Stock market : सेन्सेक्स ‘लक्ष’पूर्तीकडे? - पुढारी

Stock market : सेन्सेक्स ‘लक्ष’पूर्तीकडे?

डॉ. विजय ककडे

सेन्सेक्सने (Stock market) गेल्या तीन दशकांत 1000 वरून 62,000 असा टप्पा गाठत असताना अनेक चढउतार तर पाहिलेच; पण त्याहीपेक्षा जो बाजार केवळ विदेशी गुंतवणूकदार, मूठभर दलाल व व्यापारी यांच्या ताब्यात होता, त्यात संस्थात्मक वाढीबरोबर गुणात्मक बदलही झाले.

शेअर बाजाराने (Stock market) सातत्याने नवे उच्चांक स्थापन करण्याची अलीकडील काळातील प्रक्रिया 62000 पर्यंत मेल्यानंतर त्यामध्ये आता थोडी घसरण होऊन शुक्रवारी 60,822 पर्यंत घसरला. ही अल्पप्रमाणातील घसरण आता पुढे चालत राहणार, का शेअर बाजाराचे लक्ष्य पुढील महत्त्वाचा 1 लाखाचा टप्पा गाठणार का? हा कळीचा प्रश्न आहे.

विशेषत: सर्वसामान्य गुंतवणूकदार हा घसरण सुरू झाली की भयकांत होऊन बाजारातून बाहेर पडतो व चांगल्या परताव्यापासून दूर राहतो. गुंतवणूकदाराचे हे वित्तीय वर्तन त्याच्या भय व लोभ मानसिकतेत असल्याने शेअर बाजाराच्या चढउतारावर परिणाम करणारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय तसेच उद्योगनिहाय घटक अभ्यासल्यास शेअर बाजाराचा गुंतवणूकदार या नात्याने लाभ घेता येईल.

सेन्सेक्स किंवा भारतीय भांडवल बाजाराचा संवेदनशील सूचका यातील बदलाकडे किंवा चढउताराकडे सावधपणे पाहता येईल. सेन्सेक्सने गेल्या तीन दशकांत 1000 वरून 62,000 असा टप्पा गाठत असताना अनेक चढउतार तर पाहिलेच; पण त्याहीपेक्षा जो बाजार केवळ विदेशी गुंतवणूकदार, मूठभर दलाल व व्यापारी यांच्या ताब्यात होता, त्यात संस्थात्मक वाढीबरोबर गुणात्मक बदलही झाले.

त्यातील पारदर्शीपणा, व्यवहार सुलभता वाढल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदार आता शेअरबाजाराकडे वळू लागला. एसआयपी किंवा शिस्तबद्ध हफ्ते भरणार्‍यांची संख्या वाढल्याने बाजार स्थैर्याकडे वाटचाल करू लागल्याचे चित्र दिसते. ही संख्यात्मक वाढ किंवा कोरोनाच्या प्रभावाने दोन वर्षांपूर्वी किंवा मार्च 2020 मध्ये 29,470 म्हणजे 30 हजारांपेक्षा कमी होता, तो आता दुप्पटीहून अधिक म्हणजे दोन वर्षात दामदुप्पट करणारा ठरला. याची कारणमीमांसा किंवा जबाबदार घटक पाहिल्यास पुढील दिशा समजू शकेल.

सेन्सेक्स वाढीचे कारक घटक (Stock market)

मार्च 2020 मध्ये सेन्सेक्सने जो 30 हजारांखाली तळ गाठला, त्यामध्ये कोरोना परिणाम मोठ्या प्रमाणात होता. टाळेबंदी किंवा लॉकडाऊन उत्पन्न, उत्पादन, रोजगार चक्क अचानकपणे थांबवणारा ठरल्याने त्याला भयकांत प्रतिसाद मिळाला.परंतु त्यानंतर पुढे कोरोना लस शोधली गेली. कोरोनाचा भयावह अंधार मागे टाकत अर्थव्यवस्था पूर्वपदावर येऊ लागली. आता देशी व विदेशी गुंतवणूकदार भारताच्या व्ही आकाराच्या म्हणजे अतिजलद विकासावर विश्वास ठेवून गुंतवणूक वाढवू लागले. यातून दरमहा सुमारे 505 बिलियन डॉलर्स (चार लाख कोटी रु.) असा गेल्या चार महिन्यांत राहिला व ही वाढ 62% इतकी होती. त्याच्या जोडीला देशांतर्गत गुंतवणुकीतही वाढ झाल्याने सेन्सेक्स रॉकेट वेगाने झेपावला!

कोरोनाचे अर्थव्यवस्थेवरील परिणाम नियंत्रित करण्यासाठी सर्वच प्रगत राष्ट्रांनी भरीव मदत केली. हा जागतिक प्रवाह वाढीव चलन पुरवठ्याच्या स्वरूपात चांगल्या गुंतवणूक संधीच्या शोधात भारतीय भांडवल बाजारात असल्याने आपल्या भांडवल बाजारात वित्तमंत्र्यांनी 20 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले व निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी उत्पादन निगडित प्रोत्साहन (झङख – झीेर्वीलींळेप ङळपज्ञशव खपलशपींर्ळींश) जाहीर केल्याने आपल्या निर्यातीत वाढ दिसू लागली. भारतीय शेअर बाजाराच्या वेगवान वाढीस चीनमधील उद्योगावर आलेले संकट मदतकारक ठरले.

विशेषतः रसायने उद्योग, औषध उद्योग कंपन्यांना याचा फायदा झाला. अनेक उद्योग चीनबाहेर पडू लागले. त्याचाही लाभ झाला. याच सुमारास भारतीय उद्योग धोरणात सरकारने काही सकारात्मक उपाय केल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे मानांकन ‘मूडीज’सारख्या संस्थांनी उणे ते स्थिर असे वाढवले. प्रतिगामी कर पद्धतीचा त्याग करीत, खासगीकरणाला चालना देणारे धोरण उद्योग विश्वाला व गुंतवणूकदारांना आशावादी ठरले.

पुढील दिशा

सेन्सेक्सचा 5 लाखांचा टप्पा 2030 पर्यंत साध्य होईल, असा अंदाज राकेश झुनझुनवाला यांनी व्यक्त केला असून, 2025 पर्यंत 1 लाखाचा सेन्सेक्स शक्य असल्याचे अंदाज व्यक्त होत आहेत. पण याचबरोबर सेन्सेक्स उच्च पातळीवरून असून दहा टक्के घसरण होण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

अल्पावधीतच शेअरबाजारात होणारी घसरण ही आरोग्यदायी असल्याचे अनेक अभ्यासक मानतात व भारतीय अर्थव्यवस्था आगामी वर्षात 10% विकासदर साध्य करू शकणार असल्याने उद्योगांचे नफा प्रमाण 30% ने वाढून बाजारात उत्साह राहील व सेन्सेक्स आता फार वेगाने वाढणार नसला तरी मोठ्या घसरणीकडे जाणार नाही, हे स्पष्ट आहे. विकासगती वाढवणारे व उत्पन्न वाढवणारे समादेशक अंदाजपत्रकाची अपेक्षादेखील सेन्सेक्स वाढीकडेच कल दर्शवतो.

सर्वसामान्य गुंतवणूकदारांना सेन्सेक्सची झपाट्याने होणारी वाढ आकर्षिक करणारी असली तरी; आपली गुंतवणूक 10 ते 20% ने घटू शकते, अशी मानसिकता ठेवून सातत्याने संचयी वृद्धी देणार्‍या, उत्तम गुणवत्तेच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास तो सेन्सेक्सचा ‘लक्ष’ प्राप्तीच्या दीपावलीत आनंद साजरा करू शकेल!

Back to top button