हेल्थ इन्श्युरन्स : नूतनीकरण करताना घ्यावयाची खबरदारी | पुढारी

हेल्थ इन्श्युरन्स : नूतनीकरण करताना घ्यावयाची खबरदारी

दरवर्षी पॉलिसीचे नूतनीकरण करावे लागते. परंतु यासाठी शेवटच्या मिनिटापर्यंत वाट पाहू नये. हेल्थ इन्श्युरन्स चे नूतनीकरण करताना मात्र खबरदारी घ्यावी लागेल.

हेल्थ इन्श्युरन्स हे आपल्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावतो, यात शंका नाही. कोरोना काळात हेल्थ इन्श्युरन्सचा अनेकांना लाभ झाला आहे. कोणत्याही आणीबाणीच्या काळात हेल्थ इन्श्युरन्स हे आपल्याला आर्थिक संरक्षण देण्याचे काम करतो. हेल्थ इन्श्युरन्स खरेदी करण्याबरोबरच त्याचे वेळेत नूतनीकरण करणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. कारण ती योजना पुढेही लागू राहील. दरवर्षी पॉलिसीचे नूतनीकरण करावे लागते. परंतु यासाठी शेवटच्या मिनिटापर्यंत वाट पाहू नये. हेल्थ इन्श्युरन्सचे नूतनीकरण करताना कोणती खबरदारी घ्यावी, हे इथे सांगता येईल.

विमा रकमेवर विचार : आरोग्य विम्याचे नूतनीकरण करताना विमा रक्कम वाढवण्याच्या पर्यायाचा विचार करू शकता. वाढत्या वैद्यकीय गरजेनुसार सध्याची विमा योजना ही भविष्यातही पुरेशी ठरू शकेल, असे नाही. त्यामुळे नूतनीकरण करताना विम्याची मर्यादा वाढवण्याबाबत सकारात्मक विचार करावा. तिशीच्या आतील असाल तर विमा कवच पाच लाखांपर्यंत असणे पुरेसे आहे. परंतु चाळीशीनंतर त्याची मर्यादा दहा लाखांच्या आसपास असणे पुरेसे राहू शकते.

टॉप अप प्लॅन : इन्श्युरन्स बेनिफिट वाढवण्यात टॉप अप ही विशेष भूमिका बजावते. आपल्याला सध्याची विमा योजना पुरेशी वाटत नसेल तर पॉलिसीचे नूतनीकरण करताना ‘टॉप अप’ या पर्यायाची निवड करू शकता.

गरजांचा आढावा : वैद्यकीय विमा नूतनीकरण करताना स्वत:चे आरोग्य आणि कुटुंबातील अन्य सदस्यांचे आरोग्य याचे आकलन करण्याची चांगली वेळ आहे. या आधारावर पॉलिसीत बदल करू शकतो.

नवीन आजारपण : कौटुंबिक आरोग्य विमा घेतला असेल आणि कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला नवीन आजार झाला असेल तर नूतनीकरण करताना त्याची माहिती विमा कंपनीला द्यावी. आपण तशी सूचना न केल्यास कालांतराने दावा दाखल करताना अडचण येऊ शकते.

पोर्टेबिलिटीवर विचार करा : हेल्थ इन्श्युरन्स पोर्टेबिलिटीची सुविधा ही सध्याची पॉलिसी ही एका कंपनीकडून दुसरी कंपनी निवडण्याचा अधिकार प्रदान करते. सध्याच्या विम्या कंपनीच्या सेवेबद्धल आपण समाधानी नसाल आणि दुसरी पॉलिसीची निवड करताना लाभ कमी होत नसेल, तर पोर्टेबिलिटीच्या पर्यायाबाबतचा विचार करावा.

नियम आणि अटी

कंपनीचे धोरण किंवा नियामक निकषातील काही बदलांमुळे विम्यांच्या अटीत आणि नियमांत वेळोवेळी बदल होत राहतो. त्यामुळे पॉलिसीचे नूतनीकरण करताना त्याचेे विवरण जसे की विमा रक्कम, दावे आणि त्याची संख्या, नो क्लेम बोनस आदींची माहिती घ्यावी.

जयदीप नार्वेकर

Back to top button