Nifty and Sensex : अर्थवार्ता | पुढारी

Nifty and Sensex : अर्थवार्ता

प्रीतम मांडके

* गतसप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निफ्टी (Nifty and Sensex) निर्देशांकांमध्ये अनुक्रमे एकूण 185.95 अंक व 619.07 अंकांची वाढ होऊन दोन्ही निर्देशांक अनुक्रमे 18102.75 अंक व 60686.69 अंकांच्या पातळीवर बंद झाले. (Nifty and Sensex) निफ्टी व सेन्सेक्समध्ये एकूण 1.04 टक्क्यांची व 1.03 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. रुपया चलनामध्ये डॉलरच्या तुलनेत आलेल्या मजबुतीच्या पार्श्वभूमीवर निर्देशांकांमध्ये वाढ झाली. सप्ताहाच्या अखरेच्या दिवशी एचडीएफसी बँक, रिलायन्स, इन्फोसिससारख्या दिग्गज कंपनीच्या समभागांची तेजीचे नेतृत्व केले. रुपया चलन डॉलरच्या तुनेत 7 पैसे मजबूत होऊन 74.45 रुपये प्रतिडॉलर स्तरावर बंद झाले.

* ‘पेटीएम’च्या आयपीओला धमाकेदार नसला तरी समाधानकारक प्रतिसाद. पेटीएमचा आयपीओ 1.89 पट भरला. ‘क्वालिफाईड इन्स्टिट्यूटशनल बायर्स’चा हिस्सा 2.79 पट तसेच सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी असलेला हिस्सा 1.16 पट भरला. 2080-2150 रु. किंमतपट्टा असलेला 18300 कोटींचा हा सर्वांत मोठा आयोपीओ होता.

* सामान्य गुंतवणूकदारांसाठी खूशखबर. सरकारी रोखे (जी.सेक) खरेदीसाठी गुंतवणूकदारांना मध्यस्थाविना ‘रिटेल डिरेक्ट गिल्ट अकाऊंट’ उघडता येणार. या खात्याचे नियंत्रण आणि नियमन थेट रिझर्व्ह बँकेतर्फे केले जाणार. तसेच यासंबंधी व्यवहारांसाठी हे खाते नेहमीच्या वापरातील बचत खात्यांशी जोडले जाण्याची सुविधादेखील उपलब्ध. यापूर्वी ही सुविधा केवळ बँका, इन्श्युरन्स कंपनी, डिलर्स आणि विविध म्युच्युअल फंडांना उपलब्ध होती. विशेष म्हणजे सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी या योजनेअंतर्गत कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले.

* सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत सरकारी कंपनी ‘ओएनजीसी’चा नफा मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल 230.4 टक्क्यांनी वधारून 18749 कोटी झाला. कंपनीचा एकूण महसूल 44.3 टक्क्यांनी वाढून 1.2 लाख कोटी, तर एकूण खर्च 46.2 टक्के वाढून 1.1 लाख कोटी झाले. कंपनीने प्रतिसमभाग 5.50 रुपयाचा लाभांशदेखील जाहीर केला.

* ऑनलाईन औषधविक्री व आरोग्यविषयक क्षेत्रातील सुविधा पुरवणारी ‘फार्मइझी’ कंपनी लवकरच आयपीओद्वारे भांडवल बाजारात उतरणार. कंपनीने बाजारनियामक ‘सेबी’कडे 6250 कोटींच्या आयपीओसाठी अर्ज केला. बाजार विश्लेषकांच्या अनुमानानुसार कंपनीचे सध्याचे मूल्य 42 हजार कोटींच्या (सुमारे 5.6 अब्ज डॉलर्स जवळपास आहे.)

* टाटा समूहाची महत्त्वाची कंपनी ‘टाटा स्टील’ची नेत्रदीपक कामगिरी. सप्टेंबर महिन्याअखेर संपलेल्या तिमाहीत कंपनीचा नफा मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल साडेसात पटींनी वाढून 12548 कोटींवर पोहोचला. कंपनीचा एकूण महसूलदेखील मागील वर्षी असलेल्या 38940 कोटींच्या तुलनेत 55 टक्के वधारून 60282.8 कोटींवर पोहोचला. टाटा समूहाचा विचार करता नफा मिळवण्यात टाटा स्टीलने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएल)ला मागे टाकले.

* पॅसेंजर कार उत्पादनामध्ये घट. ऑक्टोबर 2020 च्या तुलनेत ऑक्टोबर 2021 मध्ये पॅसेंजर वाहनांमध्ये 27 टक्केची घट. तसेच दुचाकी वाहनांमध्ये 25 टक्के घट झाली आहे. पॅसेंजर वाहनांमध्ये घट होण्याचे मुख्य कारण सेमी कंडक्टर चीपची पुरेशा प्रमाणातील अनुपलब्धता. दुचाकी वाहनांच्या विक्रीमध्ये बीएस-व्हीआय या इमेशन स्टॅण्डर्ड वाहनाच्या मागणीमध्ये घट झालेली आहे.

* सौरऊर्जा पॅनेल आणि संबंधित वस्तू उत्पादन करणार्‍या कंपन्यांसाठी सरकारची अनुदान योजना. रिलायन्स न्यू एनर्जीसह इतर दोन कंपन्यांची अनुदानासाठी निवड. तिन्ही कंपन्या एकत्रिपणे 12 हजार मेगावॅट ऊर्जानिर्मिती करणारी उपकरणे बनवणार. यासाठी सरकारतर्फे एकूण 4500 कोटींचे लाभ या कंपन्यांना मिळू शकतील.

* देशातील महत्त्वाची वाहन कंपनी ‘महिंद्रा अँड महिंद्रा’चा दुसर्‍या तिमाहीचा नफा मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल 9 पटींनी वधारून 1432 कोटींवर पोहोचला. एकूण 14.8 टक्के वाढून 13305 कोटी झाला.

* 5 नोव्हेंबर रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची परकीय गंगाजळी 1.145 अब्ज डॉलर्सनी घटून 640.874 अब्ज डॉलर्स झाली.

Back to top button