अर्थवार्ता | पुढारी

अर्थवार्ता

* गत सप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकांमध्ये एकूण अनुक्रमे 390.60 अंक व 1387.12 अंकांची वाढ होऊन दोन्ही निर्देशांक अनुक्रमे 17576.3 अंक 59307.15 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये एकूण 2.27 टक्क्यांची, तर सेन्सेक्समध्ये 2.39 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.

* सणासुदीच्या खरेदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी. 7 ऑक्टोबरच्या आकडेवारीनुसार बँकांकडे कर्ज मागणी वृद्धीदरात (क्रेडिट ग्रोथ) मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल 17-94 टक्क्यांची वाढ होऊन, भारतातील बँकांकडील कर्ज 128.6 लाख कोटींपर्यंत पोहोचले. बँकेच्या मागणी आकडेवारीनुसार, मागील दहा वर्षांचा हा उच्चांक आहे. तसेच बँकांकडे विविध स्वरूपात ठेवल्या जाणार्‍या ठेवीमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 9.62 टक्क्यांची वाढ होऊन ठेवी 172.72 लाख कोटींवर पोहोचल्या.

* निव्वळ व्याज उत्पन्न (नेट इंटरेस्ट इन्कम) वाढल्याच्या पार्श्वभूमीवर कॅनरा बँक, युनियन आणि सेंट्रल बँकेच्या नफ्यात दोन आकडी वाढ. कॅनरा बँकेचा नफा दुसर्‍या तिमाहीत मागील वर्षीच्या तुलनेत 89 टक्के वधारून 2525 कोटी, तर एनआयआय 18.51 टक्के वधारून 20482.35 कोटी झाला. तसेच एकूण अनुत्पादित कर्जाचे प्रमाण 8.42 टक्क्यांवरून 6.37 टक्क्यांवर आले. युनियन बँकेचा नफा 21.07 टक्के वधारून 1848 कोटी झाला. तर एनआयआय 21.61 टक्केे वधारून 8305 कोटी झाले. तसेच एकूण अनुत्पादित कर्जाचे प्रमाण 12.64 टक्क्यांवरून 8.45 टक्के झाले. सेंट्रल बँकेचा नफादेखील 27 टक्क्यांनी वधारून 318 कोटी झाला. तसेच एनआयआय 24.52 टक्के वधारून 2747 कोटी झाला. सेंट्रल बँक नुकतीच रिझर्व्ह बँकेने घातलेल्या बंधनातून मुक्त झाली.

* देशातील महत्त्वाची सिमेंट उत्पादक कंपनी अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचा चालू आर्थिक वर्षाचा दुसर्‍या तिमाहीचा निकाल जाहीर. निव्वळ नफ्यात 42.46 टक्क्यांची घट होऊन नफा 756 कोटी झाला. कंपनीचा महसूलदेखील मागील वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत 13596 कोटींवरून 11743 कोटींवर खाली आला.

* भारताच्या स्पर्धा आयोगाने (कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया) ‘गुगल’ या आंतरराष्ट्रीय कंपनीवर 1337.76 कोटींचा दंड ठोठावला. काही ठराविक स्मार्ट फोनच्या कंपन्यांना अ‍ॅपस्टोरमध्ये प्राधान्यक्रम देऊन नियमांचा भंग केल्याचा कंपनीवर ठपका.

* देशातील महत्त्वाची खासगी क्षेत्रातील बँक ‘अ‍ॅक्सिस बँक’चा दुसर्‍या तिमाहीचा निकाल जाहीर. बँकेच्या निव्वळ नफा मागच्या वर्षीच्या तिमाच्या तुलनेत तब्बल 70 टक्के वाढून 3133 कोटींवरून 5330 कोटी झाला. बुडीत कर्जे तसेच इतर कारणांसाठी कराव्या लागणार्‍या तरतुदींमध्ये 68 टक्क्यांची घट होऊन तरतुदी (प्रोव्हीजन्स) 1735 कोटींवरून 549 कोटी झाल्या. एकूण अनुत्पादित कर्जांचे प्रमाण 3.53 टक्क्यांवरून 2.5 टक्के तर निव्वळ अनुत्पादित कर्जांचे प्रमाण (नेट एनपीए) 1.08 टक्क्यांवरून 0.51 टक्क्यांपर्यंत खाली आले. निव्वळ व्याज उत्पन्न (नेट इंटरेस्ट इन्कम)देखील 31 टक्के वधारून 7900 कोटींवरून 10.360 कोटी झाले.

* गैरबँकिंग कर्जवाटप क्षेत्रातील (एनबीएफसी) वित्तीय कंपनी ‘बजाज फायनान्स’ला चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत विक्रमी नफा. मागील वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत नफ्यात 88 टक्क्यांनी वाढ होऊन नफा 1481 कोटींवरून 2781 कोटी झाला. एकूण अनुत्पादित कर्जांचे प्रमाण 2.45 टक्क्यांवरून 1.17 टक्के झाले. निव्वळ व्याज उत्पन्न (एनआयआय) 31 टक्के वाढून 5337 कोटींवरून 7001 कोटी झाले. एकूण व्यवस्थापन अंतर्गत भांडवलमूल्य (एयूएम)देखील 1.66 लाख कोटींवरून 31 टक्के वधारून 2.18 लाख कोटी झाले.

* युनायटेड किंग्डममध्ये महागाईचा आगडोंब. सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाई दर (सीपीआय इन्फ्लेशन) मागील 40 वर्षांच्या उच्चांकी पातळीवर म्हणजेच 10.1 टक्क्यांवर पोहोचले. अन्नधान्य/खाद्यान्न वस्तूंच्या दरात थेट 14.5 टक्क्यांची वाढ झाली. आर्थिक समस्या हाताळल्यास असमर्थता दर्शवत ‘युके’च्या पंतप्रधान लिझ स्ट्रस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर केवळ 44 दिवसांत राजीनामा दिला.

* देशातील सर्वात मोठी रंग बनवणारी कंपनी ‘एशियन पेंट’ रंग बनवण्यासाठी लागणार्‍या कच्च्या मालाच्या व्यवसायात 2650 कोटींची गुंतवणूक करणार. दुसर्‍या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 605.17 कोटींवरून 32.83 टक्के वधारून 803.83 कोटी झाला. कंपनीची विक्रीदेखील 7036.51 कोटींवरून 19.81 टक्के वाढून 8430.60 कोटी झाली.

* सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाची बँक ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चा सप्टेंबर तिमाहीतील नफ मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल दुप्पट झाला. मागील वर्षी असणारा 264 कोटींचा नफा या तिमाहीत 535 कोटी झाला. एकूण अनुत्पादित कर्जांचे प्रमाण 5.56 नफ्यावरून 3.40 टक्के झाले. तसेच बुडीत कर्ज व इतर कारणांसाठी करण्यात येणार्‍या तरतुदींमध्ये (प्रोव्हीजन्स) 18.4 टक्क्यांची घट होऊन तरतुदी 927 कोटी झाल्या.

* गत सप्ताहात रुपया चलनाने डॉलरच्या तुलनेत तळ गाठला. रुपया प्रती डॉलर 83.29 रुपये स्तरापर्यंत कमकुवत झाला आणि शुकवारअखेर 82.86 रुपये प्रती डॉलरवर बंद झाला. 14 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर या एका सप्ताहाचा विचार करता, एका सप्ताहात रुपया डॉलरच्या तुलनेत 50 पैसे कमजोर झाला.

* 14 ऑक्टोबर रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश गंगाजळी 4.5 अब्ज डॉलर्सनी घटून 528.36 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली.

  – प्रीतम मांडके  (मांडके फिनकॉर्प)

 

(या पुरवणीत देण्यात येणारे गुंतवणुकीचे सल्ले, लेखक अभ्यास करून देत असतात. पण गुंतवणुकीत जोखीम ही असतेच. ती लक्षात घेऊनच गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचा निर्णय आपल्या जबाबदारीवर घ्यावा.)

 

 

 

Back to top button