सेन्सेक्स आणि निफ्टी : अर्थवार्ता | पुढारी

सेन्सेक्स आणि निफ्टी : अर्थवार्ता

प्रीतम मांडके

* सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकांची घोडदौड सुरूच. सेन्सेक्सने इतिहासात प्रथमच 60 हजारांचा टप्पा पार केला. निफ्टीदेखील 18 हजारांच्या उंबरठ्यावर. सेन्सेक्सने गतसप्ताहात 60333 तसेच निफ्टीने 17947.65 अंकांच्या सर्वोच्च पातळीला स्पर्श केला. सप्ताहात सेन्सेक्स आणि निफ्टी एकूण अनुक्रमे 1032.58 व 268.05 अंकांची वाढ दर्शवून 60048.47 अंक व 17853.2 अंकांच्या पातळीवर बंद झाले.

निफ्टीने एकूण 1.52 टक्क्यांची तर सेन्सेक्सने एकूण 1.75 टक्क्यांची वाढ दर्शवली. रुपया चलनदेखील डॉलरच्या तुलनेत 4 पैसे घसरून 73.78 रुपये प्रतिडॉलर किमतीवर बंद झाले. एकूण सप्ताहाचा विचार करता रुपया चलन डॉलरच्या तुलनेत 20 पैसे कमजोर झाले. तसेच 10 वर्षांच्या सरकारी रोख्यांच्या दराने देखील उसळी घेतली.

कच्चा तेलाच्या वाढत्या किमतीचा परिणाम रोख्यांचे दर वाढवण्यात झाला. शुक्रवारच्या सत्रात 10 वर्षांच्या सरकारी रोख्यांचे दर 4 बेसिस पॉईंट वधारून 6.1397 टक्क्यांवरून 6.1810 टक्के झाला.

* आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमतींनी मागच्या तीन वर्षांचा उच्चांक गाठला. बे्ंरट कु्रुडच्या किमतीमध्ये मागील तीन आठवडे, तर डब्ल्यूटी आयमध्ये मागील पाच आठवड्यांपासून सातत्याने वाढ होत आहे.

शुक्रवारच्या सत्रात मध्यापर्यंत ब्रेंट कु्रुड 0.7 टक्के वधारून 77.78 डॉलर प्रती बॅरल तसेच डब्ल्यूटीआय क्रुड 0.6 टक्के वधारून 73.70 डॉलर प्रती बॅरलच्या किमतीवर पोहोचले. ऑक्टोबर 2018 नंतरची ब्रेट कु्रडची ही सर्वोच्च पातळी आहे. कच्च्या तेलाच्या उत्पादनाचा व त्याने येणार्‍या व्यत्ययाचा परिणाम किंमत वाढीमध्ये झाला.

* चीनमधील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठी बांधकाम उद्योगातील कंपनी ‘एव्हरग्रँड’ दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर सुमारे 83 दशलक्ष डॉलर्स व्याजपरतावा देण्यास कंपनी असमर्थ ठरली. कंपनीच्या समभागांमध्ये 12 टक्क्यांची घसरण कंपनीवर तब्बल 305 अब्ज डॉलर्सचे कर्ज पुढील 30 दिवसांत कंपनी व्याज परतावा देण्यास असमर्थ ठरली तर कंपनीला दिवाळखोर घोषित करण्यात येईल. चीनमधील अर्थव्यवस्थेतील मंदीचे परिणाम आता द़ृश्य स्वरूपात दिसण्यास सुरुवात.

* टाटा आणि एअरबस कंपन्यांमध्ये भारतीय सैन्यासाठी 56 विमानांचा 20 हजार कोटींचा करार. एअरबस डिफेन्स अँड स्पेस कंपनी भारतीय वायूदलास 56, सी-295 विमाने पुरवणार. यातील 16 विमाने लगेचच स्पेनमधून भारतात दाखल होतील.

तसेच उरलेली 40 विमाने टाटा अ‍ॅडव्हास सिस्टीम कंपनीद्वारे बनवली जातील. याद्वारे प्रत्यक्ष 15 हजार तसेच अप्रत्यक्षपणे 10 हजार जणांना रोजगार उपलब्ध होतील. या करारापश्चात टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटांनी दोन्ही कंपन्यांचे अभिनंदन केले.

* सहकारी बँकांमध्ये मधील बुडीत गेलेल्या बँकांमधील ठेवीदारांसाठी खुशखबर. ‘डीआयसीजीसी’कडून सुमारे 21 बुडीत सहकारी बँकांकडून 5 लाख डिपॉझिट इन्श्युरन्ससाठी पात्र ठेवीदारांची यादी मागवण्यात आली. यामध्ये पीएमसी, रूपी यांसारख्या सहकारी बँकांचा समावेश आहे. डिपॉझिट इन्श्युरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कार्पोरेशन बिल 2021 नुसार बँकेतील ठेव बुडवल्यास कमाल 5 लाखांपर्यंतची ठेव रक्कम ठेवीदारास मिळू शकते.

* मनोरंजन क्षेत्रासाठी मोठी बातमी. ‘झी इंटरटेन्मेंट’ आणि ‘सोनी पिक्चर्स’ नेटवर्क्स इंडिया कंपन्यांचे एकत्रीकरण होणार. एकत्रित कंपनीमध्ये झी कंपनीचा 47.07 टक्के तर सोनीचा 52.93 टक्के वाटा असेल. सोनी या एकत्रित झालेल्या कंपनीमध्ये 1.57 अब्ज डॉलर्स गुंतवणार.

या दोन्ही कंपन्यांचा बाजारहिस्सा (मार्केट शेअर) 27 टक्क्यांपर्यंत पोहोचेल. सध्या सोनी नेटवर्क्सचा महसूल 5800 कोटी, तर झी कंपनीचा महसूल 8100 कोटी आहे. विलीनीकरणपश्चात ही देशातील मनोरंजन क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी बनेल.

* आयपीओद्वारे भांडवलबाजारात उरणार्‍या कंपन्यांना सुगीचे दिवस. मॅक्लॉईड फार्मा 1 अब्ज डॉलर्सच्या आयपीओद्वारे बाजारात उतरणार. तसेच पुराणिक बिल्डर्सनेदेखील सेबीकडे अर्ज केला. तसेच आदित्य बिर्ला म्युच्युअल फंडाचा आयपीओ 29 सप्टेंबर रोजी खुला होणार. 5 रुपये फेस व्हॅल्यूच्या समभागाचा किंमत पट्टा 695-712 रुपये आहे. एकूण 2768 कोटींच्या जवळपास या आयपीओची किंमत आहे.

तसेच ओयो ही हॉटेलसंबंधी क्षेत्रातील कंपनीदेखील सुमारे 1 अब्ज डॉलर्स (सुमारे 7 हजार कोटी) भांडवल बाजारात उतरण्याच्या तयारीत. तसेच नुकताच बंद झालेला ‘पारस डिफेन्स’चा आयपीओ तब्बल 304.26 पट ओव्हर सब्स्क्राईब झाला. आतापर्यंतचा सर्वाधिक ओव्हर सब्स्क्राईब झालेला आयपीओ म्हणून या आयपीआने भारतीय बाजारात विक्रम प्रस्थापित केला.

* बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या भांडवल बाजारमूल्याने नवीन विक्रम प्रस्थापित केला. बीएसईचे बाजार भांडवलमूल्य 261.73 लाख कोटींवर पोहोचले. एकट्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडमूल्य 16 लाख कोटींवर पोहोचले.

सेन्सेक्सला 10 हजार अंक वाढवण्यासाठी केवळ 8 महिन्यांचा कालावधी पुरला. या वर्षात सेन्सेक्सने तब्बल 25 टक्के परतावा दिला. अमेरिकेच्या डॉजोन्सपेक्षा हा परतावा जवळपास दुपटीने अधिक आहे.

* 17 सप्टेंबर रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची परकीय गंगाजळी 1.47 अब्ज डॉलर्सनी घटून 639.642 अब्ज डॉलर्स झाली.

Back to top button