पुढारी ऑनलाईन : भारतीय शेअर बाजारात रेकॉर्डतोड तेजी कायम आहे. मजबूत संकेतांदरम्यान सेन्सेक्स आणि निफ्टी गुरुवारी नव्या विक्रमी उच्चांकासह खुले झाले. सेन्सेक्स गुरुवारी ७४,२४२ वर खुला झाला. त्यानंतर तो ७४ हजारांवर आला. तर निफ्टीने २२,५२३ च्या अंकाच्या सर्वकालीन उच्चांकाला स्पर्श केला. मेटल आणि सरकारी बँकिंग शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून येत आहे. तर आयटी क्षेत्रात विक्री होत आहे. (Stock Market Updates)
सेन्सेक्सवर टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, एशियन पेंट्स, टाटा मोटर्स हे टॉप गेनर्स आहेत. तर एम अँड एमचा शेअर्स ३ टक्क्यांनी घसरून १,९०० रुपयांच्या खाली आला. टायटन, आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक, इन्फोसिस, कोटक बँक, रिलायन्स, मारुती या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल (US Federal Reserve Chair Jerome Powell) यांनी या वर्षी व्याजदर कपात होणार असल्याची हमी दिल्यानंतर आणि आगामी काळात आर्थिक मंदीचा धोका नसल्याचे संकेत दिल्यानंतर आशियाई बाजारात तेजी पसरली. याचा मागोवा घेत भारतीय इक्विटी निर्देशांक निफ्टी ५० आणि सेन्सेक्स गुरुवारी नवीन विक्रमी उच्चांकासह खुले झाले. (Stock Market Updates)
जागतिक स्तरावर फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी या वर्षी व्याजदरात कपात करण्याचे संकेत दिल्यानंतर अमेरिकेतील शेअर बाजारात बुधवारी तेजी राहिली होती. डाऊ जोन्स, NASDAQ कंपोझिट आणि एस अँड पी ५०० निर्देशांक ०.५ टक्क्यांपर्यंत वाढले. MSCI चा जपानबाहेरील आशिया-पॅसिफिक शेअर्सचा निर्देशांक ०.४ टक्क्यांनी वाढला, तर जपानचा Nikkei सत्राच्या सुरुवातीला नवीन सर्वकालीन उच्चांक गाठल्यानंतर ०.९ टक्क्यांनी घसरला. चायनीज ब्लू चिप्स ०.१ टक्के वाढला आणि शांघाय कंपोझिट निर्देशांक ०.२ टक्क्यांनी वाढला. हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक ०.२ टक्क्यांनी खाली आला.
हे ही वाचा :