महत्वाच्या अर्थवार्ता | पुढारी

महत्वाच्या अर्थवार्ता

* गत सप्ताहात निफ्टी व सेन्सेक्समध्ये एकूण अनुक्रमे 205.10 अंक व 630.16 अंकांची वाढ होऊन दोन्ही निर्देशांक 18512.75 अंक व 62293.64 अंकांच्या पातळीवर बंद झाले. बंदभाव पातळीचा विचार करता, क्लोजिंग बेसिस निफ्टीने व सेन्सेक्सने सर्वोच्च पातळीवर विक्रमी बंदभाव दिला. निफ्टीच्या वाढीस एचडीएफसी लाईफ (10.4 टक्के), अपोलो हॉस्पिटल्स (8.9 टक्के), भारत पेट्रोलियम (6.7 टक्के), इंडसिंड बँक (5.2 टक्के) यांसारख्या कंपन्या ठरल्या. निफ्टीमध्ये एकूण 1.12 टक्के, तर सेन्सेक्समध्ये एकूण 1.02 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. रुपया चलनाचा विचार करता, शुक्रवारच्या सत्रात रुपया चलन डॉलरच्या तुलनेत 8 पैसे मजबूत होऊन 81.62 रुपये प्रतिडॉलर स्तरावर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव कोसळल्याने रुपया चलन तसेच निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकाला सहारा मिळाला. महिन्याच्या सुरुवातीला असलेले 98 डॉलर प्रती बॅरल ‘बे्ंरट क्रूड’ आता 85 डॉलर प्रती बॅरल किमतीपेक्षा खाली उतरले. चीनमध्ये पुन्हा कोव्हिडची साथ पसरल्याने चीनकडून खनिज तेलाची मागणी घटली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव कोसळले. (अर्थवार्ता)

* फोलो ऑन पब्लिक ऑफर (एफपीओ)च्या माध्यमातून अदानी एंटरप्राईजेस 20 हजार कोटींचा निधी उभा करणार. अपारंपरिक स्रोतांद्वारे ऊर्जानिर्मिती (ग्रीन एनर्जी) तसेच डिजिटल व्यवसाय क्षेत्रात विस्तार करण्यासाठी या निधीचा वापर होणार.

* केंद्र सरकार कोल इंडिया, हिंदुस्थान झिंग, राष्ट्रीय केमिकल अ‍ॅड फर्टिलायझरसह पाच सरकारी कंपन्यांमधील 5 ते 10 टक्के हिस्सा विकून 16500 कोटींचा निधी उभा करणार.

* जगामध्ये आयपीओद्वारे भांडवल बाजारात पदार्पण केल्यावर सर्वाधिक खराब कामगिरी करणार्‍या कंपन्यांमध्ये भारतातील ‘पेटीएम’ कंपनीचा समावेश 2.4 अब्ज डॉलर्सच्या आयपीओद्वारे भांडवल बाजारात उतरल्यानंतर वर्षभरात या कंपनीच्या भांडवल बाजारमूल्यामध्ये (मार्केट कॅप) सुमारे 75 टक्क्यांनी घसरण नोंदवली गेली. स्पेनमधील ‘बनकिया’ कंपनीने यापूर्वी 2012 मध्ये 82 टक्के घसरणीचा विक्रम नोंदवला होता.

* सप्टेंबरअखेर भारतातील मोबाईल वापरकर्त्यांची संख्या 37 लाखांनी घटली. ‘ट्राय’ या सरकारी संस्थेच्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत मोबाईल वापरकर्त्यांची संख्या 1.149 अब्जवरून 1.145 अब्ज झाली. यामध्ये व्होडोफोन-आयडिया कंपनीने 4 दशलक्ष ग्राहक गमावले, तर रिलायन्स-जिओने सर्वाधिक म्हणजे 7 लाख तसेच एअरटेलने 4 लाख नवीन ग्राहक जोडले. मागील सहा महिने मोबाईल वापरकर्त्यांच्या संख्येत सातत्याने वाढ झाल्यानंतर सप्टेंबरमध्ये प्रथमच घट नोंदवण्यात आली.

* ऑनलाईन शिक्षणसुविधा पुरवणार्‍या स्टार्ट अप ‘बायजूज’ कंपनीमध्ये नेदरलँडस्च्या ‘प्रोसस’ या गुंतवणूकदार कंपनीने 9.67 टक्के हिस्सा 578 दशलक्ष डॉलर्सना खरेदी केला.

* ट्विटर, अ‍ॅमेझॉन, मेटा (फेसबुक) यांच्यानंतर गुगलमध्ये कर्मचारी कपातीसाठी प्रयत्न. सध्या 10 हजार कर्मचार्‍यांवर रोजगार कपातीची टांगती तलवार. आतापर्यंत मेटामध्ये 11 हजार, अ‍ॅमेझॉनमध्ये 10 हजार, ट्विटरमध्ये 8 हजार कर्मचार्‍यांची गच्छंती. आतापर्यंत जागतिक पातळीवर सुमारे 1 लाख 35 हजार आयटी अणि स्टार्ट अप क्षेत्रातील कर्मचार्‍यांनी आपला रोजगार गमावला. याचप्रमाणे इंटेल कंपनीमध्ये सुमारे 2 टक्के, सिस्को कंपनीमध्ये 4 हजार कर्मचार्‍यांना बडतर्फ करण्यासाठी हालचाली सुरू.

* मुकेश अंबानींचा ‘रिलायन्स’ उद्योग समूह लवकरच वित्तसंबंधी क्षेत्रात उतरणार. ‘जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस’ कंपनीद्वारे कर्जपुरवठा क्षेत्रात उतरण्याचे संकेत. एकूण सुमारे 1 लाख कोटींची कंपनी असण्याचा अंदाज ‘मक्वायरी’ या पतमानांकन संस्थेने वर्तवला आहे. यामुळे ‘बँकिंग’ आणि ‘नॉनबँकिंग फायनान्शिअल’ एनबीएफसी क्षेत्रातील स्पर्धा तीव— होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला.

* मुकेश अंबानी यांच्या ‘जिओ इन्फोकॉम’ कंपनीला अनिल अंबानी यांची दिवाळखोर कंपनी ‘रिलायन्स इन्फाटेल’ कंपनी खरेदी करण्याची ‘नॅशनल कंपनीला ट्रिब्युनल’ या सरकारी संस्थेची परवानगी. दिवाळखोरीसंबंधी प्रकरणे हाताळणार्‍या न्यायालयाने एकूण 3720 कोटी ‘एस्क्रो’ खात्यात जमा करण्याचे आदेश जिओ इन्फोकॉमला दिले. मार्च 2020 साली सुरू झालेली ही प्रक्रिया विविध कारणांमुळे प्रलंबित होती.

* ऑक्टोबरअखेर भारतातील ‘डिमॅट’ खात्यांची संख्या विक्रमी 10.40 कोटींवर. मागील वर्षीच्या तुलनेत 41 टक्क्यांची वाढ. युक्रेन युद्धामुळे परदेशातून भारतात येणारी गुंतवणूक (एफडीआय) चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत 9 टक्के घटून 38.9 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली. इक्विटीमार्फत शेअर बाजारात येणारी गुंतवणूक 14 टक्के घटून 26.9 अब्ज डॉलर्स झाली. परंतु भारतातील स्थानिक गुंतवणूकदार आणि म्युच्युअल फंड इंडस्ट्रीने बाजाराला सावरले.एसआयपीद्वारे सातत्याने मेपासून 12 हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक शेअर बाजारात होत आहे. एसआयपीचे भांडवल बाजारमूल्य ऑक्टोबरअखेर 6.6 लाख कोटींवर गेले.

* 18 नोव्हेंबरअखेर संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश गंगाजळी 2.5 अब्ज डॉलर्सनी वधारून 544.7 अब्ज डॉलर्स झाली. मागील चार आठवड्यांत मिळून गंगाजळी एकूण 22.7 अब्ज डॉलर्सनी वाढली.

-प्रीतम मांडके (मांडके फिनकॉर्प)

Back to top button