Nifty and Sensex : अर्थवार्ता | पुढारी

Nifty and Sensex : अर्थवार्ता

* गत सप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकांमध्ये (Nifty and Sensex) अनुक्रमे एकूण 237.95 अंक व 1050.68 अंकांची घसरण होऊन दोन्ही निर्देशांक अनुक्रमे 17764.8 अंक व 58636.01 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टी व सेन्सेक्स (Nifty and Sensex) निर्देशांकांमध्ये 1.87 टके व 1.73 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. आंतरराष्ट्रीय बाजारात असणार्‍या मंदीच्या तसेच पेटीएम कंपनीच्या आयपीओच्या निराशाजनक पदार्पणामुळे भारतीय शेअरबाजार खाली आले.

* पेटीएम कंपनीची प्रमुख कंपनी असलेली ‘वन 97-कम्युनिकेशन’चा समभाग भांडवल बाजारात पर्दापणाच्या दिवशीच 27 टक्के कोसळला. कंपनीने आजपर्यंतच्या सर्वात मोठा म्हणजेच 18,300 कोटींचा आयपीओ आणला होता. कंपनी लोकप्रिय जरी असली तरी आर्थिक ताळेबंदाच्या (बॅलन्सशीटच्या) पार्श्वभूमीवर अजूनही कमकुवत असल्याचे विश्लेषकांचे मत होते. त्यामुळे गुंतवणूकदारांचा आयपीओला थंडा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पर्दापणातच आजपर्यंत सर्वाधिक कोसळलेला समभाग असा विक्रम कंपनीने केला. 2150 रु. प्रतिसमभाग इतकी इश्यू प्राईस असलेला समभाग घटून 1564.15 रु. प्रतिसमभागपर्यंत खाली आला.

* काही वर्षांपासून अनिर्णित ठरलेले 3 कृषी कायदे अखेर मागे घेण्याचे केंद्र सरकारने ठरवले. येत्या हिवाळी अधिवेशनात याबाबत शिक्कामोर्तब होणार.

* ऑक्टोबर महिन्यात घाऊक महागाई दर (डब्ल्यूपीआय इन्फ्लेएशन रेट) मागील 5 महिन्यांच्या विक्रमी स्तरावर म्हणजे 12.54 टक्क्यांवर पोहोचला. तसेच किरकोळ महागाईदर (सीपीआय इन्फ्लेएशन रेट) 4.48 टक्क्यांवर आला. कच्चे तेल (क्रूड ऑईल) व ऊर्जासंबंधी क्षेत्राचा महागाई दर सर्वाधिक म्हणजे 37.18 टक्क्यांपर्यंत पोहोचला. त्यापाठोपाठ खनिज आणि अन्नधान्य वस्तूंच्या महागाईतदेखील वाढ झाल्याचे समोर आले. (Nifty and Sensex)

* अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ‘जो बायडन’ यांचा ‘ओपेक प्लस’या तेल उत्पादक देशांच्या संघटनेबाबत कठोर पावले उचलण्यास प्रारंभ. जाणूनबुजून तेल उत्पादक देश कच्च्या तेलाचे उत्पादन वाढत नसून त्यामुळे चीन, भारत, अमेरिकेसारख्या वापरकर्त्या देशांना महागड्या दराने इंधन विकत घ्यावे लागते. त्यामुळे बाजारात कच्च्या तेलाची उपलब्धता वाढून इंधनाचे दर खाली येतील. 2 डिसेंबर रोजी होणार्‍या बैठकीआधी ओपेक प्लस संघटनेच्या तेल उत्पादक देशांवर यामुळे दबाव आला आहे. जो बायडेन यांच्या आवाहनामुळे कच्च्या तेलाच्या भावाने आंतरराष्ट्रीय बाजारात मागील सहा आठवड्यांची न्यूनतम पातळी गाठली. ब्रेंट क्रुड 80 डॉलर प्रती बॅलरपेक्षा कमी झाले. ब्रेंट क्रुड सुमारे 1.90 डॉलर म्हणजेच 2.5 टक्के घटून 77.04 डॉलर्स प्रती बॅलरपर्यंत खाली आले.

* सप्टेंबर तिमाहीअखेर परदेशी गुंतवणूकदारांची (एफपीआय) भारतातील शेअर बाजारातील गुंतवणूक मागील तिमाहीच्या तुलनेत 13 टक्के वधारून तब्बल 667 अब्ज डॉलर्स झाली. मागच्या तिमाहीत ही गुंतवणूक 592 अब्ज डॉलर्स होती.

* अकासा एअर या भारतीय हवाई वाहतूक कंपनीने ‘बोईंग’ या विमाने बनविणार्‍या कंपनीकडे ‘737 मॅक्स जेट’ बनावटीची 72 विमानांची ऑर्डर दिली. देशातील शेअर बाजारातील बडे गुंतवणूकदार ‘राकेश झुनझुनवाला’ व ‘इंडिगो एअरलाईन्स’चे माजी सीईओ यांनी एकत्र येत ‘अकासा एअर’ या कंपनीची सुरुवात केली आहे. जेट एअरवेज बंद पडल्यानंतर देशांतर्गत हवाई प्रवास वाहतुकीची झालेली पोकळी भरून काढण्याचा अकासा एअरचा संकल्प आहे. एकूण 93 अब्ज डॉलर्सना (सुमारे 66 हजार कोटी) ही 72 विमाने विकत घेण्यात आली.

* ‘क्रिप्टोकरन्सी’ संदर्भात रिझर्व्ह बँकेची बैठक. क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार करण्यासाठी लवकरच केंद्र सरकार बिल आणण्याची तयारी करत आहे. क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या खात्यांमध्ये अचानक वाढ झाली आहे. बँकांनी ग्राहकांना यासंबंधी सेवा पुरवताना सुरक्षितता आणि तोटा झाल्यास योग्य ती क्षमता तयार करण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने दिले. परंतु, हे सर्व करताना गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पुन्हा एकदा ‘क्रिप्टोकरन्सी’बद्दल चिंता व्यक्त केली.

* चालू आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत ‘एलआयसी’चा मेगा आयपीओ येणार. ‘सरकारी निर्गुंतवणुकी’संदर्भात निर्णय घेणारे खाते ‘दीपम’चे सेक्रेटरी तुहीन कांता पांडे यांची माहिती. तसेच बीपीसीएल, शिपिंग कॉर्प, बीईएमएलसह सहा सरकारी कंपन्यांचे खासगीकरणदेखील लवकरच. जानेवारीपर्यंत यासंदर्भात निविदा मागवल्या जाणार. आर्थिक वर्ष 2022 मध्ये केंद्र सरकारने 1.75 लाख कोटींच्या निर्गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवले आहे.

* जपानी कंपनी कुबोटा ‘एस्कॉर्ट’ या शेतीविषय वाहने व उपकरणे बनवणार्‍या कंपनीमध्ये 53 टक्क्यांपर्यंत हिस्सा वाढवणार. एकूण 10 हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित.

* 1 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरपर्यंत भारतात विक्रमी 20.90 लाख टन साखरेचे उत्पादन. मागील वर्षी याच कालावधीत 16.82 लाख टनांचे उत्पादन घेण्यात आले होते. साखर कारखानदारांची शिखर संघटना ‘इस्मा’ची माहिती.

* ‘सुंदरम अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी’ प्रतिस्पर्धी म्युच्युअल फंड कंपनी ‘प्रिन्सिपल अ‍ॅसेज मॅनेजमेंट कंपनी’ला विकत घेणार. यासाठी सुंदरम म्युच्युअल फंडाला ‘सेबी’कडून मान्यता मिळाली. दोन्ही कंपन्यांची ग्राहक संख्या एकत्रितपणे सुमारे 20 लाख इतकी आहे.

* 12 नोव्हेंबर रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची परकीय गंगाजळी 763 दशलक्ष डॉलर्सनी घटून 640.11 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली.

Back to top button