेवा. जर आपण इक्विटी फंडमध्ये गुंतवणूक केली असेल आणि युनिट खरेदी केल्यानंतर एक वर्षाच्या आत त्याची विक्री करत असाल, तर एक टक्‍का एक्झिट लोड द्यावा लागेल. लिक्विड फंड, अल्ट्रा शॉर्ट टर्म फंडवर एक्झिट लोड द्यावा लागत नाही.

पैसे असे मिळतात

मिळणारे पैसे हे थेट आपल्या खात्यात जमा होतात. साधारणपणे, ज्या खात्यातून एसआयपी जात असेल किंवा ज्या खात्यातून एकरकमी पैसे भरले असतील. त्याच खात्यात युनिटचे पैसे जमा होतात. म्युच्युअल फंड कंपन्या गुंतवणूकदारांचे बँक विवरण घेतात. जर फंड हाऊसकडे आपले विवरण नसेल तर बँक धनादेश पाठवेल.

– प्रसाद पाटील

Back to top button