Stock Market Updates | फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाने गुंतवणूकदार बिथरले, सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद | पुढारी

Stock Market Updates | फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाने गुंतवणूकदार बिथरले, सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद

Stock Market Updates : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने चौथ्यांदा केलेली व्याजदर वाढ आणि कमकुवत जागतिक संकेताचे पडसाद आज गुरुवारी (दि.३) भारतीय शेअर बाजारात उमटले. आजच्या सत्रात सेन्सेक्स, निफ्टीत चढ-उतार दिसून आला. गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरण झाली होती. पण त्यानंतर सकाळी साडेदहाच्या सुमारात या घसरणीला ब्रेक लागला होता. यामुळे सेन्सेक्स ६०,८०० वरुन ६१ हजारांच्या दिशेने झुकला होता. तर निफ्टी १८ हजारांवर गेला आहे. त्यानंतर पुन्हा घसरणीचा ट्रेंड सुरु झाला. सेन्सेक्स ६९ अंकांनी खाली येऊन ६०,८३६ वर बंद झाला. तर निफ्टी ३० अंकांनी घसरून १८,०५२ वर बंद झाला.

प्री ओपन सत्रात सेन्सेक्स ३५० अंकांनी घसरला होता. तर निफ्टी १८ हजारांच्या खाली आला होता. त्यानंतर सत्र सुरु होताच सेन्सेक्स ६०,८०० वर राहिला. दरम्यान, बुधवारच्या ८२.७८ च्या तुलनेत गुरुवारी रुपया प्रति डॉलर ८२.८८ वर खुला झाला होता.

फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरवाढीच्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजवर रात्रभर घसरण झाली. याचा मागोवा घेत आशियाई समभागही घसरले. जपानचा निक्केई निर्देशांक ०.०५ टक्क्यांनी तर दक्षिण कोरियाचा KOSPI ०.५५ टक्क्यांनी घसरला. शांघाय कंपोझिट निर्देशांक ०.१२ टक्क्यांनी आणि हँग सेंग निर्देशांक २.३७ टक्क्यांनी घसरला.

फेडरल रिझर्व्ह व्याजदरात आणखी ७५ बेसिक पॉइंट्सची वाढ

अमेरिकेची प्रमुख बँक फेडरल रिझर्व्हने (US Federal Reserve) बुधवारी वाढती महागाई कमी करण्यासाठी व्याजदरात आणखी ७५ बेसिक पॉइंट्सची वाढ केली. फेडरल रिझर्व्हने याआधी २१ सप्टेंबर रोजी व्याजदरात ७५ बेसिक पॉइंटची वाढ केली. आता चौथ्यांदा व्याजदरवाढ केली आहे. अमेरिका गेल्या काही वर्षापासून वाढत्या महागाईचा सामना करत आहे. सप्टेंबरसाठी महागाई दर ८.२ टक्क्यांवर होता. जो फेड रिझर्व्हने निश्चित केलेल्या उद्दिष्टाच्या चारपट जास्त आहे. सप्टेंबरमध्ये फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी सांगितले होते की महागाई दर २ टक्क्यांवर आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

ITC च्या शेअर्सचा उच्चांक


बीएसईवर १,१०५ शेअर्सची घसरण होताना १,२१० शेअर्स वाढताना दिसले. ITC च्या शेअर्सनी १ टक्‍क्‍यांची वाढ नोंदवून गुरुवारच्‍या ट्रेडमध्‍ये नवीन उच्चांक गाठला.

महिंद्रा फायनान्सचे शेअर्स ९.५ ९.६३ टक्क्यांनी वधारले

महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेसच्या शेअर्सनी ९.६३ टक्क्यांनी वाढून २१२.१५ रुपयांवर व्यवहार केला. या शेअरने त्याच्या आधीच्या १९३.६० रुपयांच्या तुलनेत २१२.९५ रुपयांचा इंट्राडे उच्चांक गाठला आहे. टेक महिंद्राचे शेअर्स २ टक्क्यांनी घसरले होते.

हे शेअर्स ठरले टॉप लुजर्स

हिंदाल्को, विप्रो, टेक महिंद्रा, इन्फोसिस आणि कोल इंडिया हे आज NSE प्लॅटफॉर्मवर टॉप लुजर्स होते. त्यांचे शेअर्स २.१५ टक्क्यांपर्यंत घसरले होते. याउलट बजाज ऑटो, टायटन, यूपीएल, आयटीसी आणि हीरो मोटोकॉर्प हे सर्वाधिक नफा मिळवणाऱ्यांमध्ये होते.

आरबीआय पतधोरणविषयक समितीची बैठक

भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेची पतधोरणविषयक समितीची (MPC) आज बैठक होत आहे. महागाई अद्याप नियंत्रणात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, आरबीआय आपल्या अहवालाचा तपशील त्वरित सार्वजनिक करणार नाही.

हे ही वाचा :

Back to top button