अर्थवार्ता | पुढारी

अर्थवार्ता

गत सप्ताहात शुक्रवारच्या सत्रात निफ्टीने एकूण 321.50 व सेन्सेक्सने 1181.34 अंकांची भरारी घेऊन अनुक्रमे 18349.7 अंक व 61795.04 अंकांच्या पातळीवर बंदभाव दिला. निफ्टीमध्ये एकूण 1.78 टक्के, तर सेन्सेक्समध्ये एकूण 1.95 टक्क्यांची वाढ नेंदवली गेली. अमेरिकेमध्ये सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात महागाईदर (सीपीआय इन्फ्लेक्शन) कमी आल्याने जगभरच्या भांडवल बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सप्टेंबरमध्ये असलेला 8.2 टक्के महागाईदर ऑक्टोबरमध्ये 7.7 टक्के झाल्याने अमेरिकेची मध्यवर्ती बँक ‘फेडरल रिझर्व्ह’ व्याजदर वाढ करताना काहीशी नरमाईची भूमिका स्वीकारेल, अशी अपेक्षा गुंतवणूकदारांना आहे. यामुळे निफ्टी व सेन्सेक्सने मागील 1 वर्षातील सर्वोच्च पातळी गाठली. तसेच रुपया चलनदेखील डॉलरच्या तुलनेत एकाच दिवसात तब्बल 98 पैसे मजबूत झाले. शुक्रवारच्या सत्रादरम्यान रुपया डॉलरच्या तुलनेत जवळजवळ 1.49 टक्के मजबूत होता आणि सत्राअखेर रुपयाने 1.21 टक्के मजबुतीसह 80.82 रुपये प्रतिडॉलर स्तरावर बंदभाव दिला. 26 मार्च 2020 नंतरची एकाच दिवसात झालेली ही सर्वाधिक वाढ आहे. एचडीएफसी लिमिटेड व एचडीएफसी बँक या दोघांनी सुमारे 5 टक्के, तर इन्फोसिस (4.5 टक्के), टेक महिंद्रा (3.6 टक्के), एचसीएल टेक (3.5 टक्के), टीसीएस (3.4 टक्के) वाढ दर्शवून निफ्टी व सेन्सेक्स वाढीस हातभार लावला.

चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत एलआयसीचा नफा 11 पट वधारून 1434 कोटींवरून 15952 कोटी झाला. ताळेबंद मांडण्याच्या पद्धतीत बदल केल्याने (अकाऊटिंग पॉलिसी) नफा वधारला. तसेच 6785 कोटींच्या इतर उत्पन्नाचे (अदर इन्कम) देखील नफ्यात भर घातली.

देशातील महत्त्वाची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सचा तोटा चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत 898 कोटींपयर्र्ंत खाली आला. मागील वर्षी याच तिमाहीत तोटा 4416 कोटी होता. एकूण महसुलात मागील वर्षीच्या तुलनेत 29.7 टक्क्यांची वाढ होऊन महसूल 61379 कोटींवरून 79611 कोटी झाला. कंपनी लवकरच न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजवरून स्वेच्छेने बाहेर पडणार. जानेवारी 2023 पर्यंत टाटा मोटर्सचे ‘अमेरिकन डिपॉझिटरी शेअर्स’ न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजमधून डिलिस्ट होतील.

केंद्र सरकारने ‘स्पेसीफाईड अंडरटेकिंग ऑफ युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया’(डणणढख) च्या माध्यमातून अ‍ॅक्सिस बँकमध्ये असलेला अखेरचा 1.55 टक्क्यांचा हिस्सा 4 हजार कोटींना विकला. ‘ऑफर फॉर सेल’च्या माध्यमातून हिस्साविक्री करण्यात आली. यापुढे केवळ एलआयसीचा अ‍ॅक्सिस बँकेमध्ये 8.14 टक्क्यांचा हिस्सा बाकी.

आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे ‘आयओसी’, ‘एचपीसीएल’, ‘बीपीसीएल’ या सरकारी कंपन्या तोट्यात. चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत तिन्ही कंपन्यांना मिळून एकूण 2748.66 कोटींचा तोटा. केंद्र सरकारने एलपीजी विक्रीतून होणारा तोटा भरून काढण्यासाठी 22 हजार कोटींचा मदतनिधी दिला होता, तरीदेखील कंपन्यांना तोटा सहन करावा लागला. ‘आयओसी’ला 272.35 कोटी, ‘एचपीसीएल’ला 2172.14 कोटी, तर ‘बीपीसीएल’ला 304.17 कोटी तोटा झाला.

कर्जाच्या बोज्याखाली दबलेल्या ‘रिलायन्स कॅपीटल’ कंपनीचा 51 टक्के हिस्सा असलेल्या ‘रिलायन्स निप्पॉन लाईफ इन्शुरन्स’ कंपनीमधील हिस्सा विक्रीसाठी ‘रिलायन्स कॅपीटल’चे प्रशासक प्रयत्नशील. या कंपनीमधील हिस्सा खरेदीसाठी आदित्य बिर्ला सनलाईन इन्श्युरन्स व जपानची निप्पॉन लाईफ एकत्र येऊन बोली लावण्याची शक्यता. सध्या ‘निप्पॉन लाईफ’चा ‘रिलायन्स निप्पॉन लाईन इन्शुरन्स’मध्ये 49 टक्के हिस्सा, तर उर्वरित 51 टक्के हिस्सा ‘रिलायन्स कॅपीटल’कडे.

सप्टेंबर महिन्यात भारताचा औद्योगिक वृद्धीदर निर्देशांक (आयआयपी) मागील वर्षीच्या तुलनेत 3.1 टक्के झाला. पायाभूत सुविधा, ऊर्जानिर्मिती, खनिज उत्खनन क्षेत्र यांनी वाढ दर्शवली. परंतु ग्राहक दैनंदिन वापराच्या (कन्स्युमर ड्युरेबल्स) वस्तूंच्या निर्मिती क्षेत्राने मात्र घट दर्शवली.
कर्जाच्या बोज्याखाली दबलेल्या फ्यूचर रिटेल कंपनीला खरेदी करण्यासाठी मुकेश अंबानी व गौतम अदानी उद्योगपती आमने-सामने. ‘फ्युचर रिटेल’ला खरेदीसाठीची याचिका (एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट) रिलायन्स रिटेल व्हेंचर्स तसेच अदानी उद्योग समूहाची उपकंपनी ‘मून रिटेल’ यांनी दाखल केली. फ्युचर रिटेल खरेदीसाठी देशापरदेशातील सुमारे डझनभर उद्योगसमूह उत्सुक आहेत. फ्युचर रिटेलवर एकूण 33 कर्जदात्यांनी (क्रेडिटर्स) 21,057 कोटींचे कर्ज थकवल्याचा दावा केला आहे. फ्युचर रिटेलची 397 शहरांत 1308 दुकाने असून आर्थिक वर्ष 2021 मध्ये कंपनीचा महसूल 6261 कोटी होता.

देशातील महत्त्वाची वाहनकंपनी महिंद्रा आणि महिंद्राने चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत आजवरचा सर्वोच्च महसूल मिळवला तसेच नफा 46 टक्के वधारून 2090 कोटी झाला. महसुलात मागील वर्षीच्या तुलनेत 57 टक्क्यांची वाढ होऊन महसूल 13314 कोटींवरून थेट विक्रमी 20839 कोटींवर पोहोचला. तसेच महिंद्रा कंपनी दुचाकी उत्पादक पिजिऑट कंपनीमधील हिस्सा विकणार. ‘म्यूचर’ कंपनी ‘पिजिऑट’मध्ये 50 टक्के इक्विटीसह 80 टक्क्यांचा हिस्सा खरेदी करणार.

ऑक्टोबर महिन्यात ‘एसआयपी’च्या माध्यमातून म्युच्युअल फंडामध्ये विक्रमी 13 हजार कोटींची गुंतवणूक. चालू आर्थिक वर्षात पहिल्या सात महिन्यांत एसआयपीद्वारे तब्बल 87 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली. ऑक्टोबरमध्ये इक्विटी सदरात 9390 कोटी एसआयपीच्या माध्यमातून गुंतवले गेले.

14 नोव्हेंबर रोजी संपलेल्या सप्ताहाअखेर भारताची विदेशी गंगाजळी 1.1 अब्ज डॉलर्सनी घटून 529.9 अब्ज डॉलर्स झाली. सोने धातूच्या साठ्यात (रिझर्व्ह) झालेल्या घटमुळे गंगाजळी खाली आली. सोन्याच्या साठ्यात 705 दशलक्ष डॉलर्सची घट होऊन साठा 37 अब्ज डॉलर्स झाला.

Back to top button