Share Market Today | शेअर बाजारात तेजीचा उच्चांक कायम, सेन्सेक्सची ६३,५०० वर उसळी | पुढारी

Share Market Today | शेअर बाजारात तेजीचा उच्चांक कायम, सेन्सेक्सची ६३,५०० वर उसळी

Share Market Today : भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टीचा तेजीचा उच्चांक गुरुवारी (दि.१ डिसेंबर) कायम राहिला. आज गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ४०० हून अधिक अंकांनी वाढून ६३,५०० वर निफ्टी १०० अंकांनी वाढून १८,८०० वर गेला. दोन्ही निर्देशांकांचा नवा उच्चांक आहे. हिंदाल्को, टेक महिंद्रा, विप्रो, इन्फोसिस आणि टीसीएस हे आज NSE वर सर्वाधिक २.७३ टक्क्यांपर्यंत वाढलेल्या शेअर्समध्ये होते. याउलट बजाज ऑटो, आयशर मोटर्स, यूपीएल, पॉवरग्रीड आणि एचयूएल हे मागे पडलेले दिसत होते.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी मध्यवर्ती बँक लवकरच व्याजदर वाढीची गती कमी करू शकते असे सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील प्रमुख निर्देशाकांनी उसळी घेतली. यामुळे सुरुवातीच्या व्यवहारात आशियाई शेअर्समध्ये तेजी दिसून आली आहे. भारतीय शेअर बाजारातही सलग आठव्या दिवशी तेजी कायम राहिली.

दरम्यान, जपानचा निक्केई १.०६ टक्क्यांनी वधारला आहे. तर दक्षिण कोरियाचा कोस्पी ०.४९ टक्क्यांनी, चीनचा शांघाय कंपोझिट ०.९१ टक्क्यांनी वाढला आहे. हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक १.७४ टक्क्यांनी वाढला. अमेरिकेतील तिन्ही प्रमुख निर्देशांकांनी उसळी घेतली. (Share Market Today)

जुलै-सप्टेंबर या तिमाहीतील भारताची आर्थिक वाढ ६.३ टक्के आहे, जी मागील तीन महिन्यांतील १३.५ टक्के वाढीच्या निम्म्यापेक्षा कमी आहे. देशातील आर्थिक वाढीची गती मंद झाल्यामुळे गुंतवणूकदार सावध भूमिका घेऊ शकतात, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
NSE आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी बुधवारी ९,०१० कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली, तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी ४,०५६ कोटी रुपयांचे शेअर्स विकले.

बुधवारी (दि.३०) सेन्सेक्सने ६३,२०० चा टप्पा पार केला होता. तर निफ्टीने १८,७०० अंकांवर गवसणी घातली होती. दोन्ही निर्देशांकाचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. बुधवारी सेन्सेक्स ४१७ अंकांनी वाढून ६३,०९९ वर तर निफ्टी १४० अंकांनी वाढून १८,७५८ वर बंद झाला होता. एम अँड एम, हिंदाल्को, बजाज ऑटो, ग्रासिम, अल्ट्राटेक सिमेंट यांचे शेअर्स आघाडीवर राहिले होते.

हे ही वाचा :

Back to top button