Share Market Crash | सेन्सेक्स ७७३ अंकांनी घसरला, बाजारातून ३.५ लाख कोटी उडाले, एका रिपोर्टमुळे अदानींच्या शेअर्सचे काय झाले पाहा? | पुढारी

Share Market Crash | सेन्सेक्स ७७३ अंकांनी घसरला, बाजारातून ३.५ लाख कोटी उडाले, एका रिपोर्टमुळे अदानींच्या शेअर्सचे काय झाले पाहा?

Share Market Crash : जागतिक बाजारातून मिळालेल्या नकारात्मक संकेतांचा बुधवारी भारतीय शेअर बाजाराला मोठा फटका बसला. सुरुवातीपासून सुरू झालेली सेन्सेक्सची घसरण बाजार बंद होईपर्यंत कायम राहिली. आजच्या व्यवहारात ऑटो शेअर्स वगळता सर्वच क्षेत्रांत विक्री दिसून आली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे ३०० अंकांनी घसरून ६०,६७१ वर आला होता. तर निफ्टीने १८ हजारांवर व्यवहार केला. सकाळी साडेअकराच्या सुमारास सेन्सेक्स ८५० अंकांनी खाली आला होता. निफ्टीने १८ हजारांची पातळी गमावून १७,८०० वर व्यवहार केला. त्यानंतर सेन्सेक्स ७७३ अंकांच्या घसरणीसह ६०,२०५ वर बंद झाला. तर निफ्टी २२६ अंकांनी घसरून १७,८९१ वर स्थिरावला.

सेन्सक्सची आजची घसरण ही १ टक्क्यांहून अधिक आहे. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना ३.४६ लाख कोटींचा फटका बसला. बीएसई बाजार भांडवल (BSE m-cap) काल नोंदवलेल्या २८०.३९ लाख कोटींच्या तुलनेत ३.४६ लाख कोटींनी घसरून २७६.९३ लाख कोटींवर आले. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी आणि एल अँड टी या आघाडीचे शेअर्स हे या घसरणीला कारणीभूत ठरले.

बँक निफ्टी १,१९३ अंकांनी घसरला

आजच्या व्यवहारात सर्वाधिक फटका अदानी ग्रुपच्या शेअर्संना बसला. आज अदानी ग्रुपचे शेअर्स १० टक्क्यांपर्यंत घसरले. अमेरिकेतील शॉर्ट-सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्चच्या एका नकारात्मक अहवालानंतर बुधवारी अदानींचे शेअर्स धडाधड कोसळले. दरम्यान, देशांतर्गत बाजारातील नकारात्मक वातावरणामुळे बँक निफ्टी १,१९३ अंकांनी घसरून ४१,५४० वर आला. कोटक बँक, बंधन बँक, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँक यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली.

आर्थिक मंदीचे सावट

अमेरिकेची आर्थिक स्थिती दर्शवणाऱ्या डाटामधून मंदीचे संकेत मिळत आहे. आर्थिक मंदीच्या जोखमीने तसेच अनेक कंपन्यांच्या वाढीचा आलेख खाली आल्याने गुंतवणूकदारांच्या भावना दुखावल्या आहेत. यामुळे शेअर बाजारात आज विक्रीचा सपाटा दिसून आला. सेन्सेक्सवर मारुती, सुझुकी, एचयूएल आणि टाटा स्टील हे शेअर्स घसरले होते. एसबीआय, एल अँड टी, इंडइंड बँक आणि अल्ट्रा टेक सिमेंट हे आजच्या व्यवहारातील टॉप लूजर्स होते. हे शेअर्स सुमारे २ टक्क्यांनी खाली आले.

क्षेत्रीय निर्देशांकांत निफ्टी पीएसयू बँक ०.५२ टक्क्यांनी घसरला. निफ्टी आयटीदेखील ०.४४ टक्क्यांनी खाली आला होता. निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस आणि निफ्टी कन्झ्यूमर ड्युरेबल्स निर्देशांकांतही घसरण दिसून आली. तर व्यापक बाजारपेठेत निफ्टी स्मॉलकॅप ५० हा ०.३८ टक्के आणि निफ्टी मिडकॅप ५० हा ०.४९ टक्के घसरला.

परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा जोर कायम

काल मंगळवारी शेअर बाजारात परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FIIs) ७६०.५१ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. FIIs चीनसारख्या तुलनेने स्वस्त बाजारपेठेकडे गुंतवणूकदारांचा कल दिसत असल्याने या महिन्यात आतापर्यंत त्यांनी १७ हजार कोटींची गुंतवणूक भारतीय बाजारातून काढून घेतली आहे.

अदानी ग्रुपचे शेअर्स १० टक्क्यांपर्यंत घसरले

आजच्या व्यवहारात सर्वाधिक फटका अदानी ग्रुपच्या (Gautam Adani) शेअर्संना बसला. आज अदानी ग्रुपचे शेअर्स १० टक्क्यांपर्यंत घसरले. फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार (Forbes Real-Time Billionaires List), ६० वर्षीय गौतम अदानी यांच्या संपत्तीत आज ५.९ अब्ज डॉलरने घट होऊन ती १२०.६ अब्ज डॉलरवर आली आहे. तरीही जगातील श्रीमतांच्या यादीत अदानी यांचे तिसरे स्थान कायम आहे. एकूण संपत्तीत जेफ बेझोस (११९.५ अब्ज डॉलर) आणि वॉरन बफेट (१०८.१ अब्ज डॉलर) यांच्या पुढे अदानी यांचा क्रमांक आहे. जगातील टॉप १० श्रीमंतांच्या यादीत अदानी यांच्यासोबत मुकेश अंबानी (८५.८ अब्ज डॉलर) यांचा समावेश आहे.

अदानी ग्रुपमधील (Adani Group) कंपन्या अमेरिकेतील बाँड्स आणि नॉन-इंडियन-ट्रेडेड डेरिव्हेटिव्हजच्या माध्यमातून शॉर्ट सेलिंग करत करत असल्याचे हिंडेनबर्ग फर्मने त्यांच्या रिपोर्टमधून उघड केले आहे. याचा फटका आज अदानींच्या शेअर्सना बसला. अदानी ग्रुपमधील अंबुजा सिमेंटचा शेअर ९.६ टक्के घसरून ४५० रुपयांवर आला. अदानी पोटर्स, अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशऩ हे सुमारे ५ टक्क्यांनी खाली आले.

कमकुवत जागतिक संकेत

अमेरिका आणि युरोपियन स्टॉक फ्यूचर्स बुधवारी घसरले होते. तर आशियाई बाजारातील निर्देशांकांत किरकोळ वाढ दिसून आली. एकूणच अमेरिका आणि आशियाई बाजारात संमिश्र वातावरण राहिले. अमेरिकेतील नॅस्डॅक निर्देशांक ०.७ टक्के घसरला. तर एस अँड पी ५०० आणि Euro Stoxx 50 हा निर्देशांकदेखील घसरला. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज (DJIA) ०.३ टक्के वाढून ३३,७३४ वर स्थिरावला. तर S&P 500 निर्देशांक ०.०७ टक्के घसरून ४,०१६ वर बंद झाला.

केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी गुंतवणूकदारांची सावध भूमिका

गुंतवणूकदारांनी भारतातील आगामी केंद्रीय अर्थसंकल्प आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या बैठकीपूर्वी सावध भूमिका घेतली आहे. हे दोन्ही १ फेब्रुवारी राजी आहेत. पण याआधीच शेअर बाजारात विक्रीचा जोर वाढला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातून नेमके कोणत्या घोषणा होणार याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिले आहे.

कच्च्या तेलाच्या किमती

जागतिक आर्थिक वाढीच्या चिंतेमुळे मागील सत्रात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या होत्या. दरम्यान, कोविड-१९ महामारीच्या निर्बंधातून बाहेर पडल्यानंतर तेलाचा प्रमुख आयातदार देश चीनमधून मागणी वाढेल अशी आशा निर्माण झाली आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या किमती बुधवारी वाढल्या. ब्रेंट क्रूझ फ्यूचर्स ०.४२ टक्के वाढून प्रति बॅरेल ८६.५० डॉलरवर पोहोचले. (Share Market Crash)

 हे ही वाचा :

Back to top button