डेट फंड | पुढारी

डेट फंड

आपल्या देशातील गुंतवणूक क्षेत्रामध्ये आज अनेक नवनवीन पर्याय उपलब्ध झाले आहेत. बँक एफडीपेक्षा सुरक्षित आणि बँकेहून अधिक चांगला परतावा मिळण्यासाठी म्युच्युअल फंडामधील डेट फंड पर्याय उपलब्ध आहेत. गुंतवणुकीचे सुरक्षित आणि अधिक परतावा म्हणून एकूण घरगुती मालमत्तेपैकी 60% हून अधिक रक्कम बँकेच्या विविध योजनांमध्ये पारंपरिक पद्धतीने ठेवीत गुंतवणूक केली जाते. रु. 5 लाखांपर्यंतच्या ठेवीला विमा संरक्षण असते. म्हणजे बँक बुडाली, तर पाच लाखांपर्यंत तुम्हाला विमा कंपनीकडून ठेव परत मिळू शकते. त्यासाठी बँकेने ठेवीचा विमा हप्ता भरला आहे का, ते पाहणे गरजेचे आहे.

आपल्या देशात सेबीच्या आधिपत्या खाली म्युच्युअल फंड क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 2012 साली 7 लाख कोटी गुंतवणूक मालमत्ता असलेले क्षेत्र आता 40 लाख कोटींवर पोहोचले आहे. मागील दहा वर्षांत अनेक गुंतवणूकदाराना चांगला फायदा मिळालेने पाच पटीहून अधिक वृद्धी या क्षेत्रात पाहावयास मिळत आहे. इक्विटी डेब्ट हायब्रिड कमोडिटी अशा वेगवेगळ्या मालमत्तेमधील 2000 हून अधिक योजना पाहावयास मिळतात. डेट म्युच्युअल फंडामध्ये अगदी एका दिवसापासून दहा-पंधरा वर्षांसाठी दीर्घकाळासाठी सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओव्हर नाईट फंड, मनी मनी मार्केट, लिक्विड फंड, ट्रेझरी अँड फंड, शॉर्ट टर्म फंड, अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड, लो दुरेशन फंड, लाँग टर्म डेट फंड, बाँड फंड, कॉर्पोरेट बाँड फंड असे अनेक प्रकारच्या योजना गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहेत.

अनेक गुंतवणूकदारांकडून जमा रक्कम त्या योजनेच्या उद्देशानुसार फंड मॅनेजरकडून कमर्शियल पेपर, कॉर्पोरेट किंवा सरकारी बाँड. सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट, ट्रेझरी बिल, गव्हर्नमेंट बाँड्स अशा अनेक ठिकाणी कमी-जास्त मुदतीनुसार गुंतवणूक केली जाते. आपल्या गुंतवणुकीच्या उद्देशानुसार इथे योजनांची निवड करता येते. जर तुमच्याकडे मोठी रक्कम आली असेल. दोन-चार दिवसांसाठी गुंतवणूक करून त्याच्यावर व्याज मिळवायचे असेल, तर ओव्हरनाईट फंड किंवा लिक्विड फंडामध्ये गुंतवणूक करून मिळविता येते. अल्पकाळासाठी येणारे पैशाचे प्रभावी व्यवस्थापन करू शकतो. मोठमोठ्या कंपन्या, बँका या योजनेचा प्रभावी वापर करतात.

जोखीम : म्युच्युअल फंड योजना सेबीच्या नियमानुसार चालत असतात. अशा नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे राबविली जाते. इथे मिळणारा व्याजदर हा अनिश्चित असतो. रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार व्याजदरातील वेळोवेळी होणारे बदलाचा परिणाम होत असल्याने व्याजदराची जोखीम इथल्या गुंतवणुकीवर आढळून येते. बाजारात जेव्हा व्याजदर वरच्या स्तरावर असतात, तेव्हा गुंतवणूक फायदेशीर ठरते बाजारातील व्याजदर कमी होतात, त्यावेळी इथे जास्त परतावा मिळतो. व्याजदर वाढले की परतावा कमी मिळतो. दुसरी जोखीम क्रेडिट जोखीम असू शकते म्हणजे एखाद्या कंपनी म्युच्युअल फंड योजनेने गुंतवणूक केली असेल अन् ती कंपनी डिफॉल्ट झाली, तर तितकी रक्कम परत लवकर मिळत नाही. या ठिकाणी अनेक कंपन्यांना कर्ज दिले असते. एखादी कंपनी डिफॉल्ट झाली तरी फार मोठा फरक पडत नाही; परंतु बँक बंद पडली तर 5 लाखांवरील रक्कम वर्षानुवर्षे मिळत नाही, हे सत्य आहे.

पारदर्शीपणा : डेट फंडविरुद्ध बँक मुदत ठेवींची तुलना केली, तर बँक ठेवीदारांना बँकांनी दिलेली कर्जे, बँकांचे एनपीए, बुडीत कर्जे राईट ऑफ इत्यादींबद्दल फारच कमी माहिती असते. दुसरीकडे डेट फंड अतिशय पारदर्शक असतात कारण योजनेतील कोणकोणत्या कंपन्यांना किती प्रमाणात कर्जे दिली आहेत, त्या पोर्टफोलिओची माहिती दर महिन्याला दिली जाते. ऑनलाईनवर ही माहिती उपलब्ध असते. दर दिवसाला आपल्या गुंतवणुकीचे मूल्य बदलत असते, तेही स्वतःच्या मोबाईल वर पाहू शकता.

तरलता : बँक मुदत ठेव आणि डेट फंड यांची तरलता आघाडीवर तुलना केल्यास, दोन्ही अत्यंत तरल आहेत. फिक्स डिपॉझिट तुमचे पैसे डिपॉझिट खात्यात ठराविक कालावधीसाठी ठराविक व्याजदरासाठी लॉक करते. मुदत पूर्ण झाली तरच या ठेवीवर योग्य व्याज मिळवू शकतो. परंतु डेट फंडमध्ये लॉक-इन नसते. कधीही कितीही रक्कम काढू शकतो. समजा बँकेत दहा लाखांची तीन वर्षांसाठी 7% दराने ठेव ठेवली असेल आणि मुदतपूर्व ऋऊ काढण्यासाठी गेलात, तर ती एफडी ब्रेक करावी लागते. नमूद केलेले व्याजदर मिळत नाही. त्या व्याजदरात कपात केली जाते. असे डेट फंडामध्ये घडत नाही. पण काही डेट फंडांमध्ये एक्झिट लोड सोडले, तर कोणतीही रक्कम किंवा व्याज दरात वजावट केली जात नाही. जी काही गुंतवणूक व्हॅल्यू असेल, ती रक्कम मिळते. ओव्हर नाईट, लिक्विड फंडासारख्या कमी कालावधी योजनेत कोणतेही एक्झिट लोड आकारत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही डेट फंडाची एक्झिट लोड रचना तपासली पाहिजे.
वरील चार्ट पाहिल्यास, बँकेतील मुदत ठेवींवरील मिळणार्‍या व्याजावरील आयकर कपात केल्यानंतर निव्वळ परतावा हा 4.83% मिळत आहे. आणि डेट फंडातील गुंतवणुकीवर इंडेएक्सशन बेनिफिट घेऊन 6.72% परतावा मिळत आहे. हे सत्य आहे.

वायटीएम बुक करा : डेट फंडातील गुंतवणुकीवर अर्थव्यवस्था व व्याज दराचा परिणाम ऋण बाजारावर होत असतो म्हणून गुंतवणूक करताना आपली गरज म्हणजे कालावधी पाहून डेट फंडामधील गुंतवणूक योजनांची निवड करणे गरजेचे आहे. सध्या कोरोना काळानंतर महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यावर पर्याय म्हणून अनेक देशांतील सेंट्रल बँकांनी व्याजदर वाढविले आहेत. आपल्या देशात ही मागील सहा महिन्यांत दीड ते दोन टक्क्यांपर्यंत व्याजदर वाढले आहेत. त्यामुळे सध्या सरकारी बाँड 7.40% पर्यंत बाँड इल्ड वाढलेले दिसत आहे. म्हणून आता डेट फंडामध्ये गुंतवणूक करणे भविष्याच्या द़ृष्टीने फायद्याचे आहे. जर समजा, भविष्यात व्याजदर 1% नी कमी झाले तर डेट फंडामध्ये 1% अधिक परतावा मिळतो. सध्याचे वाढलेले व्याजदर महागाई आटोक्यात आणण्यासाठी केले आहेत. भविष्यात व्याजदर कमी होण्याची दाट शक्यता आहे. अशा प्रसंगांमुळे तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक आणि बँक एफडीपेक्षा चांगला परतावा मिळण्याची खात्री डेट फंडाकडून मिळणार आहे. म्हणून सध्याचा काळ डेट फंडामध्ये गुंतवणुकीचा काळ आहे, त्याचा फायदा घेतला पाहिजे.

करमुक्त परतावा किती मिळतो?

डेट फंड योजनेतील परतावा हा प्रत्येक त्या त्या योजनेतील प्राथमिक उद्दिष्टानुसार ठरलेला असतो. सुरक्षित गुंतवणूक आणि स्थिर उत्पन्न देणे या उद्देशानुसार डेट फंड कार्य करत असतो. यासाठी विविध कालावधींसाठी विविध गुंतवणूक डेट फंडांची तुम्हाला निवड करणे गरजेचे असते. उदा. कधीही लागणारा पैसा हा आपण बचत खात्यावर ठेवतो. जिथे 2.5 ते 3% परतावा मिळतो. तीच रक्कम जर लिक्विड फंडात ठेवली, तर तुम्हाला 4 ते 5% परतावा मिळतो. जर तुम्ही तीन वर्षांपेक्षा जास्त रक्कम ठेवणार असाल, तर शॉर्ट टर्म डेट किंवा लाँग टर्म डेट फंड योजनेची निवड करावी लागेल. बँकेकडून मिळालेल्या व्याजावर आपल्या आयकर स्लॅबनुसार कर भरावा लागतो. कर भरल्यानंतर आपणास निव्वळ परतावा किती मिळतो ते पाहावे लागेल. तसे डेट फंड गुंतवणुकीवर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि तीन वर्षांनंतर लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स बसतो. तीन वर्षांनंतर डेट फंडातून मिळालेल्या उत्पन्नातून तीन वर्षांत इंडेएक्सशन बेनिफिट म्हणजेच वाढलेली महागाई वजा करून त्यावर 20% टॅक्स द्यावा लागतो. उच्च आयकर स्तरावरील लोकांचे गुंतवणुकीवर तीन वर्षांच्या कालावधीसाठी डेट फंड आणि बँक एफडीवर मिळणारा परतावा किती मिळतो हे वरील तक्त्यावरून लक्षात येईल.

अनिल पाटील
प्रवर्तक, एसपी वेल्थ, कोल्हापूर

Back to top button