निफ्टी आणि सेन्सेक्स : अर्थवार्ता - पुढारी

निफ्टी आणि सेन्सेक्स : अर्थवार्ता

प्रीतम मांडके

* गत सप्ताहात निफ्टी आणि सेन्सेक्स निर्देशांकांनी पुन्हा नवीन विक्रम प्रस्थापित केला. निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये अनुक्रमे 444.35 व 12.46.89 अंकांची वाढ होऊन दोन्ही निर्देशांक आजर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर म्हणजेच 18338.55 अंक व 61305.95 अंकाच्या पातळीवर बंद झाले. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या भांडवल बाजारमूल्याने तब्बल 272 लाख कोटींचा आकडा पार केला. सप्टेंबर महिन्यातील घाऊक महागाई दरांचा आकडा दिलासादायक आल्याने गुरुवारच्या सदरात बँकांच्या समभागांनी उसळी मारली.

* सप्टेंबर महिन्यात घाऊक महागाई दर मागील 6 महिन्यांच्या न्यूनतम पातळीवर सप्टेंबर घाऊक महागाई दर 10.66 टक्के तर किरकोळ महागाई दर 4.35 टक्के ऊर्जा आणि तेल क्षेत्राचा महागाई दर 24.81 टक्के. सप्ताहाअखेर रुपया चलनदेखील डॉलरच्या तुलनेत काही प्रमाणात सावरले. रुपया डॉलरच्या तुलनेत 11 पैसे मजबूत होऊन 75.25 रुपये प्रति डॉलर स्तरावर बंद झाला.

* ब्रेंट क्रूडने आंतरराष्ट्रीय बाजारात आपली वाढ कायम ठेवली आहे. 10 ऑक्टोबर 2018 नंतर प्रथमच ब्रेंटक्रूडने 85.10 डॉलर प्रति बॅरल किमतीचा टप्पा गाठला. अनेक ऊर्जा निर्मिती केंद्रांवर नैसर्गिक वायू आणि कोळशाच्या टंचाईमुळे पर्यायी कच्चा माल म्हणून क्रूड ऑईलचा वापर सुरू केल्याने कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. या वाढत्या किमतीमुळे भारताच्या 10 वर्षे कालावधीच्या सरकारी रोख्यांचा भाव एका आठवड्यात 6.267 टक्क्यांवरून 14 ऑक्टोबरअखेर 6.329 टक्क्यांपर्यंत वाढला.

* सप्टेंबर महिन्यात भारताची व्यापार तूट 22.6 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली. आयात आणि निर्यात यांच्यामधील तफावत व्यापार तुटीद्वारे दर्शवली जाते. मागील वर्षाच्या तुलनेत भारताची निर्यात22.6 टक्के वधारून 33.79 अब्ज डॉलर्स झाली तर आयात तब्बल 84.8 टक्के वधारून 56.39 अब्ज डॉलर्स झाली. आयात वाढण्यास कच्च्या तेलाचे वाढलेले दर कारणीभूत ठरले. पेट्रोलियम प्रॉडक्टस्च्या आयातीमध्ये घसघशीत 199 टक्क्यांची वाढ होऊन एकूण 17.4 अब्ज डॉलर्सची पेट्रोलियम उत्पादने देशात आयात करण्यात आली. तसेच सोने खरेदीमध्येसुद्धा 751 टक्क्यांची वाढ होऊन 5.1 अब्ज डॉलर्स सोन्याची आयात करण्यात आली. तसेच खाद्यतेलामध्ये 132 टक्के व कोळसा खरेदीमध्ये 83 टक्क्यांची वाढ होऊन त्यांनीदेखील एकूण आयात वाढवण्यास हातभार लावला.

* चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीच्या निकालांना सुरुवात. देशातील दुसर्‍या क्रमांकाची सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसचे दमदार प्रदर्शन. इन्फोस्सिचा नफा मागील तिमाहीच्या तुलनेच 4.3 टक्के वधारून 5421 कोटी झाला. कंपनीच्या महसूल वाढीच्या अंदाजात देखील बदल करण्यात आला. महसूल वाढ उद्दिष्ट 14 ते 16 टक्क्यांवरून 16.5/17.5 टक्के करण्यात आले. मागच्या तिमाहीच्या तुलनेत महसूल 6.1 टक्का वाढून 29602 कोटी झाला. तसेच ‘विप्रो’चा नफा 17 टक्के वाढून 2930 कोटी झाला. विप्रोने वार्षिक 10 अब्ज डॉलर्स (सुमारे 75300 कोटी) विक्रीचा टप्पादेखील पार केला.

* ‘सेंट्रम फायनान्शिअल सर्व्हिसेस’ आणि ‘भारत पे’ यांच्या एकत्रित समूहास ‘स्मॉल फायनान्स बँक’चा परवाना रिझर्व्ह बँकेतर्फे मंजूर करण्यात आला. या कंपनीतर्फे बुडीत ‘पीएमसी’ बँक खरेदीसाठी प्रस्ताव देण्यात आला होता. परंतु, रिझर्व्ह बँकेने ‘स्मॉल फायनान्स बँक’ला मंजुरी दिली. बुडीत पीएमसी बँकेबाबत अद्याप निर्णय होणे बाकी आहे.

* ‘एअर इंडिया’च्या यशस्वी विक्रीनंतर एलआयसीचा आयपीओ आणि भारत पेट्रोलियममधील सरकारी हिस्सा विक्री या आर्थिक वर्षाअखेर केली जाणार. यासंबंधीची प्रकरणे हाताळणारे ‘दीपम’चे सेक्रेटरी ‘तुहीन पांडे’ यांची माहिती आर्थिक वर्ष 2022 मध्ये तब्बल 1.75 लाख कोटींचे निर्गुंतवणूक उद्दिष्ट असल्याचे केंद्र सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

* रिलायन्स इंडस्ट्रीजने ‘चायना ब्लूस्टार’कडून आरईसी सोलर होल्डिंग्ज कंपनी 5800 कोटींना विकत घेतली.

* अ‍ॅमेझॉनकडून भारतामध्ये सर्च रिझल्टमध्ये पक्षपातपणा केला गेल्याचा आरोप. तसेच काही उत्पादनांची नक्कल बनवून त्यांना प्राधान्य देत असल्याचे ‘रायटर्स’चे म्हणणे. याप्रकरणी अमेरिकन खासदार एलिझाबेथ वॉरेन यांची सखोल चौकशीची मागणी.
10) पंतप्रधान मोदींकडून पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी ‘नॅशनल मास्टर प्लॅन 2024-25’ ची घोषणा. ‘पीएम गती शक्ती’ असे या संकल्पनेस नाव देण्यात आले. 11 औद्योगिक वसाहती, 2 लाख किलोमीटर्सचे हायवे, प्रत्येकी 10 हजार कोटींचे संरक्षण साहित्य उत्पादन करणार्‍या 2 औद्योगिक वसाहती, 197 मेगा फूडपार्क 4,54,200 कि.मी. इलेक्ट्रिसिटीचे नेटवर्क, 17 हजार किमीची गॅस पाईपलाईन, 1600 दशलक्ष टनांची रेल्वे मालवाहतूक यासारखे अनेक महत्त्वाचे प्रकल्प या योजनेंतर्गत उभे केले जाणार.

* नोकर्‍यासंबंधीची माहिती देणारी मायक्रोसॉफ्टची वेबसाईट ‘लिंक्ड इन’ चीनमधून लवकरच बाहेर पडणार. चीन सरकारच्या जाचक अटींमुळे मायक्रोसॉफ्टने हा निर्णय घेतला.

* 8 ऑक्टोबर रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची परकीय गंगाजळी 2.039 अब्ज डॉलर्सनी वधारून 639.516 अब्ज डॉलर्स झाली.

* पूर्वलक्षी करांसंबंधी केंद्र सरकार आणि व्होडाफोन यांच्यामध्ये चालू असलेल्या वादावर पडदा. 2012 सालच्या या प्रकरणात व्होडाफोनवर सुमारे 7 हजार 900 कोटींचा दंडदेखील आकारण्यात आला होता. ‘हच’संबंधीच्या व्यवहार 11218 कोटींच्या कराची मागणी करण्यात आली होती; परंतु आता सरकार विरुद्धच्या सर्व केसेस मागे घेण्याच्या अटींवर दोन्ही पक्षांकडून हे प्रकरण सामोपचाराने मिटविण्यात येणार आहे.

Back to top button