Share Market Updates | सेन्सेक्स लाल चिन्हात बंद, अदानींचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये, जाणून घ्या मार्केटमधील ‘या’ ५ गोष्टी | पुढारी

Share Market Updates | सेन्सेक्स लाल चिन्हात बंद, अदानींचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये, जाणून घ्या मार्केटमधील 'या' ५ गोष्टी

Share Market Updates : जागतिक कमकुवत संकेतांमुळे आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी (दि.६) शेअर बाजारात घसरण पहायला मिळाली. सुरुवातीला सेन्सेक्स २३५ अंकांनी घसरला. तर निफ्टी १७,८०० च्या खाली आला. त्यानंतर दुपारी १२.१८ च्या सुमारास सेन्सेक्स ४७३ अंकांनी खाली आला होता. त्यानंतर सेन्सेक्स ३३४ अंकांनी घसरून ६०,५०६ वर बंद झाला. तर निफ्टी ८९ अंकांच्या घसरणीसह १७,७६४ वर स्थिरावला. आजच्या व्यवहारात अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर्स १० टक्क्यांपर्यंत घसरले. तर बँकिंग शेअर्समध्ये बँक ऑफ बडोदा, बंधन बँक, इंडसइंड बँक, ॲक्सिस बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँक यांचे शेअर्स आघाडीवर होते. तर कोटक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, इंडियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युको बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, एचडीएफसी बँक, एचडीएफसी बँक यांचे शेअर्स घसरले.

अदानी समूहातील शेअर्स १० टक्क्यांपर्यंत घसरले

हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये (Adani stocks) होत असलेली घसरण थांबता थांबेना झाली आहे. आज सोमवारी (दि.६) अदानी समूहातील शेअर्स १० टक्क्यांपर्यंत घसरले. तर १० पैकी ६ शेअर्स हे लोअर सर्किट लिमिटमध्ये गेले आहे. आजच्या व्यवहारात अदानी समूहातील १० शेअर्सच्या बाजार भांडवलास बसलेला फटका हा ५० हजार कोटींहून अधिक आहे. तर गेल्या ८ सत्रातील त्यांचे एकूण नुकसान सुमारे १० लाख कोटी एवढे आहे. आजच्या व्यवहारात अदानी ट्रान्समिशनमध्ये सर्वाधिक १० टक्क्यांची घसरण दिसून आली. हा शेअर आता १,२५६ रुपयांवर आला. अदानी एंटरप्रायजेसचा शेअर आज सुरुवातीला ७.५ टक्क्यांनी घसरला होता. त्यानंतर ही घसरण काही प्रमाणात थांबली आणि दुपारच्या सत्रात हा शेअर ०.३३ टक्के घसरणीसह १,५९२ रुपयांवर आला. अदानी ग्रीन एनर्जी (-५ टक्के), अदानी पॉवर (-५ टक्के), अदानी टोटल गॅस (-५ टक्के), अदानी विल्मर (-५ टक्के) आणि एनडीटीव्ही (-४.९८ टक्के) हा शेअरदेखील ५ टक्क्यांच्या लोअर सर्किटमध्ये अडकला आहे.

Vodafone Idea शेअर्स २५ टक्क्यांनी वाढले, ‘हे’ आहे कारण

दरम्यान, येस बँक (०.६१ टक्के), स्टेट बँक ऑफ इंडिया (०.९२ टक्के), बँक ऑफ बडोदा (१.३१ टक्के) हे शेअर्स ‍वधारले. (Share Market Today) ‘व्होडाफोन आयडिया’चे शेअर्स आज २५ टक्क्यांनी वाढले. सरकारने १६,१३३ कोटी रुपयांच्या व्याज थकबाकीचे इक्विटीमध्ये रूपांतर करण्यास सहमती दिल्यानंतर व्होडाफोन आयडियाच्या शेअर्स वधारले. व्होडाफोन आयडियाचे सरकारला मोठे देणे आहे. स्पेक्ट्रम लिलावातील हप्ते, त्यावरील वापराचे शुल्क आणि या सर्व रकमेवरील व्याज अशी ही थकीते आहेत. ही रक्कम १६,१३३ कोटी रुपये आहे. रकमेच्या बदल्यात सरकारला शेअर्स देण्याचा प्रस्ताव कंपनीने दिला होता. सरकारने सदर प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

IT शेअर्संनाही फटका

माहिती तंत्रज्ञान शेअर्स १.१ टक्क्यांहून अधिक घसरले. IT मधील १० पैकी ९ घटकांचे अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हच्या दरवाढीच्या चिंतेमुळे नुकसान झाले. अमेरिकेतील कोणत्याही संभाव्य मंदीचा IT कंपन्यांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो.

ऑटोमध्ये ‘हे’ शेअर्स ठरले टॉप लूजर्स

ऑटोमध्ये आयशर मोटर्स (-१.९७ टक्के), महिंद्रा अँड महिंद्रा (-१.५५ टक्के), मारुती सुझूकी (-१.०३ टक्के), टाटा मोटर्स (-०.८९ टक्के), अशोक लेलँड (०.७१ टक्के०, एस्कॉर्ट्स कुबोटा (-०.२३ टक्के), बजाज ऑटो (-०.१९ टक्के), टाटा मोटर्स (-०.०७ टक्के) हे शेअर्स घसरले. हिंदाल्को, हिंदुस्तान झिंक, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू आदी मेटल स्टॉक्सवरदेखील आजच्या व्यवहारात दबाव राहिला.

विक्रीचा सपाटा कायम

परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) जानेवारीमध्ये २८८.५२ अब्ज रुपये (३.५१ अब्ज डॉलर) किमतीच्या भारतीय शेअर्सची विक्री केली आहे. (Share Market Updates)

हे ही वाचा :

Back to top button