गुंतवणूक : नवीन फंडांची मांदियाळी | पुढारी

गुंतवणूक : नवीन फंडांची मांदियाळी

गेल्या सहा महिन्यांपासून मिडकॅप इंडेक्सने जवळपास पंधरा टक्के वाढ नोंदवलेली आहे. बाजारातील तेजीचा मिडकॅप कंपन्यांना चांगला फायदा होतो, असा इतिहास आहे कारण मिड कॅप कंपन्या या भावी लीडर असतात.

‘बाजारात तेजीचे वारे वाहू लागले की, नवीन म्युच्युअल फंड योजनांचे पीकही जोमदार येऊ लागते. अशाच नुकत्याच बाजारात आलेल्या तीन एनएफओची माहिती आपण आज घेऊ!

त्यापैकी पहिला फंड आहे व्हाईट ओक लार्ज कॅप फंड! व्हाईट ओक कॅपिटल ही सर्वसामान्यांना काहीशी अपरिचित असणारी गुंतवणूक व्यवस्थापन पाहणारी कंपनी आहे. प्रशांत खेमका यांनी 2017 साली तिची स्थापना केली. तत्पूर्वी ते गोल्डमन सॅक्स (Goldman Sachs) या विख्यात अमेरिकन मल्टीनॅशनल इन्व्हेस्टमेेंट बँकेत CIO म्हणून सन 2000 पासून कार्यरत होते. व्हाईट ओक कॅपिटल ही कंपनी जगभरातील पोर्टफोलिओ मॅनेजमेंट कंपन्यांच्या फंडांचे व्यवस्थापन पाहते. 31 ऑक्टोबर 2022 अखेर तिचा अणच (Assets Under Management) 5.8 बिलीयन यूएस डॉलर्स इतका होता. भारतीय चलनात ही रक्कम सांगायची, तर ती होते जवळपास 47560 कोटी रु.

या व्हाईट ओक कॅपिटलचा लार्ज कॅप फंड बाजारात आला आहे. त्याचा NFO कालावधी आहे 10 नोव्हेंबर 2022. या कालावधीत या फंडामध्ये गुंतवणूक करणार्‍यांना 10 रु. प्रती युनिटने गुंतवणूक करता येईल. हा लार्ज कॅप फंड असल्यामुळे फंडाची किमान 65 ते कमाल 80 टक्के गुंतवणूक ही भारतातील अग्रगण्य अशा ब्ल्यूचिप कंपन्यांमध्ये होईल. S & P BSE 100 TRI हा या फंडाचा बेंचमार्क इंडेक्स आहेे.

सर्वसामान्य गुंतवणूकदारांना अत्यंत आकर्षक वाटतील अशी या फंडाची दोन वैशिष्ट्ये आहेत. पहिले म्हणजे किमान 500 रु. भरून तुम्हाला या फंडात भाग घेता येतो आणि दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या फंडाचा HDFC Business Cycle Fund! लागू होण्याचा कालावधी आहे. केवळ एक महिना शेअर बाजारात प्रथमच प्रवेश करणार्‍या गुंतवणूकदारांसाठी हा फंड म्हणजे त्रिवेणी संगम आहे. तो अशा अर्थाने की, प्रथम गुंतवणूक करणार्‍या लोकांनी प्रत्यक्ष शेअर्समध्ये गुंतवणूक न करता म्युच्युअल फंडामध्ये करावी. लार्ज कम कंपन्यांमधील गुंतवणूक सुरक्षित मानली गात असल्यामुळे प्रथम गुंतवणुकीसाठी लॉर्ज कॅप फंड निवडावा आणि तिसरी गोष्ट म्हणजे सुरुवात नेहमी अल्प गुंतवणुकीने करावी.

दुसरा NFO आहे. कॅनरा रोबेको मिडकॅप फंड! कॅनरा रोबेको या अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीविषयी अधिक काही सांगावे, अशी स्थिती नाही. कारण कॅनरा बँक ही भारतातील चौथ्या क्रमांकाची मोठी राष्ट्रीयीकृत बँक आहे. आणि रोबेको ग्रुप हा नेदरलँडमधील रोबो बँकेच्या आधिपत्त्याखाली अ‍ॅसेट मॅनेजमेंटचे काम करणारा प्रचंड मोठा ग्रुप आहे. शिवाय भारतातील सर्वात जुन्या म्युच्युअल फंड कंपन्यांपैकी कॅनबँक म्युच्युअल फंड ही कंपनी आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून मिड कॅप इंडेक्सने जवळपास पंधरा टक्के वाढ नोंदवलेली आहे. बाजारातील तेजीचा मिड कॅप कंपन्यांना चांगला फायदा होतो, असा इतिहास आहे कारण मिड कॅप कंपन्या या भावी लीडर असतात. त्यांच्या वाढीचा वेग लार्ज कॅप कंपन्यांपेक्षा अधिक असतो. विस्तारालाही अधिक वाव असतो. परंतु लार्ज कॅप कंपन्यांपेक्षा अधिक अस्थिरताही मिड कॅप कंपन्यांमध्ये असते. त्यामुळे जे अगोदरच शेअर बाजाराशी परिचित आहेत, ज्यांना आपल्या गुंतवणुकीत वैविध्य हवे आहे आणि किमान पाच वर्षे ज्यांची वाट पाहण्याची तयारी आहे, त्यांनी या फंडामध्ये गुंतवणूक करावी.

तिसरा फंड आहे HDFC Business Cycle Fund! बँकिंग जीवन विमा सर्वसाधारण विमा, म्युच्युअल फंड, गृहबांधणी कर्जे अशा सर्व वित्तीय क्षेत्रांमध्ये आपला अत्यंत दर्जेदार व्यवस्थापनाच्या ठसा उमटवणारा एचडीएफसी हा ग्रुप आहे. Expansion, Peak, Conrtabtion आणि Slump या अवस्थांमधून कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था आणि पर्यायाने त्या देशातील उद्योग जात असतात. सर्वसाधारणपणे देशाची अर्थव्यवस्था नव्या वळणावर उभी असते, मंदीतून सावरून वरच्या दिशेने झेप घेण्याची सर्वांना आशा असते, अशा वेळी कंपन्या Business Cycle फंडस् बाजारात आणतात. जे फंड मॅनेजर इतर वेळी Bottom-up Approach बाळगतात, ते इथे अगदी उलटा द़ृष्टिकोन पकडतात. म्हणजे ते आधी कोणती क्षेत्रे उभारी घेण्याची शक्यता आहे ते पाहून त्या क्षेत्रातील चांगल्या कंपन्या गुंतवणुकीसाठी निवडतात.

या प्रकारच्या फंडाचे यश हे संपूर्णपणे फंड मॅनेजरच्या कौशल्यावर लवलंबून असते. त्यामुळे उच्च जोखीमक्षमता असणार्‍यांनीच या फंडामध्ये गुंतवणूक करावी.

शेवटी एका वादाच्या मुद्द्याबद्दल बाजारातील बरेच गुंतवणूक तज्ज्ञ NFO मध्ये गुंतवणूक करण्याच्या विरुद्ध असतात. त्यांच्या विरोधाचा मोठा मुद्दा असतो, तो NFO ना Track Record नसतो. हा म्हणजे नवीनच फंड असल्यामुळे आपण त्याच्या कारकिर्दीच मोजमाप घेऊ शकत नाही. परंतु हा मुद्दा तितकासा बरोबर नाही. कारण फंड जरी नवीन असला तरी फंड मॅनेजर अनुभवीच असतात. आपली गुणवत्ता त्यांनी अगोदरच सिद्ध केलेली असते. आणि लोकांनाही नवीन गोष्टींचे आकर्षण असते. शिवाय 10 रु. NAU ने आपल्याला युनिटस् मिळतात, ही गोष्ट तर फारच आकर्षक असते.

भारत साळोखे
अ‍ॅम्फी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर

Back to top button