निवृत्तीधारक आहात? - पुढारी

निवृत्तीधारक आहात?

प्रसाद पाटील

निवृत्तीधारक असणाऱ्यांना यावर्षी हयातनामा जमा करण्याची तारीख 1 ते 30 नोव्हेंबर आहे. 80 पेक्षा अधिक वयोगटातील पेन्शनधारकांना ऑक्टोबरपासूनच जीवन प्रमाणपत्र जमा करता येणार आहे.

निवृत्ती वेतन नियमित मिळण्यासाठी आणि सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी पेन्शनधारकांना वर्षातून एकदा आपले जीवन प्रमाणपत्र जमा करावे लागते. जीवन प्रमाणपत्राच्या आधारे पेन्शनधारक हयात आहे की नाही, हे सरकारला समजते. जर आपण हयातनामा दिला नाही तर सरकारकहून पेन्शन बंद केली जाते. अर्थात, आता जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी बँक किंवा पोस्टात जाण्याची गरज नाही. घरबसल्या देखील आपण हयातनामा जमा करू शकता.

निवृत्तीवेतनधारक हे जीवनप्रमाणपत्र ऑनलाईन देखील देऊ शकतात. यावर्षी जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी एक ते 30 नोव्हेंबरपर्यंतचा कालावधी दिला आहे. 80 किंवा त्यापेक्षा अधिक वयोगटातील निवृत्तीवेतनधारकांना ऑक्टोबरपासूनच आपले प्रमाणपत्र जमा करता येणार आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून जीवन प्रमाणपत्र जमा करण्याची पद्धत इथे सांगता येईल.

घरपोच सुविधा : निवृत्तीवेतनधारकांना सार्वजनिक क्षेत्रातील बारा बँकांकडून घरपोच सुविधा दिली जात असून हयातनामा सादर करण्यासाठी देखील या सुविधेचा उपयोग करता येणार आहे. जीवनप्रमाणपत्र घेऊन जाण्यासाठी बँकेची डोअर स्टेप बँकिंग सेवा उपलब्ध आहे. ही सेवा बुक केल्यानंतर निश्चित तारखेला आणि वेळेवर एक एजंट आपल्या घरी येईल आणि जीवन प्रमाणपत्र अ‍ॅपचा उपयोग करून जीवन प्रमाण डिजिटलच्या माध्यमातून ऑनलाईनने मान्य करेल. अर्थात, यासाठी बँकेकडून शुल्क आकारले जाते. एसबीआय या सेवेसाठी 75 रुपये आणि जीएसटी आकारणी करते.

पोस्टमनची मदत : टपाल विभागाने इंडिया पोस्ट पेमेंट बँक (आयपीपीबी) आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती आणि दळणवळण मंत्रालय यांनी एकत्रपणे पोस्टमनच्या माध्यमातून डिजिटल जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी डोअरस्टेप सेवा सुरू केली आहे. 2020 नोव्हेंबरपासून आयपीपीबी डोअर स्टेप बँकिंग सेवा सुरू झाली आहे. या सेवेची माहिती मिळवण्यासाठी पेन्शनर मंडळींना आयपीपीबी संकेतस्थळावर जावे लागेल. त्याचवेळी या सेवेचा लाभ घेण्यासाठी टपाल विभागाशी संपर्क करू शकता किंवा विनंती देऊ शकता. पोस्टाच्या डिजिटल जीवन प्रमाणपत्रासाठी 70 रुपये (जीएसटी/सेससह) किरकोळ शुल्क आकारण्यात येते. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पेन्शनधारकांना आधार नंबर हा बँक, पोस्टाकडे नोंदलेला असावा. तसेच नोंदणीकृत मोबाईल नंबरची गरज असते.

जीवन प्रमाण पोर्टल : आपण जीवन प्रमाण पोर्टलच्या माध्यमातून हयातनामा जमा करू शकता. यासाठी सर्वात अगोदर निवृत्तीवेतनधारकास जीवन प्रमाण पोर्टलवर जावे लागेल. या ठिकाणी जीवन प्रमाण अ‍ॅप डाऊनलोड करावा लागेल. अ‍ॅप डाऊनलोड झाल्यानंतर फिंगरप्रिंटची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यासाठी आधारच्या डिव्हाईसची गरज भासेल. त्यानंतर निवृत्तीवेतनधारकास मोबाईल नंबर आणि ई मेल आयडी समाविष्ट करून अ‍ॅपवर नोंदणी करावी लागेल. त्यानंतर पेन्शन अकाऊंट नंबर, बँक डिटेल्स भरावे लागेल. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला एक डिजिटल प्रमाणपत्र डाऊनलोडचा पर्याय दिसेल. हे प्रमाणपत्र कोषागार कार्यालयाकडे किंवा बँकेकडे जमा करावे लागेल.

Back to top button