Stock Market Updates | गुजरातमध्ये भाजपचा झंझावात! शेअर बाजारात पाॅझिटिव्ह ट्रेंड, सेन्सेक्स ६२,५०० पार | पुढारी

Stock Market Updates | गुजरातमध्ये भाजपचा झंझावात! शेअर बाजारात पाॅझिटिव्ह ट्रेंड, सेन्सेक्स ६२,५०० पार

Stock Market Updates : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल आज (दि.८) जाहीर (Gujarat, Himachal Pradesh assembly election results 2022) होत आहेत. या दोन राज्यांतील निवडणुकीच्या निकालाचे शेअर बाजारात पडसाद दिसून येत आहेत. दरम्यान, सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टीने स्थिर सुरुवात केली. त्यानंतर दोन्ही निर्देशांकात चढ-उतार दिसून आला. गुजरात निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांनुसार भाजपने बहुमताकडे वाटचाल केल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीने तेजीच्या दिशेने झेप घेतली. सेन्सेक्स २०० हून अधिक अंकांनी वधारून ६२,६२० वर तर निफ्टीही वधारून १८,६०० वर गेला.

गुजरातमध्ये भाजपने १४६ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस २३, आप १० जागांवर आघाडीवर आहे. गुजरातमधील भाजपच्या विक्रमी बहुमतामुळे शेअर बाजारात सकारात्मक वातावरण तयार झाल्याचे चित्र दिसत आहे.

सेन्सेक्स ६२,४०० वर तर निफ्टी १८,५०० वर व्यवहार करत आहे. एसबीआय लाइफ, पॉवरग्रिड, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी लाइफ आणि टाटा मोटर्स यांचे शेअर्स आज NSE वर १.३५ टक्क्यांपर्यंत घसरले. याउलट आयशर मोटर्स, एल अँड टी, एम अँड एम, अपोलो हॉस्पिटल्स आणि अदानी एंटरप्रायझेस यांचे शेअर्स आघाडीवर होते.

जगभरात आर्थिक मंदीचे सावट आहे. तसेच महागाई उच्च स्तरावर पोहोचली आहे. हे मुद्दे देखील शेअर बाजारातील स्थिर व्यवहाराला कारणीभूत ठरले आहेत. अमेरिकेतील प्रमुख निर्देशांकांत घसरण झाल्याचे पडसाद आशियाई बाजारात दिसून येत आहेत. आशियाई बाजारात सुरुवातीच्या व्यवहारात संमिश्र वातावरण आहे. जपानचा निक्की निर्देशांक ०.७४ टक्क्यांनी आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी ०.७७ टक्क्यांनी घसरला. तर चीनचा शांघाय कंपोझिट ०.१६ टक्क्यांनी खाली आला आहे. हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक मात्र १.४५ टक्क्यांनी वधारला. गुरूवारी आशियाई बाजारांत सुरुवातीच्या व्यवहारात तेलाच्या किमती स्थिर होत्या.

आरबीआयने रेपो दर ३५ बेसिस पॉईंटने वाढवल्यानंतर शेअर बाजाराचा सेन्सेक्स बुधवारी २१५ अंकांनी घसरला होता. तर निफ्टी ८२ अंकांनी म्हणजेच ०.४४ टक्क्यांनी घसरून १८,५६० वर बंद झाला होता. (Stock Market Updates)

NSE आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी बुधवारी १,२४१.८७ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली, तर स्थानिक गुंतवणूकदारांनी ३८८.८५ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली. दरम्यान, ब्रेंट क्रूड फ्यूचर्स ०.७९ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ७७.७८ डॉलरवर पोहोचले.

हे ही वाचा :

Back to top button