ओव्हरनाईट फंड म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी लाभदायी पर्याय - पुढारी

ओव्हरनाईट फंड म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी लाभदायी पर्याय

बळवंत जैन

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी ओव्हरनाईट फंड हा एक चांगला पर्याय आहे. या योजनेत एका दिवसासाठीसुद्धा पैसे गुंतविता येतात. ज्या लोकांजवळ अधिक पैसा उपलब्ध आहे, त्यांनी तो एक-दोन दिवसांसाठी गुंतविल्यास त्यांना अतिरिक्त कमाई करता येणे शक्य असते. या योजनेशी संबंधित देवाणघेवाण घरबसल्या ऑनलाईन स्वरूपात केली जाऊ शकते. पैसे काढण्याच्या व्यवहारावर कोणतेही शुल्क घेण्यात येत नाही.

गुंतवणुकीच्या क्षेत्रात एक सर्वसाधारण धारणा अशी आहे की, म्युच्युअल फंड केवळ इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्यायच उपलब्ध करून देतात. ही धारणा वास्तवापासून अनेक योजनेत दूर आहे. वास्तविक, म्युच्युअल फंड हाऊस हे एखाद्या डिपार्टमेंटल स्टोअर्ससारखे असून, प्रत्येकाला लहान गुंतवणूकदारापासून कॉर्पोरेटपर्यंत त्याच्या अपेक्षेप्रमाणे फंडात गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध असतो.

त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडात दहा वर्षांपासून एका दिवसापर्यंत कितीही कालावधीसाठी गुंतवणूक करण्याच्या योजनांचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. या योजनांपैकी ओव्हरनाईट फंड हा असा पर्याय आहे, ज्यात आपले पैसे केवळ एका दिवसासाठी ठेवून आपण चांगली कमाई करू शकतो.

ओव्हरनाईट फंड या नावावरूनच असे लक्षात येते की, हा एका रात्रीसाठी गुंतवणूक करण्याचा पर्याय आहे. या योजना ओपन एंडेड असतात आणि त्यात कोणतीही व्यक्ती गुंतवणूक करू शकते. ओव्हरनाईट फंड ही केवळ एका दिवसात मॅच्युरिटी होणार्‍या पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्याची योजना आहे. आतापर्यंत लोक आपला सरप्लस फंड घरात किंवा चालू खात्यात ठेवत असत आणि त्यावर कोणतेही व्याज मिळत नसे. त्यामुळे ज्यांच्याकडे काहीसा अतिरिक्त निधी आहे अशा व्यक्तींसाठी ओव्हरनाईट फंड हा चांगला पर्याय आहे. या माध्यमातून आपण काही ना काही कमाई निश्चितपणे करू शकतो.

एकाच दिवसाची मॅच्युरिटी असलेल्या बाँडस्मध्येच फक्त गुंतवणूक केली जात असल्यामुळे या पर्यायाद्वारे व्याजदराशी संबंधित कोणतीही जोखीम यात नसते. पेमेंटची जोखीमसुद्धा या पर्यायात अत्यल्प असते. ज्यांना आपली गुंतवणूक कमीत कमी जोखीम पत्करून करायची आहे त्यांनी हा मार्ग निवडणे श्रेयस्कर आहे. या योजनांनी गेल्या एका वर्षाच्या कालावधीत 5.7 टक्क्यांचा वार्षिक परतावा दिला आहे.

ओव्हरनाईट फंड योजनांमधून अशा सरकारी बाँडस्मध्ये गुंतवणूक केली जाते, जे दुसर्‍याच दिवशी मॅच्युअर होतात. त्याचप्रमाणे या योजनेतून चांगले रेटिंग असलेल्या आणि एका दिवसात मॅच्युअर होणार्‍या खासगी कंपन्यांच्या बाँडस्मध्येही पैसे गुंतविले जातात. फंड मॅनेजरला हे बाँडस् दररोज खरेदी करावे लागतात आणि दररोज विकावे लागतात, त्यामुळे व्याजदरांचा जास्त परिणाम या गुंतवणुकीवर होत नाही.

त्यामुळे ओव्हरनाईट फंडात गुंतवणूक करण्यासंबंधीच्या सर्व कंपन्यांच्या योजना जवळजवळ सारख्याच आहेत. अशा स्थितीत आपण एखाद्या प्रतिष्ठित आणि प्रस्थापित म्युच्युअल फंडाच्या योजनेतच गुंतवणूक करायला हवी. याखेरीज आपण आधीपासूनच जेथे गुंतवणूक केलेली आहे, अशा म्युच्युअल फंड हाऊसचीही निवड आपण करू शकतो.

ओव्हरनाईट फंड डेट श्रेणीत येतात. करवसुलीच्या बाबतीत म्युच्युअल फंडांना दोन श्रेणीत विभागण्यात आले आहे. पहिल्या श्रेणीत इक्विटीशी संलग्न योजना येतात. अन्य सर्व योजना दुसर्‍या श्रेणीत येतात. डेटशी संबंधित सर्व योजना दुसर्‍या श्रेणीत मोडतात.

डेट योजनांमध्ये जर गुंतवणूक केलेली रक्कम तीन वर्षांनंतर काढली तर त्यातून मिळणारा लाभ दीर्घकालीन लाभ मानला जातो. अशा स्थितीत गुंतवणूकदाराला मूल्य निर्देशांकाचा लाभ मिळेल. त्यानंतर जी रक्कम तयार होईल, त्यावर वीस टक्के दराने कराचा भरणा उपकर आणि अधिभार यांसह करावा लागेल. जर दीर्घावधीत मिळणारा लाभ निर्धारित अवधीत घर खरेदी करण्यासाठी उपयोगात आणला तर त्यावर सवलतीचा लाभ मिळू शकेल.

या योजनांमध्ये अल्पावधी भांडवली लाभ हे गुंतवणूकदाराचे सामान्य उत्पन्न मानले जाते. त्यावर त्याच्या कराच्या स्लॅबनुसार कर लावला जातो. 36 महिन्यांपेक्षा अधिक गुंतवणूक ओव्हरनाईट फंडात केला जाण्याची शक्यता बिलकूल नसल्यामुळे अधिकांश प्रकरणांमध्ये लाभ अल्पावधीच्या श्रेणीत येतो आणि आपल्या वार्षिक उत्पन्नात तो मिळवला जातो.

तुम्ही जर नोकरदार असाल आणि जर तुमचा पैसा एसआयपी आणि होमलोनच्या ईएमआयसाठी बचत खात्यात जमा असेल तर तो तुम्ही ओव्हरनाइट फंडात गुंतवू शकता. अशा स्थितीत बचत खात्याच्या तुलनेत तुम्हाला जास्त परतावा प्राप्त होऊ शकेल. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर आपल्याकडील सरप्लस फंड या योजनांमध्ये गुंतवून काही प्रमाणात कमाई वाढवू शकता. सामान्यतः प्रत्येक व्यावसायिक या पैशांमधून कोणतेही उत्पन्न मिळवू शकत नाही.

कारण, आता बहुतांश लोक नेट बँकिंगचा वापर करतात. त्यामुळे सरप्लस फंड सहजरीत्या गुंतविता येऊ शकतो. गरज पडल्यास ही रक्कम म्युच्युअल फंड कंपनीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन काढली जाऊ शकते. हीच देवाणघेवाण म्युच्युअल फंडच्या कॅम्स आणि कार्वी यांसारख्या नोंदणीकृत वेबसाईटच्या माध्यमातूनही केली जाऊ शकते.

Back to top button