पुढारी ऑनलाईन : सुधारित जागतिक संकेतांमुळे आज शुक्रवारी भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टीने तेजीत व्यवहार केला. बाजारातील तेजीत रिलायन्स आणि सन फार्मा हे शेअर्स आघाडीवर राहिले. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स ६२९ अंकांनी वाढून ६२,५०१ वर बंद झाला. तर निफ्टी (Nifty) १७८ अंकांच्या वाढीसह १८,४९९ वर स्थिरावला. आज बाजारात जोरदार खरेदी दिसून आली. मुख्यतः रिलायन्स, बँकिंग आणि आयटी स्टॉक्स वाढले. निफ्टी एफएमसीजी (Nifty FMCG), निफ्टी मेटल हे निर्देशांकदेखील वधारले होते.
सेन्सेक्सवर रिलायन्स (Reliance), सन फार्मा (Sun Pharma), एचसीएल टेक (HCLTech), हिंदुस्तान युनिलिव्हर (Hindustan Unilever), विप्रो (Wipro), अल्ट्राटेक सिमेंट (Ultratech Cement), मारुती (Maruti), टाटा स्टील (Tata Steel), टायटन (Titan), इन्फोसिस (Infosys), एसबीआय, टेक महिंद्रा, टीसीएस, बजाज फायनान्स हे शेअर्स वाढले. तर भारती एअरटेल, पॉवर ग्रिडहे शेअर्स घसरले.
सन फार्मास्युटिकल्सने (Sun Pharma Q4 Results) ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीत १,९८४.४७ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला आहे. कंपनीने ४ रुपये प्रति इक्विटी शेअर अंतिम लाभांश मंजूर केला. या पार्श्वभूमीवर सन फार्माचा शेअर २ टक्क्यांहून अधिक वाढून ९६५ रुपयांवर पोहोचला.
मेडप्लस हेल्थ सर्व्हिसेसने (Medplus Health Services) मार्चमध्ये संपलेल्या तिमाहीत २६.५ कोटीचा निव्वळ नफा नोंदवल्यानंतर त्यांचे शेअर्स सुमारे १० टक्क्यांनी वाढले.
व्होडाफोन आयडियाने (Vodafone Idea shares) ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीत त्यांचा एकत्रित तोटा ६,४१८ कोटी रुपयांपर्यंत खाली आणल्याचे सांगितल्यानंतर शुक्रवारी व्होडाफोन आयडियाचे शेअर्स सुमारे ३ टक्क्यांनी वाढले. सकारात्मक सुरुवातीनंतर बीएसईवर हा शेअर (vodafone idea share price) २.७१ टक्क्यांनी वाढून ७.१८ रुपयांवर पोहोचला. तर एनएसईवर (NSE) तो २.८५ टक्क्यांनी वाढून ७.२० रुपयांवर गेला. मागील वर्षाच्या याच कालावधीत कंपनीला ६,५६३ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. यंदाच्या तिमाहीत कंपनीने तोटा कमी केला आहे.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) गुरुवारी ५८९ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची खरेदी केली. गेल्या २१ सत्रांपैकी २० सत्रांमध्ये परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारांत निव्वळ खरेदीदार राहिले आहेत.
शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात कच्च्या तेलाची किंमत कमी झाली. मजबूत डॉलर आणि पुढील ओपेक प्लस (OPEC+) धोरण बैठकीपूर्वी रशिया आणि सौदी अरेबियाच्या विरोधाभासी संकेतांमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाली. ब्रेंट क्रूड ३० सेंटने घसरून ७५.९६ डॉलर प्रति बॅरलवर आले. तर यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट १४ सेंटने घसरून ७१.६९ डॉलर प्रति बॅरलवर आले.
अमेरिकेतील कर्ज मर्यादेवर तोडगा निघण्याच्या आशेने अमेरिकेतील शेअर बाजाराने उसळी घेतली. या तेजीचा मागोवा घेत शुक्रवारी आशियाई बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यवहार झाले. जपानचा Nikkei 225, दक्षिण कोरियाचा कोस्पी (Kospi) हे निर्देशांक वाढले. दरम्यान, हाँगकाँगचा हँगसेंग सार्वजनिक सुट्टीमुळे बंद राहिला.
आशियाई बाजारातील तेजीनंतर शुक्रवारी युरोपियन शेअर बाजारांनी सुरुवातीच्या व्यवहारात तेजीत व्यवहार केला. कारण अमेरिका कर्ज मर्यादा वाढविण्याच्या आणि डिफॉल्ट टाळण्याच्या संभाव्य कराराच्या आशा वाढल्या आहेत. लंडनचा बेंचमार्क FTSE 100 निर्देशांक ०.७ टक्क्यांनी वाढून ७,६२३ अंकांवर पोहोचला. महागाईची तीव्रता वाढली असतानाही एप्रिलमध्ये ब्रिटनमधील किरकोळ विक्रीत वाढ झाल्याच्या वृत्तांमुळे हा निर्देशांक वधारला आहे. युरोझोनमध्ये फ्रँकफर्टचा DAX निर्देशांक ०.४ टक्क्यांनी वाढून १५,८४८ अंकांवर पोहोचला आणि पॅरिस CAC 40 हा ०.६ टक्क्यांनी वाढून ७,२७० वर पोहोचला.
हे ही वाचा :