गतसप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकांमध्ये अनुक्रमे एकूण 258.20 अंक व 831.15 अंकांची वाढ होऊन दोन्ही निर्देशांक 22040.7 अंक व 72426.64 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये एकूण 1.19 टक्क्यांची, तर सन्सेक्समध्ये एकूण 1.16 टक्क्यांची वाढ बघायला मिळाली. सप्ताहात सर्वाधिक वाढ होणार्या कंपन्यांमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा (11.5टक्के), विप्रो (10.7 टक्के), यूपीएल (7.3 टक्के), बजाज ऑटो (6.9 टक्के), बीपीसीएल (6.6 टक्के) या समभागाचा समावेश होतो. याचप्रमाणे सर्वाधिक घट होणार्यांमध्ये हिंडाल्को (-12.8 टक्के), ग्रासीम (-2.9 टक्के), आयटीसी (-2.6 टक्के), एचयूएल (-2.0 टक्के), सन फार्मा (-1.6 टक्के) या कंपन्यांच्या समभागाचा समावेश झाला.
या आठवड्यात भांडवल बाजारावर प्रामुख्याने मागील महिन्याचे जाहीर झालेले किरकोळ महागाई व घाऊक महागाई दर यांचा परिणाम पाहायला मिळाला. यासोबतच डिसेंबर महिन्यातील 'आयआयपी' निर्देशांक (औद्योगिक उत्पादन निर्देशांक) आकडा यांचा प्रभाव पाहायला मिळाला.
आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेतील किरकोळ महागाई दर अजूनही पूर्णपणे नियंत्रणात आला नसल्याचे पाहायला मिळाले. अमेरिकेत सर्व अर्थविश्लेषकांनी महागाई दर 2.9 टक्के राहण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. परंतु, हा दर 3.1 टक्के आला, त्यामुळे तूर्तास तरी कर्ज व्याजदर कपातीची शक्यता मावळली आहे. यामुळे भांडवल बाजारावर आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव पाहायला मिळाला.
दिवाळखोर गोफर्स्ट विमान कंपनी खरेदीसाठी अजयसिंग यांची स्पाईस जेट व जयदीप मीरचंदानी यांची स्कायवन कंपनी उत्सुक. अजय सिंग यांनी बीझीबी एअरवेज यांच्यासह संयुक्तपणे बोली लावली आहे.
जानेवारी महिन्यात भारतातील किरकोळ महागाई दर (Consumer price index ) मागील तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर खाली आला. जानेवारीत किरकोळ महागाई दर 5.1 टक्के झाला, तर डिसेंबर 2023 मध्ये हा महागाई दर 5.69 टक्के होता. तसेच अन्नधान्य महागाई दर देखील जानेवारीत 9.53 टक्क्यांवरून 8.3 टक्क्यांपर्यंत खाली आला. अन्नधान्य वगळता राहणारा किरकोळ महागाई दर (core inflation) तर मागील 50 महिन्यांच्या न्यूनतम स्तरावर म्हणजचे 3.6 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
देशातील औद्योगिक क्षेत्राची प्रगती दर्शवणारा आयआयपी निर्देशांक (index of industrial production) डिसेंबर महिन्यात 2.4 टक्क्यांवरून 3.8 टक्क्यांपर्यंत वाढला. उत्पादन क्षेत्रात झालेली वाढ (manufacturing sector growth) 1.2 सर्वाधिक म्हणजे 1.2 टक्क्यांवरून 3.9 टक्क्यांवर पोहोचली.
भारताला इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये लागणार्या सेमीकंडक्टर चीप बनवण्यासाठी टाटा समूह प्रयत्नशील. लवकरच टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा सेमीकंडक्र चीप बनवण्याचा 25 हजार कोटींचा अवाढव्य प्रकल्प आसाममध्ये उभारला जाणार. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या मंजुरीच्या अखेरच्या टप्प्यात हा प्रकल्प असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक आणि आयटी मंत्रालयाचे राज्यमंंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिली. यासोबतच अमेरिकेच्या मायक्रॉन सेमीकंडक्टरने यापूर्वीच गुजरातमध्ये 22516 कोटींचा भव्य प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. आयटी क्षेत्राप्रमाणेच सेमीकंडक्टर चीप उत्पादनात जागतिक पातळीवर भारताचा दबदबा निर्माण करण्याचा सध्या प्रयत्न चालू आहे. यासाठी 76 हजार कोटींची उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना केंद्र सरकारने जाहीर केली होती.
देशातील महत्त्वाची वाहन कंपनी महिंद्रा अँड महिंद्राचा निव्वळ नफा मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 61 टक्क्यांनी वधारून 2454 कोटी ऑपरेटिंग मार्जिन काही प्रमाणात कमी होऊन 14.8 टक्क्यांवरून 14 टक्के झाले.
नियमांचे पालन करण्यात कुचराई केल्याने रिझर्व्ह बँकेने व्हिसा आणि मास्टरकार्ड या आंतरराष्ट्रीय कंपन्यांना दणका दिला. थर्ड पार्टीद्वारे (अॅप्सद्वारे) मनीट्रान्सफर किंवा पेमेंटचे सर्व (business to business) B2B व्यवहार स्थगित करण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने दिले. याचाच अर्थ, ज्या फिनटेक अॅप्सवर व्हिसा आणि मास्टरकार्डद्वारे पेमेंट करण्याची आली. सामान्य ग्राहकांच्या के्रडिट कार्ड वगैरेसंबंधी व्यवहारात याने अडथळा येणार नाही. कंपन्यांमधील व्यवहार आणि पैशांची देवाणघेवाण यासंबंधीचे 'केवायसी' संबंधीच्या नियमांचे उल्लंघन होत असून, मनी लाँड्रिंगचा संशय रिझर्व्ह बँकेला आहे. सध्या अशा प्रकारच्या व्यवहारांचे मूल्य 20 हजार कोटींच्या घरात आहे.
20 लाख कोटी भांडवल बाजारमूल्याचा टप्पा पर करणारी 'रिलायन्स इंडस्ट्रीज' देशातील पहिली कंपनी बाजार भांडवल मूल्याचा विचार करता, आता रिलायन्सने 'पेप्सिको', 'शेल' आणि चीनच्या 'पेट्रोचायना कंपनीला मागे टाकून जगातील सर्वात मोठ्या 50 कंपन्यांच्या यादीत प्रवेश केला. नुकतेच रिलायन्स इंडस्ट्रीजमधून विलग होऊन जिओ फायनान्शिअल कंपनीने भांडवल बाजारात पदार्पण केले. यांचे एकत्रित मूल्य पाहता 21.73 लाख कोटी झाले आहे. सध्या रिलायन्सचे स्थान 49 असून, जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये प्रथम क्रमांक मायक्रोसॉफ्ट (3.08 ट्रिलियन डॉलर्स), द्वितीय क्रमांक अॅपल (2.89 ट्रिलियन डॉलर्स) यांचा लागतो.
देशातील प्रमुख अॅल्युमिनियम उत्पादक कंपनी हिंडाल्कोचा निव्वळ नफा चालू आर्थिक वर्षात 71 टक्के वधारून 2331 कोटी झाला. अॅल्युमिनियम आणि कॉपर धातूंच्या किमतीत वाढ झाल्याने कंपनीचा नफा वाढला. महसूल 0.6 टक्क्यांनी घटून 52808 कोटींवर आला.
चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्या तिमाहीत सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलचा तोटा मागील तिमाहीच्या तुलनेत 1481 कोटींवरून 1569 कोटींपर्यंत वाढला. कंपनीच्या महसूलात 11.6 टक्क्यांची वाढ होऊन महसूल 4549 कोटी झाला.
पेटीएम पेमेंटस् बँकवरील बंदी 15 दिवस पुढे ढकलली. 31 जानेवारीच्या आदेशानुसार ठेवी स्वीकारणे, फास्टटॅग रिचार्ज करणे, वॉलेटमध्ये पैसे जमा करणे यांसारखे व्यवहार करण्यास पेटीएमवर 29 फेब्रुवारीनंतर बंदी घालण्यात आली होती; परंतु रिझर्व्ह बँकेनी ही बंदी मुदत 15 मार्चपर्यंत पुढे ढकलली.
याचप्रमाणे 'पेटीएम'ने आपले नोडल अकाऊंट (केंद्रीय खाते) पेटीएम बँकवरून एस्क्रो खात्याच्या माध्यमातून अॅक्सिस बँकमध्ये स्थलांतरित केले. यामुळे 15 मार्चनंतरदेखील पेटीएम क्यूआर कोड, साऊंड बॉक्स, स्वाईपकार्ड मशीन यांना सुविधा मिळणे शक्य होईल. पेटीएम वॉलेटमध्ये सध्या 3 ते 4 हजार कोटींचा निधी शिल्लक आहे. पेटीएमकडे सध्या 4 कोटी व्यापारी आणि ई-वॉलेटचे 35 कोटी ग्राहक आहेत.
सरकारी तेल व नैसर्गिक वायू उत्खनन कंपनी 'ओएनजीसी'चा तिसर्या तिमाहीचा निव्वळ नफा मागील वर्षाच्या तिमाहीच्या तुलनेत 7.9 टक्के घटून 10748.5 कोटी झाला. कंपनीचा महसूल मागील तिमाहीतच्या तुलनेत 1 लाख 69 हजार कोटींवरून 1 लाख 65 हजार कोटी झाला.
9 फेब्रुवारी रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश चलन गंगाजळी 5.27 अब्ज डॉलर्सनी घटून 617.23 अब्ज डॉलर्सवर स्थिरावली.