Children's Day : बालकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी... | पुढारी

Children's Day : बालकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी...

अनिल पाटील

14 नोव्हेंबर ही पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन(Children’s Day) म्हणून कालच साजरी झाली. बालकांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने या लेखात केलेला ऊहापोह.

आजची लहान मुले उद्यासाठी प्रथम आपल्या कुटुंबाचे आधारस्तंभ आहेत आणि नंतर देशाचे उज्ज्वल भवितव्य आहेत. आपली मुले उच्चशिक्षित झाली पाहिजेत, तरच देशाची प्रगती होणार आहे. हे सत्य असले तरी आज परिस्थिती वेगळी आहे. बदलत्या काळात दर्जेदार शिक्षण द्यायचे असेल तर अर्थिक पाठबळ हवे, हे समीकरण ठरलेले आहे. आणि खरे वास्तव म्हणजे बालकांना उच्च शिक्षण देण्याचे आर्थिक सामर्थ्य आज फक्त 20 टक्के पालकांकडे आहे.

सध्या 80 टक्के पालकांकडे आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी पुरेसा उपलब्ध पैसा नाही. शिक्षणात आलेले नवनवीन तंत्रज्ञान, बदलते शैक्षणिक धोरण, शिक्षणातील ट्रेंड आणि या क्षेत्रातील वाढलेली महागाई या सर्व कारणांमुळे आपल्या मुलांना उच्च शिक्षण देणे मध्यमवर्गीय कुटुंबाच्या आवाक्याबाहेर गेले आहे. जवळ साठलेल्या तुटपुंज्या रकमेतून आपण बालकांना उच्च शिक्षण देऊ शकत नाही; याची खंत पालकांना वाटत आहे. याचा परिणाम मुलांच्या करिअरवर झाला आहे. पैशाअभावी मुलांना हवे ते शिक्षण मिळत नसलेने “माझ्या वडिलांनी माझ्यासाठी काहीच केले नाही” असे नैराशेचे भाष्य अनेक मुलांच्या तोंडून ऐकण्यात येत आहे.

ही परिस्थिती का आली? (Children’s Day)

या पालकांनी बदलत्या काळाचे वेध घेतले नाहीत. मुलांच्या शिक्षणासाठी महत्त्व देऊन पैशाची तरतूद केली नाही. योग्य ठिकाणी गुंतवणूक केली नाही. बँकांचे व्याजदर खाली आहे, बदलत्या काळात शिक्षणाचे आराखडे बदलत गेले, मोठ्या प्रमाणात शिक्षण क्षेत्रातील महागाई वाढली. अशी अनेक आव्हाने त्यांच्यासमोर आली आहेत. त्यावर त्यांना मात करता आली नाही. म्हणूनच मुलांच्या उच्च शिक्षणासाठी लागणारा पैसा सहजपणे उपलब्ध व्हावा, अशा प्रकारचे आर्थिक नियोजन करणे ही काळाजी गरज आहे.

बारावीनंतर मुलांचे करिअर घडण्यास सुरुवात होते. मुलांच्या 18 वर्षांनंतर प्रत्येक पालकावर शैक्षणिक खर्चाची मोठी जबाबदारी येते. सध्या बी. ए. किंवा बी.कॉम.मध्येही अनेक विषय पाहावयास मिळतात. बी.कॉम. अकाऊटिंग ऑडिट अ‍ॅण्ड टॅक्सेशन, स्टॅटेस्टीक्स, बी.कॉम. इन मॅनेजमेंट अकाऊटिंग, इंटरनॅशनल फायनान्स, बिझनेस अकाऊटिंग, बी.कॉम. अप्लाईड इकॉनॉमिक्स, बी.कॉम. बँकिंग अ‍ॅण्ड फायनान्स, बी. कॉम. इंटरनॅशनल बिझनेस, बी.कॉम. अनॅलीटिक्स असे विविध कोर्सेस फक्त बी.कॉम.मध्येच पाहावयास मिळतात.

अशा कोर्ससाठी बेंगलोरसारख्या मोठ्या नामांकित युनिव्हर्सिटींमध्ये 7 ते 9 लाख खर्च येत आहे. जिथे आपल्या ठिकाणी बी.कॉम. कोर्ससाठी 15000/- खर्च होतो. असे अनेक कोर्सेस प्रत्येक क्षेत्रातील शिक्षणात आले आहेत. बारावीनंतर केवळ इंजिनिअरिंगसाठी 70-80 प्रकारचे वेगवेगळ्या विषयाचे कोर्सेस उपलब्ध आहेत. या कोर्सेससाठी देशातील शहरानुसार खर्च वेगवेगळा येतो. देशात वर्ग 1 – मेट्रोसिटी शहरे मुंबई, बेंगलोर, दिल्ली, कोलकातासारख्या ठिकाणी इंजिनिअरिंगसाठी प्रतिवर्षी 6 ते 10 लाख खर्च होत आहे. (Children’s Day)

चार वर्षांचा एकूण खर्च आज 24 ते 40 लाख आहे. वर्ग 2 – पुणे, नाशिक, सुरत वगैरे शहरात प्रतिवर्षी 4 ते 6 लाखप्रमाणे चार वर्षांसाठी 13 ते 25 लाख आज खर्च येतो. वर्ग – 3 शहरात कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड वगैरे अशा शहरांमध्ये प्रतिवर्षी 1 ते 2 लाख प्रतिवर्षीप्रमाणे पदवी पूर्ण करण्यास 4 ते 8 लाख खर्च येतो. प्रत्येक शहरातील शिक्षणाच्या दर्जानुसार त्यांना करिअरमध्ये संधी मिळते. बेंगलोरमधून बाहेर पडलेल्या इंजिनिअरला सरासरी 50 ते 72 हजार पगार करिअरच्या सुरुवातीस मिळतो. तोच वर्ग 3 शहरात शिक्षण घेतलेला, इंजिनिअरला 15 ते 20 हजाराने करिअरची सुरुवात होते. यूएस, युके सारख्या ठिकाणी इंजिनिअर शिक्षण घेण्यासाठी वर्षाला 40 ते 50 लाख खर्च येतो. पदवीपर्यंत शिक्षणासाठी दीड ते दोन कोटी खर्च होतो.

मात्र करिअरच्या सुरुवातीला 5 ते 6 हजार डॉलर म्हणजे भारतीय रुपयात 3,50,000 /- ते 4,20,000/- दरमहा आणि वार्षिक 40 ते 50 लाख पगार मिळू शकतो. आपल्या मुलांच्या कुवतीनुसार कोणत्या ठिकाणी शिक्षण घ्यायचे आहे आणि भविष्यात किती खर्च येईल, याचा प्रत्येक पालकांनी जागरूकता दाखविली पाहिजे. त्यासाठी आजचा शिक्षण खर्च किती? मुलगा आज किती वर्षांचा आहे? आणि वयाच्या 18 नंतर वाढत्या महागाईनुसार किती रक्कम लागेल? सरासरी 8 ते 9% महागाई दर गृहीत धरून याबाबत आराखडा प्रत्येक पालकांनी केला पाहिजे.

उदा. आज मुलाचे वय दोन वर्षे असेल तर मुलाच्या 18 व्या वर्षी आजपासून 16 वर्षे शिक्षणासाठी अवधी मिळतो. आज 25 लाख शिक्षणासाठी खर्च येत असेल, तर तो 9% महागाई गृहीत धरून 16 वर्षांनंतर एक कोटीपर्यंत खर्च येईल. 16 वर्षांत एक कोटी हवे असतील तर मुलांचा वाढदिवस, मनोरंजन खर्च वगैरे फालतू खर्चाला फाटा देऊन मुलांच्या शिक्षणासाठी मोठा फंड तयार करण्यास प्राधान्य दिले पाहिजे.

सदर आराखडा तयार केल्यानंतर कोठे गुंतवणूक करायची? हा प्रश्न निर्माण होतो. तुमचा मुलगा/मुलगी जितकी लहान असेल तितका गुंतवणुकीसाठीचा अवधी जास्त मिळतो. आणि चक्रवाढ व्याजाने कमी गुंतवणुकीत मोठी रक्कम उभी करण्यास संधी मिळते. तुमच्याकडे मुदत जास्त असेल, तर तुम्ही पारंपरिक योजनेमध्ये गुंतवणूक न करता इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये एसआयपी गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते.

कारण इथे जोखीम असते म्हणून 12 ते 15% परतावा मिळतो. आणि कमी रकमेमध्ये मोठा फंड तयार करता येतो. बरेच पालक मुलाचा जन्म झाला की मुलांच्या नावाने आयुर्विम्याची योजना घेतात किंवा पोष्टाची योजना घेतात. जिथे 5 ते 7% व्याज मिळते. शिक्षण क्षेत्रातील महागाई 8 ते 15% वाढत आहे.

पैसा वाढतो त्यापेक्षा 3% नी जास्त महागाई वाढते. त्याचा परिणाम म्हणून आपल्याला नुकसान सोसावे लागते. म्हणूनच प्रत्येक कुटुंब प्रमुखाने आर्थिक नियोजनाला महत्त्व दिले पाहिजे. आर्थिक शिस्त ठेवली पाहिजे. कुटुंबातील सर्व सदस्यांनी आर्थिक साक्षरतेचे धडे घेऊन आपली भविष्यातील आर्थिक उद्दिष्टे ठरविली पाहिजेत, वाढत्या महागाईनुसार बजेट तयार केले पाहिजे. त्यासाठी लवकर आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर आपल्या जीवनातील मोठमोठी आर्थिक ध्येय सहजपणे साकार करू शकतो.
(लेखक एस. पी. वेल्थ, कोल्हापूरचे प्रवर्तक आहेत.)

Back to top button