आरोग्य विमा : लहान मुलांना द्या ‘सुरक्षाकवच’ | पुढारी

आरोग्य विमा : लहान मुलांना द्या ‘सुरक्षाकवच’

अनेकजणांना आपल्या नवजात बाळालाही आरोग्य विमा संरक्षण देता येते, हे माहीत नसते. आरोग्य विमा कंपन्या नवजात बालकांकरिता वेगळी पॉलिसी देत नाहीत. मात्र, त्या मुलाचे आई-वडील यांच्या पॉलिसीमध्ये नवजात बाळाचे आरोग्य संरक्षण जोडले जाते. त्याचबरोबर फॅमिली फ्लोटर पॉलिसीमध्येही नवजात बालकाला विमा संरक्षण दिले जाते.

* बहुतांश आरोग्य विमा कंपन्या बाळाला तीन महिने पूर्ण झाल्यानंतर त्याच्या पालकांच्या विमा कव्हरमध्ये सहभागी करण्याची परवानगी देतात. मात्र, काही कंपन्या ग्रुप हेल्थ पॉलिसीमध्ये मुलाला जन्म झाल्याच्या दिवसापासून विमा संरक्षण देतात. असे केल्यामुळे लहान मुलांना प्रारंभीच्या काळात ज्या लसी व औषधे द्यावयाची असतात, त्याची सोय होते. अर्थात यासाठीचा हप्ता थोडा जास्त भरावा लागतो.

* जर पहिल्या दिवसापासून बाळाला विमा संरक्षण द्यायचे असेल, तर जन्माच्या अगोदर आठ दिवस संबंधित विमा कंपनीला त्याची सूचना द्यावी लागते. तुम्ही तशी सूचना दिल्यानंतर ती विमा कंपनी नवजात बालकाला अधिकाधिक विमा संरक्षण कसे देता येईल, याची माहिती देते. जर ती कंपनी मुलाला 90 दिवसांपेक्षा अधिक विमा संरक्षण देत असेल, तर पॉलिसीचे वार्षिक नूतनीकरण करताना त्यात मुलाचे नाव जोडले जाते.

* पॉलिसीचे नूतनीकरण करताना मुलाचे नाव पॉलिसीत घालण्याकरिता एक अर्ज करावा लागतो. त्याचबरोबर त्या बाळाचा जन्मदाखला, मॅटर्निटी डिस्चार्ज कार्ड यासारखी कागदपत्रे सादर करावी लागतात. कागदपत्रे सादर केल्यानंतर ती आरोग्य विमा कंपनी त्या मुलाला विमा संरक्षण देते.

* लहान मुलाला विमा संरक्षण देण्याकरिता पालकांना वेगळा हप्ता भरावा लागतो. वेगळा हप्ता भरल्यानंतर त्या मुलासाठी नवी पॉलिसी कंपनीकडून दिली जाते. फॅमिली फ्लोटर पॉलिसीमध्ये तो मुलगा किंवा मुलगी 21 वर्षांचा होईपर्यंत विमा संरक्षण दिले जाते. आरोग्य विमा कंपन्यांना पाच वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांना स्वतंत्ररीत्या विमा संरक्षण देता येते.

जगदीश काळे

Back to top button